यक्षप्रश्न! - संपूर्ण!!

Submitted by अज्ञातवासी on 12 December, 2020 - 12:48

अज्ञात घनदाट अरण्यातून तो वाटसरू झरझर पावले टाकत चालला होता.
वरवर पाहता तो घाईत चालला आहे, असे पाहणाऱ्यास वाटले असते. पण जवळून निरीक्षण केल्यास तो कुठल्यातरी अनामिक भीतीने ग्रासलेला होता.
'त्या जंगलात अनेक नरभक्षक आहेत. सांभाळून राहा.'
त्याला गुरुजींचे शब्द आठवले.
आता मात्र त्याला चालता चालता धाप लागली. त्यामुळे एका डेरेदार वृक्षाखाली तो बसला, व आपल्या झोळीतून त्याने पाण्याची बाटली बाहेर काढली, व तो घटाघटा पाणी पिऊ लागला.
"आम्हासही पाणी मिळेल का?"
त्याने चमकून आवाजाच्या दिशेने बघितले.
एक वृद्ध माणूस त्याच्याकडे याचना करत होता.
त्याने बाटली त्याच्याजवळ दिली. तो वृद्ध घटाघटा पाणी प्याला.
"धन्यवाद तरुणा. या घनदाट अरण्यात जळ मिळणं फक्त त्या परमेश्वराच्या मर्जीवर अवलंबून असतं."
"इथे जवळपास पाण्याचा स्रोत नाही का बाबा?"
"आहे, इथून उत्तरेकडे जवळच एक तळं आहे. त्याचं पाणी अमृताहून मधुर आहे, पण कुणीही ते पाणी आणू शकत नाही."
"का?"
"कारण त्या तळ्यात एक यक्ष निवास करतो. तो कुणालाही त्या तळ्यातल्या एक थेंब पाण्यालाही स्पर्श करु देत नाही. पण जर तू त्याच्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलीस, तर तुला त्या पाण्याची अवीट गोडी चाखायला मिळेल. मात्र लक्षात ठेव. ते पाणी तूच चाखू शकशील. दुसऱ्या कुणासाठी तू पाणी आणू शकणार नाहीस."
"ही तर महाभारतातील कथा झाली बाबा."
"जीवनसुद्धा महाभारतच आहे तरुणा." म्हातारा म्हणाला व संथ पावले टाकत तो दूरवर निघून गेला.
त्या तरुणाने क्षणभर विचार केला, व तो उत्तरेकडे निघाला.
त्याला बहुतेक जास्त श्रम पडले नसावेत, कारण लवकरच ते तळं त्याच्या नजरेस पडलं.
गोलाकार अशा त्या तळ्याच्या बाजूला प्रचंड मोठमोठे वृक्ष पसरले होते. मात्र त्या वृक्षाचं एकही पान तळ्यात पडलेलं नव्हतं.
तळ्यातील अत्यंत नितळ पाणी, बघणाऱ्याला आकर्षित करत होतं. त्याच्या रंगावरूनच कुणाला जलपान करण्याची आकांक्षा उत्पन्न झाली असती.
मात्र सभोवतालचा देखावा भयानक होता. अनेक पुरुषांचे सांगाडे आजूबाजूला पडलेले होते!
तो क्षणभर घाबरला. पण नंतर निर्भयतेने पाणी पिण्यासाठी खाली वाकला.
"थांब तरुणा..."
एक पुरुष त्याच्यासमोर आला. त्याने उंची वस्त्रे परिधान केली होती. रेशमी झगा, रेशमी विजार, असा त्याचा पेहराव होता. सर्व बोटांमध्ये अंगठ्या, अंगावर दागिने, भुवया कोरलेल्या, तोंडावर पांढरी रंगरंगोटी, ओठांवर लाली असा त्याने पेहराव केला होता.
"आपण यक्ष आहात?" तरुण आश्चर्यचकित झाला.
"हो तरुणा. मीच यक्ष."
"आपला पेहराव मात्र तसा वाटत नाही."
"कारण काळ बदलला, तर मलाही बदलावं लागलं. माझे प्रश्न तसेच राहिले. मात्र मी नव्या उत्तरांच्या शोधात निघालो. असो. तुला या पाण्याची आकांक्षा असेल, तर मी जे प्रश्न विचारेन त्याची उत्तरे द्यावी लागतील."
"हो यक्ष महाराज. त्यासाठीच तर मी आलोय."
यक्ष हसला. "ठीक आहे."
"पहिला प्रश्न!"
"मी कोण आहे?"
वाटसरू थोड्यावेळ थांबला.
"तुम्ही यक्ष आहात. जे उत्तर तुम्ही आधीच दिलंय, जेव्हा मी विचारलं होतं, तुम्हीच यक्ष आहात का? तेव्हा!
