शरलॉकच्या एका गोष्टीची गोष्ट!

Submitted by भास्कराचार्य on 24 November, 2020 - 12:48
शरलॉक व्हायलेटचा हात निरखून बघताना

शरलॉक होम्सच्या 'द अ‍ॅडव्हेंचर ऑफ द सॉलिटरी सायक्लिस्ट' ह्या गोष्टीवर आधारित हे लिखाण आहे. ह्यात ह्या गोष्टीचे आणि इतर काही मामुली स्पॉयलर्स असण्याची शक्यता आहे, हा इशारा आधीच देऊन ठेवतो.

ह्या गोष्टीत व्हायलेट स्मिथ नावाची सुंदर तरूणी आहे. कामावरून घरी जाताना सुनसान रस्त्यावर तिचा पाठलाग करणारा एक आगंतुक सायकलवाला आहे. दुष्ट ड्रॅगनसारखा एक अक्राळविक्राळ गुंडही आहे, आणि 'शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती' म्हणणारे आपले व्हाईट नाईट्स शरलॉक आणि वॉटसन आहेत. डेमझल इन डीस्ट्रेसचं हे शरलॉक कथेतलं रूपांतर एकदम झकास जमलंय.

ही सुरस कथा वाचल्यावर पूर्वी मी लगेच पुढच्या गोष्टीकडे वळलो असेन किंवा काय, पण कथेतल्या रहस्यापलीकडे फार काही विचार केला नाही. पण आता कथेच्या रहस्याचा विचार मनात आला. गंमत म्हणजे ह्या गोष्टीमध्ये मिस व्हायलेट स्मिथला एक भावी नवरा आहे. सिरील मॉर्टन त्याचं नाव. त्याच्या उल्लेखापलीकडे तो ह्या गोष्टीत काहीही करत नाही. मग आर्थर कॉनन डॉईल साहेबांनी तिला हा 'फियॉन्से' कशाला ठेवला असेल? हा जाणीवपूर्वक निर्णय असेल का? की डॉईलला नेणीवेतूनच लग्नाळू तरूणीची गोष्ट सुचली असेल? ती तशी का असेल?

ह्या माणसाचं नाव गोष्टीत प्रारंभीच येतं. व्हायलेट स्मिथ जेव्हा होम्सला एकंदर माहिती देत असते तेव्हा. ती होम्सला पाठलाग करणार्‍या सायकलवाल्याबद्दल सांगते. पण ही मुलगी स्वतःच्या भावी जोडीदाराकडे मात्र मदतीसाठी जात नाही. सगळं प्रकरण आटपल्यावर ती त्याच्याशी लग्न करून मोकळी होते, पण त्याआधी तो ह्यात काहीही करत नाही.

अर्थात, होम्सच्या गोष्टीमध्ये होम्सनेच लोकांना वाचवणं वगैरे भाग आहे. पण काही गोष्टींमध्ये बायकांचे प्रेमिक होम्सच्या मार्गात लुडबूड करत असतात. 'डिसअ‍ॅपीअरन्स ऑफ लेडी फ्रान्सेस सर्फॅक्स'मध्ये तसं आहे. पण तिथे तो 'फियॉन्से' नव्हता. 'ठिपक्याठिपक्यांचा पट्टा' गोष्टीमध्येही होम्स आणि वॉटसन ज्या मुलीला वाचवतात, तिचंही लवकरच लग्न होणार असतं. पण तिथेही तो जोडीदार 'असण्या'पलीकडे काही करत नाही. 'कॉपर बीचेस'मधल्या मुलीला शेवटच्या क्षणी तिचा वाग्दत्त वर येऊन वाचवतो खरा, पण ते थोडं अपघातानेच आलंय, असं वाटतं. त्यामुळे डॉईलचं आणि ह्या संकल्पनेचं काही बरं नाही, असं काही असेल का?

