न विरघळणारी खडीसाखर

Submitted by बिपिनसांगळे on 20 November, 2020 - 09:57

न विरघळणारी खडीसाखर
---------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------
संध्याकाळचे पाच वाजले होते ; पण सात वाजल्यासारखे वाटत होते. एवढं आकाश काळवंडलेलं. आणि जोडीला पावसाची उदास संततधार . भिजून भिजून आवारातली अशोकाची झाडंही मलूल पडलेली . पावसाच्या धारा उगा नाईलाजाने पहात.
इतर वेळ असती तर वेगळी गोष्ट होती . निशीगंधानं खिडकीत बसून पाऊस एन्जॉय केला असता. कॉफीचा मोठा मग हातात धरून. काठोकाठ भरून. एकेक घोट चवीचवीने घेत. पावसाच्या धारा जशा अवकाश चिरत जातात तशा काळीज चिरत जाणाऱ्या गझल ऐकत …
आताही ती खिडकीत होती. पण ....एका मोठ्या हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर . आयसीयू वॉर्डच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत. आत्ताही खिडकीत उभं राहून ती पाऊस पाहत होती. पण मन बधिर करणाराच पाऊस तो. मध्येच गार वारं आलं . ती शहारली . अंग चोरून उभी राहिली. एखादी मांजर नकोशा वाटणाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी वळचणीला लपल्यासारखी. पाऊस तोच असतो . पण कधीकधी तो नकोसा वाटतो. मनाला एखाद्या ओलसर ,अंधाऱ्या बोगद्यात जबरदस्तीने ढकलतोय असं वाटत राहतं .
मागे आयसीयूचा वॉर्ड आणि आतमध्ये तिची आई . मृत्यूशी झुंज देत. डॉक्टरांनी चोवीस तासांची मुदत दिली होती. तसे आता वीस तास उलटले होते – पण ?...
आईचं वय अर्थात फार नव्हतं , पण आजारपणामुळे बारीक झालेली काया . निशी आईवरच गेलेली होती . आईचा तोच चेहरा आता सुकलेला .
निशीला खूप असहाय्य्य वाटत होतं . एकटं वाटत होतं . परिस्थितीच तशी होती .
आई !... आई म्हणजे सगळ्यांचा एक हळवा कोपरा असतो. पण तिचा जास्तच, कारण तिला आई अन आईला ती. दोघीच बिचाऱ्या . तिला कळायच्या आधीच वडलांनी त्या दोघींना दूर केलं होतं. तिला त्यांचा राग होता, कारण तिला त्यांचं प्रेम मिळालं नव्हतं . तिने वडलांचा पुरुषी मृदुपणा , त्यांचं प्रेम , त्यांचा लाड कधी अनुभवलाच नव्हता. त्यामुळे, तिची आई म्हणजे तिचं सर्वस्व होतं .
अन आता आई तर जाणिवांच्या पलीकडे होती .त्यामुळे ती सर्वथा एकटी होती.
नातेवाईक तर फक्त नातं सांगण्यापुरतेच . शेजारच्यांनी मदत केली , नाही असं नाही ; पण किती वेळ ?
आणि आईचं काही बरंवाईट झालं तर... ?
लिफ्टचं दार उघडलं . एक नवीन पेशंट . स्ट्रेचर बाहेर आलं. दार बंद झालं . ऑपेरेटरने बटण दाबलं . लिफ्ट पुन्हा खाली गेली . मनात भलतेसलते विचार लिफ्टसारखे खालीवर करत…
आई स्ट्रेचरवर . स्ट्रेचर लिफ्टमध्ये . लिफ्ट वर . वर म्हणजे ? ... लिफ्ट परत खाली. दार उघडतं, आत कोणीच नसतं . मग आई .. आई ? ... हंबरडा फोडावासा वाटतो . पण कंठातून आवाज फुटत नाही .
त्या वरच्याकडेही एक लिफ्ट असावी . सतत वरखाली करणारी . तो ती लिफ्ट ऑपरेट करतो . काही जीव खाली सोडतो ,काही जीव वर घेऊन जातो . लिफ्टही अदृश्य अन तोही अदृश्यच …
डोकं बधिर करणारे , मन गरगरवणारेच ते विचार . त्यात हुरहूर लावणारी संध्याकाळ , अंधार , पाऊस . सारीकडून जीवघेणं काही दाटून आलेलं असावं . अशी सुन्न करणारी भावना . चित्त थाऱ्यावर कसं ते रहात नव्हतं .
पावसाचा जोर वाढला . तो तिरका आला . कडक आवाजात काचेची तावदानं वाजवत.. खिडकीच्या आत. तिच्या चेहऱयावर पाण्याचे शिंतोडे उडाले . ती शहारली . मागे झाली . तिने गळ्यातल्या काश्मिरी स्टोलने पाणी पुसलं . तिची विचारधारा तुटली . ती भानावर आली .
