बळी

Submitted by रूपाली विशे - पाटील on 5 December, 2020 - 03:08

" बळी"
________________________________________

" गवताचं पातं वार्‍यावर डोलतयं ...डोलताना म्हणतयं खेळायला चला.... !!"
दहा वर्षाची श्रेया आणि आठ वर्षाची अस्मी दोघी बहिणी शाळेत शिकवलेली कविता गुणगुणत, फुलपाखरांच्या पाठी धावत , हिरव्यागार बांधावरून आपल्या शेताकडे निघाल्या होत्या.

' तळं'... निळ्याशार पाण्याने तुडुंब भरलेलं .. तेथील वातावरणात.... आसमंतात गार हवा भरलेली..' तळं' भारलेलं ....एका अनामिक गुढतेने!'

" दादा ss माझा दादा ss " अश्या आरोळ्या ठोकत तळ्याच्या पाण्याकडे धावत जाणारी एक स्त्री व तिच्यामागे तिला पकडण्यासाठी धावणारा, त्या स्त्रीला पाण्यातून बाहेर खेचून आणणारा पुरुष असे दृश्य पाहून तळ्याच्या तोंडाशी उभ्या असलेल्या श्रेया आणि अस्मी घाबरून घराकडे धावत सुटल्या.
" आई ....आई ....!! तिथे ना... तळ्यावर ना...!" दोघींच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
" काय झालं ? कशाला ओरडतायेतं दोघी?" मनिषा दोघींच्या आवाजाने घराबाहेर आली. धडधडत्या छातीने दोघी बहिणींनी आलटून पालटून आपल्या आईला तळ्यावर पाहिलेल्या दृश्याची कहाणी सांगितली.

"दोघींना किती वेळा सांगितलयं की, त्या तळ्याजवळ जाऊ नका म्हणून ... पण दोघी ऐकतील तर शप्पथ!! तळं झपाटलेले आहे असचं म्हणतात ना सगळे ? कितीतरी जीव घेतल्यात त्या तळ्याने ...!! पुन्हा तिथे जायचे नाही. शेवटचं सांगते तुम्हां दोघींना!" मनीषा आपल्या मुलींना रागे भरली.

" नाही आई ... पुन्हा नाही जाणार तळ्यावर!" दोघी बहिणी मान खाली घालून म्हणाल्या.

___________________ XXX_________________

हिरवगारं शेत... त्या शेतातली विहीर... खोल अंधाराने व्यापलेली .... बारा महिने सदैव पाण्याने भरलेली... त्या विहिरीच्या कठड्याजवळ उभ्या राहून, विहिरीत वाकून श्रेया आणि अस्मी दोघी बहिणी आपले प्रतिबिंब न्याहाळत, विहिरीच्या पाण्यात दगड मारत होत्या.

" ताई ... खरचं का गं तळं झपाटलेले असेल? म्हणजे काय असेल तिथे? भूत असेल का?" लहानग्या अस्मीने आधीच मोठे असलेले डोळे अजून मोठाले करत कुतुहलाने आपल्या मोठ्या बहिणीला विचारले.

"मला नाही माहित पण आई म्हणते म्हणजे नक्कीच असेल!" मोठ्या श्रेयाने आपल्या लहान बहिणीची शंका दूर केली. दोघी बहिणी गप्पा मारण्यात मश्गुल असताना अचानक विहिरीच्या पाण्यात मोठा दगड येऊन पडला आणि त्यामुळे पाण्याचा एक मोठा फवारा वरपर्यंत उडला. ते पाहून दोघी बहिणी भयंकर घाबरल्या. जोर-जोराने ओरडत दोघीजणी विहिरीपासून लांब पळत सुटल्या.

" घाबरल्या..... घाबरल्या.... पोरी घाबरल्या.... मज्जा ss मज्जा ss आली!" विहिरीजवळ उभा राहून राजू खो - खो हसत होता.

" राजू.... तू ? थांब .. आता घरी नाव सांगतो आम्ही तुझं!" श्रेया आणि अस्मी रडकुंडीला आल्या.

"नको ...नको गं पोरींनो! एकवार माफ करा त्याला..! यापुढे नाही घाबरवणार तो.. हो ना राजू?" मुलींच्या आरडा- ओरड्याच्या आवाजाने तारा विहिरीजवळ आली.

" हं.. हो शप्पथ! गळा शपथ .. नाय ..नाय... पुन्हा नाय करणार !" राजू गळ्याला चिमटा घेत म्हणाला.

राजू म्हणजे ताराचा भाचा. डोक्याने थोडासा वेडसर . आई - वडील लहानपणी वारल्यामुळे अनाथ, पोरका झालेला. रघ्या आणि तारा हे जोडपं बरीचं वर्षे सुनिल आणि विनय ह्या दोन भावांच्या बागायतीत रोजंदारीवर कामाला होते. दोघे तेथेच घर बांधून राहत होते. लग्न होऊन बरीच वर्षे उलटली तरी ताराला मूलबाळ झाले नव्हते. निसर्गाने ताराची कूस उजवली नसली तरी राजूसाठी तिच्या मनात मायेचा, प्रेमाचा झरा नेहमीच खळाळत होता. तारा राजूला खूप जीव लावायची. पण रघ्या मात्र राजूचा खुप राग-राग करी. त्याला राजू डोळ्यांसमोरही सहन होत नसे. पण ताराच्या प्रेमापोटी तो राजूला सांभाळत होता.

___________________ XXX__________________

" वहिनी , चला.. !! आज आपल्याला ग्रामसभेला जायचंय! तहसीलदार कार्यालयातून सरकारी माणसं येणार आहेत ग्रामपंचायत कार्यालयात !" विनय आपली वहिनी मनीषाला म्हणाला.

