अज्ञातवासी! - भाग १४ - पिंगळ्याची भेटवस्तू व नवा वेताळ!!!

Submitted by अज्ञातवासी on 21 November, 2020 - 13:16

भाग - १३
https://www.maayboli.com/node/77286

"हे काय आहे?" मोक्ष किंचाळलाच.
"भेटवस्तू, तुमच्यासाठी..."
"उचला हे, आणि निघा इथून! नाहीतर तुम्हांला घालवून द्यावं लागेल मला."
"अहो, ही साधीसुधी कवटी नाही, हिच्यात पूर्वी जो मेंदू होता ना, त्याने अक्षरशः नाशिकवर राज्य केलंय...
दादासाहेबांची कवटी आहे ती."
मोक्षला काय बोलावं तेच सुचेना!
"मग या कवटीचे वारसदार कोण? तुम्हीच ना? अहो वेताळ गेला ना, तर दुसरा वेताळ गादीवर येतो. म्हणजे खुर्चीवर, पण त्याला कायम जुन्या वेताळाची कवटी सोबत करते."
"तुम्ही, हे सगळं घेऊन निघा, आताच्या आता." मोक्ष कसाबसा ओरडला...
"नाही मित्रा, थांब!"
त्याने त्याच्या शबनममधून डफली बाहेर काढली, आणि तो वाजवू लागला...
◆◆◆◆◆
ही कवटी नाही रे महाराजा |
हे तर नियतीचं आख्यान ||
वेताळ गेला तुझ्याचसाठी |
दिलं त्याने बलिदान ||
खेळ तर नियतीचा |
सुरू झालाय आता ||
जाशील कुठे महाराजा |
प्रश्नच आहे अस्तित्वाचा ||
शत्रूचा नायनाट करशील |
मुठीत सगळी प्रजा ||
माना तुकवतील सगळे |
तूच राहशील महाराजा ||
तो थांबला, आणि भेसूर हसला...
...आणि गगनभेदी आवाजात ओरडू लागला...
'हे देवा महाराजा,कवटी स्वीकार करा, खेळ सुरू करा, घोड्याच्या वेगाने धावा, हत्तीच्या मदमस्त चालीने शत्रूचा चुराडा करा, कट्यारीने फितुरांचे गळे चिरा, तलवारी खुपसून गनिमाचा नायनाट करा....
...मातृहत्यारी, पितृहत्यारी,भ्रातृहत्यारी, स्त्रीहत्यारी, , गुरूहत्यारी...
सगळे शाप माथी घ्या.
राक्षस व्हा, दैत्य व्हा, दानव व्हा, प्रेत व्हा, पिशाच व्हा... अधिपती व्हा...
...वेताळ व्हा...'
मोक्षच्या डोळ्यासमोर अंधारी आली, तो कसाबसा एका खुर्चीवर बसला...
खुर्चीभोवती वाडा जळत होता.
खुर्ची जळत होती. खुर्चीवर एक माणूस बसलेला होता.
मोक्ष असहायपणे त्याच्याकडे बघत होता...
"मोक्षा, बाळा, बापाची एक आठवण तुला नकोय??? आता जेव्हा तू तयार होशील, तेव्हाच तुला ती मिळेल!!!"
आणि तो खदाखदा हसला.
"साहेब, मी निघतो. मला अजून नियतीशी गाठ घ्यायचीय!!!"
मोक्षने चमकून मागे वळून बघितले.
पिंगळ्याच्या नाकाच्या जागी आता टोकदार चोच आली होती...
लांब मान आता गिधाडासारखी झाली होती...
डोळे लालबुंद झाले होते. उंच पिंगळा आता कमरेत खाली वाकला होता....
...त्याने पंख फडफडवले, व पिंगळा उडून गेला...
◆◆◆◆◆
बऱ्याच वेळाने मोक्षने डोळे उघडले.
समोर काहीही नव्हतं.
'हे स्वप्न, की भास? की सत्य?'
त्याने डोकं गच्च दाबून धरलं.
'नाही, नाही, मी वेडा होईन अशाने. उद्याच निघायचं मला. तिकडे जाऊन पुन्हा हेच सुरू राहिलं तर?'
तो ताडकन उठला, व बाहेर गेला.
समोरच मघाशी आलेला मुलगा उभा होता.
"अरे तू, इकडे ये."
तो मुलगा त्याच्या जवळ आला.
"आता थोड्यावेळापूर्वी तू त्या माणसाला आत सोडलंस, कुठे गेला तो."
त्याने मोक्षकडे निरखून बघितले.
"कुठला माणूस?"
"अरे तो..." मोक्ष बोलता बोलता थांबला. त्याने डोकं गच्च दाबून धरलं, आणि तो पुन्हा खोलीत येऊन बसला.
'कुणाशी बोलावं. कुणाला सांगावं?'
'शरा????'
'नाही, शक्य नाही. या जन्मात तरी शक्य नाही.'
तेवढ्यात दारावर टकटक झाली.
"आत येऊ का?" काकासाहेब म्हणाले.
"या ना काका. तो गडबडून म्हणाला."
"काय बाळा, उद्या निघायचंय ना!"
मोक्ष काहीही बोलला नाही.
"अरे हा वाडाच असा आहे. एकदा पाऊल मध्ये आलं की बाहेर पडत नाही."