तिच्या शेजारचे आजोबा एक छोटी, स्वामी समर्थांची पोथी वाचत होते . बायकोच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून . ते बहुतेक वेळा ती पोथीच वाचत असायचे . तल्लीन होऊन . त्या तशा हॉस्पिटलच्या वातावरणातही . पण तिला जाणवायचं की त्या पोथीमुळे का होईना त्यांचं मन विचलित होत नाही , डगमगत नाही . मग ती स्वतःची तुलना त्यांच्याशी करत राही .
त्यांना पाहून ती जरा सावरली . आजोबा मनाने भलतेच पॉझिटिव्ह होते . ते तिलाही धीर द्यायचे . तिला वाटायचं , की त्यांचं एवढं वय असून ते एवढे सकारात्मक आहेत , मग आपण तर तरुण आहोत ! आत्ताशी एकोणतीस.
तिला सगळ्यात महत्त्वाचं वाटायचं, जाणवायचं ; ते म्हणजे त्या आजोबांचं बायकोवर खूप प्रेम होतं .
असा प्रेमळ नवरा आपल्या आईला का नाही मिळाला ? असा काळजी घेणारा बाप आपल्याला का नाही मिळाला ?... त्या आजोबांकडे पाहताना प्रत्येक वेळी तिला असं वाटायचं . का या साऱ्या नशिबाच्या गोष्टी ?
रात्रीचे आठ वाजले.
तिथे उघडणाऱ्या मोठ्या लिफ्टचं दार उघडलं . नकोसा वाटणारा आवाज करत . त्या लिफ्टला खंड नव्हता . सतत वर अन खाली . तिच्या दरवाजाचा दर थोड्या वेळाने वैताग आणणारा आवाज .
एक स्ट्रेचर बाहेर आलं . पुन्हा एक नवीन पेशंट . एक वयस्कर बाई. बरोबर तिचा चिंताक्रांत मुलगा. एकटाच.
तिला वाटलं , आजकाल असंच असतं . मदतीला माणसंच नसतात . नुक्लिअर फॅमिलीज ! सगळा भार त्या एकट्या माणसावरच पडतो . आपल्यासारखंच ! का घरी माणसं असूनही तो एकटाच आलाय ? कोणास ठाऊक ? जाऊ दे. आपण हा विचार का करतोय ?
काय झालं असेल त्या बाईला ? खरं तर इथे कोणालाच यावं लागू नये . देव माणसांना इतकं आजारीच का पाडतो ? काहीवेळा त्या पेशंटला काही कळत नाही ; पण बाहेर बसलेल्या त्याच्या लोकांचा मात्र क्षणोक्षणी जीव जळत असतो. बेवजह शमा जळाल्यासारखा .
तो तरुण वळला आणि ती पाहतच राहिली .
त्याला पाहताच तिच्या भुवया आक्रसल्या. कपाळाला आठ्या पडल्या. तो राज होता. कॉलेजचा क्लासमेट . अन तो तिचा नुसता क्लासमेट नव्हता ...
दोघांची नजरानजर झाली अन तिने मान फिरवली .
छे ! आणि एक डोकेदुखी ! तिला वाटलं . ती त्याच्याशी एक शब्दही बोलणार नव्हतीच. पण तरी... तो तिथेच आसपास असणार होता. घुटमळणार होता. त्याची नजर सतत तिचा वेध घेणार होती. पुढे किती क्षण, किती दिवस , कोण जाणे .
काही माणसांशी उगा बिनसतं अन ते पुन्हा जुळून येतच नाही. राजच्या बाबतीत तिचं तसं होतं .
त्याची धावपळ चालू होती. आणि फोनवर फोन .
बाहेर आवारात पाण्याचं तळं साठलं होतं . अन तिच्या मनात विचारांचं .
दाढी न केलेल्या , केस अस्ताव्यस्त असलेल्या , हातात आला तो कुठला तरी चुरगळलेला टीशर्ट तसाच घातलेल्या , राजकडे तिने एकदा नाराज नजर टाकली .
पोरांनी पावसाच्या पाण्यात सोडलेल्या होडीसारखं तिचं मन हेलकावे घेत अनिश्चितपणे भरकटू लागलं . तिच्याही नकळत… भूतकाळात .
-----
कॉलेजच्या प्रवेशाच्या रांगेत तो तिला पहिल्यांदा भेटला होता . ओळख झाली होती . त्याला चांगले मार्क्स होते . तिलाही काही कमी नव्हते . दोघेही स्कॉलर . त्यामुळेच तर त्यांची मैत्री जमली. नंतर तर पक्कीच . कारण दोघांचा वर्ग एकच .