वाग्दत्त वधू असणं म्हणजे ती इतरांसाठी उपलब्ध नाही, असं एक साधं समीकरण असतं. तो पुरूष आयुष्यातल्या नांगरासारखा असतो, आणि हे इतर लोकांनी जाणून तसं वागणं अभिप्रेत असतं. अर्थात, हे नातं लग्नापूर्वीच तुटूनही जाऊ शकतंच. त्यामुळे 'म्हटलं तर खूप आहे, पण काही बाबतीत फार नाही' अश्यासारखं हे नातं आहे. ह्या गोष्टीमध्येही ते तश्याच अंगानं येतं. व्हायलेट स्मिथच्या सौंदर्याच्या मोहात जवळपास सगळेच आहेत. तिच्या संपत्तीवर डोळा असणारा कॅरूथर्ससुद्धा तिच्या शुद्ध प्रेमात वगैरे पडतो. वूडलीसारखा गुंड माणूस तर तिच्या अंगचटीला यायला टपलेला असतो. विधुर असलेला वॉटसनही तिचे गोडवे गाताना थकत नाही. इतकंच काय, होम्ससारखा यंत्रवत भासणारा माणूसही तिच्या गारूडाखाली असल्यासारखं वाटतं! तो तिचा हात हातात घेतो, तिच्या 'स्पिरिच्युअल' सौंदर्याबद्दल बोलतो, आणि 'इस हसीन चेहरे के पिछे तो काफी चाहनेवाले होंगे' असा बॉलीवूडी डायलॉग मारतो! पण व्हायलेट स्मिथ विवाहबंधनात अडकणार असल्याने ती कॅरूथर्सचा लग्नाचा प्रस्तावही स्वीकारू शकत नाही. वूडलीच्या जंगली भावना तर जाऊच दे, आणि वॉटसन-होम्सच्या मनातल्या गोष्टींना तर वाचा मिळणं शक्यच नाही.

इथे आर्थर कॉनन डॉईलच्या वैयक्तिक आयुष्यातली दु:खद म्हणावी अशी घटना डोक्यात येते. त्याच्या पहिल्या बायकोशी त्याने २१ वर्षे संसार केला. ती क्षयाने बराच काळ आजारी असायची. शेवटच्या काळात तर ती अंथरूणाला खिळलेली होती. तिच्या मरणाच्या २ वर्षे आधी प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे. तिच्या मरणानंतर पुढील वर्षी त्याने त्याच्या दुसर्‍या बायकोशी लग्न केलं. तिच्याशी त्याची ओळख आणि प्रेमात रूपांतर हे जवळपास १० वर्षे आधीच झालं होतं, पण त्याच्या प्रथम पत्नीशी निष्ठेमुळे त्यांनी ती असेपर्यंत हे नातं 'प्लेटॉनिक' ठेवलं होतं. त्याकाळच्या इंग्लंडमध्ये व्यभिचार कायदेही बरेच कडक असावेत. काय असेल ते असो. पण हे पुस्तक लिहिण्याच्या काळात डॉईलच्या मनात ह्या सर्व भावना होत्या हे नक्की.

त्यामुळे ही गोष्ट फक्त एक साहसकथा म्हणून आपल्याशी बोलण्यापलीकडे जाऊन पोचते. दबलेल्या भावनांचा एक लोलकच आपल्याला होम्स, वॉटसन, कॅरूथर्स ह्या पात्रांमधून चमकताना दिसायला लागतो. डॉईलच्या स्वतःच्या भावनांमधून तर ही गोष्ट आली नसेल? असून नसलेल्या लग्नामध्ये असताना आणि दुसर्‍या व्यक्तीकडे आपण स्वतःला झोकून देऊ शकत नाही, ह्या भावनांचं प्रतिबिंब तर त्या असून नसलेल्या जोडीदारामधून आणि ह्या दबलेल्या भावनांमधून दिसत नसेल? लेखकाच्या स्वतःच्या मनाचा हिंदोळा कधीकधी गोष्टीमध्ये हेलकावे खातो तो हा तर नसेल?

