सावली - भाग २

Submitted by सांज on 7 December, 2020 - 01:44

मल्हारचे एव्हाना दोन-तीन स्पॉट्स अभ्यासून झाले होते. तो घरीच बसून मिळालेला डाटा प्रोसेस करत होता. मनस्विनी आणि मुक्ता नसल्यामुळे त्याला खरंतर थोडंसं बोअरच होत होतं. सतत रियाजात मग्न मुक्ताला आणि तिच्या तिरकस बोलण्याला तो मिस करत होता. खरंतर मल्हार त्याच्या कामाच्या बाबतीत प्रचंड passionate होता. लहानपणापासूनच झाडं-प्राणी-पक्षी यांच्यामध्ये रमायचा. मोठं झाल्यावर मग रुळलेल्या वाटा न निवडता त्याने त्याच्या या आवडीलाच त्याचं करियर म्हणून निवडलं आणि थेट नावाजलेल्या लंडन वाइल्डलाइफ इंस्टीट्यूट पर्यन्त जाऊन पोचला. त्याचं काम तिथे वाखाणलं जात होतं. धाडस, झोकून देण्याची वृत्ती, सतत नाविण्याचा ध्यास, प्रवास, जग पाहण्याची तीव्र इच्छा.. या सगळ्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरायचा. एका ठिकाणी सेटल वगैरे होऊन स्वप्नपूर्ती साठी रिटायरमेंटची वाट पाहणार्‍यांपैकी तो नव्हता. बेभान होऊन मन मानेल तिकडे वार्‍यासारखं वाहण्यात त्याला थ्रिल वाटायचं. एका ठिकाणी फारसा तो कधी रमायचाच नाही. इथेही खरंतर सुरूवातीचे 1-2 आठवडे मनस्विनीकडे राहून नंतर बेस गोव्यात मित्राकडे हलवून पुढचं काम करण्याचा त्याचा विचार होता. पण त्या पहाटे पारिजातकाच्या सड्यामध्ये उभ्या मुक्ताला पाहिल्या नंतर कसा कोण जाणे त्याचा प्लान बदलला आणि पूर्णवेळ इथेच मुक्काम ठेऊन बाकी फील्ड स्टडी साठी येत जात राहायचं असं त्याने ठरवलं.

पडदा पूर्ण वर सरकला. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मनस्विनीने नेहमीप्रमाणे एक-दोन मिनिटातच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. अभोगी मधली ती चीज तिच्या एकेका मुद्रेतून, विभ्रमातून, पदलालित्यातून जणू जिवंत होत होती. हळूहळू सुर, ताल आणि ती अभिन्न होत गेले आणि सभागृह मंत्रमुग्ध झालं. मुक्ता तिला साथ देत होती म्हणजे तसा प्रयत्न करत होती. पण तिच्या देहबोलीत आज काहीतरी न्यून होतं. तिची पावलं तालात जरूर थिरकत होती, ती चीजही तिच्यात तितकीच झिरपलेली होती.. तरीपण.. ‘आपलं काही चुकणार तर नाही?’ हा विचार तिच्या मनात सतत चालू होता आणि तोच तिच्या नृत्यावर परिणामही करत होता. शेवटाकडे येता येता एक दीर्घ चक्र दोघींनी घेतलं आणि ते घेता घेता मुक्ताची नजर अरुंधतीकडे गेली. अरुंधती तिच्याकडे रोखून पाहत होती. तिच्या त्या नजरेत का कोणास ठाऊक मुक्ताला स्वत:ची हार दिसू लागली. आणि त्या विचलित अवस्थेत शेवटची तिची सम क्षणभराच्या फरकाने हुकली.. मनस्विनीच्या ते लक्षात आलं, तिने अत्यंत चपळाईने मुक्ताची बाजू सांभाळून घेत आणखी एक तीव्र चक्र घेऊन त्या नृत्याविष्काराचा शेवट केला. इतर कोणाच्या लक्षात आलं नसलं तरी अरुंधतीच्या नजरेतून मात्र हे सुटलं नाही. पूर्ण सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. अरुंधती मात्र तिच्या त्याच भेदक नजरेने मुक्ताकडे पहात राहिली. .

यथावकाश कार्यक्रम पार पडला. नंतरच्या डिनरसाठी सगळे जमलेले असताना मुक्ता एकटीचं कोपऱ्यातल्या टेबलाशी पाण्याचा ग्लास हातात घेऊन सुन्न बसून होती. मनस्विनी भोवती सगळ्यांचा गराडा होता. बऱ्याचं दिवसांनी भेटी होत असल्याने ती गप्पा-गोष्टीत दंग होती.

एकटक हातातल्या अर्ध्या रिकाम्या ग्लासकडे पहात असताना, मुक्ताच्या कानांवर ओळखीचा आवाज आला,

“सो.. धीस इज इट?”

मुक्ताने वळून पाहिलं, तिच्यामागे विजयी मुद्रेने तिच्याकडे पहात अरुंधती उभी होती.

“काय?” तिच्या बोलण्याचा रोख न कळून मुक्ता म्हणाली.

“म्हणजे यासाठी मला सोडून आलीस तू?”

“नक्की काय म्हणायचंय आई तुला?” मुक्ताने विचारलं.

