हाडळ आली...

Submitted by वीरु on 7 December, 2020 - 13:24

सत्तरी पार झाली तरी भागाबाईचा संसारातला रस काही कमी होत नव्हता. घरातली प्रत्येक गोष्ट आपल्या सल्ल्यानेच व्हायला हवी असा तिचा नेहमीच अट्टाहास असायचा, नव्हे तसा नियमच होता तिचा. बरं घरात कशाची ददात होती असही काही नव्हतं. गोठ्यात बारा पंधरा गाई म्हशी नांदत होत्या त्यामुळे दुध-दुभत्याला तोटा‌ नव्हता. शेतातल्या दोन्ही विहिरी बारामाही भरलेल्या असायच्या. तिचे तिन्ही मुले-सुना तिच्या शब्दाबाहेर नव्हते. सगळ्यांना भागाबाईने केलेल्या कष्टांची जाणीवही होती, पण आता थोडं तरी संसारातुन लक्ष‌ कमी करावं आणि आम्हाला थोडी मोकळीक द्यावी असं त्यांना विशेषत: सुनांना सारखं वाटायचं. 'आमची मुलं लग्नाच्या वयाला आली पण आमचा सासुरवास काही संपत नाही. आम्ही संसार करावा तरी केव्हा?' अशी मोठ्या अन् मधल्या सुनेची आपापल्या नवऱ्यांजवळ कुरकुर असायची. आत्याबाईंनी इतर म्हाताऱ्यांसारखा तास दोन तास वेळ गावातल्या विठ्ठल मंदीरात घालवावा, थोडं देवाचं नाव घ्यावं असं त्यांना मनापासुन वाटायचं. एकदोनदा मोठ्या सुनेने आपल्या मुलाला सांगुन त्याच्या आजीला मोटरसायकलवरून मंदिरात पोहचवलंही, पण नातु घरी परतायच्या आधी आजी घरात हजर.. त्यामानाने तिसऱ्या म्हणजे सगळ्यात लहान सुनेचं बरं होतं. ती शिक्षिका होती आणि बदलीच्या गावालाच रहायची त्यामुळे तिची फारशी तक्रार नव्हती.
‌भल्या पहाटे तुळशीला पाणी घालतांना भागाबाई देवाचं नाव घेण्याऐवजी घरातल्यांना ज्या सूचना सुरु करायची त्या थेट रात्री सगळं गाव झोपी गेल्यावरच संपायच्या. मुला-नातवंडांचं ठीक होतं कामधंदा, शिक्षणामुळे काही काळ त्यांची घरापासुन सुटका व्हायची. पण दोन्ही सुनांना कामापासुन पाच मिनीट उसंत मिळाली तर जगबुडी येईल की काय असं भागाबाईला वाटायचं. शेतीचे कामं निघाले की दोन्ही सुनांचे 'मी जाते शेतात. तु थांब आत्याबाईजवळ' असं सुरु व्हायचं. शेतात जरी
अंगमेहनतीचं काम असलं तरी थोडीफार उसंत तरी मिळायची. म्हणुन शाळेला सुट्या लागुन लहान सुन घरी आली की या दोघी काही ना काही कारणं सांगुन शेतात पळायच्या. भागाबाईला त्यांची चलाखी समजायची नाही अशातला भाग नव्हता, पण थोडंफार शेताकडे लक्ष रहातं म्हणुन ती गप्प बसायची. पण जेव्हा गावात मोबाईल टॉवर आला आणि वावराच्या कानाकोपऱ्यात मोबाईलला रेंज मिळते असं नातवंडांच्या बोलण्यातुन भागाबाईला समजलं तेव्हा तीने पोरांना सांगुन दोन्ही सुनांना मिळुन एक मोबाईल मागवुन घेतला. "काय वो आत्याबाई, आमाला कशाला पायजे मोबाईल-बिबाईल. लोकं काय म्हणतील. घरात लॅण्डलाइन हाये ना बोलायला." मनातुन खुष होत सुनांनी सांगितलं. "आगं पोरीनो, मंग तुमची कधी हौस होईल? म्हतारेकोतारे पण वापरतात मोबाईल." भागाबाई मोठ्या मनाने म्हणाली. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी मोठी सुन शेतावर जायला निघाली तेव्हा तिच्या हातात भागाबाईने आठवणीने मोबाईल ठेवला. 'काय झालंय म्हातारीला. इतकी कशी सुधरली' असं मनात म्हणत मोठी सुन शेतात पोहचली खरी पण आपण काय ब्याद सोबत आणलीये हे तीला दर अर्ध्या तासाने जेव्हा भागाबाईचा फोन यायला लागला तेव्हा समजायला लागलं.