राज साधा होता . दिसायला अन वागायला चारचौघांसारखा . हुशार . मध्यमवर्गीय . अभ्यास सोडता इतर काहीच न करणारा. त्याचं अभ्यासातलं लक्ष कधीच हललं नाही .
त्याला निशी आवडायला लागली . तारुण्याचे नवे सोनपंख फुटलेले दिवस ते !
पण त्या बिचाऱ्याची काही हिंमत नव्हती , तिला ते सांगायची .
निशी उंच , सडपातळ, गोरी अन गोड पोरगी होती . तिची जिवणी मोहक होती . ती हसली की समोरचा विरघळूनच जायचा .
राजने तिचं नाव खडीसाखर ठेवलं होतं . मनातल्या मनात . अन तो मनातल्या मनात हेही म्हणायचा की खडीसाखर जरी तू असलीस तरी विरघळतो मात्र मीच बरं का .
निशी मात्र लवकरच कॉलेजची मजा घ्यायला शिकली !
अर्थात त्यासाठी अभ्यास बाजूला ठेवावा लागतोच . अभ्यासही बाजूला पडला अन राजही !
कॉलेज मध्ये एक सिनियर पोरगा होता . प्रिन्स ! अर्थात ते काही त्याचं खरं नाव नव्हतं. ते नाव त्याने स्वतःच स्वतःला ठेवून घेतलेलं. पैसेवाला होता . बाप पैसा कमवायचं काम करत होता . अन हा ते पैसे उडवायचं काम करत होता !
तो देखणा पण उनाड तरुण होता . त्याच्या बोलण्यात एक आकर्षक गोडवा होता . तो पोरींशी बोलायला लागला की पोरींची जान खल्लास ! त्याच्याकडच्या महागड्या , लेटेस्ट बाईकवर बसून हिंडायला त्या तयार व्हायच्याच. अन हॉटेलिंग , मल्टीप्लेक्समध्ये पिक्चर , भटकणं , मजा !. इतर पोरापोरींना जळवायची नामी संधी ! बाकी सगळं जग जणू खाली जमिनीवर राहिल्यासारखं वाटायचं त्या पोरींना .
निशी कोणालाही आवडेल अशीच होती . प्रिन्सला ती आवडली , यात काही आश्चर्य नव्हतं . त्या वेड्या वयात तीही त्याच्यावर भाळली .
अर्थात तिला त्याचा इतिहास माहिती नव्हता . आणि तो माहिती व्हायला वेळ लागणार होता .
तीही इतर पोरींसारखीच वागू लागली . खरं तर तो तिचा स्वभाव नव्हता ; पण तारुण्याची नशा ?...ती बहकवतेच !
ती त्याला बघण्यासाठी ,भेटण्यासाठी ,बोलण्यासाठी वेडीपिशी व्हायची . तो मात्र तिला खेळवत होता निशीसाठी तो पहिला असला तरी त्याच्यासाठी ती काही पहिली नव्हती …
अशा फालतू पोरांकडे चुंबकत्व असतं की काय , राम जाणे ! पण चांगल्या चांगल्या पोरीही येड्या होतात खऱ्या .
कॉलेजमध्ये एक पोरगी होती, दिया . सुंदर म्हणता येईल अशी ती नव्हती . पण तिचे लुक्स मात्र कॉमन नव्हते ,वेगळे होते. एखाद्या मॉडेलसाठी सुटेबल . तो तिचा प्लस पॉईंट होता. एका फ्रेंच कंपनीने त्यांच्या सौन्दर्यप्रसाधनांच्या प्रमोशनसाठी भारतातल्या सगळ्या मोठ्या शहरांमधून सौन्दर्यस्पर्धा घेतल्या. पुणे शहरातून दिया पहिली आली . पहिली आली आणि सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे गेलं . कॉलेजमधल्या पोरा-पोरींचं, माध्यमांचं, साऱ्यांचंच आणि अर्थात प्रिन्सचंही .
ब्युटीक्वीन झाली असल्याने तिला अनेक कार्यक्रमांना बोलावलं जायचं . प्रिन्स तिच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजर राहू लागला.
त्याला ती आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त आवडलेली पोरगी होती. तिनेही सौंदर्यस्पर्धेसाठी मेहनत घेतली होती. ती मेहनत फळाला आली होती. अर्थात ते टिकवायला लागणार होतं .आणि त्यासाठी पैसा लागणार होता . तिने प्रिन्सचा पैसा पाहिला . त्याने तिचं सौंदर्य आणि तिची प्रसिद्धी .
दोघांचं जमायला वेळ लागला नाही .
मग तर तोच तिला सगळीकडे नेऊ लागला . मिरवू लागला. दोघांना स्वर्ग अक्षरश: दोन बोटं उरला होता . आणि खरंच !