“मला हेचं म्हणायचंय ‘मुक्ता चैतन्य’, की तुमच्यात मला शूण्य प्रगती दिसतेय! माझ्याकडे होतीस तेव्हाही अशीचं होतीस.. लो कॉन्फिडन्स.. नो शार्प मुव्हमेन्ट्स.. लॉस्ट माइंड.. अँड ग्रेसलेस डान्स!! ज्या आवेगाने तू निघून आलीस, आय वॉज इक्सपेक्टींग सम सरप्रायजेस! बट यू डिसअप्पोइंटेड मी.. अगेन!”

मुक्ताचं मन आधीचं तिला खात होतं त्यात अरुंधतीच्या या अशा बोलण्याने तिला अजून थिजल्या सारखं वाटू लागलं.. ती तशीचं मान खाली घालून उभी होती, कुठल्याही क्षणी रडू कोसळेल अशा अवस्थेत!

तितक्यात परिस्थितीचा अंदाज घेऊन मनस्विनी तिथे आली आणि मुक्ताला एका हाताने स्वत:जवळ घेत ती म्हणाली,

“मुक्ता यू वर अमेझिंग टुडे! द वे यू हॅंडल्ड युअरसेल्फ दॅट वॉज व्हेरी ब्रेव्ह बेटा..!”

भरल्या डोळ्यांनी मनस्विनीकडे पहात तिने हसण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.

“नाऊ आय अंडरस्टॅंड.. गुरुनेच असं डोक्यावर चढवून ठेवलंय म्हटल्यावर साहजिक आहे शिष्यांकडून अशा चुका होणं!” अरुंधती म्हणाली.

तिच्याकडे रोखून बघत मनस्विनी किंचित हसली आणि मग तिच्या नजरेत नजर मिळवून म्हणाली,

“वर्ष १९८५, स्थळ सेंट्रल हॉल, पुणे.. ललित कला केंद्राचा कार्यक्रम.. स्टेजवर पद्मिनी ताईंबरोबर तरुण अरुंधती आणि त्यांची आणखी एक शिष्या.. दोघींचा पहिलाचं मोठा परफॉर्मेंस.. पहिला तीन ताल झाल्यावर दुसऱ्या आवर्तनाच्या वेळी अरुंधती चक्क मिनीटभर ब्लॅंक झाली! तिला काही सुचेचना. एकदम घामेघूम! पण पद्मिनीताईंनी हुशारीने त्या ब्लॅंक होण्याला अभिनयाचाच भाग बनवलं आणि तिला पुन्हा नृत्यात सामावून घेतलं!.... आठवतंय ‘अरुंधती जी’?”

अरुंधती क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिली. आणि मग सावरुन म्हणाली,

“स्मरणशक्ती उत्तम आहे अजून तुझी, मनस्विनी!”

“हो अर्थात! तुला सगळ्याचा विसर पडला म्हणून काय झालं.”

“सगळं लक्षात आहे माझ्या! पण मुक्ताची माझ्या सोबत तुलना करु नकोस तू!”

“का? त्रास झाला? आणि तसंही मी मुक्ताची तुझ्याशी तुलना कधीचं करणार नाही! मी फक्त पहिल्यांदा मोठ्या कार्यक्रमात पर्फाॅर्म करणाऱ्या दोन नवोदित नर्तिकांची तुलना केली.. तेव्हा ती तू होतीस आणि आता मुक्ता आहे बास!”

मुक्ता या दोघींचा हा असा संवाद पाहून अवाक् झाली. एका क्षेत्रातल्या असल्यामुळे त्या दोघी एकमेकींना ओळखत असणार इतपतच तिची समज होती. पण हे असं एकमेकींशी एकेरी बोलणं, जुनी गाढ ओळख असल्यासारखं वागणं तिच्यासाठी जरासं नवीनच होतं. न राहवून ती म्हणाली,

“तुम्ही दोघी ओळखता एकमेकींना पूर्वीपासून?”

तिच्या या प्रश्नानंतर मनस्विनीकडे एक करकरीत कटाक्ष टाकून अरुंधती तिथून निघून गेली. पण यावेळी मात्र तिच्या नजरेत पराभव होता, तिचा स्वत:चा!

तिच्या अशा निघून जाण्याने मुक्ता मात्र विचारात पडली आणि प्रश्नार्थक नजरेने तिने मनस्विनीकडे पाहिलं. तिचा गोंधळ उमगुन मनस्विनी तिला म्हणाली,

“त्या कार्यक्रमातली पद्मिनी ताईंची ती दुसरी शिष्या मी होते!”

आता मुक्ता चांगलीच आश्चर्यचकित झाली.

“म्हणजे, तुम्ही दोघी गुरु-भगिनी आहात? इतकी जुनी ओळख आहे तुमची एकमेकींशी? मला कधीचं काहीचं का नाही बोललात तुम्ही?”

“त्याने काही फरक पडला असता का?”

“नाही तसं नाही.. पण..”

“झालं तर मग.. चल निघुया?”

“हो..”

मुक्ता सावरुन म्हणाली आणि मग दोघी तिथून बाहेर पडल्या.