पूर्वी आपण फक्त शुद्ध चेतना होतात, मात्र आता त्या चेतनेला मीपणा आलाय, म्हणून तुम्ही यक्ष आहात."
"तरुणा." यक्ष हसला. "तुझं बुद्धीचातुर्य अद्वितीय आहे. या पाण्याची चव तूच चाखू शकशील, असा मला विश्वास वाटतो."
दुसरा प्रश्न!
"तू कोण आहेस?"
वाटसरू हसला.
"माझाही मी पणा शाबूत आहे. म्हणून मी महान गुरू अद्वैतमुनी यांचा पट्टशिष्य सर्वज्ञ आहे व माझ्या अध्ययनातला शेवटचा टप्पा म्हणून गुरू ब्रम्हपुत्र यांना शोधायला निघालोय."
आता यक्ष हसला.
तिसरा प्रश्न!
"जीवनाचा उद्देश काय आहे?"
"एखाद्या उद्देशासाठी जीवन समर्पित करणं, हाच जीवनाचा उद्देश आहे."
चवथा प्रश्न!
"जन्माचं कारण काय?"
"अपूर्ण उद्देशांची पूर्तता करणं, हेच जन्माचं कारण आहे."
पाचवा प्रश्न!
"जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त कोण आहे?"
"ज्याला कुठलाही उद्देश नाही, तोच या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त आहे."
सहावा प्रश्न!
"वासना आणि जन्माचा काय संबंध आहे?"
"वासनेच्या पूर्ततेसाठीच जन्माची निर्मिती झाली आहे."
"जगात दुःख का आहे?"
"जगात अपेक्षा आहेत, म्हणून दुःख आहे."
"परमेश्वराने दुःखाची रचना का केली?"
यावर वाटसरू गडबडला. मात्र तरीही तो धैर्याने म्हणाला.
"सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नसतात, हे मानवाला कळावं म्हणून!"
"वाह!" यक्षाच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.
"परमेश्वर अस्तित्वात आहे?"
"हो आहे."
"तो स्त्री आहे की पुरुष?"
"तो निरपेक्ष आहे. लिंगनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, स्वरूपनिरपेक्ष!"
"तरुणा, तुझ्या बुद्धीवर मी प्रसन्न झालोय.
आता शेवटचा प्रश्न!" यक्ष आनंदाने म्हणाला.
"आपल्या दोघांमध्ये बुद्धिमान कोण, आणि मूर्ख कोण?"
"मीच बुद्धिमान आणि मीच मूर्ख. बुद्धिमान मी यांच्यासाठी, की आपल्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर मी दिलं,
आणि मूर्ख याच्यासाठी की मला आधीच कळायला हवं होतं, की त्या वृद्धाने या पाण्याची चव चाखलीये. कारण हे पाणी गोड की कडू हे चाखल्याशिवाय कसं कळणार? याचाच अर्थ तो कधीही हे पाणी चाखू शकत होता. पण तरीही त्याने माझ्याकडे पाणी मागितलं, आणि इथल्या पाण्याची कथा सांगितली. कारण त्याला वाटत होतं, मी इथे यावं, आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत म्हणजे जर मी चुकलोच, तर या सर्व लोकांप्रमाणेच मृत्यू पावेन!"
"तरुणा! मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. सगळी उत्तरे तू बरोबर दिलीत. जा, यशस्वी हो. तूच हे पाणी चाखू शकशील. मनसोक्त अमृतप्राशन कर!" यक्ष आनंदातिरेकाने म्हणाला.
तरुण आनंदाने खाली वाकला, व घटाघटा पाणी पिऊ लागला...
...व पुढच्याच काही क्षणात त्या विषारी पाण्याच्या प्रभावाने तो काळा पडून गतप्राण झाला...
हे बघून कितीतरी वेळ झाडाच्या मागे लपलेला तो वृद्ध समोर आला...
'तुला इथे आणणं ही फसवणूक नव्हती तरुणा, तुझ्या बुद्धिमतेच्या गर्वाने तुला वास्तवाचाही विसर पडावा, व समोरच्या सांगाड्यांचाही तुझ्यावर परिणाम न व्हावा, हीच तुझी फसवणूक होती.' वृद्ध स्वतःशीच म्हणाला.
...व त्या दोन्ही नरभक्षकांनी त्याचे तुकडे करायला सुरुवात केली...