परिणाम ? प्रिन्सच्या आयुष्यातून निशी बाजूलाच पडली. निशीसाठी हा फार मोठा धक्का होता. ती मनातून कोसळली . डिप्रेशनमध्ये गेली. तिने आईच्या झोपेच्या गोळ्या खाऊन स्वतःला संपवायचा प्रयत्न केला. निशीच्या वडिलांनी तिच्या आईला सोडलं ,तेव्हा पासून त्या झोपेच्या गोळ्या आईच्यामागे लागलेल्या.
आईने खूप धावपळ करून पोरीला वाचवलं .
आई म्हणाली,” निशी, अगं हे काय केलंस तू ? तो नाहीये तर नाहीये. पण मी तर आहे ना. हेच जर करायचं असतं तर तुझ्या बाबांनी मला सोडलं त्यावेळेस मीही हेच केलं असतं . पण नाही ! लहान असलेल्या तुझा विचार न करता मी असं काही चुकीचं पाऊल उचललं असतं; तर मग तू काय केलं असतंस ? अशी हिंमत हरायची नाही. बापामागे मी तुला एकटीने , खंबीरपणे वाढवलंय ना ? ते कसं ? अन कशासाठी ? रडायचं नाही -लढायचं !
त्या बाईमध्ये त्यांनी काय पाहिलं ? कोणास ठाऊक ? ठीक आहे. पण त्यांनी जरी विचार बदलले तरी मी नाही. त्यांचं प्रेम खोटं निघालं . ओके. पण मी तर त्यांच्यावर खरंच प्रेम केलं .
वेडाबाई ! पुन्हा असं काहीच करायचं नाहीये !
तू चांगली शिक अन आयुष्यात पुढे जा . “
निशी सुधारली . स्वतःसाठी नाही पण आईसाठी . अभ्यासात आणि करिअरमध्ये लक्ष देऊ लागली. पण तिचा प्रेमावरचा विश्वास उडाला. बाबांनी आईला सोडलं. आणि प्रिन्सने तिला. त्यामुळे तिचा पुरुषांवरचाही विश्वास उडाला.
तिच्या आईच्या हे लक्षात आलं . ती पुरुषांचा तिरस्कार करते. त्यांना झिडकारते, धुडकावते, हे तिला योग्य वाटलं नाही. आपलं आयुष्य झगडण्यात गेलं; पण पोरीचं आयुष्य असं झगडण्यात नक्कीच जाऊ द्यायचं नाही , त्यांनी ठरवलं . शेवटी आईचंच मृदू मन ते . मग पुढे कधीतरी आईने तिला सांगितलं , “ एखादा पुरुष वाईट असतो म्हणजे सगळेच वाईट असतात असं नाही गं पोरी. पैशापेक्षा मन जपणारा पुरुष महत्वाचा .”
तरीही ती पोरांशी तुसड्यासारखी वागायला लागली.
राज हे सारं पाहत होता. त्याच मन आतल्या आत जळत होतं. त्याने निशीशी बोलण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला. पण तिने त्याला धुडकावूनच लावलं. तुझ्या सहानुभूतीची गरज नाही म्हणून सुनावलं .
तो एकदम सरळ पोरगा होता . त्याला छक्केपंजे माहित नव्हते . एकदा त्याने सरळ तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं .
“ निशी, का कुढत जगतेस ? तो प्रिन्स बिन्स गेला उडत . तुझा राजपुत्र कोणी वेगळाही असू शकेल. म्हणजे राज-पुत्र नसला तरी नुसता राज असू शकेल ना ?... म्हणजे...म्हणजे मी देईन साथ तुला . ते डिप्रेशन वगैरे झटकून टाक .”
" काय ? ... ओ राजपुत्र , तुझ्या मनात माझ्याबद्दल जे विचार आहेत ना ते आधी झटकून टाक ! ओके ? “अंगावर पडलेली घाण टिचकीसरशी उडवावी तसं तिने क्षणार्धात त्याला उडवलं .
बिचारा ! मनातल्या मनात झुरत राहिला !
दरी पडली ती पडलीच . पुन्हा मनं जुळणं म्हणजे कठीणच होतं. राज तसा साधा असला तरी स्वाभिमानी होता . त्याच्या मनाला ती गोष्ट खूपच लागून राहिली . पण त्याने ती गोष्ट , तशीच मनाच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवली .
त्याच्यासाठी निशी हा विषय संपला होता . पुन्हा तिचं तोंड बघायचं नाही , हे त्याने मनाशी पक्कं करून टाकलं . त्याने स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. प्रेम हा नाजूक शब्द आपल्यासाठी नाही , हे त्यानं मनाशी ठरवूनच टाकलं . लग्नबिग्न पुढचं पुढं . घरातले मागेबिगे लागलेच , तर ! त्यांच्या पसंतीने .