परत आल्यावर मुक्ताचं लक्ष कशातच लागेना. सतत डोळ्यांसमोर अरुंधतीचे शब्द उमटू लागले. सहा वर्षे अहोरात्र मेहनत करुन जर स्टेजवर आपलं ततपप होणार असेल तर खरंच काय अर्थ आहे या मेहनतीला? ज्या जिद्दीने आपण घराबाहेर पडलो ती जिद्द इतकी विफल ठरावी? आपण नक्की काय साध्य केलं? यासारखे कितीतरी प्रश्न सतत तिच्या मनात पिंगा घालू लागले. अरुंधती कितीही कठोर, निर्दयी वाटत असली तरी ती म्हणतेय ते खरंच तर आहे की असंही तिला वाटून गेलं. इतके मोठे दावे करुन शेवटी आपण एक अतिसामान्य परफॉर्मेंस देऊन परत आलो याचं वैषम्य तिच्या मनात खोल रुतलं होतं. ती रियाज करेनाशी झाली. कुठल्यातरी पुस्तकात तोंड खुपसून तास अन् तास विचार करत बसू लागली. आपल्या जिवीताचं कारणच कोणीतरी आपल्यापासून हिरावून घ्यावं अशी तिची अवस्था झाली. मनस्विनीला तिच्याकडे पहावेना. तिने तिला समजावून पाहिलं, प्रोत्साहित करुन पाहिलं, प्रसंगी रागावूनही पाहिलं पण या कशाचाच म्हणावा तसा परिणाम मुक्तावर होत नव्हता. ती अजून अजून गप्प गप्प होत गेली..

मुक्ताची ती अवस्था पाहून मनस्विनी आता चांगलीच चिंतेत पडली. देश पातळीवर मानाची समजली जाणारी अभिजात कथ्थक स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली होती. ती जिंकणं हे मुक्ताचं ध्येय होतं. देशभरातले अव्वल स्पर्धक त्यात दरवर्षी भाग घेतात. अतिशय कठीण समजली जाणारी ही स्पर्धा उदयोन्मुख कलाकारांसाठी स्वत:ला सिद्ध करण्याचं एक दर्जेदार साधन होतं. आणि गमतीची गोष्ट ही की, गेल्या वर्षीचा अपवाद सोडला तर त्या आधीची सलग दहा वर्ष स्पर्धा मनस्विनीच्या शिष्यांनीच जिंकली होती. मनस्विनीचा हा लौकिक आणि तिचं प्रवाहाविरुद्ध जाऊन स्वत:चं असं अढळ स्थान निर्माण करणं यामुळेच तर मुक्ताने सहा वर्षांपूर्वी अरुंधतीच्या नकळत मनस्विनीच्या ‘लास्या’ कथ्थक अकादमी ची प्रवेश परीक्षा दिली आणि सिलेक्ट झाल्यावर तडक बॅग भरून इथे येऊन शिकायला दाखल झाली. तिचं नाव फॉर्मवर पाहून मनस्विनीलाही आधी आश्चर्यचं वाटलं होतं.. तिनेही मग एक काकण जास्तच कठीण परीक्षा घेतली मुक्ताची पण मुक्ता त्यात उत्तीर्ण तर झालीच वर तिच्या त्या बेधडक अंदाजाने तिने मनस्विनीला मोहितही केलं होतं. पण तेव्हाची ती ध्येयाने पछाडलेली मुक्ता मागच्या एक-दोन वर्षात मात्र कुठेतरी हरवल्या सारखी वाटत होती. काहीच अभ्यास न करता आधीच्या तोडक्या ज्ञांनाच्या आधारावर जे होईल ते पाहू असं म्हणून दिलेली परीक्षा आणि खूप, अगदी रात्रंदिवस अभ्यास करून, सतत परीक्षेचाच विचार डोक्यात ठेऊन, भरपूर ज्ञान साठवून शेवटच्या क्षणी नर्वस होऊन दिलेली परीक्षा असा काहीसा फरक मुक्ताच्या तेव्हाच्या आणि आत्ताच्या वागण्यात दिसत होता.

घरातलं हे असं टेंस्ट वातावरण मल्हारच्या नजरेतूनही सुटलं नव्हतं. मुंबईहून आल्यापासून दोघी अगदीच शांत शांत होत्या. मुक्ताची अवस्था पाहून तिला डिरेक्टली त्याने काही विचारलं नाही. पण, त्या दिवशी सावंतवाडीहून परतल्यावर रात्री मनस्विनीचा काळजीने भरलेला चेहरा पाहून त्याने तिला न राहवून विचारलं,

“मनू मावशी, नक्की काय झालंय? तुम्ही मुंबईहून परतल्यापासून पाहतोय मी, दोघीही लॉस्ट आहात. काही घडलंय का तिथे?”

मनस्विनीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली,

“मुक्ताला कॉन्फिडंस यावा म्हणून घेऊन गेले रे मी तिला हट्टाने माझ्यासोबत. पण घडलं उलटच! तिचं हे असं स्वत:ला मिटून घेणं खूप छळतय मला. माझी एक गुणी शिष्या माझ्या डोळ्यांदेखत हरत जाताना पाहतेय मी. आणि मला कळत नाहीये, काय केलं म्हणजे मला ती पूर्वीची मुक्ता परत मिळेल!”

“अगं हो.. पण झालंय काय नक्की?”