पुरूषी इच्छेचं आणि निराशेचंही चित्र ह्या गोष्टीतून दिसतं. लग्नाचा प्रस्ताव ठोकरूनही व्हायलेटची काळजी घेणारा, तिला जपणारा कॅरूथर्स ह्यात आहे. पण तोही जेव्हा तिचं रक्षण करायला जातो, तेव्हा तिला संकटच वाटतं. पण ती जाते ती डिटेक्टिव्हकडे, भावी जोडीदाराकडे नाही. पण ह्या जोडीदाराचं नुसतं असणं ही एकच गोष्ट त्या पुरूषी इच्छेचं व्यक्त होणंही गप्प करून टाकते. इथे पुन्हा डॉईलच्या आयुष्याकडे आपली नजर जाणं क्रमप्राप्त आहे. त्याउलट वूडलीसारखी राक्षसी आकांक्षा ही मात्र अर्थातच हे असलं काही बघत नाही, आणि जवळपास मिस स्मिथवर बलात्कार करायला जाते. पण इथे एक डोळ्यात भरण्यासारखी गोष्ट म्हणजे कॅरूथर्स आणि वूडली ह्यांच्या आकांक्षांमध्ये फरक अधोरेखित करताना डॉईल हेही आपल्याला सांगू पाहतो, की कॅरूथर्स स्वतःच्या इच्छेमुळे शक्य असूनही व्हायलेटला खरंखुरं सांगून टाकत नाही. वॉटसन त्याला 'तू स्वार्थी आहेस' असं सरळ म्हणतो, आणि कॅरूथर्सही ते कबूल करतो, आणि वर आपल्याला ऐकवतो, 'love often goes together with selfishness'. आता खरंच असं असतं का, हा वादाचा मुद्दा आहे. पण इथे मात्र डॉईलची दबलेली आकांक्षा, निराशा आणि बहुधा अपराधी भावना जणू एकत्र येऊन त्याच्या मनातला 'सगळीच पुरूषी आकांक्षा कुठे ना कुठेतरी सारखीच असते' असा कल्लोळ आपल्याला ऐकवतायत, असं वाटतं. सारं प्रेम स्वार्थी आहे, रक्षण करायला आलेला पण मनात इच्छा असलेला पुरूषही राक्षसी असलेल्या माणसासारखाच वाटतो ... डॉ. जेकिलच्या दबलेल्या भावना आणि मिस्टर हाईडच्या राक्षसासारखं हे डॉईलला वाटलं असेल का?

ह्या सर्वांवर एखाद्या स्त्रीच्या मनात अजून काहीतरी वेगळे विचार येऊ शकतात. कदाचित त्यांना गेल्या परिच्छेदात माझ्या नजरेतून सुटलेलं अजून काहीतरी जाणवेल. ही गोष्ट नक्कीच आत्ताही आपल्याला काहीतरी सांगून जाईल. पण डॉईलच्या अनुषंगाने मला जाणवलं ते हे सगळं. फियॉन्से का आला, हे उमगल्यासारखं वाटलं. साहसकथा म्हणून तर ही छान आहेच, पण महत्त्वाची रूपलक्षणं ह्यात दडली आहेत. लेखकाच्या मनोव्यापारांचा गोष्टींवर कसा परिणाम होतो, हेही इथे दिसतंय असं वाटतं. मी आज ही गोष्ट बर्‍याच दिवसांनी पुन्हा वाचली. आणि मला ती वेगळ्याच अंगांनी 'भेटली' असं वाटलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते व्हायलेटला फियान्से असणं हे केवळ 'कथेची गरज' म्हणून आहे. तो समजा नसता तर तिने कॅरूथर्सचा विवाह प्रस्ताव नक्की स्वीकारला असता. शरलॉकशी जेव्हा ती कॅरूथर्सचा उल्लेख करते तेव्हा त्याच्याविषयी आदराने, आपुलकीने बोलते. त्याच्या मुलीबद्दलही तिला आस्था आहे. त्याचा प्रस्ताव नाकारतानाही त्याच्या माझ्याविषयीच्या भावना सच्च्या आहेत पण मी आधीच वचनबद्ध असल्याने त्याला होकार देऊ शकत नाही असे सांगते. पण तिने त्याला स्वीकारलं असतं तर कथा पुढे गेली नसती, तिला शरलॉककडे यायची गरज पडली नसती. त्यामुळे फियान्से म्हणजे केवळ कथा पुढे नेण्यासाठी केलेली रचना आहे. बाकी त्याचा कुठेही सहभाग नाही. व्हायलेट आधी त्याच्याकडे मदतीसाठी जात नाही याचंही नवल वाटतं.