-----
निशीला हे सारं आठवलं ,पण त्यामुळे तिचं मन पुन्हा आईच्या विचारांवर येऊन थांबलं ... त्यावेळेस आपण मरणाच्या दारात होतो , तिने आपल्याला वाचवलं . आज आई मरणाच्या दारात आहे... आता आपली पाळी आहे , पण आपल्या हातात काहीच नाही .
तिचे डोळे अचानक भरून आले.
तेवढ्यात मागे एकच गडबड उडाली. एक गावंढळ बाई मोठ्याने गळा काढून रडायलाच लागली . निशी धसकली. तिने मागे वळून पाहिलं .
तशी नर्स त्या बाईला ओरडली, “ ओ बाई , गप बसा ! तुमचा पेशंट नाही . कळलं ? रडायचं काम नाही. “
तशी ती बाई जादू झाल्यासारखी गप्प झाली !
हसण्यासारखाच प्रसंग तो खरं तर . त्या बाईच्या क्षणात बदललेल्या अविर्भावाने , त्या गंभीर वातावरणातही , त्या गंभीर प्रसंगातही एकदोघांना हसू आलंच . पण गेलेल्या जिवाचं काय ?
ती बाई दरवाजापासून बाजूला झाली . अन निशी उडत्या काळजाने , तरातरा तिकडे गेली …
पण दुःख म्हणावं की सुख मानावं ? तिला क्षणभर धक्का बसला तरी तो पेशंट कोणी वेगळाच होता . तिची आई नव्हती…
तिने सगळ्यांशी आपुलकीने बोलणाऱ्या एका अनुभवी नर्सला आईचं विचारलं . ती म्हणाली , “ बिनघोर रहा गं पोरी ! आता काळजीचं कारण नाही. रात्रीच्या राऊंडचे डॉक्टर तुला सांगतीलच “.
तिला एकदम हायसं वाटलं . ती एकदम एक्साईट झाली .
तिथला औषधांचा , फिनेलचा वास, पेशंटच्या नातेवाईकांची गडबड , नर्सेसची लगबग , तो जीवनमरणाचा खेळ, या सगळ्या नकोशा वाटणाऱ्या गोष्टी तिला क्षणभर सुसह्य वाटल्या. त्या मोठ्या हॉलमधली गर्दीही जरा कमी झालेली . कलकल कमी करणारी .
तिचा श्वास जणू देहातून खाली उतरत गेला. मन हलकं करणारा.
पाऊसही जरा हलका झाला .
तिला कॉफी पिण्याची तीव्र इच्छा झाली. खाली जावं लागणार होतं. कँटिनमध्ये . ते मुख्य इमारतीपासून लांब होतं . तिथे जायचं म्हणजे भिजण्याची निश्चिती . त्यात तिच्याकडे छत्री नव्हती. शेजारचे आजोबाही खाली गेलेले असावेत , त्यांची छत्री घेऊन .
“ एक्सक्यूज मी “, ...
“ अं ? “ ती मागे वळाली.
समोर राज होता.
त्याच्याही हळव्या जखमा हळूहळू का होईना भळभळू लागल्या होत्या .
“ निशी,...सॉरी . निशीगंधा , कॉफी घ्यायला येणार का ?”
ती काही बोलली नाही . त्याची भळभळ वाढू लागलेली .
ती विचारात पडली. तो पुढे म्हणाला , ठामपणे , “ चल, कॉफी घेऊ या . खूप गरज आहे आत्ता. मला अन कदाचित तुलाही ... दोघांना !”
तिला नकोही वाटलं अन बरंही . इतर वेळ असती तर ती धाडकन तोंडावर नाही म्हणाली असती . पण आत्ता तिला त्याची गरज होती . फार गरज ! ती मुकाट निघाली . तो अस्वस्थ . हातातली छत्री गोल गोल फिरवत. खाली कॅन्टीनमध्ये जेवायची वेळ झाल्याने जेवणाऱ्यांची गर्दी होती. बाहेर जावं लागणार होतं . चौकात , उडप्याच्या हॉटेलात . ते बाहेर पडले. बाहेरची रहदारी कमी झालेली. नशिबाने पाऊसही रिमझिम . न भिजण्यासारखा.
निशीने आईचं सांगितलं . नुकतंच तिला कित्ती बरं वाटलंय, तेही सांगितलं . मग ती आई अन दवाखान्याबद्दलच बोलत राहिली .
पाऊस थांबला होता . ते चालत होते . तो गप्प होता . अवघडला होता .
त्याचीही आई आजारी होती. तोही टेन्स होताच .