"मी येऊन काय करणार भाऊजी ? तुम्ही ऐका काय सांगतायेतं सरकारी माणसं !"

" असं कसं वहिनी? तुम्हीपण चला, तुम्हाला पण कळायला हवं!"

" बरं येते मी!".

संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय ग्रामस्थांनी भरलेले.

"आम्हाला हा प्रकल्प आमच्या जमिनीवर नको. आमची काळी आई आमच्या हातून गेली तर आम्ही काय खायचं ? कसं जगायचं ? " गावातील भडकलेली जनता ग्रामसभेत सरकारी यंत्रणेला धारेवर धरत होती.

"हे बघा.. आधी शांत व्हा..!! साहेब काय सांगतायेतं ते पहिल्यांदा ऐका !" गावचे ग्रामसेवक सगळ्यांना शांत होण्यास सांगत होते.

"हा सरकारी प्रकल्प गावात आला तर तुम्हाला सरकार तुमच्या जमिनीच्या मोबदल्यात योग्य भरपाई देणारच. तुम्हाला ह्या प्रकल्पामध्ये तुमच्या कौशल्यानुसार नोकरी सुद्धा देण्यात येईल. तुम्हाला या प्रकल्पातून रोजगाराची, उद्योगधंद्याची संधी उपलब्ध होईल. सरकार तुम्हाला वार्‍यावर सोडणार नाही!" सरकारी अधिकारी सरकारची बाजू बळकटपणे मांडत होते.

"अहो साहेब, सरकारी यंत्रणा प्रकल्पग्रस्तांच्या, विस्थापितांच्या मागे किती बळकटपणे उभी राहते ते माहित आहे आम्हाला! एकदा का प्रकल्प पूर्ण झाला की तुमच्या कागदावरच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाच्या योजना बासनात गुंडाळल्या जातील. मग नोकरी आणि प्रकल्पातील सगळी कंत्राटे तुमचे सरकार परप्रातियांना, बाहेरच्या लोकांना देईल आणि नंतर भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसली जातील. भूमिपुत्रांनी मग आत्महत्या करायच्या का? तुम्ही भूमिपुत्रांचा विचार करायलाच हवा!" उच्चशिक्षित असलेला पण आधुनिक शेतीची संकल्पना राबवून मोठा बागायतदार म्हणून नावारूपास येऊ पाहणारा संजय ग्रामस्थांच्या वतीने सरकारी अधिकाऱ्यांसमोर बाजू मांडत होता.

" हे बघा, आधी सर्वांनी शांत व्हा. थोडं आमचेही ऐका! सरकार जो निर्णय घेईल तो सर्वांच्या भल्याच्या दृष्टीनेच असेल. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं हे सरकारचे काम आहे. देशाची प्रगती करायची असेल तर सरकारला काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात . पण तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या की, सरकार कुठल्याही भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही ह्यासाठी बांधील राहील..!" सरकारी अधिकारी हिरीरीने सरकारी बाजू मांडत होते.

" आम्हांला नुसती सरकारी पोकळं आश्वासने नको ... आम्हाला हा प्रकल्प नकोच...आमचं गाव , आमची जमीन सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही सरकार विरोधात आंदोलन उभारू..... लढा देऊ! " ग्रामसभेत सरकार विरोधात जनक्षोभ उफाळून आला होता. ग्रामस्थ सभेतच सरकार विरोधात घोषणा देऊ लागले.

___________________ XXX________________

" एवढी सुपीक जमीन मागच्या वर्षी डेव्हलप केली. कर्ज काढून पाण्यासारखा पैसा ओतला. नवीन बोअरवेल, ठिबक सिंचन, चिकूची, नारळांच्या रोपांची नवीन लागवड केली... आता कुठे चांगले बस्तान बसत होते आपले तर हा नवीन सरकारी प्रकल्प येतोय गावात. सगळं काही डोळ्यांसमोरून नष्ट होणार!" पत्नी आशूसमोर विनय आपली व्यथा मांडत होता.

" हो.. पण सरकार पैसे देईल ना आपल्याला जमिनीच्या मोबदल्यात! प्रकल्पात नोकरी, कंत्राटे पण मिळू शकतील ना!" समजूतदारपणा दाखवत आशू म्हणाली.

"एवढं सोप्पं आहे का ते आशू ? आता माझे शिक्षण , वय ही सरकारी नोकरी मिळण्यालायक नाही. मला नोकरी मिळेल की नाही त्याची खात्री नाही. आपली मुलं लहान आहेत अजून. त्यांचे शिक्षण बाकी आहे आणि नोकरी, कंत्राटे देण्याच्या नावाखाली सरकार प्रकल्पात परप्रांतीयांचा भरणा करेल.जमिनीच्या बदल्यात सरकार पैसा देईल पण साठवलेला पैसा किती पुरणार? जरी त्या पैशातून उद्योगधंदा चालू करायचं म्हटलं तरी ते कितपत जमेल आपल्याला ह्याची सुद्धा खात्री नाही. साठवलेले पाणी आणि खळाळते पाणी ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे आशू! पुढच्या महिन्यात जमिनीची मोजणी करण्याचे काम हाती घेणार आहे सरकार असं कानावर आलयं माझ्या!" विनयची निराशा वाढली होती.

"पावसाने झोडपलं ...राजाने मारलं .. नवर्‍याने छळलं ... तर तक्रार कुणाकडे करायची? सरकारच्या विरोधात जायला लोकांमागे कुणाचेही पाठबळ नाही. जी परिस्थिती आहे ती स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही आपल्यापुढे!" आशूने समजावणीचा सूर काढला.

