अज्ञातवासी - भाग १७ - नवी गणिते!

Submitted by अज्ञातवासी on 5 December, 2020 - 09:32

पुढील भाग पुढच्या शनिवारी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल!!

भाग १६ -

https://www.maayboli.com/node/77385

एक प्रचंड मोठी वायनरी, तिच्या पार्श्वभूमीवर एक मोठं रिसॉर्ट...
...आणि रिसॉर्टमध्ये सगळ्यात उंचीवर असलेली एक मोठी रूम!
रूमच्या मोठ्या दरवाज्यासमोर ओळीने सशस्त्र गार्डस तैनात होते.
रूममध्ये एका टेबलावर गोल करून सहाजण बसलेले होते.
'जिमी जिमी जिमी,
आजा आजा आजा...'
"डिसुझा, बंद कर यार हे... नुसता मिथुन मिथुन!"
"पांडे, तू माझ्या रिसॉर्टमध्ये बसलाय. मिथुनला काही बोलायचं नाही समजलं?"
"तुझं रिसॉर्ट?" सिंग मोठ्याने म्हणाला
"मग कुणाचं?"
"दादासाहेबांच." सायखेडकर मध्येच म्हणाला.
"माझंच." डिसुझा शांतपणे म्हणाला.
"गप्प बसा सगळे!" शेखावत ओरडला.
"शेखावत, विनाकारण ओरडून काहीही होणार नाही. वायफळ गोष्टींपेक्षा महत्वाचं काहीतरी बोलायला सुरुवात करायला हवी." जाधव शांतपणे म्हणाला.
"मोक्ष अमेरिकेला परत गेलाय. संग्रामचा मार्ग मोकळा झालाय. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे, मोक्षच्या हल्लेखोरांचा कुणीही तपास करत नाहीये."
"यात तुला वाईट वाटण्यासारखं काय आहे शेखावत?"
"कारण तो हल्ला मी घडवला होता जाधव, मात्र तो संपूर्णपणे निष्फळ ठरला."
"मूर्ख! मूर्ख आहेस तू शेखावत..." सिंग ओरडलाच.
"मी नाही, तुम्ही तिघे मूर्ख आहात. तुम्हाला फक्त गुलामी करायचीय, गुलामी. सायखेडकर, जाधव आणि तू... सगळे गुलाम!"
"गुलाम नाही, आम्ही एकनिष्ठ आहोत. खुर्चीशी.. जोपर्यंत खुर्ची आमच्याशी बेईमानी करणार नाही, तोपर्यंत आम्हीही बेईमान होणार नाही."
"आणि संग्राम खुर्चीवर बसल्यावर, तुमच्या इमानाची किंमत राहील?" पांडे शांतपणे म्हणाला...
तिघेही त्याच्याकडे बघू लागले.
"उत्तर हो असेल, तर आता मी शेखावतची साथ सोडतो, पण उत्तर हो आहे?"
कुणीही काहीही बोललं नाही.
"एकवेळ मी मोक्षला खुर्चीवर बसलेला बघू शकतो, नामधारी राजा! पण संग्राम नाग आहे नाग..." पांडे बोलतच राहिला.
"तुमचं खुर्चीशी इमान आहे, खुशाल राहूदे. पण रिकाम्या खुर्चीशी इमान ठेवा... बेईमानाला खुर्चीवर बसू देऊ नका."
"मग खुर्चीवर कोण बसेल?" सायखेडकरने विचारले
"ज्याच्या नशिबात खुर्ची असेल तो!" शेखावत सगळ्यांकडे बघत म्हणाला.
सगळे आळीपाळीने एकमेकांकडे बघू लागले.
"तर, खूर्चीपासून संग्रामला दूर ठेवायचं. आहे मान्य?" पांडेंनी प्रश्न विचारला.
उत्तरादाखल सगळ्यांनी माना डोलवल्या.
"चियर्स!" शेखावत स्मितहास्य करत म्हणाला.
काही ग्लास हवेत उंचावले गेले...
◆◆◆◆
"झोयाबेटा!"
झोया खाली आली, मोक्ष तिच्याकडे निरखून बघत राहिला.
सोनेरी काळसर केस, अतिशय गोरा रंग, घारे डोळे, सडपातळ बांधा आणि साडेपाच फुटाच्या वर उंची!
पांढरा कुर्ता आणि त्याखाली जीन्स, केसांचा बॉबकट केलेला.
"जी पप्पा."
"हे मोक्ष शेलारसाहेब. आजपासून तुझे नवीन विद्यार्थी."
"ऐकलंय मी, याच्यावर गोळीबार झाला होता."
"झोया," खान गडबडला. "अरे-कारे?"
"माझा विद्यार्थी आहे. त्याला कसं ट्रेन करायचं हे मला ठरवू द्या. तसंही, याच्यात मला काहीही स्पार्क दिसत नाही. फक्त दादासाहेबांचा मुलगा म्हणून शिकवेन."