मानवी भावभावनांचे कंगोरे होम्सच्या 'The problem of Thor Bridge' कथेत खूप समर्थपणे व्यक्त झालेत. त्यातली सगळीच पात्रं ग्रे शेडमधे रंगवली आहेत, नील गिब्सन, मारिया गिब्सन, ग्रेस डनबार सगळेच खरेखुरे वाटतात. माझ्या मते होम्सच्या सर्वोत्तम कथांपैकी ही एक नक्की आहे.

मस्त विवेचन. मला ती पूर्ण गोष्टच मजेशीर वाटते.सायकल वरून पाठलाग करणे काय.त्या माणसाने सरळ 'मी प्रेम करतो, मला तुझी काळजी वाटते, चल एकत्र जाऊ स्टेशन ला' म्हणायचे ना.
होम्स च्या बऱ्याच गोष्टी या काळात वाचल्या तर कालबाह्य होतात.पण तरी त्यांची मजाच वेगळी.
या कथेचे ग्रॅनाडा रूपांतर तर अजूनच विनोदी आहे.त्यातली ती बार फाईट. व्हायोलेट चा अर्धा अधिक वेळ एकच रिव्हीलिंग ड्रेस.तो लाल केस वाला वुडली.आणि शेवटी कॅरुथस ने वुडली च्या गुप्त भागावर गोळी मारणे(ये मै नही कहती, युट्युब कमेंटस मे लिखा है)
पण बघायला मजा येते.

फार फार आवडलं. Happy
दबलेल्या भावनांचा एक लोलकच आपल्याला होम्स, वॉटसन, कॅरूथर्स ह्या पात्रांमधून चमकताना दिसायला लागतो.>>>>>

लेखक पुरूष असला तर पुरूष व्यक्तिरखेतूनच आपल्या आकांक्षा/भावना व्यक्त करू शकतो का... व्हायलेट फक्त माध्यम आहे का... का तिलाही डॉईल यांनी इमोट/ व्यक्त होण्यासाठी वापरलं आहे. व्यक्तिरेखेचे लेखन लिंगसापेक्ष असते का... हे प्रश्न पडले. आपल्या आजारी पत्नीच्या एकटेपणाला कुठून व्यक्त केले आहे का / स्वतःला इमोशनली अनअवेलेबल (?) पार्टनर आहे म्हणून व्हायलेटमध्ये (तिच्या फियांसेची अनुपस्थिती) स्वतःला पाहिले असेल का आपल्या प्लेटॉनिक मैत्रिणी ऐवजी. ही साहसकथा मालिका एका (शरलॉक) टेम्प्लेटमध्ये असावी लागणारं म्हणून तिला मर्यादित निर्मितीस्वातंत्र्य असेल का....
मी पुस्तकं वाचलेले नाही पण लेख अतिशय आवडला म्हणून यावर विचार केला.
धन्यवाद भास्कराचार्य !

मस्त लिहिलं आहेस. या अँगलने विचार केला नव्हता कधी.

हा प्रतिसाद लिहिता लिहिता Irene Adler ची Scandle in Bohemia गोष्ट आठवली जिला होम्स द वुमन या नावाने संबोधत असे. अर्थतच ती कोणाची वधू वगैरे नसली तरीही होम्सला तिच्याबद्दल आकर्षण होते .

आवडला लेख.

<<वाग्दत्त वधू असणं म्हणजे ती इतरांसाठी उपलब्ध नाही, असं एक साधं समीकरण असतं. तो पुरूष आयुष्यातल्या नांगरासारखा असतो, आणि हे इतर लोकांनी जाणून तसं वागणं अभिप्रेत असतं. अर्थात, हे नातं लग्नापूर्वीच तुटूनही जाऊ शकतंच. त्यामुळे 'म्हटलं तर खूप आहे, पण काही बाबतीत फार नाही' अश्यासारखं हे नातं आहे.>>
हेही अगदीच पटलं. म्हणजे, त्या काळातल्या गोष्टींंमध्ये.