" हं.. बरं! पण सांग मी कधी छळलयं का तुला आशू?" आशूची मस्करी करत विनय म्हणाला.

" तुम्हांला काय चेष्टा सुचते हो.. ! मी उगाचं उदाहरण दिले. पण एक सांगू का तुम्हांला? "

" बोल ना!!"

"सुनिल दादांचे बरं आहे. त्यांना शहरात सरकारी नोकरी आहे. त्यांना काही एवढा फरक पडणार नाही जरी जमीन गेली तरी!". आशू एक निश्वास सोडत म्हणाली.

" हं...चालायचंच! बरं आशु , आता लक्षात आलं.. उद्या मला तलाठी कार्यालयात जायचे आहे जमिनीचे पेपर आणायला. सकाळी जरा लवकर उठवं बरं!"

" हो .. चला मग जेवून घेऊया!".

____________________XXX__________________

"आई गं... लई चटके लागतात हो मला ...नको... नको.. सोडा मला! " जमिनीवर झोपलेली तारा जोर-जोराने किंचाळत होती.

" जरा गप बस की गं तारे, जवा तवा पोट दुखतयं म्हणून पोट धरून बसते आणि आता हा भगत बरं करतोय तर नुस्ती बोंबा मारतेस!" रघ्या तारावर खेकसत होता.

चुलीतल्या जळत्या विस्तवावर विळ्याचे टोक लालभडक होईपर्यंत तापवून ते ताराच्या पोटावर टेकवून नंदू भगत विळ्याच्या टोकाने ताराला डाग देत होता. वेदना असह्य झाल्याने तारा मोठ-मोठ्याने किंचाळत होती. ताराच्या विव्हळण्याच्या आवाजाने शेतात खेळणाऱ्या श्रेया आणि अस्मी दोघी आवाजाच्या रोखाने निघाल्या. फाटलेल्या कुडाच्या भिंतीतून त्यांनी हळूच डोकावून पाहिलं तर त्यांना हे भयानक दृश्य दिसलं. दोघी बहिणी भयंकर घाबरल्या आणि तिथूनच धावत घरी आल्या.

"आई .. आई ...आपल्या शेतात ना.... ताराकाकी आहे ना...!" दोघी अतिशय घाबरलेल्या स्वरात म्हणू लागल्या.

"काय झालं ताराकाकीला? आधी पाणी प्या ! एवढं घाबरायला काय झालं तुम्हांला?" दोन्ही मुलींना घाबरलेल्या अवस्थेत पाहून मनीषा गोंधळली.

" आधी तुम्ही सगळे शेतात चला!".

__________________ XXX_________________

" रघ्या! काय चाललंय इथे?" मनीषाने रघ्याला खडसावले.

" काही नाही वहिनी! कुठे काय? " मनीषाच्या प्रश्नाने रघ्या जरा घाबरला.

" मग हा कोण आहे इथे ? कशासाठी आलायं ? ताराच्या पोटाला विळ्याने चटके का देता तुम्ही?" आशूने रघ्याची उलट तपासणी घेतली.

" अस्सं.. अस्सं होय! त्याचं काय आहे वहिनी, हया ताराचे पोट नेहमी दुखते अन् जवा बघलं तवा पोट धरून बसते. त्यावर हा जालीम उपाय हाय. आमच्या गावाकडं लई बेस्ट उपाय हाय हयो!" हसत - हसत रघ्या दोन्ही मालकिणीला सांगू लागला.

" अगं, तारा तुला एवढं बरं वाटत नव्हतं तर मला सांगायचं ना...! " वेदनेने विव्हळणाऱ्या ताराला पाहून मनिषा म्हणाली.

" वहिनी, लई दिवसांपासून पोट दुखतयं माझं. अंगावरच काढतेयं दुखणं पण आता नाय सहन होत हो ..!"असं म्हणत तारा रडू लागली.

" हे बघ तारा, रडू नकोस. उद्या सकाळी घरी ये. आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि रघ्या, तू असले जीवघेणे उपचार करून ताराचा जीव संकटात टाकतो आहेस ह्याचे जरा भान ठेव आणि हे असले रिकामटेकडे भगत - बिगत इथे आणत जाऊ नकोस!" नंदूकडे रागाने पाहत मनीषा म्हणाली.

__________________XXX_________________

" यांच्या पोटदुखीचे कारण अंपेन्डीक्स आहे . त्यासाठी त्यांचे ऑपरेशन करावे लागेल !" सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून डॉक्टर मनीषाला म्हणाले.

" ठिक आहे डॉक्टर! तुम्ही तारा बरी होईल यासाठी प्रयत्न करा!"

" तारा , घाबरू नकोस. डॉक्टरांच्या उपचारातून तू बरी होशील!" मनीषा घाबरलेल्या ताराला समजावू लागली.

"हो .. वहिनी ! पण डॉक्टरला पैसे लागतील ना?" ताराला पैशांची चिंता सतावत होती.

" तू काळजी नको करू गं... मी देईन सगळ्या उपचारांचा खर्च!".

डॉक्टरांनी ताराचे ऑपरेशन केले आणि ताराला तिच्या पोटदुखीच्या दुखण्यातून सुटका मिळाली.