"झोया," खानाने कपाळाला हात लावला.
"थँक्स झोया.....मॅडम!" मोक्ष हसून म्हणाला.
"गुड बॉय. हवेलीपासून थोड्याच अंतरावर एक प्रचंड मोठी पडकी हवेली आहे, ती जागा आपल्याला शूटिंग रेंज म्हणून वापरता येईल. सध्या गनपासून एके ५६ पर्यंत सगळं शिकवेन. एकदा शिकवेन, दोनदा शिकवेन, तीनदा शिकवेन, पण त्यांनतर नेम चुकलाच, तर जागीच गोळी घालेन. आहे कबूल?"
"कबूल.... मॅडम...."
'झोया ती हवेली नाही..." खान मध्येच म्हणाला.
"का पप्पा?"
"नाही सांगितलं ना एकदा? नाही म्हणजे नाही. मोक्षसाहेब. ती हवेली सोडून कुठेही प्रॅक्टिस करा."
"खानसाहेब, असं का पण?"
"मी नाही सांगू शकत, पण, ऐका माझं."
"कारण ती इब्राहिमची हवेली आहे, बरोबर ना पप्पा?" झोया म्हणाली.
खान काहीही बोलला नाही.
"मग शेलरांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूच्या गोटात प्रॅक्टिस करायला मिळतेय, यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल खानसाहेन? प्रॅक्टिस तिथेच होईल." मोक्ष खानाकडे बघत म्हणाला.
"गुड बॉय. आता पप्पा तुम्हीच बघा, तुमच्या मोक्षसाहेबांचं म्हणणं टाळायचं का?"
"झोया..." खान उद्विग्न झाला. "ठीक आहे."
दोघेही एकमेकांकडे बघून हसले.
"चल, मला थोडी कामे आहेत, तेवढी आटोपून हवेलीत जाऊयात. पप्पा, थोडी मानसिक व शारीरिक ट्रेनिंग ही द्या त्याला. असं पपलूसारखं ध्यान चांगलं दिसत नाही. ओके?"
ती उत्तराची वाट न बघताच निघून गेली...
"खानसाहेब?? मी पपलू दिसतो? सांगा मला? खरोखर सांगा." मोक्ष खानाला उद्विग्नतेने विचारू लागला.
"आता खरं बोलायला लावू नका मोक्षसाहेब!" खान हसू दाबत म्हणाला.
मोक्ष क्षणभर थबकलाच... आणि तोही जोरजोरात हसू लागला.
"हिरो, टाइमपास नको. आवरा." झोया वरून ओरडली.
"मॅडम ओरडतायेत खानसाहेब. चला मीही आवरतो." मोक्ष हसत म्हणाला, आणि वर गेला.
खान त्याच्याकडे बघतच राहिला.
'बेटा, ती फक्त इब्राहिमची हवेली असती, तर ठीक होतं.
पण ती इब्राहिमपेक्षा मुमताजची हवेली होती...'
विजेचा झटका लागावा, असा खान विचारातून बाहेर आला.
"हैदर, बंदूके तयार रखना..." तो हैदरला सूचना देऊ लागला.
◆◆◆◆◆
"अप्पा, गेला तो... गेला एकदाचा...'
संग्राम नाचायचाच बाकी होता.
"आई... खुर्ची माझी... माझी खुर्ची..."
"हो तुझीच खुर्ची." सौदामिनीबाई हसल्या.
"मीटिंग कधी भरवायची अप्पा? सांगा ना? लवकर सगळं आटोपून टाकू."
"अरे बाबा, धीर धर! सगळ्या सदस्यांना बोलवायचं म्हणजे काही खायचं काम नाही."
"सगळे कोण? तुम्ही आहेत, काका आहेत? अजून कोण पाहिजे?"
"संग्राम, कधीतरी शहाण्यासारख बोलत जा." अप्पा वैतागून म्हणाला.
"अहो बस झालं अप्पा. किती टाइमपास?"
"टाइमपास काय? तुला खुर्चीवर बसवायचं म्हणून बसवायचं का? सगळ्यांची मान्यता मिळायला नको?"
"कुणाची मान्यता?"
अप्पा थोड्यावेळ शांत झाला....
व त्याने बोलायला सुरुवात केली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच लहान झाला आहे भाग. तुमची कथा आवडते आहे म्हणून तुमच्यावर वेळ पडेल तेव्हा टीका करणे सोडणार नाही मी. Berklee चा कॉन्सर्ट आणि म्हाताऱ्या साधुकडे कानाडोळा करून कथा वाचतोय.. आणि एवढा लहान भाग???