होम्सची एक गोष्ट आहे, नाव लक्षात नाही, जिच्यात दोन माणसं असतात. दोघेही पूर्वी बहुतेक ऑस्ट्रेलियातून पैसे कमावून आलेले असतात. एकाचं काही तरी सिक्रेट दुसऱ्याला ठाऊक असतं. त्याचा उपयोग करून तो त्याच्याकडून भरपूर इस्टेट वगैरे उकळतो. शेवटी हा पहिला त्या दुसऱ्याचा खून करतो.
ज्याचा खून करतो, त्याच्या मुलावर आळ येतो. पण खरा ज्याने खून केलेला असतो, त्याच्या मुलीचं या मुलावर प्रेम असतं. तिचा ठाम विश्वास असतो की तो खून करणं शक्य नाही. होम्सला सगळी परिस्थिती समजते, पण तो गप्प बसतो कारण एवीतेवी तो मुलगा पुराव्याअभावी सुटेल असं त्याला वाटतं. (आणि तसंच होतं. होम्सचा अंदाज कसा चुकेल? Wink )
तर, या गोष्टीत ती मुलगी ठामपणे त्याच्या मागे उभी असते. ती त्याची फियान्से वगैरे नसते. (In fact तो मुलगा दुसऱ्याच एकीशी लग्न करून बसलेला असतो पण प्रेम हिच्यावर करत असतो)
Adventure of naval treaty मध्येही ती फियान्सी खूप निष्ठेने सेवा करत असते पर्सी फेल्प्सची, आणि मदतही करते होम्सला.
मुली भावनेने जास्त गुंततात, असं असेल कदाचित.

ती बॉसकोंबे व्हॅली केस
नेव्हल ट्रिटी पण मजेशीर आहे.
ज्या केसेस पुस्तकात अत्यंत कंटाळवाण्या वाटतात त्याची ग्रॅनाडा व्हर्जन्स खूप मस्त बनली आहेत.उदाहरणार्थ ग्रीक इंटरप्रिटर आणि मुसग्रेव्ह रिच्युअल.
रिटायर्ड कलरमॅन ही खूप चांगली कथा आहे.याची ग्रॅनाडा व्हिज्युअल व्हर्जन बहुतेक बनली नाहीत.बाकीची जुनी दिसतायत, आणि रॉबर्ट डाऊनी चे एक.(मला तो माणूस अजिबात बघवत नाही होम्स म्हणून.)

ग्रॅनाडा व्हर्जन्स म्हणजे काय?
रॉबर्ट डाऊनी मला खूप आवडला शेरलॉक होम्स म्हणून. पण फक्त पहिल्या सिनेमात. लॉर्ड ब्लॅकवूडवाल्या. गेम ऑफ shadows अ आणि अ वाटतो. अर्थात तो दोष डाऊनीचा नाही. कंबरबॅचचा होम्स फारसा पाहिला नाही. पण जेवढा पाहिला तेवढ्यात तरी फारसा आवडला नाही.

ग्रॅनडा प्रॉडक्शन्स ने जेरेमी ब्रेट ला घेऊन बनवलेले शेरलॉक होम्स चे एपिसोड.युट्युबवर मिळतील.
कंबरबॅच चा होम्स क्युट आणि देवासमान सुंदर वगैरे आहे पण फार फास्ट आहे.खूप लक्ष देऊन 2-3 वेळा सबटायटल ऑन करून एपिसोड बघावे लागतात त्याचे एकही डिडक्शन घालवायचे नसेल तर.

ज्या केसेस पुस्तकात अत्यंत कंटाळवाण्या वाटतात त्याची ग्रॅनाडा व्हर्जन्स खूप मस्त बनली आहेत.उदाहरणार्थ ग्रीक इंटरप्रिटर आणि मुसग्रेव्ह रिच्युअल.>>> +१११

ग्रीक इंटरप्रिटर वाचायला प्रचंड रटाळ आहे पण त्याचे ग्रॅनाडा रुपांतर बहारदार आहे! पण रुपांतरात मूळ कथेचा शेवट बदलून टाकला आहे Sad रुपांतर म्हणून ते मस्तच वाटतं बघायला पण ज्यांनी मूळ कथा वाचली आहे त्यांना असा Bollywood style fight and rescue शेवट आवडणार नाही.