तो गप्पसा आहे हे तिच्या लक्षात आलं . तिची एकटीचीच बडबड चालू आहे , हेही तिच्या लक्षात आलं . मग तीही गप्प झाली .
मग तिला एक गोष्ट एकदम लक्षात आली . अन तिने त्याला, त्याच्या आईबद्दल विचारलं .
“ काळजीचं कारण नाहीये ,” तो म्हणाला , “ होईल बरी . निदान अगदी सिरीयस तरी नाहीये . नशीब ! “
“थँक गॉड ! “ ती म्हणाली .
“तिचं सारं मार्गी लागलं . आत्ता जरा मोकळा झालो म्हणून तर मलाही गरमागरम कॉफी घ्यावीशी वाटली . पण एकटंच जायला नको झालं . म्हणून तर तुला विचारावं म्हणलं ,” तो म्हणाला .
तिला त्याच्या फॅमिलीबद्दलही विचारायचं होतं खरं . त्याची बायको कशी असेल ? लकी गर्ल ! ... त्याने कोणाशी लग्न केलं असेल ? घरच्यांनी ठरवलेल्या मुलीशी की ...? पण तिचं मन त्या विचाराला अडखळलं. तिने तिचे शब्द ओठाशी निग्रहाने अडवले.
तेवढ्यात हॉटेलही आलं होतं .
ते आतमध्ये बसले . हॉटेल छान होतं . मन प्रसन्न करणारं .
“ काही खाणार ? “ त्याने विचारलं . तेव्हा तिला ती उपाशी असल्याची जाणीव झाली . सकाळी तिने कसंबसं- काहीतरी पोटात ढकललं होतं . एकटीनेच. त्यावर तिने काहीच खाल्लं नव्हतं . दुपारी ती जेवलीच नव्हती . तरी खाण्याची फार काही इच्छा नव्हतीच .
“ हं . ठीक आहे . सँडविच आणि कॉफी घेऊ या , “ ती म्हणाली .
“ ओके “. त्याने ऑर्डर दिली .
खरं तर त्यानेही काहीच खाल्लं नव्हतं . पण त्याला ते विचारावं हे तिच्या लक्षातही आलं नाही . मुद्दाम असं नाही , पण -
“ बोल ना काहीतरी ,” ती म्हणाली .
“ काही नाही, “ तो म्हणाला . तिचं निरीक्षण करत . खाली विटकी जीन्स , वर मळकट गुलाबी रंगाचा टीशर्ट अन त्यावर तो गुलाबीच रंगाचा स्टोल . गळ्याभोवती नुसताच गुंडाळलेला . मॅडमचा अवतार फार काही छान नव्हता . अर्थात , सिच्यूएशनमुळे . पण चेहरा तर तोच होता . हृदयात आनंदी वार करणारा.
कॉफी अन सँडविच आलं . वाफाळणाऱ्या कॉफीचा कडक वास आला . पावसात सुखावणारा.
” अंधार , पाऊस अन गारवा , अशात काहीतरी गरम काही पिण्यासारखं सुख नाही . त्यासाठी तुला थँक्सच म्हणलं पाहिजे ,” ती म्हणाली .
" मॅडम , एवढ्या फॉर्मॅलिटीज नकोयत म्हणलं ."
विषय बदलण्यासाठी ती म्हणाली ,”ओके आपण वेगळ्याच विषयांवर बोलू या . “
“ ओके मॅडम . पण असं एकदम बोलता येत नसतं . “
“ हं , तेही खरं आहे म्हणा ,”मध्येच ती उत्तेजित होऊन म्हणाली , “ राज . तुला प्रिन्स आठवतो ? “
त्याच्या चेहऱ्यावर विषादाची छटा उमटली . त्याच्या काळजात कळ उमटली ..
“वेगळा विषय म्हणजे हा होय ? … जाऊ दे ना निशी ! ते जुने त्रासदायक विषय आता आणिक कशासाठी ? जी परिस्थिती आहे , तीच पुष्कळ आहे तोंड द्यायला .”
त्याची सल तिच्या लक्षात आली . पण ती पुढे त्याच अवस्थेमध्ये म्हणाली , “ अरे , ऐक ना . ते जुनं जाऊ दे रे . एक वाईट गोष्ट आहे . त्याचा धंदा दिवाळखोरीत गेला ! दिवसच फिरले रे त्याचे . “
“ काय ? “ तो आश्चर्याने ओरडलाच, “ खूपच वाईट ! खरं तर असं कोणाचंच होऊ नये . पण कसं काय ? “
“ त्याचे ऑडिटर आणि आमच्या कंपनीचे ऑडिटर एकच आहेत ना . कळतात अशा गोष्टी . झालं ते वाईटच .पण त्याला तो आणि त्याचे षौक कारणीभूत आहेत . हेही तितकंच खरं आहे “ .
