तमिळ सिनेमा - सुब्रमण्यपुरम्

Submitted by केअशु on 25 November, 2020 - 00:07
subramaniapuram

आमच्या साऊथचे सिनेमे या WhatsApp समुहात लिहिलेला एक लेख माबोकरांसाठी
---------------------------------------------------
सिनेमाचं नाव आहे सुब्रमण्यपुरम् (Subramaniapuram) सुब्रमण्यपुरम् हा २००८ चा तमिळ सिनेमा आहे.

लेखक , दिग्दर्शक , निर्माता - शशिकुमार
कलाकार - जाई संपत , स्वाति , शशिकुमार
संगीत - जेम्स वसंतन्

हा एक अॅक्शन कम थरारपट आहे.तमिळनाडूच्या मदुराई शहरातल्या सुब्रमण्यपुरम् भागात सिनेमाची कथा घडते.

सिनेमा सुरु झाल्यावर पहिल्याच दृश्यात आपल्याला दिसतं की तुरुंगातून एक गुन्हेगार शिक्षेचा काळ संपल्याने बाहेर पडतो आहे.तो बाहेर पडताच तुरुंगाच्या आवारातच एक व्यक्ती त्या गुन्हेगारावर धारदार हत्याराने हल्ला करुन पळून जाते. गेल्या २८ वर्षात या गुन्हेगाराला साधं भेटायलाही कोणी आलं नाही याच्यावर हल्ला केला कोणी हा प्रश्न पोलिसांनाही पडतो.

पहिलं दृश्य इथे संपतं.

आता कॅमेरा आपल्याला मदुराई शहराच्या सुब्रमण्यपुरम् भागात ते सुद्धा ८० च्या दशकात घेऊन जातो.
इथे आपल्याला भेटतात अळगर (जय), परमन (एम. शशिकुमार), कासी (गांजा करुप्पू), डोपा आणि दुमका हा अपंग मुलगा. हे पाच उनाड युवक. यांची दिवसभरातली प्रमुख कामं म्हणजे उनाडक्या करणे, मारामार्‍या करणे , दुसर्‍या गँगला हूल देणे, राजकारण्यांची पडेल ती कामे करणे.
याच भागात सोमु हा राजकारणी राहत असतो.या सोमुच्या घरात त्याचा भाऊ कणुगु , सोमुची मुलगी तुलसी आणि बाकीचे नातेवाईक राहत असतात.हे पाच टपोरी कधी मारामारी किंवा दादागिरी करताना सापडले तर पोलिसांना फोन करुन किंवा यांचा जामीन देऊन सोडवण्याचं काम हा सोमु करत असतो.या कामात याला याचा भाऊ कणुगु मदत करत असतो.
सोमुची मुलगी तुलसी आणि अळगर यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटत असतं.परमनला हे पसंत नसतं.तो वेळोवेळी अळगरला याबद्दल दटावत असतो.पण प्रेमच ते! ते कुठं ऐकतंय? ते फुलत जातं.
अशातच भागातल्या मंदिराच्या एका सोहळ्याच्या कमिटीच्या प्रमुखपदी सोमुची निवड होत नाही.याचा परिणाम असा होतो की सोमु ज्या पक्षाचा सदस्य असतो त्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपद सोमुला मिळत नाही.दुसर्‍या एकाची निवड त्या पदावर होते.सोहळ्याचे प्रमुखपद गेले नि जिल्हाध्यक्षपदही गेले यामुळे कणुगुची बायको त्याची थट्टा करते.याचा राग येऊन व्यथित होऊन तीर्थप्राशन करत बसलेला कणुगु एक योजना आखतो.त्यासाठी अळगर,परामन आणि कासिला बोलावतो.ज्याची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्या माणसाचा खून करण्याची जबाबदारी तो या तिघांवर सोपवतो.आजपर्यंत अनेकवेळा छोट्या-मोठ्या मारामार्‍यांमधून सोडवल्याची आठवण करुन देऊन त्याबदल्यात हे काम करायला सांगतो.पोलिसांनी पकडलंच तर त्यातून सहीसलामत सोडवण्याची हमीसुद्धा देतो.
आतापर्यंतचे उपकार स्मरुन अळगर,परमन आणि कासि एके रात्री त्या जिल्हाध्यक्षाला मारतात आणि पळून जातात.पण गुन्ह्याच्या वेळी वापरलेली सायकल पोलिसांना सापडते आणि त्यावरुन अळगर आणि परामनची रवानगी तुरुंगात होते.कासि मात्र बाहेरच राहतो. आपल्याला इथून सोडवले जाईल या आशेवर असलेल्या अळगर आणि परामनला काशी या मित्राकडून कळतं की सोमु किंवा कणुगु कोणीच त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत नाहीये.आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं.
अशातच तुरुंगातला अजून एक गुन्हेगार त्यांची ही परिस्थिती अोळखतो आणि त्यांना आपल्यासोबतच तुरुंगातून सोडवतो.बाहेर आल्यावर हा मित्र अळगर आमनि परामनकडे एक कामगिरी सोपवतो.त्याच्या बहीणीचा खून करणार्‍या त्याच्या मेव्हण्याचाच खून करण्याची कामगिरी असते.
अळगर आणि परामन याला तयार होतात.कणुगुला मारुन मदत करणार्‍या मित्राच्या मेव्हण्याचा खून करुन संपवायची योजना आखतात.एके रात्री अळगर आणि परामन कणुगुच्या घरात शिरतात.पण कणुगुला याची चाहूल लागताच तो लपून बसतो आणि वाचतो.इकडे अळगर आणि परामन मित्राच्या मेव्हण्याला एका अंत्ययात्रेत शिरुन जी त्या मेव्हण्याच्या मित्राच्या वडिलांची असते.त्यात शिरुन कामगिरी फत्ते करतात.त्यानंतर पुन्हा एकदा हे दोघे कणुगुला रस्त्यात गाठून मारायचा प्रयत्न करतात.पण कणुगु फक्त जखमी होतो.
दोनदा आपण वाचलो पण आपल्याला मारायचा प्रयत्न हे दोघे पुन्हा करणार हे अोळखून कणुगु अळगर आणि परामनलाच संपवायची योजना आखतो.