हो ना..हरवून गेले होते कथेत आणि संपला भाग..
इथे असं वाटलं कि मोक्ष-झोया लवस्टोरी सुरू होणार कि काय..पण झोया तर झोया संग्राम शेलार होणार आहे.. इन्ट्रेस्टींग.....
आता पुढच्या शनिवारच्या प्रतिक्षेत!

खूपच लहान भाग. कथा इतकी रसमय होत चालली आहे की बस रे बस! एक सबंध आठवडा वाट पहायची तर भाग थोडे मोठे नकोत? पुलेशु!

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

भाग लहान होताहेत, याची मलाही जाणीव आहे. त्याबद्दल सॉरी!
आज थोडंस मनातलं बोलूनच टाकतो!
मी माझा ९ ते ६ चा जॉब सांभाळून एकाचवेळी तीन कथांवर काम करतोय. त्यातल्या त्यात आता रिकवर झालो असलो, तरीही ठणठणीत बरा आहे, असं म्हणणार नाही. तसच, मला वेळ तर अजिबात मिळत नाहीये. (मला रात्री १० नंतर गुडनाईट म्हणनाऱ्याना सकाळी चार वाजता डायरेक्ट गुड मॉर्निंगचा मेसेज जातो. Lol
अज्ञातवासी म्हणा, किंवा नातीगोती म्हणा, या दोन्ही कथा एकाचवेळी पूर्णपणे वेगळ्या आहेत. आता पाटील vs पाटीलही परत येतेय. मला जमत नाही असं म्हणत नाही, पण फक्त भाग मोठा टाकायचाय, म्हणून काहीही भारुडभरती मी लेखात नाही करू शकत. I can give you something less, something late, but not inferior. तत्वातच बसत नाही. Happy
अजून एक, कुणीही आपली आवडती कामे, छंद या कथेसाठी सोडू नका. ही कथा इथेच असेल, अज्ञातवासीही इथेच असेल!
अनेक दिवसांपूर्वी मेघाला सांगितल्याप्रमाणे...
अभी अपुन इधरइच है! Lol

Thanks.
अज्ञातवासी.

ता.क. शनिवारी रात्री ९ चा रिमाईंडर लावून ठेवला तरी चालेल. Happy भाग येतीलच.

पाटील vs पाटीलही परत येतेय >>> अरे वा! छानच!!
भाग लहान आले तरी चालतील फक्त वेळेवर येऊ द्या. Happy
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....