“ठीक आहे . आपलं आपलं नशीब ! “ तो थंडपणे म्हणाला .
अन ती पुढे कडवटपणे म्हणाली , “ कर्माची फळं आज ना उद्या भोगावीच लागतात ! “
त्याला दिया आठवली . पण त्यानं विचारलं नाही . पण निशीच त्याला म्हणाली ,” अन ती ब्युटीक्वीन ,तिनेही सोडलंय त्याला . आता एक इंडस्ट्रियालिस्ट धरलाय . स्मार्ट पोरगी !” ती तिखट स्वरात म्हणाली .
ती काचेतून बाहेरचा अंधार निरखत राहिली . जुन्या आठवणींचे थेंब वैराण मनावर पडत राहिले .
ते कॉफी घेऊ लागले . शांतपणे .
काळाने अबोलपणाची ती एक अदृश्य दरी अजूनही पूर्ण मिटवलेली नव्हती . आज ते भेटले होते , तेही अशा परिस्थितीमध्ये !...
तिचे डोळे स्त्रीसुलभपणे ओले झाले .
“ राज , मी तुला दुखावलं होतं त्यावेळी . सॉरी ! “
“इट्स ओके “, तो शांतपणे म्हणाला .
“आज , आत्ता मला कोणाशी तरी बोलायची खूप गरज होती . खूप . आणि कोणाशी बोलणार ना ? ... तू आता परका असलास तरी निदान परिचित तर आहेस . “
तिच्या त्या लॉजिकवर त्याने आपोआपच आवंढाच गिळला.
त्याने टेबलवर ताल धरला . अस्वस्थपणे ,” हं ,तुझं शेवटचं ते वाक्य मात्र खरंय ! अगदी खरंय ! अन माझ्यासाठी तर नेहमीच . “
त्याने पुन्हा ताल धरला . आता अगदी व्यवस्थित .
ती अवघडली . मग मूड बदलण्यासाठी ती म्हणाली , “ तबला शिकतोस ? “
“ नाही . सुगम संगीत शिकतोय अलीकडे . “
“ अरे वा ! “
“ त्यात अरे वा सारखं काहीच नाहीये . मी माझ्यासाठी शिकतोय .”
“ भारीच रे ! “
“ अगं , भारी वगैरे काही नाही . शिकतो आपला असाच . जरा सुरात तरी गाणं म्हणू शकतो . चार जण जमले तर निदान बेसूर तरी होणार नाही . मला काही कुठल्या रिऍलिटी शोमध्ये भाग वगैरे नाही घ्यायचाय !” तो चेष्टेच्या सुरात , डोळे उडवत गुणगुणला , " तुम मुझे भूलभी जाओ तो ये हक है तुमको ."
तिला वाटलं की गडी चांगलाच उत्फुल्ल दिसतोय . तिला त्याचं कौतुक वाटलं . आणि तिला आठवलं की गझलप्रेमासाठी तिला उर्दू शिकायचंय . पण ते कामाच्या रहाटगाडग्यात राहूनच जातंय म्हणून .
ते परत हॉस्पिलकडे निघाले .
तो म्हणाला , “ निशी , तू आत्ता कॉफी प्यायला येशील की नाही याचीही शंका होती. “
“का ?”
“प्लिज , डोन्ट मिसअंडरस्टॅन्ड मी ! पण आपल्यामध्ये जो दुरावा आलाय तो ... “
“ ए , कधीची गोष्ट आहे ती ? खूप जुनी ना ? मग जाऊ दे ना , देऊ सोडून आता. “
ती हात पुढे करत म्हणाली , “ फ्रेंड्स ? “
तिच्या त्या अचानक पवित्र्याने तो बिचारा बावरला . त्याने छत्री दुसऱ्या हातात घेतली अन हात पुढे केला , गडबडल्यासारखा आणि त्याच्या हातातून छत्री निसटली. ती तिच्या पायात आली अन ती अडखळली , धडपडली . पण रस्त्यावर साठलेल्या पाण्यात ती आडवी होण्याआधी , त्याने पुढच्याच क्षणाला तिच्याभोवती हात घालून तिला सावरलं . पावसाच्या गारव्यातही एकमेकांच्या उबदार स्पर्शाने त्यांच्या तनामनात जणू वीज चमकली .
अहा ! काय मनोरम दृश्य होतं ते ! अन पहायला, हे सगळं घडवणाऱ्या खट्याळ पावसाशिवाय दुसरं कोणीच नाही .
तो काही ना कळून तिला ‘सॉरी ‘म्हणाला . तर ती मात्र एकदम लाजलीच . तिचे गाल आरक्त झाले . त्याचं दुर्दैव - रात्रीची वेळ अन अंधार , त्यामुळे त्याला ते काही दिसलं नाही .