“तिचा तिथला परफॉर्मेंस म्हणावा तसा झाला नाही. घाबरली, गोंधळली, चुकली. आणि हे सगळं अरुंधतीच्या समोर झालं, त्यामुळे ते तिच्या अजूनच जिव्हारी लागलंय. खरंतर पहिल्या वेळी हे असं होणं अगदी स्वाभाविक आहे रे पण ही पोर मानायलाच तयार नाही. गेली सहा वर्षं पछाडल्या सारखा रियाज आणि अभ्यास केलाय पोरीने. पण या माय-लेकींचा काय वाद झालाय काय माहीत मागच्या दिवाळीत. तेव्हापासून बिथरलीये नुसती.”

“ओहह..” मल्हार विचारात पडला.

“आधी वेड्यासारखा रियाज करायची. थोडी विश्रांती घे म्हणावं लागायचं मला. आणि आता सगळंच सोडून दिल्यासारखी वागतेय. दोन महिन्यांवर नॅशनल कोंपिटिशन आलीये आणि हिची ही अवस्था. यावर्षी पहिल्यांदा भाग घेणार होती. जिंकून अरुंधतीला दाखवून द्यायचं होतं तिला की ती सुद्धा काहीतरइ करू शकते तेही स्वत:च्या बळावर! पण आता..”

“पण त्या अरुंधती अय्यरचं आणि हिचं इतकं का वाकडं आहे गं? म्हणजे कुठली आई आपल्या मुलीशी इतकं कठोर वागते!” मल्हार विस्मयाने म्हणाला.

यावर एक मोठा सुस्कारा सोडून मनस्विनी म्हणाली,

“माणूस एका ठराविक उंचीवर पोचला ना मल्हार, की तो त्या उंचीच्या ओझ्याखाली दबायला लागतो. स्वत:ची ‘इमेज’ जपण्याच्या नादात खुद्द स्वत:लाचं हरवून बसतो. आपलीच सावली आपल्यापेक्षा मोठी होत जाते मग. अरुंधतीचंही असच काहीतरी झालंय. आणि या सार्‍याची शिकार मात्र झालीये मुक्ता. तिचं लहानपण घुंगरांच्या नादामध्ये हरवून गेलंय. सतत अरुंधतीच्या अपेक्षांना खरं उतरण्याची धडपड! कोमेजून गेलीये बिचारी. अरुंधतीही तशी वाईट नाही रे.. पण आधीच तिचा स्वभाव महत्वाकांक्षी, त्यात तिला भरगोस यश मिळत गेलं आणि ती त्याच्या आधीन झाली. स्वत:च्या मुलीचं असं स्वत:ला सोडून जाणं आणि कुठे तर तेही माझ्याकडे? हे सगळं तिच्याही जिव्हारी लागलं असणार! इगो दुखावला असणार! सो या सगळ्याचं फलित आहे माय-लेकींमधलं हे शीत-युद्ध! पण या सगळ्यात मुक्ताचं करियर विस्कटू नये इतकच वाटतंय.”

“हम्म.. मी बोलून बघू का तिच्याशी..” मल्हारने विचारलं.

“बघ.. तुम्ही एका वयाचे आहात. ऐकलं तुझं तिने तर चांगलंच आहे.”

सकाळी मल्हार जरासा उशीराच उठला. बाल्कनीतुन त्याला मुक्ता दिसली. घुंगरू बाजूला पडलेले होते आणि ती कठड्यावर बसून पक्षांना दाणे टाकत होती. तो आवरून खाली आला, मस्त कॉफी बनवली आणि दोन मगांमध्ये ओतून मुक्ता बसली होती तिथे आला.

“कॉफी?” मग तिच्यापुढे धरत त्याने विचारलं.

मुक्ताने आधी कॉफी कडे पाहिलं आणि मग मान वर करून मल्हारकडे. पण काहीच बोलली नाही. मल्हार पुढे म्हणाला,

“अगं, घे घे.. चांगली कॉफी बनवतो मी. माझी शेवटची गर्लफ्रेंड माझ्या कॉफी मुळेच माझ्या प्रेमात पडली होती.”

यावर जरासं चकित होऊन तिने तो मग हातात घेतला आणि त्याला बसायला थोडी जागा करून म्हणाली,

“शेवटची म्हणजे नक्की किती होत्या?”

त्यावर मोठयाने हसून तो म्हणाला,

“मुलींच वय आणि मुलांच्या गर्लफ्रेंड्स यांचा काऊंट विचारायचा नसतो असं म्हणतात!”

त्यावर किंचित हसून मुक्ता म्हणाली,

“अच्छा हो का.. कोण म्हणतं असं?”

“आहेत एक थोर विचारवंत, जग त्यांना मल्हार साठे या नावाने ओळखतं!”

“हाहा विचारवंत.. बसा खाली.” मुक्ता खळखळून हसली.

तिच्या त्या हसण्याकडे पहात मल्हार तिला म्हणाला,

“तुला या आधी कोणी सांगितलंय का?”

त्याला मध्येच तोडत मुक्ता हसून त्याला म्हणाली, “की मी खूप छान हसते वगैरे? हाहा डोन्ट ट्राय.. मी काही ही कॉफी पिऊन तुझ्या प्रेमात वगैरे पडणार नाहीये!”

“ओहह शिट.. कित्ती कष्टाने कॉफी बनवली होती मी.. ऑल वेंट इन वेन!” आणि मग यावर दोघेही हसले.