समाप्त!!

(जी ए कुलकर्णी यांना समर्पित)
(महाभारतातील यक्ष - युधिष्ठिर संवादावर आधारित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी

जबरदस्त कथा!!
तुमच्या लेखन कौशल्याला नमस्कार!!

छान आहे.
नरभक्षक असले तरी, विषारी मांस खातात का असा प्रश्न पडला.

जबरदस्त कथा!!
तुमच्या लेखन कौशल्याला नमस्कार!!-- +111111
किती सुचतं तुला..

मस्त.

क्षणभर घाबरला. पण नंतर निर्भयतेने पाणी पिण्यासाठी खाली वाकला.
"थांब तरुणा..."
>>>एक प्रश्न..इथेच मेला असता की तो.. थांबवला कशाला...

खरं सांगायला गेलं तर ही कथा एकटाकी म्हणावं अशी लिहिली गेली. जास्त विचार न करता.
खूप दिवसांनी काहीतरी जुन्या टाईपच लिहिल्याच समाधान आहे. Happy
आता अनेक प्रश्न मलाही पडले लिहिताना. त्यापैकी दोन प्रश्न वर आलेच आहेत.
१. त्या नरभक्षकांवर विषाचा परिणाम होत नाही का?
- जस्ट एक फॅन्टसी फिक्शन म्हणून बघितलं,तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
२. तो आधीच पाणी प्यायला वाकला असता, त्याला थांबवलं का?
- अनेक कारणे असू शकतात. मेबी उंदराला मारण्यापूर्वी मांजर त्याला खेळवते, अशा टाईपच असू शकेल.
पण जर deeply विचार केला, तर अनेक कंगोरे निघू शकतात. हे मला वाचकांच्याच शब्दात वाचायला आवडेल. किंवा यावर एक विक्रम वेताळ स्टोरी लिहावी का? Wink

@अस्मिता - धन्यवाद!
@chraps - धन्यवाद! असा काही टच नाही आहे, मेबी आय एम टू predictable Wink
@ हरचंद पालव - धन्यवाद!
@ गार्गी - धन्यवाद!
@सांज - धन्यवाद!
@रुपाली - धन्यवाद! आपल्या कौतुकाचा मी नम्रपणे स्वीकार करतो Happy
@मेघा - धन्यवाद! रिकामपणाचे उद्योग, दुसरे काय?
@मी अश्विनी - धन्यवाद!
@बोकलत - धन्यवाद!
@भाग्यश्री - धन्यवाद!
@आनंदा - धन्यवाद!
@आसा - धन्यवाद!
@mrunali - धन्यवाद!
@च्यवनप्राश - धन्यवाद!
@VB - धन्यवाद
@यक्ष - नोटेड Happy धन्यवाद.
@मन्या - धन्यवाद
@सुखी - धन्यवाद