आठवते जुनी दिवाळी

Submitted by निशिकांत on 14 November, 2020 - 11:29

आठवते जुनी दिवाळी---( दिवाळी निमित्त वेगळ्या धाटणीची कविता )

मी राम रहिम तो, आम्ही
शेजारी एकेकाळी
स्नेहात पूर्ण भिजलेली
आठवते जुनी दिवाळी

मी दीप लवता दारी
त्यालाही प्रकाश मिळतो
ठेवण्यास दीप पाजळते
पणतीत तेल तो भरतो
त्या मंदमंद ज्योतींनी
वास्तुंना खास झळाळी
स्नेहात पूर्ण भिजलेली
आठवते जुनी दिवाळी

तो त्यांच्या रीतीभाती,
मी माझ्या पाळत होतो
गीता तो जाणत होता
मी कुरान चाळत होतो
जाईल तोल मग कैसा?
नव्हतीच वाट शेवाळी
स्नेहात पूर्ण भिजलेली
आठवते जुनी दिवाळी

विषवृक्ष लावले कोणी?
केंव्हा हे कळले नाही
तुटले जे क्षणात होते
नाते ते जुळले नाही
का राम रहिम भेदरले?
बांधल्या वेगळ्या चाळी
स्नेहात पूर्ण भिजलेली
आठवते जुनी दिवाळी

भांडावयास जे तत्पर
मज चीड धर्ममल्लांची
काशीश्वरास आवडते
शहनाई बिस्मिल्लांची
तो वरून बघतो पापे
करतो जी तिन्ही त्रिकाळी
स्नेहात पूर्ण भिजलेली
आठवते जुनी दिवाळी

पण बुजुर्ग दोन्हीकडचे
मायूस असे का व्हावे?
त्यांनीच अमन शांतीच्या
तत्वास पुढे रेटावे
नांदताच भाईचारा
संपेल रात्र ही काळी
स्नेहात पूर्ण भिजलेली
आठवते जुनी दिवाळी

निशिकांत देशपांडे,पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users