"काका मला पटकन पाऊल बाहेर काढावे लागेल." मोक्ष अस्वस्थपणे म्हणाला
"का बाळा, काय झालं? मी कधीच बघतोय तू बराच अस्वस्थ दिसतोस. कधीही न झोपलेल्या माणसासारखा. काय झालं, मला सांगशील?"
मोक्ष थोड्यावेळ गप्प बसला, आणि नंतर म्हणाला...
"मला बाबा दिसतायेत!!"
"काय???" काका उडालेच.
"हो स्वप्नात दिसतायेत. भास होताहेत. काका अक्षरशः ते माझा जीव घेतील असं वाटतंय."
"बाप कधीही मुलाचा जीव घेत नाही बाळा, उलट जीव वाचवतो. कधीकधी मुलासाठी जीवही देतो."
'मी तुझ्यासाठी जीव दिलाय मोक्ष'
मोक्षच्या कानात आवाज घुमला
"आणि जर समजा दादासाहेबांचीच इच्छा असेल तू इथे राहावं, तर त्यांच्या इच्छेविरुद्ध कुणीही जाऊ शकणार नाही. तुझ्यात हिम्मत असेल तर तू जा."
मोक्ष काहीही बोलला नाही.
"कधी संवाद साधायचा प्रयत्न केलास? हो स्वप्न असेल, भास असेल, पण प्रयत्न तर करून बघ. दादा काहीतरी सांगेलच ना? आणि नाही सांगितलं तर ठीकच. भास म्हणून सोडून दे. नियती जिथे घेऊन जाईल, तिथे जात राहावं बाळा..तिथेच आपलं हित असतं."
मोक्ष विषण्ण हसला.
"चल, आराम कर. शांत झोप. मी निघतो."
मोक्ष पुन्हा मागे टेकला.
काका निघून गेले.
◆◆◆◆◆
रात्री सगळीकडे शांतता झाली...
"आई, उद्या गेला नाही तर?"
"जाईल."
"नाहीच गेला तर."
"तर पुढचा हल्ला तू कर. तो एकतर अमेरिकेला जायला हवा, नाहीतर स्वर्गात."
तेवढ्यात अप्पा आत आले.
"काय चिंतन चालुये मायलेकांचं?"
"काही नाही, जरा गप्पा मारत होतो."
"मारण्याच्याच गप्पा मारत असाल, नाही का?"
"तुम्हाला कुजकट बोलण्याशिवाय काही येत का अप्पा?" संग्राम बिथरला.
"येतं ना. सावध करणं येतं."
"म्हणजे?"
"गोळीबार तू केला नाहीस, आणि खान असताना त्याच्यावर गोळीबार झाला. त्याला तर नाशकात कुणी जास्त ओळखतही नाही."
"म्हणजे अप्पा?"
"म्हणजे, गोळीबार करणारा त्याला चांगल्यारित्या ओळखत असावा. किंवा शेलारांना चांगल्यारित्या ओळखत असावा. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याला मोक्षाला खुर्चीच्या मार्गातून हटवायचं असेल."
"असं असेल, तर तो आपला मित्रच असेल, नाही का आप्पासाहेब?" सौदामिनीबाई हसल्या.
"नाही. उलट सर्वात मोठा शत्रू."
"का?"
"कारण तो संग्रामला मदत करण्यासाठी मोक्षाला हटवत नाहीये, तर त्याला खुर्चीच हटवायचीय!!!"
दोघेही वेड्यासारखे अप्पासाहेबांकडे बघत राहिले.
◆◆◆◆◆
मध्यरात्री.
मोक्ष झोपेत होता.
पुन्हा तेच स्वप्न...
जळणारी खुर्ची, खुर्चीवर दादासाहेब बसलेले.
'मोक्षा, मी जीव दिला तुझ्यासाठी!'
मात्र मोक्ष आज पळत नव्हता. तो सरळ उभा होता. दादासाहेबांच्या समोर!
'बाबा, का जीव द्यावा लागला तुम्हाला?'
'तुला वाचवण्यासाठी!!!'
'कुणापासून?'
दादासाहेब भेसूर हसले...
'माझ्यापासून, माझ्या भूतकाळापासून. मी निर्माण केलेल्या सैतानापासून!!!'
'कोण आहे बाबा तो? सांगा ना...'
'नाही राजा, त्याला भेटण्यासाठी आधी तुला वेताळ बनावं लागेल. वेताळ! सगळ्यांचा अधिपती!!!'
मोक्ष तसाच उभा होता. निश्चल!
'बाबा, हेच तुम्हाला हवंय माझ्यापासून?'
'हो राजा, बदला घे, विध्वंस कर सगळ्याचा... आणि त्या विनाशाच्या राखेवर तांडव कर. होशील ना वेताळ? होशील ना? होशील ना???'
मोक्षच्या अवतीभोवती त्याला भेटलेली माणसे फेर घालून नाचताना दिसली. प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत होता.
'होशील ना वेताळ?'
मोक्ष मान खाली घालून बसला.
आवाज आता टिपेला पोहोचला होता...
आणि एकेक्षणी तो ताडकन उठून उभा राहिला...
'होय, होईल मी वेताळ!!!'

