रंगीत चित्रं

Submitted by बिपिनसांगळे on 14 November, 2020 - 07:35

रंगीत चित्रं
------------------------------------------------------------------------------------------------------------------
रंगीत चित्रं ? शीर्षक वाचून थोडंसं गोंधळल्यासारखं होईल खरं. पण ते तसंच आहे .
कुठलं तरी एखादं चित्रं म्हणजे ते रंगीत असणारच असंच आपल्या डोक्यात असतं. अगदी पूर्णपणे नाही, पण बरंचसं. सध्याच्या काळात तर नक्कीच . सध्या तर त्याचा विस्फोट झाला आहे. हातात येणारी वर्तमानपत्रं, पुस्तकं, मासिकं, जाहिराती अन जाहिरातपत्रकं, सगळंच रंगीबेरंगी .आणि त्याच्यानंतर टीव्ही आहे, मोबाईल आहे. सतत रंग दाखवायला. बाहेर पडलं कि मोठ्या जाहिराती, दुकानांच्या पाट्या आणि फ्लेक्स . सगळं जगच रंगीबेरंगी होऊन गेल्याचा भास होत रहातो.
कधी छान वाटतं...अन अतिही वाटतं !
माणसाने खूप रंगछटा तयार केल्या आहेत . पण निसर्गाकडे माणसापेक्षा जास्त रंग आहेत . माणूस त्याच्या रंगांचं बेसुमार प्रदर्शन करत राहतो . मात्र निसर्गाच्या अनेक छटा तशा सहजी दृष्टीस पडत नाहीत .
माणसाचं चित्रवेड , रंगवेड आदिम ! पार भीमबेटकापासून ते अजिंठ्यापर्यंत !
माझ्या लहानपणी ? ...
थोडं जुन्या काळात.
आताच्या नव्या पिढीला आश्चर्य वाटेल कदाचित . पण एकुणात चित्रं फार कमी पहायला मिळत असत. अन जी असत ती रंगीत नसत.
लहानपणापासून चित्रांची आवड . चित्रं बघायला आवडतात . पण तेव्हा मुळात चित्रंच पहायला मिळत नसत . जी काही थोडीफार चित्रं असत ती काळ्या पांढऱ्या रंगात किंवा पांढऱ्याऐवजी कुठलातरी एक रंग. हिरवा, निळा वगैरे . त्या हिरव्या- निळ्यामध्येही फार विविधता नसे. त्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काळ्या इंकने चित्रं काढलेली असत .
मी बालवाडीत असताना पुस्तकं नव्हतीच .सगळाच तोंडी कारभार. मुलांना खेळ- खाऊ आणि घरातल्यांची थोडा वेळ सुटका , यासाठी आमची बालवाडी होती . घरात पेपर यायचा . तेव्हा त्यामध्ये छायाचित्रं अतिशय कमी असायची. जी असायची ती कृष्णधवल आणि दर्जा तर विचारायला नको.
तरीसुद्धा चित्रं भेटतच राहिली ,तेव्हाही .
असंच एक चित्र भेटायचं ते रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर . आगरकर शाळेसमोर. रास्ता पेठेतील मुलींची प्रसिद्ध शाळा.
शाळेच्या समोर एक जुना वाडा आहे . मुंबईतल्या चाळीची आठवण करून देणारा . तळमजला धरून चार मजल्यांचा. लाकडाचा जास्त वापर असलेला . मूळ रंग जाऊन काळा रंग धरलेला . किती जुना ते माहिती नाही. खाली वाड्याच्या दाराशी एक फुलवाला बसत असे . रंगीबेरंगी हार लटकवून , लाल,पिवळी, पांढरी, गुलाबी फुलं पसरून . छोटंसं दुकान. फूटपाथला लागूनसं. त्याच्या शेजारची भिंत त्याने रंगवून घेतलेली आणि त्यावर चार बाय पाच या आकाराचं गणपतीचं रंगीत चित्र .
बसमधून स्टेशनला जाताना ते चित्र दिसत असे . ते बघण्यासाठी मी खिडकीत बसण्याची धडपड करत असे . नेहमी. आणि ते चित्र दिसलं की मी खुश होत असे व मला कळत असे की आता स्टेशन जवळ आलं म्हणून. पाच मिनिटांच्या अंतरावर . आपण पोचलो . मन हुरूरून जायचं , तळेगावला जाण्यासाठी .
आजही तो वाडा तसाच आहे . जरा पडझड झालीये . पुढच्या पूर्ण बाजूला कोणी राहताना दिसत नाही. खाली फुलवाल्याचं दुकान अजूनही तसंच आहे . आणि ते गणपतीचं चित्रदेखील . मस्त फिकट गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर रंगवून घेतलेलं. नवीन .कलरफुल ! छान ,प्रसन्न, हसरं रूप आहे गणपतीबाप्पाचं .