______________ XXX_______

" कोण ...कोण ....आहे तिथे? आई. . आई....धाव ... अस्मी ..... पळ!" भरदुपारी आपल्या आईला न सांगता श्रेया आणि अस्मी शेताकडे निघाल्या होत्या. अचानक झाडामागे होणाऱ्या हालचालीने त्या घाबरल्या. तेवढ्यात संपूर्ण अंग पांढऱ्या कपड्याने झाकलेली सावली त्यांच्या मागावर येऊ लागली. त्या सावलीच्या चाहुलीने श्रेया अस्मीचा हात घट्ट पकडून जोराने पळत सुटली. ती सावली त्यांच्या मागे मागे येऊ लागली. दोघी एवढ्या घाबरल्या होत्या की, त्यांच्या नजरेला समजतच नव्हते की, आपल्या मागे लागलेली सावली नक्की कसली आहे. हा काय प्रकार आहे? दोघी वाऱ्याशी स्पर्धा करत पळू लागल्या. अचानक त्यांनी मागे वळून पाहिलं तर ती सावली तळ्याच्या आजूबाजूला गायब झाली. दोघी बहिणी धापा टाकत घराच्या दरवाजातच येऊन कोसळल्या. मुलींची ही अवस्था पाहून मनीषा घाबरून गेली. तिने मुलींना पाणी पाजलं. थोड्या वेळाने जरा शांत झाल्यावर दोघींनी आपल्यावर गुदरलेल्या प्रसंग सांगितला. सगळ्यांना प्रश्न पडला की कोण असेल बरं मुलींचा पाठलाग करणारा?

" लहान मुलांना पळवणारी टोळी फिरते या परिसरात!" महेश काकांनी आपल्या जवळची माहिती पुरवली तसं जमलेल्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर एक अनामिक भीती दाटून आली. आता एकटयाने फिरत जाऊ नका अश्या सूचना सगळ्यांनी श्रेया आणि अस्मीला केल्या.

_________________ XXX_______________

" रघ्या! तुला एक गोष्ट सांगायची होती . पण तू पडला भोळा गडी! कुठं चुकून बोलून गेलास तर नसता व्याप व्हायचा डोक्याला !"

"बोल रे नंदू ! नाही सांगायचो कुणाला. ताराची शपथ!"

" तुला सांगतो रघ्या, ही जमीन हाये ना ती भारलेली हाये. ह्या जमिनीच्या पोटात गुप्तधन हाये !" कपटी मनाचा नंदू आपल्या बोलण्याने रघ्याला जाळ्यात ओढू लागला.

" इथं... इथं... नाही इथं ... इथचं असणार गुप्तधन!" हातातली घुंगरू लावलेली काठी जमिनीवर आपटत नंदू म्हणाला.

" खरचं! काय बोलतो रे तू नंदू ! ह्या जमिनीत खरचं गुप्तधन असेल?" तोंडाचा आ वासून नंदूकडे बघत रघ्या म्हणाला.

"अरे , तुला काय बी माहित नाय! लई वर्षापूर्वी समुद्रचाचे यायचे इथे ..समुद्रकिनाऱ्याच्या गावात ...लोकांना लुबाडायचे. मग त्यांना घाबरून गावातली लोकं आपला पैसा- अडका, सोनं- नाणं जमिनीत खड्डा करुन पुरुन ठेवायचे!" कावेबाज नंदूने बरोबर मासा गळाला लावायला सुरुवात केली.

"असं होय ! मला काय बी माहित नाय. पण एक सांग हे गुप्तधन शोधायचं कसं?"

" ते मी तुला नंतर सांगेन. आज रातच्याला पूजा करीन मी देवीची. देवीला कौल लावीन मग सांगेन मी तुला. पण तोवर कुणाकडे बोलू नकोस. बरं !येतो मी आता!"

_________________XXX________________

"अरे रघ्या.. खुळा हायेस का रे तू? हे काय करून ठेवलयं ? " शेतातल्या जमिनीवर लहान लहान खड्डे खोदलेले पाहून नंदूने रघ्याला विचारले.

" अरे, तूच तर सांगितलं ना की इथं गुप्तधन हाय म्हणून ... म्हणून मी इथं खड्डे खणले!".

"काय रे ... ए खुळ्या...! तो ऊपरवाला अक्कल वाटत होता तवा तू काय चाळण घेऊन फिरत व्हता का रे?" नंदू रघ्यावर भडकला.

" पण तूच म्हणालास की ..."

"चूप ...XXX !! गुप्तधन कधी असं मिळतं काय?"

तेवढ्यात अचानक मागून येणाऱ्या फुस्स ss फुस्स ss आवाजाने दोघेही दचकले. फणा काढून मागे उभा असलेला नाग पाहून दोघांची बोबडी वळली. पण नंदू हा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. कपटी नंदू मागे लांब सरकत लांबूनच नागासमोर डोळे बंद करून नमस्कार करत म्हणू लागला.
" हे नागदेवता, मला ठावं हाय तू ह्या जमिनीत असलेल्या गुप्तधनाचा रक्षक हायेस. तू ह्या जमिनीचा मूळ पुरुष हायेस. तुझी विधिवत पूजा करू... तू मार्ग दाखीव आम्हाला.. तुला संतुष्ट करु!" असं नाटकीपणे म्हणत एक डोळा बारीक करत नंदू रघ्याच्या चेहर्‍यावरचे भाव निरखू लागला. क्षणभरात नागोबा आल्या वाटेने निघून गेले. रघ्या आश्चर्याने तसेच मोठ्या भक्तीभावाने नंदूकडे पाहु लागला.

"ह्यो... हयोच या जमिनीचा मुळपुरुष हाय... तो रक्षण करतो गुप्तधनाचं. त्याला संतुष्ट केल्याबिगर आपल्याला गुप्तधन मिळायचं नाय!".

" पण मग काय करावं लागेल त्याला संतुष्ट करायला!"

" बळी.... बळी .... नरबळी.... नरबळी ...द्यायला लागेल.... कुमारीकांचा. एक नाही दोन... दोन ... कुमारीकांचा बळी द्यायला लागेल... त्याला प्रसन्न करायला !" नंदू हातातली घुंगरूवाली काठी वर करत , दोन्ही हात वर करत खदाखदा हसू लागला.

त्याला तसं हसताना बघून रघ्या घाबरला.

______________XXX___________

" कसला इचार करतोय रं ..रघ्या?" दुसऱ्या दिवशी सकाळी चिंतित चेहऱ्याने बसलेल्या रघ्याला पाहून नंदूने विचारले.

" काय नाय!"

"मग मयताला गेल्यासारखं थोबाड कशापायी करून बसला हायेस?"

" इथं .. या जमिनीत खरचं गुप्तधन असलं का ह्याचा इचार करतोयं!"

" नुसता इचार करून नाही मिळत गुप्तधन ..रघ्या! त्यासाठी लई मोठी किंमत मोजावी लागते !" नंदूचे लालसा भरलेले डोळे चमकू लागले.

" तू म्हणतोस ते नरबळी द्यायचं पण तो कसा काय द्यायचा म्हणजे असं काही वंगाळ काम माझ्याकडून नाही व्हायचं !" माघार घेत रघ्या म्हणाला.

"रघ्या, तू फक्त मालकाच्या जमिनीत घाम गाळीत बस. तिथे तुझा मालक मोटारीतून फिरणार आणि तू बस इथं तंबाखू मळत आणि विड्या फुकत. या जमिनीत पैसा , सोनं असा मोठा खजिना गवसला तर... तर...तुझी तारा राणी बनून फिरेल. भरजरी कापडं , गळाभर दागिने घालून फिरेल. लोक सलाम ठोकतील तुला. रघ्या नाहीतर रघु शेठ नावाने ओळखतील.!" कावेबाज नंदू अडाणी रघ्याला पुन्हा एकदा जाळ्यात ओढू लागला. नंदूच्या बोलण्याने रघ्या खरचं दिवसा स्वप्न बघू लागला.
" पण बळी द्यायला कुमारिका आणायच्या कुठून?"
" तुझ्या काय बी ध्यानात येतं नाही का रे रघ्या? त्या दिवसा शेतात भटकत असतात त्या पोरी ..."
" ए .. नंद्या खाल्ल्या मिठाला जाणारा माणूस हाय मी! मालकाच्या पोरींचा गळा घोटू म्हणतोस तू?" नंदूचे बोलणे मध्येच तोडत रघ्या रागाने म्हणाला.

"हे बघ ..तू इचार कर.. मी आपलं उगाच सुचवले तुला! बरं जाऊ दे सोड तू इचार गुप्तधनाचा. तुला आपला मालक प्यारा हाये तर कर त्याची चाकरी मरेपर्यंत. मी जातो आता.. परत काही येणार नाही ! " ही मात्रा मात्र रघ्याला बरोबर लागली.

" नंदू ऐक माझं. आपण दुसरा मार्ग शोधू!"

" मग तू शोध मार्ग! मार्ग शोधला की मग येतो मी !" नंदूने निर्वाणीचा इशारा दिला. त्या रात्री रघ्याला रात्रभर झोप लागली नाही. पण त्या रात्री त्याच्या मनात काहीतरी नक्कीच शिजत होते. गुप्तधनाच्या लालसेपोटी रघ्या मोठे पाप करण्यासाठी तयार झाला होता.

_______________ XXX_________________
"सोडा...सोडा... आम्हांला सोडा... आई.. आई ...वाचवा ... !! आईला न सांगता शेताकडे खेळायला निघालेल्या श्रेया आणि अस्मीला अचानक पाठी मागून येऊन , तोंडावर कापड टाकून अज्ञात व्यक्तींनी पळवून नेलं. भरदुपारी चिटपाखरू नसलेल्या शेतातल्या रस्त्यावरून दोघींचे अपहरण करण्यात आले. घराच्या आजुबाजुला मुली खेळत असतील या विचाराने मनिषा निर्धास्त होती. पण दिवे लागणीची वेळ झाली तरी मुली घरात न आल्याने तिच्या जीवाची घालमेल वाढली. घराबाहेर येऊन तिने मुलींच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. तिच्या आवाजाने आशू घराबाहेर आली. अंधार वाढत चाललेला. दोघींचा अजुन पत्ता नाही. आजच नेमका विनय कामानिमित्त मुंबईला गेलेला. त्याला यायला उशीर होणार होता. मनीषा आणि आशू शेताच्या दिशेने पळत गेल्या. शेतातून जात असताना मुलींच्या नावाने आरोळ्या ठोकत दोघी पुढे चालल्या होत्या. आपल्या शेतात आल्यावर त्यांनी रघ्या आणि ताराकडे मुलींची चौकशी केली. पण आज मुली शेतातच आल्या नाही असे उत्तर दोघांनी दिले. त्या चौघांनीही बॅटरी घेऊन अंधारात पूर्ण शेत पालथं घातलं पण श्रेया आणि अस्मीचा पत्ता लागला नाही. आता मात्र मनीषा आणि आशूचे धाबे दणाणले. कुठे गेल्या माझ्या पोरी? असं म्हणत मनीषा आक्रोश करत जागेवरच बसून राहिली. तिचे हात - पाय गळाले. ' वैरी न चिंती ते मन चिंती' अशी तिच्या मनाची अवस्था झाली. मुले पळवणार्‍या टोळीने तर मुलींना पळवले नसेल ह्या विचाराने तिला चक्कर येऊ लागली.
आणि......तिथे विहिरीजवळ राजू स्वतःशीच बडबड करत हसत होता... हातवारे करत होता...!!

रात्रभर शोध घेतल्यावर मुली न सापडल्याने दुसऱ्या दिवशी मनीषाने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपल्या परीने मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. शहरात नोकरीस असलेल्या सुनील मुली गायब झाल्या म्हणून घाई-घाईने घरी आला. घरातलं वातावरण चिंतेने भरून गेले. मनीषा आणि सुनीलच्या माथ्यावर जणू आकाश कोसळलं.

________________ XXX______________

"उद्या... उद्या अमावसेची रात हाय ...उद्याच बळी द्यायला लागेल. उद्या मध्यरात्री बारा वाजता... तू कुठे बोलू नकोस रघ्या! मी पूजेची सगळी तयारी करीन. ही धार लावलेली कु-हाड लपवून ठेव इथचं कुठंतरी... रातच्याला मुलींना इथं आणू आणि त्यांचा बळी देऊ !" हळू आवाजात नंदू शेतातल्या कोपर्‍यावर बोलत होता.

"पण नंदू .... कुणाला कळलं तर? ... तर आपल्याला जीतं सोडणार नाही गावातली लोकं!" रघ्या घाबरला होता.

" तू काय बी चिंता करू नकोस .. ह्या कानाची खबर त्या कानाला लागणार नाय. मी सगळं व्यवस्थित सांभाळीन. माझ्या स्मशानाजवळ झोपडीत कुणाची बी हिंमत नाय यायची. तसा बी लोकांचा संशय हाय की , मुले पळवणारी टोळीनेच मुलींना पळवलं असेल. बळी दिल्यानंतर रातच्यालाच स्मशानामागच्या खाडीत टाकून देऊ पोरींना!" नंदू एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा कट आखत होता.

"पण... पण ...नंदू गुप्तधन नक्की गवसलं ना रे?" रघ्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

" हळू बोल की ...कुणी ऐकलं!" नंदू रघ्यावर खेकसला.

" ए..... XXX ! कोण हाये तिथं?" झाडामागे सळसळ झाल्याने रघ्या आणि नंदू आवाजाच्या दिशेने धावत निघाले.

" ए... वेड्या! काय करतो रे तू इथं? काय ऐकलं रे तू?" विहिरीजवळ उभ्या असलेल्या राजूच्या बखोटीला धरून नंदूने विचारले.

"मी ....मी ....मी ...काय नाय... मी काय बी नाय ऐकलं!" राजू भयंकर घाबरला.

"काय ऐकलं असलं आणि जर कुठं बकलास तर याद राख..!! या विहिरीत ढकलून देऊ तुला!" राजूची मान विहिरीच्या आत दाबून धरत रघ्या म्हणाला.

" सोडा... सोडा.... मला मला मारू नका!" राजू घाबरून रडू लागला.

_______________XXX________________

मनीषा, सुनील, विनय , आशु दिवस-रात्र श्रेया आणि अस्मीचा शोध घेत होते . सुनील एका गावात तर विनय दुसऱ्या गावात. मनीषाला झोप येणे शक्य नव्हते. तिने अन्नपाणी त्यागलं होतं. "श्रेया , अस्मी कुठे आहेत गं दोघी?" आपल्या लाडक्या लेकींच्या नावांचा पुकारा करत, आक्रोश करत ती सारखी मुर्च्छित पडत होती.

रात्रभर शोध घेऊन थकलेला सुनील घरी पोहोचलाच होता तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. इन्स्पेक्टर उदय यांचे नाव स्क्रीनवर पाहून त्याने झटकन फोन उचलला.

"मि. सुनील, मी इन्स्पेक्टर उदय बोलतोय.. तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस चौकी या!" इन्स्पेक्टर उदय साहेबांनी एवढ्या तातडीने पोलिस चौकीत का बरं बोलावलं असेल ह्या विचारातच सुनील, मनीषा पोलीस चौकीत पोहोचले.
"साहेब! माझ्या मुली सापडल्या का?" मनिषाचे अश्रू थांबण्याचे काही नाव घेत नव्हते.
"काळजी करू नका! तुमच्या दोन्ही मुली सुखरूप आहेत." इन्स्पेक्टर उदयच्या बोलण्याने सगळे आनंदी झाले. एका झटक्यात सुनील आणि मनिषाच्या चेहर्‍यावरची चिंता आणि ताण नष्ट झाला.

पोलीस स्टेशनच्या आतल्या खोलीतून श्रेया आणि अस्मी बाहेर आल्या.आपल्या आई-वडिलांना बिलगुन रडू लागल्या. उपस्थित असलेल्या सगळ्यांचे हे दृश्य पाहून डोळे पाणावले.

"साहेब ...कोणी पळवलं होतं माझ्या मुलींना? कोण होते ते अपहरणकर्ते?" सुनीलने इन्स्पेक्टर उदयना विचारले.

एक दीर्घ श्वास घेऊन इन्स्पेक्टर उदय म्हणाले, " चला तर तुम्हाला आरोपींची भेट घालून देतो पोलीस कोठडीत!" पाठमोरे बसलेले आरोपी कोण आहेत हे पाहण्यास सुनील जेवढा उत्सुक होता तेवढाच त्याचा संताप अनावर होत होता.

‌"या....रे सगळ्यांनी ....दाखवा आपले चेहरे...!" हवालदार देसले आरोपींना म्हणाले. रघ्या, भगत नंदू आणि हा... तिसरा आरोपी...नाही... नाही.... इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय... विनय ....विनय .... माझा सख्खा भाऊ कसा आरोपी असू शकतो? आरोपींची चेहरे बघून सुनीलला जबरदस्त धक्का बसला.

" मि. सुनील खरंतर तुमच्यासाठी खूप मोठी धक्कादायक गोष्ट आहे ही. परंतु तुमच्या मुलींच्या अपहरणामागे मागे जो खरा मास्टरमाइंड आहे तो तुमचा प्रिय बंधुराज आहे.!"

"नाही... नाही ...हे शक्य नाही!" सुनील अजून धक्क्यातून बाहेर आला नव्हता.

" का शक्य नाही सुनिल? घोर कलियुग आहे हे ... इथे सगळं शक्य आहे. विचारा तुमच्या बंधुराजांना का केलं हे सगळं!'

" विनय ....का केलसं तू असं? काय वाईट केलं होतं रे माझ्या मुलींनी तुझं?" डोक्याला हात लावत, खाली बसत सुनील म्हणाला.

विनय खाली मान घालून होता. अचानक मान वर करत अतिशय संतापाने बोलू लागला. सगळ्यांसमोर आपल्या मनातली मळमळ ओकू लागला.

" अण्णांनी सगळी पुंजी, सगळा पैसा तुझ्या शिक्षणावर उधळला. मला पुढे शिकायचं होतं... पण नाही ...अण्णांना तुझ्यावरचं जास्त विश्वास ! मला शिकवलं नाही पुढे. तू काय अभ्यासात ' ढ' आहेस, तू आपली शेती, गाई- म्हैशी सांभाळ अश्या टोमण्यात बालपण होरपळलं माझं. तू खूप शिकलास ...शहरात नोकरी करू लागलास... आणि इथे मी दिवस-रात्र शेतात राबू लागलो. काबाड - कष्ट करू लागलो. पण जेव्हा - जेव्हा जमिनीचे पेपर बघायचो ना तेव्हा... तेव्हा त्यात अर्धा वाटेकरी म्हणून तुझं नाव पाहून माझ्या कपाळाची शीर ठणकायची . तू शहरात राहून पैसा कमावणार ..तो पैसा तुझ्या एकट्याचा आणि इथे जमिनीत मी घाम गाळून केलेल्या कष्टात तू... तुझ्या मुली ... हक्कदार..!! आता इथे सरकारी प्रकल्प येणार... जमीन जाणार ...मी काय करायचं ? तू शहरात जाशील आपल्या कुटुंबासोबत आणि मी .. मी देशोधडीला लागणार. पैसे मिळतील जमिनीचे पण त्यात तू समान वाटेकरी !! नाही.. नाहीच सहन झालं मला हे सगळं!"

" म्हणून तू माझ्या मुलींच्या जीवावर उठलास? तू ... तू माझा सख्खा भाऊ आहेस ना ? एवढं विष पोटात घेऊन माझ्या सोबत राहत होतास तू? विश्वास बसत नाही माझा. अरे, तू म्हणाला असतास तर सगळी जमीन तुला दिली असती रे.... पण तू एवढा विश्वासघातकी असेल असं स्वप्नातही वाटलं नाही मला !" सुनील अतीव दुःखाने म्हणाला.

"ह्या नंदू मांत्रिकाला हाताशी धरत आणि अडाणी रघ्याला गुप्तधनाचे आमिष दाखवत मुलींचा बळी देण्याचे कारस्थान होते तुमच्या बंधुराजांचे!" इन्स्पेक्टर उदय साहेबांच्या बोलण्याने सुनिलचे रक्त खवळले.

"साहेब , सोडू नका ह्या आरोपींना! हया सगळ्यांना कठोर शिक्षा झाली पाहीजे!" सुनिल कठोरपणे म्हणाला.

" इन्स्पेक्टर साहेब, पण एक विचारू का मी तुम्हांला?"

" अवश्य ! विचारा सुनिल!".

" हे आरोपी तुम्ही कसे पकडले आणि माझ्या मुलींची सुटका कशी काय केली?"

"ते तुम्हाला उद्या समजेल..!" इन्स्पेक्टर उदय गालातल्या गालात हसत म्हणाले.

आपल्या लेकी सापडल्या म्हणून एक पाऊल आनंदाने पुढे टाकत जाणारा सुनील दुसऱ्या पाऊलाने मात्र अडखळत होता... सख्ख्या, रक्ताच्या भावाच्या विश्वासघाताने.... अतिव दुःखाने!!

"सख्खा भाऊ ....पक्का वैरी .....! हे म्हणतात ते खोटे नाही साहेब !" हवालदार देसले इन्स्पेक्टर उदयना म्हणाले.

" बरोबर आहे तुमचं म्हणणं देसले!" इन्स्पेक्टर उदय दिर्घ श्वास घेत म्हणाले.

________________ XXX___________________

" इथे जमलेल्या माझ्या माता-भगिनी आणि बंधुंनो, आज महिला दिनानिमित्त तुम्ही मला इथे निमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर मंडळी, या महिला दिनाचे महत्त्व फक्त एक दिवसापुरते साजरे न करता, येणारा प्रत्येक दिवस हा प्रत्येक स्त्रीसाठी अभिमानाचा, आनंदाचा तसाच आदराचा असायलाच हवा.. !! तर आज या महिला दिनाच्या निमित्ताने आपण अशा एका स्त्रीचा सत्कार करणार आहोत जिने आपला जीव धोक्यात घालून एका मोठ्या हत्याकांडाचा कट शिताफीने आणि मोठ्या धैर्याने उधळून लावण्यास पोलिसांची मदत केली आहे. तर मी त्या धाडसी स्त्रीला व्यासपीठावर येण्यास आमंत्रित करतो!". इन्स्पेक्टर उदय व्यासपीठावरून महिला दिनानिमित्त भाषण करत होते. महिला दिनानिमित्त जमलेले सगळे जण एकमेकांकडे पाहू लागले. कोण आहे ती धाडसी स्त्री हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली होती.