पण ती मात्र एकदम कावरीबावरी झाली . तिला अपराध्यासारखं वाटलं . तिच्या मनात ...
ते चालत राहिले . काही पावलं दोघेही गप्पच बसले . मग शेवटी न राहवून तिने विचारलंच , “ बाकी कसं चाललंय ? म्हणजे लाईफ ?.... लग्न वगैरे केलंस की नाही ? “
“ नाही !”
“ नाही ? ते का ?” तिला जाम आश्चर्य वाटलं .
“ हा काही प्रश्न आहे का ? बस ! वाटलं , नाही केलं . “
तिने एकदम खोडकरपणे विचारलं , “ काही विशेष कारण ? की कोणी भेटली नाही ? “
“ भेटली होती की एक खडीसाखर . न विरघळणारी ... “
“ न विरघळणारी खडीसाखर? “ तिला तो शब्दप्रयोग भलताच आवडला . हा नक्की कोणाबद्दल बोलत असावा ?... तिला वाटलं. ” कोण म्हणे ही ? “
“ … तूच की ती - खडीसाखर ! ...”
तिचे मासोळीसारखे डोळे गर्रकन त्याच्याकडे वळले . त्यामधलं आश्चर्य त्याने टिपलं .
तिला राजचा स्वभाव माहिती होता . सच्चा ! तिच्या हृदयाच्या तारा नाजूकपणे, नकळत झंकारल्या.
“खरं ? ... “ ती चुटपुटत्या स्वरात गुणगुणली .
“ अगदी खरं ! शपथ घेऊ ? पण कोणाची ? आईची की तुझी की या माझ्यावर उदार झालेल्या पावसाची ? “
त्याने शपथ घेण्यासाठी हात गळ्यापाशी नेला आणि रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात तिला त्याच्या मनगटावरचा , खालच्या बाजूला असलेला टॅटू दिसला - एन लिहिलेला !...
अन त्याच्या शेजारील ती खडीसाखर विरघळायला लागली . तिला काय बोलावं अन काय करावं सुचेचना . पण तिच्या मदतीला पाऊस आला . थांबलेला तो, पुन्हा कोसळायला लागला.
त्याची ती एक छत्री दोघांना पुरणार नव्हती. त्याने ती तिला देऊ केली. पण तिने ती घेतली नाही. तिने ओल्या हाताने तिचे केस मागे फिरवले . तिचे कापलेले, भिजलेले केस छान सेट केल्यासारखे भासत होते . तिला आणखी गोड भासवणारे .
बिचारा ! त्याला काय करावं कळेचना . तो छत्री उंचावून , तिच्या डोक्यावर धरून नुसताच थांबला. स्वतः भिजत.
पाऊस आनंदाने तिरकातिरका झाला . छत्रीच्याही आत शिरला. शहाणा ! अन त्याने ती खडीसाखर आता मात्र पूर्णच विरघळली .
मग पाऊस परत सरळ झाला . पण भिजायचं नसेल तर ? ... एका छत्रीत जावं लागणार होतं . त्यात ती फोल्डिंगची , लेडीज छत्री . दोन माणसं कोंबून बसवली तर खेटावं लागेलशी . त्याच्या आईची असावी . घरी रंगवलेली .सप्तरंगी .
मग ती लाडीकपणे म्हणाली , “ जाऊ या ? “
अन ती त्याच्या जवळ सरकली. तिने त्याच्या हातात स्वतःचा हात गुंफला . तिला त्याचा स्पर्श पुरुषी पण मृदू भासला . त्या स्पर्शाचा आधार तिला त्या क्षणाला खूप आश्वासक वाटला . तर त्याच्या डोळ्यातलं पाणी पावसाच्या थेंबांमध्ये लपलं .
तो क्षण साधा नव्हता . कयामतवाला होता !
तिच्या त्या साध्याशा कृतीमध्ये त्याला सारं काही कळून गेलं .
पावसाचं पाणी धरतीच्या कुशीत आवेगाने शिरतंच की !
ते निघाले .
तो पुन्हा गुणगुणू लागला , " तुम मुझे भूलभी जाओ , तो ये हक है तुमको ."
ती ते मन लावून ऐकत होती . आणि त्याने पुढची ओळ म्हणली , " मेरी बात और है, मैने तो मोहब्बत की है !"
मागे पावसाचं पार्श्वसंगीत . द्रुत लय छेडल्यासारखं .
ते दोघे आता एकाच छत्रीत होते . त्यांच्या चालण्याची लयही एकच झाली होती .
आणि त्यांची मनं , रिमझिमके तराने गात सुटलेली .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरस

Chan

छान