अंधाराचे गाव--( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 28 November, 2020 - 21:38

अंधाराचे गाव--( वीक एंड लिखाण )

मला  बर्‍याच वेळा प्रश्न विचारला जातो की बँकेत आकडेमोडीच्या क्लिष्ट कामात आयुष्य घालवून आपण कविता कशा काय करू शकता? माझे एक ठरलेले उत्तर असे की बँक कर्मचारी पण माणसेच असतात आणि ते  समाजाचा भाग असतातच. समाजात जेजे घडते त्याचे ते साक्षीदार असतात. जर भोवतालच्या घटना डोळे उघडून पाहिल्या तर कवितेसाठी भरपूर विषय मिळतात. माझ्या बाबतीत हेच नेमके झालेले आहे. आता खालच्या कवितेची पार्श्वभूमीच बघा. मी जर बँकेत नसतो तर ही कविता झालीच नसती माझ्याकडून.
मी बँकेत नोकरीत असताना एका शाखेच्या जवळ असणार्‍या एका अगदी लहान खेड्यातिल लोकांच्या ठेवी ( डिपॉजिट्स ) खूप जास्त होत्या. त्या खेड्यात असलेली घरे आणि ठेवीची रक्कम यांचा ताळमेळ बसत नव्हता. सहाजिकच माझे कुतुहल जागे झाले. येथे पैसा वाममार्गाने तर येत नाही ना? अशी शंका आली आणि त्या गावात जाऊन सर्व ग्रामस्थांची बैठक घेतली. २/३ तास चर्चा, गप्पागोष्टी झाल्या आणि मी परतलो. पण गप्पा मरताना माझ्या कविमनाला या गावच्या श्रीमंतीचा भयाण चेहरा दिसला. या अनुभवावर रचलेली कविता:

नव्हते कोणी रंक तेथे
सारे होते राव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

ध्येय होते ऊंच ऊंच
स्वप्न तसेच भव्य
परिपूर्तीसाठी केले
आयुष्यभर अपसव्य
तपस्या आली फळाला
मुलांनी कमवले नाव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

सर्व मुले परदेशात
गावास आकाश ठेंगणे
पांगळ्यालाही शक्य नव्हते
जमीन धरून रांगणे
आनंदमयी जल्लोषात
लपले विरहाचे भव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

रेलचेल होती घरात
ऊंची वस्तूंची चंगळ
अलबेल होत्या कुंडल्या
नव्हते शनी मंगळ
दुखत असून करीत होते
दु:खाचा सराव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

दिवाळी येत असे त्यांना
दोन वर्षात एकदा
निश्चित तिथी नसे तेथे
वाट बघून अनेकदा
मुले येण्याची तारीख कळता
होत होती धवाधाव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

दोन दिवस शनी, रवी
फोनच्या घंटीची वाट
फोन वाजताच येई
आनंदाची लाट
बोलणे होता रिता होई
आनंदाचा तलाव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

काळा लांब बोगदा होता
अंधाराच्या नगरी
कण्हणे ऐकू येई डसता
आठवणींच्या मगरी
हसू कसे येईल ओठी?
पचवून विरहाचे भाव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

पोकळ होता डोलारा
ताठ ठेवीत मान
बाळ परत यावा म्हणून
करीत होते दान
तरीही दुसरा पाठवायचा
करीत होते ठराव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

अनिवासी भारतियांची
होती ती वस्ती
विरह बिंदू भोवती
संपदेची मस्ती
झाकली जखम वहात होती
भावनांचा स्त्राव
देशाच्या एका कोपर्‍यात
अंधाराचे गाव

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users