एप्रिल महिन्यातले दिवस होते. रात्रीचे आठ वाजुन गेले होते तरी उकाडा जाणवत होता. अशातच लाइट गेलेले त्यामुळे पंखे बंद, घरात बसायची सोय नव्हती. म्हणुन जेवनखान आटपुन भागाबाई हाश्शहुश्श करत बाहेर अंगणात मोठ्या नातवाबरोबर बोलत बसली होती. बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. मधुनच एखादं कुत्रं भेसुर आवाजात केकाटायचं, मध्येच लांबुन कुठुनतरी घुबडांचा घुत्कार ऐकु यायचा, टिटव्या कर्कशपणे टिवटिव करत उडत जायच्या त्यामुळे वातावरणात एकप्रकारची गुढता निर्माण झाली होती. अशातच एक विचित्र आकृती वेगाने आपल्या घराच्या दिशेने सरकत असल्याचे भागाबाईला दिसली. ती आकृती जशी जवळ येऊ लागली तशी तिचं डोकं शरीराच्या मानाने खुपच मोठं असल्याचे मिट्ट काळोखातही भागाबाईला जाणवताच तिने आपल्या नातवाला कापऱ्या आवाजात "बबल्या पळ.., हाडळ आली.." असं सांगुन जोरात किंकाळी फोडली आणि ती बेशुध्द झाली. इकडे भागाबाईची किंकाळी ऐकुन पलीकडे ती आकृतीही त्याहुन अधिक आवाजात किंचाळली त्याच वेळी आपली आज्जी गेली असं वाटुन बबल्यानेही मोठ्याने हंबरडा फोडला. एकापाठोपाठ एक अशा दोन किंकाळ्यांनी आणि बबल्याच्या रडण्यामुळे गल्लीतल्या कुत्र्यांनीही बिथरुन जोरात गळा काढला. हा सगळा गोंधळ ऐकुन भागाबाईच्या घरातले तसेच आजुबाजुची काही धाडशी मंडळी हातात काठ्या, कंदील आणि मिळेल त्या वस्तु घेऊन धावत आली तर बाकीच्यांनी हळुच आपल्या घरांचे दरवाजे बंद करुन घेतले.
इतक्यात इतका वेळ गेलेली लाईट आली आणि सगळ्यांना खाटेवर बेशुध्द पडलेली भागाबाई, तिच्याकडे पहात रडणारा नातु आणि अंगणात खापर डोक्यावर घेऊन थरथर कापत बसलेली धाकटी‌ सुन असे दृश्य दिसले. लगेच दोन बायांनी अंगणात बसलेल्या सुनबाईला हात करुन घरात आणले. काहींनी भागाबाईच्या तोंडावर पाणी मारुन तिला शुध्दीवर आणले.
थोडी शांतता झाल्यावर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. झालं असं होतं की, बदलीच्या गावी असलेली धाकटी सुनबाई शाळेला कसलीतरी सुट्टी असल्याने इकडे यायला निघाली. बदलीच्या गावाला पुरणपोळ्या बनवण्यासाठी लागणारे मातीचे खापर स्वस्तात मिळायचे. 'आता जातोच आहोत तर घरासाठी घेवुया एखादे खापर' असा विचार करुन तिने एक छानसे खापर विकत घेतले आणि एस्टी बसने इकडे यायला निघाली. येतांना रस्त्यात बस बंद पडल्याने पोहचायला रात्र झाली. स्टँडवर उतरुन पहाते तर लाइट नाही आणि मोबाईलची बॅटरीही संपलेली. मग खापर डोक्यावर ठेवुन तिने देवाचं नाव घेत भराभर चालायला सुरुवात केली. घर जवळ आलेले पाहुन तिला हायसे वाटले खरे पण अचानक एक जीवघेणी किंकाळी ऐकुन तिच्या पायातले त्राणच गेले, आणि ती तेथेच घाबरुन मटकन खाली बसली. पुढे काय झाले तिलाच आठवत नव्हते. इकडे भागाबाईला डोक्यावर खापर घेऊन वेगाने येणारी सुनबाई अंधारामुळे काहीतरी भयानक प्रकार वाटली आणि ती बेशुध्द पडली.
त्या दिवसापासुन भागाबाई फारसं कोणाशी बोलत नाही. दिवसभर देवाचं नाव घेत बसते. आणि दोन्ही सुना हळुच बबल्याला विचारतात "त्या रात्री तुझ्या आजीला काय दिसलं होतं रे?"

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी कथा ...
खमकी सासू एक नंबर उभी केलीयं कथेत...

मस्त

धन्यवाद मानवजी.
पुढच्या वेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन.