लक्ष्मी गेली!

Submitted by अज्ञातवासी on 14 November, 2020 - 11:03

काल दोन तासाची ड्रायविंग करून घरी पोहोचलो.
प्रचंड थकलेलो. सरळ जेवायला बसलो.
जेवण झाल्यावर आई माझ्या जवळ आली.
"सीताबाई गेली..."
तिच्या डोळ्यातलं पाणी ती लपवू शकली नाही, आणि माझ्याही डोळ्यातलं पाणी मी लपवू शकलो नाही.
◆◆◆◆◆
मुमताज सय्यद अहमद! उर्फ सीताबाई!
सुरगाण्याची राणी!
सुरगाणा हे गाव तसं छोटंसं, आदिवासी गाव, मात्र या गावात सगळेच सगळ्यांना ओळखतात.
माझं आजोळ, आणि याच गावात माझा जन्म झाला!
जन्म होताच सगळ्यात आधी मी माझ्या आजीजवळ होतो, आणि नंतर सीताबाईजवळ!
बाबू अहमद, सुरगाण्यातील एक तृतीयपंथी व्यक्ती. मात्र अक्षरशः तिला भेटण्यासाठी सर्व महाराष्ट्रातून लोक येत.
आणि तिची शिष्या किंवा चेला म्हणजे सीताबाई!
साडेपाच फूट उंची, अगदी सरळ, काळीसावळी, लांब नाक. दिसायला तर हिरोईनच. फक्त आवाज थोडा भसाडा. आपल्याकडे एक भ्रम आहे, किंबहुना सगळीकडे असच होतं, की हिजडे टाळ्या पिटतात, आणि पैसे मागतात.
सीताबाई मात्र राणी होती, राणी!
पांढरीशुभ्र मात्र कलाकुसर असलेली साडी घालून, अक्षरशः चांदीचे स्क्रू असलेले पैंजण घालून, सोन्याने मढुन आणि लालभडक गोल कुंकू लावून ती फक्त शुक्रवारच्या बाजारात बाहेर पडू दे, आई आली, आई आली, अशी हाळी बाजारात उठायची. लोक भराभरा तिच्या पाया पडायला यायचे आणि न मागता तिला भरभरून मिळायचं.
ती भीक नव्हती, ते दान नसायचं तो असायचा कर! सीताबाईच्या दराऱ्याचा कर!
मात्र मला कायम तिने जीवच लावला. सदैव तिची थट्टामस्करी चालायची. माझे मामादेखील तिची चांगलीच मजा घ्यायचे. मात्र तीही हसून द्यायची.
कधीही कुणाकडे जेवायची नाही, चहासुद्धा घ्यायची नाही. नियम म्हणजे नियम! मात्र तिच्याघरी गेलो, तर कायम काही न काही मिळायचं.
एकदा माझ्या मामाला टवाळक्या करताना एका मास्तरने पकडलं. 'हिजड्यासारखे काय टाळ्या पिटतायेत?' असं मास्तर त्याला बोलला, आणि त्यानंतर जे झालं...
...ते अजूनही सुरगाण्याच्या इतिहासात अमर आहे.
दुसऱ्या दिवशी सीताबाई शाळेत!
'काय रे, हिजडा टाळ्या पिटतो ना, चल तुला हिजडा दाखवते...' आणि अक्षरशः तीने त्याला पाया पडायला भाग पाडलं...
तिला देवी प्रसन्न होती. तिच्या स्वप्नात यायची. दर मंगळवारी तिच्या गावातल्या मोठ्या घरात लोक जमायचे. ती बाहेरचं काही झालंय का बघायची. खेड्यांवरही जायची. खेड्यातही तोच मानपान. असा मान तर एखाद्या साधूसंताला मिळत नसेल.
आईचं तिचं खूप जमायचं. कायम मायेने विचारपूस करायची. 'तुला देवमाणूस नवरा मिळालाय, नाहीतर तू अशी,' कायम चिडवायची. बाबांना 'जावई कधी आले?' असं मायेने विचारायची.
हळूहळू काळ बदलला, माझंच आजोळी जाणं बंद झालं. मात्र आईकडून खुशाली कळायची.
'तुझ्या लग्नात बोलवं बरं का मला.' कायम म्हणायची.
महिनाभरापूर्वीच सहज आजोळी गेलो होतो. तिला भेटून आलो.
सीताबाई हाडांचा सापळा झालेला होती.
"मला हा खोकला, आणि बीपी, दोघांनी जाम केलंय. आता नाही वाचणार." ती म्हणाली.
"माझ्या लग्नात यायचंय, तू काही जाणार नाही. पुढच्या वेळी येतो, बघतो तुला." मीही हसत म्हणालो.
आणि जाताना कधी नव्हे ते तिच्या पाया पडलो...
महिनाभरातच सीताबाई गेली... बाबूआजीकडे..
तिच्या धुंदीत जगली, मानपान घेऊन जगली...
सुरगाण्याची राणी गेली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं सांगायला गेलं तर तिच्याविषयी लिहिण्यासारखं खूप आहे, खूप आठवणी आहेत, पण लिहवत नाही.
देव तिच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना _/\_

छान.
खूप आठवणी आहेत, पण लिहवत नाही. >> लिहा नक्की.

अज्ञातवासी तुम्ही आणि महाश्वेता एकच आयडी आहात का? तुमचा नारायण धारपंचा धागा वाचत होतो त्याचं पहिलंच पान वाचून जरा गोंधळ उडाला.
https://www.maayboli.com/node/71955

अज्ञात, डोळ्यांसमोर सीताबाई उभी केलीत. तिच्या आठवणींतून कायम तुमच्या सोबत असणार आहे. काही लोक नात्यात नसूनही मनावर कायमचं नाव कोरून जातात..