“हसत जा गं.. चांगलं असतं तब्येतीसाठी! लाइफ इज प्रेशस, डोन्ट वेस्ट इट ओवरथिंकिंग ऑर वर्यींग अबाऊट द थिंग्ज यू कॅन नॉट कंट्रोल!” मल्हार मुक्ताकडे पहात म्हणाला.

त्यावर जराशी सीरियस होत, मुक्ता म्हणाली.. “यू डोन्ट नो एनिथिंग अबाऊट मी मल्हार!”

“आय नो ‘यू’! एव्रिथिंग एल्स डझंट मॅटर!”

मुक्ताने क्षणभर त्याच्याकडे वळून पाहिलं, तो जे म्हणत होता ते तिच्यासाठी नवीन होतं..

“हे असं फक्त ‘मला’ ओळखण पुरेसं आहे? विदाउट नोइंग माय बॅकग्राऊंड, माय अपब्रिंगिंग अँड ऑल दॅट स्टफ??”

“हो.. नक्कीच! माझ्यासाठी तरी आहे.”

मुक्ताला त्याच्या नजरेत एक वेगळीच आश्वस्त ओळख दिसली. तो पुढे म्हणाला,

“आणि एक सांगू मुक्ता? तुझ्यासाठीही तेवढच पुरेसं असायला हवं! हे असं सतत भूतकाळाचं ओझं वाहनं सोडून दे. तू इतरांकडून किंवा तुझ्या आईकडून जी अपेक्षा करतेयस ना, की मला ‘मी’ राहुद्या वगैरे.. त्याची सुरुवात आधी तू तुझ्यापासून कर. तू आधी ‘मुक्ता’ हो मगच जग तुला मुक्ता म्हणेल!”

“म्हणजे नक्की काय करू?”

“म्हणजे, तुझं ध्येय, तुझी स्वप्नं, तुझे रस्ते ‘तू’ ठरव! नुसतं आईला सोडून इथे येऊन राहणं पुरेसं नाहीये. इथे येऊनही तू ‘तुझ्या आईला’ तू कशी बनलेली आवडशील किंवा कशाने ‘लोक’ तुला तुझ्या नावाने ओळखतील किंवा तू काय करू शकतेस हे ‘आईला’ दाखवून देण्यासाठी वगैरे म्हणून रियाज करतेयस.. तुझे सगळे प्रयत्न ‘लोकांच्या’ अपेक्षांना खरं उतरण्यासाठी चालूयेत, कोणालातरी काहीतरी दाखवून देण्यासाठी चालूयेत! डोन्ट डू दॅट.. तू कधी स्वत:ला विचारलंयस की ‘तुला’ नक्की काय हवय? ते एकदा करून बघ.. उत्तर तुझं तुला मिळेल! अँड बिलिव्ह मी, आपण जेव्हा गोष्टी स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी, स्वत:च्या नजरेत काहीतरी बनण्यासाठी करतो ना तेव्हाच त्या बेस्ट रिजल्ट देतात! आणि त्या पॉइंट ला एकदा आपण पोचलो की मग आत्ता तू ज्याच्यासाठी झुरतेयस त्या इतरांच्या व्हालीडेशनची गरजचं भासत नाही..”

मल्हारचं बोलणं मुक्ताच्या मनाला भिडत होतं.. एक कुठलीतरी नवीन आणि सुंदर वाट आपल्यासाठी मोकळी होतेय असं तिला वाटलं.. समाधानाचं हसू तिच्या चेहर्‍यावर उमटलं.

“थॅंक यू..” ती म्हणाली.

“मोस्ट वेलकम!! हे असं ज्ञान मी अधून-मधून देत असतो!” वातावरण जरासं हलक करत तो म्हणाला.

“मी कॉफी साठी म्हणतेय!” त्याच्या प्रयत्नांना हातभार लावत तिने डोळे मिचकावले.

“हाहा.. ओहह दॅट्स माय प्लेजर! मी म्हटलं होतं ना, माझ्या हातची कॉफी पिणार्‍या मुली माझ्या प्रेमातचं पडतात”

“हम्म.. मिस्टर. ओवरकोंफिडेंट! तोंड पाहिलंय का आरशात?” मुक्ता हसून म्हणाली आणि आत जायला निघाली.

तिच्यामागून आत जात मल्हार म्हणाला,

“वेल.. हा निरागस चेहरा हॅंडसम आहे असं म्हणतोय आरसा..”

“हाहा.. निरागस!!..”

त्या दिवसानंतर त्या दोघातलं नातं जसं खुलत गेलं तसच मुक्तालाही तिचा हरवलेला सूर नव्याने गवसायला लागला. पण गोष्टी अर्थातच सोप्या नव्हत्या. सगळ्या गोष्टींची नव्याने सुरुवात करावी लागणार होती. स्वत:कडे स्वत:च्या नजरेतून पाहता येणं ही सोपी गोष्ट खचितच नाही. पण तसा प्रयत्न करायचाय हे आता तिचं ठरलं होतं आणि तो करायला तिने सुरुवातही केली होती. ती पुन्हा पुस्तकं वाचायला लागली.. कविता लिहायला लागली, अगदी कित्तीतरी वर्षांनी.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, पुन्हा रियाज करायला लागली! कथ्थक मधला ‘कवित’ हा प्रकार मुक्ताला नेहमीच खूप जवळचा वाटायचा.. त्यात नृत्यातल्या इतर गोष्टीपेक्षा नृत्याभिनयातून काव्यार्थ प्रभावीपणे पोचवणं याला जास्त महत्व असतं.. या प्रकारात मुक्ता प्रो होती. अरुंधतीच्या धाकामुळे मात्र तिने त्याला तितकं जवळ येऊ दिलं नव्हतं. पण आता त्याचा परत विचार करायला हवा असं तिला वाटू लागलं. आणि ती त्या दृष्टीने रियाजही करू लागली होती॰ तिच्यातले हे बदल पाहून मनस्विनीला मनापासून आनंद झाला. तिने त्यासाठी मल्हारचे खूप आभारही मानले.