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच भाग एकापेक्षा एक सरस झालेत.

परंतु एकाच गोष्ट खटकते ती म्हणजे नाशिक सारख्या शांत शहरात एव्हडा हिंसाचार? म्हणजे एकदम मशीनगन, गोळ्यांचा वर्षाव वगरे ...

मस्त...

काका म्हणजे वाड्याचे शरद पवार दिसताहेत...

@मोहिनी - धन्यवाद
@प्रवीण - धन्यवाद
@उनाडटप्पू - फक्त गावाचं नाव वापरलय. धन्यवाद. तसं बघायला गेलं तर मिरझापुरही प्रचंड शांत शहर आहे
@पद्म - धन्यवाद
@धनवंती - धन्यवाद
@गार्गी - धन्यवाद
@स्नेहलता - धन्यवाद
@ गौरी - धन्यवाद
@आबासाहेब - धन्यवाद
@मृणाली - धन्यवाद

काल रात्री हा भाग टाकून झोपलो, आणि स्वप्नांत कथेतल्या पिंगळ्यासारखाच एक माणूस आला, आणि कथेत वर्णन केल्याप्रमाणेच उडून गेला.
मनी वसे ते स्वप्नी दिसे Happy

आणि स्वप्नांत कथेतल्या पिंगळ्यासारखाच एक माणूस आला, आणि कथेत वर्णन केल्याप्रमाणेच उडून गेला.>> घाबरवू नका हो अज्ञातवासी!! (हलके घ्या).

वेगाने धावतेयं कथा!! हा भागही मस्तच!!

@रूपालिजी - धन्यवाद!
खरं सांगायला गेलं, तर रात्री हा भाग लिहिताना मीच घाबरलो होतो. Lol

@लावण्या - धन्यवाद
@सुखी - धन्यवाद

गेले काही दिवस आजारपण आणि प्रचंड काम यातच गेलेत. पुढील भाग लवकरच प्रकाशित करतो.