काय असते ही योजना? अळगर आणि परामनचं पुढे काय होतं? तुलसीचं काय होतं? कणुगुला मारायची योजना यशस्वी होते का? पाचपैकी बाकीच्या तिघा मित्रांचं काय होतं? सिनेमाच्या सुरुवातीला ज्याच्यावर हल्ला होतो तो कोण असतो? त्याच्यावर हल्ला का होतो? कोण करतं हा हल्ला?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे लिहिण्याऐवजी तुम्हीच ती सिनेमात पहा.

हा सिनेमा युट्यूबवर मल्याळम् मधे डब केलेला उपलब्ध आहे.
https://youtu.be/HYMmnMJe4uU

तेलुगू समजत असेल तर तेलुगूत डब केलेला आहे.
https://youtu.be/fChzTjEAOBo

या सिनेमाचा कन्नड रिमेकसुद्धा आहे सबटायटल्ससकट
https://youtu.be/IRAxIYhfC1g
------------------------------------------------------------
या सिनेमाची काही खास वैशिष्ट्ये आहेत.

१. या सिनेमात ८० च्या दशकातला काळ दाखवण्यासाठी दिग्दर्शकाने कमालीची मेहनत घेतली आहे.इतकी की रफ फुटेजमधे या सिनेमातल्या पानपट्टीवरच्या दृश्यात पान परागचे सॅशे दिसत होते. ८० च्या दशकात पान परागचे सॅशे नव्हते.शशीकुमारने ते सॅशे हटवून तो सिन पुन्हा शूट केला.इतकं डिटेलिंग या सिनेमात केलंय.खरोखरंच ८० च्या दशकातला मदुराईचा एक भाग वाटावा इतकं बेमालूम वातावरण तयार केलंय.

२. या सिनेमाचं दमदार संगीत ही अजून एक गोष्ट.कणगल इरंडाल हे हिट गाणं तुम्ही बर्‍याच WhatsApp status वर पाहिलंही असेल.यातलं देवीचं गाणं मदुरा कुलंग अगदी खास दक्षिणी धाटणीचं आहे.जेम्स वसंतन् यांनी कमाल केलीय.
अजून एक महत्वाचे म्हणजे या सिनेमात ८० च्या दशकातली इलय्याराजाची हिट गाणी काही दृश्यांमधे अगदी खुबीने वापरली आहेत.ती जाम फिट बसलेत प्रसंगांप्रमाणे.

३. या सिनेमात ८० च्या दशकात रजनीकांत या महानटाची काय क्रेझ होती (अजूनही आहे म्हणा!) ते याची देही याची डोळा पाहता येईल.रजनीकांत आणि रती अग्नीहोत्रीच्या मुराट्टु कालाई सिनेमा थेटरमधे लागणं,रजिनी सरांचे भव्य कटआऊट,थेटरातला प्रेक्षकांचा धिंगाणा; सगळं बघण्यासारखंच आहे.

४. गँग्स अॉफ वासेपुर या सिनेमामागची प्रेरणा हा सुब्रमण्यपुरम् सिनेमा होता - अनुराग कश्यप.

https://www.google.com/amp/s/m.hindustantimes.com/regional-movies/anurag...

Group content visibility: 
Use group defaults

दिग्दर्शक ससीकुमार चे तामिळ सिनेमे थोडे वेगळ्या धाटणीचे असतात.. काही सिनेमे टिपीकल तामिळ स्टाईल असतात..
हा सिनेमा पाहिला नाहीए...आप्पा,पसांगा,असुरवधम,केनेडी क्लब हे सिनेमे पाहिलेत.

यातलं कणगल इरंदाल गाणं माझं जीव की प्राण आवडतं आहे. अवीट आहे ते. मी कितीही वेळा ऐकू शकते. दिवसातून एकदा ऐकतच. अर्थात गाणं तेवढं सुंदर आहे केव त्याच्याशी निगडीत माझ्या आठवणी इतक्या सुंदर असल्याने गाणं आवडतं आहे ते माहीत नाही पण मला खूप आवडतं ते गाणं.

पिक्चर पाहिलेला नाही पण स्टोरी माहीत आहे किंबहुना म्हणूनच पिक्चर पहाववला जाणार नाही ( मला sad end चे पिक्चर बघवत नाहीत)