त्या हंगामातली ताजी आंब्याची पोळी त्याला खायला देत ती म्हणाली,

“काय जादू केलीस रे तू?”

“मी काही जादूगार नाहीये मावशी. फक्त तिला आरसा दाखवला मी. जादू तिची तीच घडवेल बघ आता.” मल्हार शांतपणे म्हणाला.

“मल्हार, तुला एक विचारू? खरं उत्तर देशील?”

“चक्क परवानगी? विचार की. मी नेहमी खरच बोलतो.”

जराशा सिरियस आविर्भावात मनस्विनीने त्याला विचारलं,

“तू प्रेमात पडलायस मुक्ताच्या? किंवा ती तुझ्या?”

हातातली आंब्याची पोळी बाजूला ठेवत त्याने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला,

“वेल.. खरं सांगायचं तर हो! पण हे नक्की प्रेमच आहे की आणखी काही ते फिगर आऊट व्हायचय अजून. आणि तिच्याविषयी विचारशील तर ते मला माहीत नाही”

अपेक्षित उत्तराने मनस्विनी विचारात पडली. आणि जरावेळाने म्हणाली,

“मल्हार, सी, मी याच्या विरोधात नाहीये. पण लंडन मध्ये राहिलेली असली तरी मुक्ता वेगळी मुलगी आहे. आणि तू हा असा भटक्या! सो, खर्‍या अर्थाने ‘सिरियस’ असशील तरचं पुढे जा. ती तुझ्या ढीगभर गर्लफ्रेंड्स पैकी एक कधीही होणार नाही.”

मनस्विनीच्या बोलण्याचा रोख उमगून मल्हार म्हणाला,

“मावशी.. ती वेगळीये हे तर मला पहिल्या भेटीतचं समजलं होतं. आणि डोन्ट वरी मीही तिच्याकडे गर्लफ्रेंड म्हणून पाहत नाही/पाहणार नाही! काय माहित या भटक्याला ठेहराव देईल ती.. किंवा हू नोज, कदाचित काही घडणार पण नाही आमच्यात! सो, अॅज फॉर नाऊ, डोन्ट जंप ऑन एनी conclusion!”

“या या, ऑफकोर्स!” मनस्विनी शांतपणे म्हणाली.

“अॅलिस, पोस्टपोन ऑल माय टूडेज अपॉईंटमेंट्स.. आय अॅम नॉट कमिंग टूडे!”

सेक्रेटरीला सूचना देऊन अरुंधतीने फोन ठेवला. मुंबईहून परत आल्यापासून तीही थोडी डाउनच होती. चैतन्यच्या अर्थातच ते लक्षात आलं होतं. तिकडे मुक्ताही त्याचे कॉल्स घेईनाशी झाली होती. त्यामुळे तो चांगलाच चिंतेत होता. आणि आज हे असं कामाच्या बाबतीत अति सिरियस असणार्‍या अरुंधतीला कधी नव्हे ते सगळ्या अपॉईंटमेंट्स कॅन्सल करताना पाहून तो जरासा चकितच झाला. त्याने विचारलं,

“सगळं ठीक आहे नं, अरुंधती?”

“हो एकदम.. असं का विचारतोयस?” नेहमीसारखा चेहरा कोरा ठेवत अरुंधती उत्तरली॰

“तसं वाटत नाहीये म्हणून विचारतोय.”

“हो का? काय वाटतय मग”

“हेच की तिकडे मुंबईला काहीतरी घडलंय पण तू मला सांगत नाहीयेस!”

यावर एक मोठा सुस्कारा सोडून अरुंधती म्हणाली,

“काय ऐकायचय तुला? तुझ्या मुक्ताचा परफॉर्मेंस कसा झाला हेच ना?”

“‘आपली मुक्ता’ अरुंधती!”

“हाहा.. ती माझ्यापासून केव्हाच दूर गेलीये चैतन्य! एनीवेज ऐक, तिच्या गुरूचा परफॉर्मेंस ऑब्वियसली खूप सुंदर झाला, पूर्वीसारखाच! पण मुक्ता मात्र खूपच अॅवरेज होती.. फार बिलो एक्सपेक्टेशन्स! ‘यासाठी मला सोडून गेलीस का’ असं विचारलंही मी तिला. रडत बसली मग मुळूमुळू!”

“ओह अरुंधती!! तुला काहीच वाटत नाही इतकं हार्टलेस वागताना?? तिचा पहिला मोठा कार्यक्रम होता तो.. धिस इज ओब्विऔस!.. ती खचली असणार आता चांगलीच.. तरीच माझे कॉल्स घेत नाहीये! दोन महिन्यांवर कॉम्पटिशन आलीये तिची..” तो उठला आणि गडबडीने जायला निघाला..