Solitary Cyclist चे ग्रॅनाडा रुपांतर फारसे भावले नाही. ती व्हायलेट इतकी सुंदर वगैरे काही वाटली नाही. कॅरूथर्स आवडला. वूडली खूपच खलनायकी वाटला.

जमून आलेली ग्रॅनाडा रुपांतर म्हणजे Man with the Twisted Lip, Problem of Thor Bridge, Speckled Band, Copper Beeches, Cardboard Box, The Red Headed League. अजून बरीच बघितली आहेत पण ही पटकन डोळ्यासमोर येतात Happy

ही कल्पना आवडली - लेखकाच्या व्यक्तीगत आयुष्याचे थोडे फार प्रतिबिंब त्याच्या fictional लिखाणात पडत असणारच. सर आर्थर कॉनन डॉयलबद्दल असा विचार आधी केला नव्हता. आता कुठलेही पुस्तक वाचताना असा विचार केला जाईल!
गंमत म्हणजे मी पण नुकतेच शेरलॉक होम्स चे complete collection वाचायला घेतले आहे. लहानपणी भा. रा. भागवत यांनी मराठीत भाषांतरीत केलेल्या कथा वाचल्या होत्या पण संपूर्ण शेरलॉक इंग्रजीतून पहिल्यांदाच वाचते आहे. मजा येतेय!

कार्डबोर्ड बॉक्स बहुतेक जेरेमी ब्रेट मरण्यापूर्वी शूट झालेला शेवटचा एपिसोड होता.प्रचंड जड ट्रीटमेंट ने झालेली शरीराची अवस्था आणि स्लरिंग आवाज.तरीही देखणा.
कार्डबोर्ड बॉक्स ग्रॅनडा व्हर्जन चा शेवट बघणे हा एक वेगळा सुंदर अनुभव आहे.इतक्या प्रभावीपणे शूट झालेले मृत्यू मी जास्त पाहिले नाहीत.

कार्डबोर्ड बॉक्स बहुतेक जेरेमी ब्रेट मरण्यापूर्वी शूट झालेला शेवटचा एपिसोड होता.प्रचंड जड ट्रीटमेंट ने झालेली शरीराची अवस्था आणि स्लरिंग आवाज.तरीही देखणा.
कार्डबोर्ड बॉक्स ग्रॅनडा व्हर्जन चा शेवट बघणे हा एक वेगळा सुंदर अनुभव आहे.इतक्या प्रभावीपणे शूट झालेले मृत्यू मी जास्त पाहिले नाहीत >>

हो बरोबर. तो ब्रेटचा शेवटचा एपिसोड होता आणि मूळ कथाही tragic, गंभीर आहे त्यामुळे त्याला एक वेगळीच उदास किनार लाभली होती.

मी मराठी रूपांतर वाचलेलंच नाहीये शेरलॉक होम्सचं. ती दिवसभर भिकाऱ्याचं रूप घेणाऱ्याची गोष्ट तीच ट्विस्टेड लिपची का? ती तेवढी मी मराठीतून वाचली आहे लहानपणी. भाषांतर कुणाचं होतं ते माहिती नाही.
ग्रीक इंटरप्रिटर मला नाही बोअर झाली. म्हणजे खरं तर शेरलॉक होम्सची कुठलीच गोष्ट मला बोअर झाली नाहीये. Proud

छान लेख आहे. कोणतेही पुस्तक वाचताना अशा प्रकारचा विचार केला नव्हता कधी. आता आपोआप असा विचार केला जाईल.

सहीये!

शाळेत असताना दूरदर्शनवर जेरेमी ब्रेटची मालिका बरेच दिवस दाखवली जात होती. तेव्हा सगळे एपिसोड्स पाहिले होते. इंग्रजी झ्याट कळायचं नाही त्यातलं, तरीही Proud
मात्र शेरलॉकच्या कथा वाचलेल्या नाहीत कधीच. घरात मुलाचं एक जाडजूड पुस्तक आहे कथांचं, इंग्रजीच आहे; वाचायला हवं का काय, असं इथले प्रतिसाद पाहून वाटलं. Lol

शेरलॉक च्या कथा वाचणं वेगळा अनुभव असतो.
भा रा भागवत भाषांतरं पण सुंदर आहेत. पण शक्यतो आधी मूळ इंग्लिश वाचली तर बरं.
येलो फेस
रेड हेडेड लीग
डान्सिंग मेन
स्पेकल्ड बँड
डेव्हिल्स फूट
मुसग्रेव्ह रिच्युअल
या अगदी वाचण्यासारख्या कथा आहेत.