" तर आजच्या सत्कारमूर्ती आहेत श्रीमती ताराबाई, श्रेया आणि अस्मी ह्या दोन मुलींच्या अपहरणात हात असलेल्या आरोपी रघ्याची पत्नी.... नरबळी सारखा भयंकर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गुन्ह्यात सहभागी होऊ पाहणाऱ्या आपल्या पती विरोधात आणि इतर आरोपींच्या विरोधात पोलिसांना माहिती देणाऱ्या धाडसी ताराबाईंचा आम्हाला गर्व आहे. तर अशा धाडसी ताराबाईंना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो!".

ठेंगणीशी, अंगाने बारीक, सावळी स्त्री उठून व्यासपीठाकडे जाऊ लागली. तिला पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले.

" नमस्कार !! मी तारा ...एक अडाणी, अशिक्षित बाई हाये..मला काही तुमच्यासारखं बोलता येणार नाय... पण एक सांगते... माझ्या दादल्याने त्या भगताच्या नादाला लागून लई वंगाळ काम केलं ....त्याला शिक्षा व्हायलाचं पायजे.. माझी तब्येत बरी नव्हती तवा ह्या पोरी आणि त्यांची माय माझ्यासाठी देवासारख्या धावून आल्या. माझ्यावर त्यांचे लई उपकार हायेत. देवाने माझ्या पोटी लेकरू घातलं नाय... पण म्हणून माझ्या पोटात माया नाय...असं नाय .. हा ' राजू' माझा भाचा... जरी थोडा खुळा असला तरी तसा लई गुणाचा हाय. भल्या- बुऱ्याची देवाने जाण दिलीयं त्याला. त्या रातीला हातात कु-हाड घेऊन येणाऱ्या भगताला पाहून राजू चरकला व्हता. त्याला जे समजलं ते त्यानं मला सांगितलं व्हतं. मुली गायब झाल्या दिसापासून माझा दादला जरा घाबरलेला दिसत व्हता. त्या रातीला मी त्याच्या मागावरचं व्हती. माझा दादला आणि तो भगत.. जे बोलत व्हते ते मी समदं ऐकलं ... तवाचं ठरवलं यांचा कट पुरा होऊ द्यायचा नाय...!! नाय म्हंजे नाय....!! ज्याचे हात रगताने माखू लागलेत त्या दादल्याचा हात धरून मला त्याच्या पापात वाटेकरी नाय व्हायचं! गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाचं पायजे!! बस एवढंच माझं म्हणणं हाय! " ताराच्या भाषणाने सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले.

"तर सरकारी प्रशासन ताराबाईंचा नुसता सत्कार करून थांबणार नसून ताराबाईंना आपल्या गावातील अंगणवाडी मध्ये मदतनीस म्हणून नेमण्यात येत आहे. तसेच राजूच्या औषधोपचाराची जबाबदारीसुद्धा घेत आहे !" ग्रामसेवकांनी तारा आणि राजूच्या पुर्नवसनाची घोषणा केली आणि जमलेल्या सगळ्यांनी या घोषणेचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

__________________XXX_______________

'"आई ! खरचं का गं आपल्या शेतात गुप्तधन असेल?" श्रेया आणि अस्मी निरागस कुतुहलाने मनीषाला विचारत होत्या.

"पोरींनो ! असं गुप्तधन जर जागोजागी सापडत असतं तर लोकं कामधंदा सोडून त्या गुप्तधनाच्या मागे लागले नसते का? आपलं शेत म्हणजे काळी आई , आपली जमीन जी सुपीक आहे, तिची मशागत केली..वरुणराजाची कृपा आणि आपले काबाडकष्ट, मेहनत असेल तर पिकाच्या रूपाने जमिनीच्या पोटातून सोनचं बाहेर येतं. तेचं आपलं धन .. तेच गुप्तधन..!" मनिषा मुलींना समजावू लागली.

" खरचं ... आई?"

" हो!! चला! झोपा आता .. उद्या सकाळी शाळेत जायचे आहे ना?" लेकींच्या अंगावर पांघरुण घालत मनिषा म्हणाली.

" हो ... आई!"

" गवताचं पातं वाऱ्यावरं डोलतयं .... डोलताना म्हणतयं झोपायला चला!!!"

दोघी बहिणी हसत- हसत आपलं गाणं म्हणतं निद्रादेवीच्या अधीन झाल्या.

_____________ XXX__________

समाप्त!!

धन्यवाद!!

रूपाली विशे- पाटील

(टिप - सदर कथा पूर्णत: काल्पनिक असून कथेतील नावे आणि घटनेत काही साध्यर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजण्यात यावा. सदर कथेतून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा कथालेखिकेचा उद्देश नाही.)
__________________ XXX______________

..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

खूप घाबरत वाचली. प्रभावी लिहिली आहे.शेवट चांगला झाला म्हणून बरं वाटलं.
अजूनही अश्या कितीतरी नरबळी च्या, अंधश्रद्धेच्या बातम्या पेपर मध्ये येतात.कधी अक्कल येणार काय माहीत लोकांना.

कथा उत्तम जमली आहे. एखादी लहानशी चित्रफीत होऊ शकते. कथाशीर्षक समर्पक. समाजातील दृष्टप्रवृत्तींना प्रकाशात आणल्याबद्दल आभार. शेवटपर्यंत पुढे काय होईल? अशीच उत्कंठा वाटत होती. पुढील कथेसाठी हार्दिक शुभेच्छा.

जाई, वीरुजी, वर्णिता...
खूप धन्यवाद तुम्हांला प्रतिसादासाठी ....

छान कथा आहे
छान लिहिली आहे
आवडली Happy

छान आहे कथा. आधी मी धास्तावले की त्या वेडसर राजूची वाट लावतो काय हा नंदू, पण शेवट आवडला.