“विसर ती कॉम्पटिशन.. प्रेलिमिनेरी राऊंड मधेच आऊट होईल बघ ती. पाहून आलेय मी तिचा परफॉर्मेंस! कुठे निघालास तू?”

“उद्याची पहिली फ्लाइट बूक करायला.. आय नीड टू सी हर!”

हातातला ग्लास बाजूला ठेवत अरुंधती एक भेदक स्माइल देत म्हणाली,

“टु सी हूम? मुक्ता ऑर मनस्विनी!!”

चैतन्य थांबला आणि वळून एक करकरीत नजर तिच्यावर टाकून म्हणाला,

“मनस्विनीला मध्ये आणू नकोस! मला ह्या क्षणी इतकच माहितीये की माय डॉटर नीड्स मी नाऊ! आणि अरुंधती एक सांगू, प्लीज फॉर गॉडस सेक, कम आऊट ऑफ द शाडो ऑफ ‘अरुंधती अय्यर’ अँड फॉर वन्स बी ए मदर ऑफ यॉर डॉटर!”

“ओह रियली? मिस्टर. चैतन्य राजे.. फर्स्ट यू बिकम ए हजबेंड ऑफ यॉर वाइफ! अँड देन ओन्ली एडवाइस मी, ओके?” अरुंधती आवाज चढवत म्हणाली.

त्यावर तितक्याच शांतपणे चैतन्य म्हणाला,

“गेली वीस वर्षं मी फक्त तेच करतोय अरुंधती!! अँड यू नो दॅट वेरी वेल!”

आणि जाता जाता वळून म्हणाला,

“चेंज यॉरसेल्फ.. अदरवाईज मुक्तासोबत मलाही गमावशील तू. डोन्ट ट्राय माय पेशन्स! इट्स हाय टाइम नाऊ!”

अरुंधतीला बर्‍याच वर्षांनी त्याच्यात जुन्या चैतन्यचा भास झाला. ती त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे आणि हातातल्या रिकाम्या ग्लासकडे पाहत राहिली..

मुक्ताचा रियाज चांगला सुरू होता. पण, स्पर्धेत नक्की काय सादर करायचं याबाबतीत ती अजून साशंक होती. तिच्या मनात अजून बराचसा गोंधळ सुरूच होता. झोपाळ्यावर कसल्यातरी विचारात दंग मुक्ताला पाहून बाहेर निघालेला मल्हार क्षणभर थांबला आणि त्याने विचारलं,

“काय मग मॅडम, कसा चालूये रियाज?”

त्यावर, थोड्या नाखुशीनेच ती म्हणाली,

“चालूये ठीक-ठाक!”

तिचा तो मूड पाहून मल्हार म्हणाला,

“चल येतेस माझ्यासोबत?”

यावर किंचित हसून ती म्हणाली,

“तुझ्या त्या जंगलात? नको रे बाबा.”

“अगं, जंगलात नाही. खंडू मामा म्हणत होते, शेजारच्या वाडीत एक 60-70 वर्षं जुनं कोकमाचं झाड आहे. ते आणि थोडा आजूबाजूचा परिसर पहायला जातोय. चल तू पण.. कंटाळत नाहीस का सतत घरात बसून?”

मुक्ताला काय वाटलं कोणास ठावूक, ती उठली आणि पायात चपला सरकावून म्हणाली,

“चल!”

दोघेही मग बरेच फिरले. आजूबाजूच्या झाडांकडे, प्राण्यांकडे, पक्षांकडे पाहण्याची एक नवीच दृष्टी त्याने मुक्ताला दिली.

परत येताना एका झर्‍याखाली दगडावर बसून पाण्यात पाय सोडून तो मुक्ताला म्हणाला,

“कम, यू शुड ट्राय धिस..”

गम्मत वाटून ती आली आणि तिनेही पाय पाण्यात सोडले. आणि काय मजा, दोन-तीन मिनिटातच खूप सारे छोटे-छोटे मासे येऊन तिच्या तळव्यांना गुदगुल्या करू लागले. त्याची खूपच मजा वाटून ती म्हणाली,

“हे वॉव.. धिस इज अमेझिंग.. आय हॅव नेवर ट्राइड धिस बिफोर!”

“आय टोल्ड यू!” मल्हार हसत पुढे म्हणाला..

“वेल्कम टु मल्हार’स वर्ल्ड! याला शहरात फिश स्पा म्हणतात. हे जे लहान लहान मासे आहेत ना, garra rufa असं नावय यांचं. आपण पाण्यात पाय सोडले की हे आपली डेड स्कीन खाऊन टाकतात. शहरातल्या त्या टब मधल्या स्पाला या खर्‍या नैसर्गिक स्पाची सर नाही!”

“हम्म.. हे खरंच मस्त आहे! तू किती एकजीव झालायस रे या सगळ्यात. झाडांशी गप्पा काय मारतोयस, पक्षांशी त्यांच्या भाषेत काय बोलतोयस.. इथे तू वेगळाच भासतोस” मुक्ता भारावून म्हणत होती.