भा रा भागवत भाषांतरं पण सुंदर आहेत>> हो हे खरंय, १-२ आधी वाचली आहेत. पण नंतर मूळ इंग्रजी कथाच वाचल्या. नंतर परत कुतुहल म्हणून त्यांची भाषांतरं वाचली Happy छान केली आहेत. ज्यूल व्हर्नच्या कादंबर्‍यांची त्यांनी केलेली भाषांतरं तर मूळ कथेपेक्षाही जास्त आवडतात Happy सूर्यावर स्वारी, चंद्रावर स्वारी, मुक्काम शेंडेनक्षत्र, समुद्र सैतान..पण या होम्सच्या धाग्यावर हे अवांतर होतय Happy

मला वाटतं भालबा केळकरानीही काही होम्सकथांची भाषांतरं केली आहेत, ती ही वाचल्याचं आठवतं.

माझ्या आवडत्या टॉप टेन होम्सकथा:
Hound of Baskervilles
Man with Twisted Lip
Speckled Band
Red Headed League
Silver Blaze
Problem of Thor Bridge
Golden Pince-nez
Bruce Partington Plans
Scandal in Bohemia
Norwood Builder

छान लेख आहे.
वाचताना कधी असा विचार केला नाही अश्या आशयाचे बरेच प्रतिसाद पाहून थोडे आश्चर्य वाटले.
कारण चित्रपटांबाबत असा विचार नेहमी केला जातो.

मी शेरलॉक होम्स शून्य वाचलाय. ईंग्लिश वाचायचा प्रश्नच नाही पण मराठीतही नाही. भा. रा. भागवत हे नाव फाफे मुळेच माहीत आहे. तसेही ईंग्लिश साहित्याबाबत शेरलॉक होम्स आणि शेक्सपीयर एकच वाटावेत ईतके अज्ञान आहे. पण लेख मात्र आवडला. प्रतिसादांना पाहून असे वाटतेय की मराठी अनुवाद तरी वाचायला हवेत.

बाई ॲनी चान्स,
भा रा भागवत यांचे मराठी अनुवाद कुठे ऑनलाईन वाचायला मिळतील का? ईथे लायब्ररी देखील नाही जवळपास चांगली..

ऋन्मेष, अमॅझॉन.इन वर अतिशय कमी किमतीत (५० रु वगैरे) फास्टर फेणे ची सर्व इ बुक्स मिळतील. किंडल अ‍ॅप कोणत्याही स्मार्ट फोन वरुन टाकून विकत घेतलेली बुक्स वाचता येतील.
शेरलॉक होम्स ची इ बुक्स पण आता कॉपीराईट मधून मुक्त झाली आहेत आणि इंटर्नेट वर कुठेही वाचायला मिळतील.

Hound... मलापण खूप आवडते. भलतंच गूढ, रहस्यमय वातावरण निर्माण केलंय त्यात. यलो फेस, रेड हेडेड लीग, स्पेकल्ड बँडपण भारीच.
ती फुलर्स अर्थवालीपण आवडते. नाव लक्षात नाही. अजून ती जिला कमी दिसत असतं आणि तिचा फियान्सी पळून जातो त्या मुलीची, तीपण मस्त आहे.

ती फुलर्स अर्थवालीपण आवडते. नाव लक्षात नाही. >>>Engineer's Thumb
अजून ती जिला कमी दिसत असतं आणि तिचा फियान्सी पळून जातो त्या मुलीची, तीपण मस्त आहे.>> A case of identity. पण त्यातले लॉजिक कायच्या काय वाटते, मुलगी आपल्या बापाला ओळखू शकणार नाही का, जरी कमी दिसत असलं तरी?

Pages