मोगरा

Submitted by सांज on 25 November, 2020 - 02:18

मिटल्या डोळ्यांसमोर उमटतोस तू
तुझे शब्द
माझी थरथर
तुझ्या न झालेल्या स्पर्शाने मोहरणारा माझा देह
तुझं रुप.. तुझा आवेग..
आणि मला जाणवणारा केवळ कंप.. नि:शब्द!
काही क्षणांनी मग ओसरतं सगळं..
त्याचं डोळ्यात तरळतं पाणी हळवं..
जवळ नसतोस तरी
जवळ असल्याचा भास देणारं..
हा भर पावसातला उन्हाळा छळतोय बघ खूप..
तुलाही असेलच छळत!
पण हे उन्ह गरजेचंच असतं बहुतेक,
त्याचे चटके बसल्याशिवाय फुलतच नाही मोगरा..
अंगणातलाही आणि मनातलाही!
वाट पाहतेय मी,
त्याच्या फुलण्याची..
आणि तुझं उन्ह पोळण्याची..
या उन्हाळ्या नंतरचा तो धुंद मोगरा
नक्कीचं खूप मोहक असेल,
तुझ्यासारखाचं..
तोपर्यंत, खूप प्रेम!

~ संजीवनी. https://chaafa.blogspot.com/?m=1

Group content visibility: 
Use group defaults