त्यावर तो नुसताच हसला. बराच वेळ दोघे तसेच शांतपणे बसून राहिले. थोड्यावेळाने, वर आभाळाच्या पोकळीकडे पाहत मल्हार म्हणाला,

“मुक्ता.. तू कधी मुसळधार पावसात चिंब-चिंब भिजलियस? कशाचीच पर्वा न करता? किंवा मध्यरात्री माळरानावर चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली झोपलीयेस? एकटीच सिनेमा पहायला गेलीयेस? चिमणीला घरटं बांधताना पाहिलंयस? किंवा एखाद्या हरिणीला तिच्या पाडसाला जन्म देताना पाहिलंयस? या ज्या साध्या साध्या गोष्टी वाटतात ना, त्या नकळत खूप ऊर्जा देऊन जातात आपल्याला. ‘To be able to feel every ‘feel’ to its fullest!’ यात खरं थ्रिल आहे. आनंद असो, राग असो, दुक्ख असो, आपलं काम असो.. सगळं आपल्याला to its fullest जगता यायला हवं. अधे-मध्ये जगण्यात, राहण्यात काही मजा नाही बघ. रिग्रेट्सचं baggage वाहत राहिलं ना की माणसाचं जगणंच थांबून जातं..”

मल्हार मोकळ्या आकाशाकडे पाहत बोलत होता आणि मुक्ता ऐकत होती. तिच्या नृत्यात तिला नेहमी जाणवणारी उणीव खालच्या पाण्याइतकीच स्पष्ट तिला आता जाणवू लागली. तो जे बोलत होता तेच तर त्यात कमी होतं.. it wasn’t to its fullest.. मनात चालू असणारे ना ना विचार, भीती हे सगळं त्यात आडवं येत होतं! एखाद्या खजिन्याची चावी सापडावी तशा आनंदात तिने त्याच्याकडे पाहिलं, त्याची नजर मात्र वर होती, अचानक आभाळात भले-मोठे ढग दाटून आले होते.. कुठल्याही क्षणी पाऊस पडेल अशी चिन्हं दिसत होती. लगोलग उठत तो म्हणाला,

“चल लवकर.. मोठा पाऊस येणारे”

दोघेही उठून जायला निघाले.. पण चार पावलंच चालले असतील की पावसाने गाठलच त्यांना. त्या जोराच्या पावसात गाडी चालवण्याची रिस्क नको म्हणून मग जवळच्या देवराईतल्या मंदिरात दोघांनी आसरा घेतला. इतक्यात, गाडीच्या खिडकीची काच बंद आहे का पहाण्यासाठी म्हणून मल्हार परत गाडीकडे धावला..

मुक्ता मंदिराच्या पायरीशी उभी राहून पाऊस बघत होती. क्षणभर तिने डोळे मिटले आणि पावसाच्या त्या आवाजात तिला एक कमालीचा मोहक र्‍हीदम जाणवला. तिने चटकन फोन ऑन केला आणि राग मल्हार लावला.. आणि तिच्याही नकळत, मंदिराच्या सभामंडपात तिचे पाय त्या सुरावटीवर आणि मुसळधार पावसाच्या बेधुंद्द तालावर थिरकायला लागले.. तो पाऊस जणू तिच्यातूनच बरसतोय असं वाटावं इतकी की त्यात मिसळून गेली. भान हरपून तो मल्हारसुरातला पाऊस तिने तिच्या विभ्रमांमधून पुन्हा पुन्हा जीवंत केला.

गाडीच्या काचा बंद करून मल्हार परत आला तो मुक्ताकडे पाहून दंगच झाला.. तिचं ते विलोभनीय मयूरनृत्य तो पाहतच राहिला.. पण मुक्ताला ना त्याच्या येण्याची जाणीव झाली ना त्याच्या पाहण्याची.. ती स्वत:ला सुद्धा विसरून गेली होती. हळूहळू पाऊस ओसरला.. सूर शांत झाले.. आणि मुक्ताही तिच्या त्या चिंब-भारल्या अवस्थेतून बाहेर आली. समोर मल्हार तिच्याकडे पाहत उभा होता. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तो भारावून गेला होता.. तिला तिची पावती मिळाली होती॰

आनंदातिशयाने फुलून जाऊन ती त्याला म्हणाली,

“मल्हार.. माझं ठरलंय स्पर्धेत कुठल्या थीम वर परफॉर्म करायचंय ते!”

“कुठल्या?” त्याने कुतुहलाने विचारलं.

“राग मल्हार..” ती म्हणाली.

एकमेकांच्या डोळ्यांत मग त्यांना त्या दिवशी बर्‍याच प्रश्नांची उत्तरं मिळाली..

.. क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/2020/09/3.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम सुंदर!! पण एक शंका, इतक्या मुसळधार पावसात तिला फोनवरचा राग ऐकू आला असेल??

हो येऊ शकतो की पावसात संगीताचा आवाज ऐकायला. एक-दोन हातांवर फोन असेल तर का नाही येणार

सांज, खूपच सहज सुंदर..

. ‘To be able to feel every ‘feel’ to its fullest!’ यात खरं थ्रिल आहे. आनंद असो, राग असो, दुक्ख असो, आपलं काम असो.. सगळं आपल्याला to its fullest जगता यायला हवं. अधे-मध्ये जगण्यात, राहण्यात काही मजा नाही बघ. रिग्रेट्सचं baggage वाहत राहिलं ना की माणसाचं जगणंच थांबून जातं..” >> मस्त मस्त