दुसरं चित्र म्हणजे ,भवानीपेठेत एक नातेवाईक रहायचे. त्यांच्याकडे जाताना एक चित्र दिसायचं . एका मोठ्या भिंतीवर रंगवलेलं , पूर्ण रंगीत . म्हणजे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट.
एका बलदंड युवक वाघाशी लढतोय असं . जितक्या वेळा जायचो तितक्या वेळा मी ते चित्रं पाहायचो . अनेक गोष्टींमुळे .एक म्हणजे चित्र, दुसरं म्हणजे रंग आणि तिसरं विषय .
पुढे कळलं की ते चित्रं एका तालमीच्या भिंतीवर रंगवलेलं होतं . त्या तालमीचं नाव जंगीशा हमाल तालीम . थोडक्यात म्हणायचं तर ती हमाल तालीम म्हणून प्रसिद्ध . भवानीपेठेचा तो भाग म्हणजे धान्याची मुख्य अन मोठी बाजारपेठ . मार्केटयार्ड नंतर झालं . तिथे पुण्याच्या आसपासच्या गावातली तरुण मंडळी हमाली काम करायची. त्यांच्यासाठी ती तालीम जुन्या काळात केलेली असावी.
तसे ते हमाल मूळचेच चांगल्या बांध्याचे असायचे . पोती वाहून , ओझी उचलून त्यांचं शरीर पिळदार झालेलं असे . पाहत रहावं असं . आता वीस न पंचवीस किलोचे धान्याचे किरकोळ कट्टे येतात. आपल्याला तेही उचलत नाहीत तो भाग वेगळा . त्यावेळी शंभर शंभर किलोची पोती असत, गोणपाटाची . दिवसभर ती पोती उचलायची , वहायची आणि गोदामात टाकायची म्हणजे खायचं कामच नव्हतं . ती वाहून घामेजलेले ते हमाल पिळदार शरीराचे झाले नसते तरच नवल . चटणी भाकरीवर वाढलेली मंडळी ती . स्टेरॉईड घेऊन मसल्स फुगवायची त्यांना गरज नव्हती . ऍब्स शब्द माहित नव्हता त्यांना , पण ते ऍब्स त्यांच्या शरीरावर असत. जे मिरवायची त्यांना माहिती नव्हती ना परिस्थिती .
पण त्यातूनही एखाद्या हमालाला आणखी तब्येत कमवायची असेल , कुस्तीगीर व्हायचं असेल, तर त्या हमालांसाठी ती तालीम बांधली गेली असावी .
चित्र असं असे - साधारण दहा बाय पंधरा आकाराचं . निळ्या रंगाचं आकाश , खाली हिरव्या गवताचा पट्टा. त्यावर डुलणारी रानफुलं. एकदोन झाडं. उडणारे पक्षी . एका कोपऱ्यात ससा , हरीण आणि मध्यात पहिलवान आणि वाघ . त्या मल्लाच्या एका हातात सुरा असे आणि दुसरा हात त्याने वाघाच्या जबड्यात घातलेला असे . लाल रंगाचा लंगोट कसलेला बलदंड पहिलवान , निर्भीडपणे वाघाशी लढत असायचा . वाघाचा जबडा अर्थातच फाकलेला पण पहिलवान मात्र अगदी निर्विकारपणे लढत असायचा . चक्क वाघाशी लढतानाही तो भावहीन कसा राहू शकत असेल ? ही एक गंमतच !
चित्र भारी चित्रकाराने काढल्यासारखं नसायचं.
आता काळाच्या ओघात तालीमबाज लुप्त झाले. पण ती तालीम, तिची जुनी वास्तू आजही आहे आणि त्यावरचं ते चित्रदेखील . इतक्या वर्षांनंतरही ,तेच चित्र त्याच भिंतीवरआहे . पुन्हा ताजं रंगवलेलं .
वर सांगितलेली दोन्ही चित्रं मी लहानपणी पाहिलेली आणि आजही ती तशीच आहेत . काळाच्या ओघात हरवून गेली नाहीत . हे मला खूप विशेष वाटतं . मला काळ माहिती नाही ; पण गेली पन्नास - साठ - सत्तर वर्षं ती तिथे असावीत . तशीच !
ज्या एका पिढीने डोंगरे बालामृत प्यायले असेल , त्यांना आठवत असेल की मंडईमध्ये एका जुन्या इमारतीच्या ,लांबून दिसणाऱ्या भागावर , उंचावर , वरपासून खालपर्यंत डोंगरे बालामृतची जाहिरात रंगवलेली होती म्हणून. आज ते चित्र तिथे नाही .
आधी सांगितलेली दोन चित्रं म्हणजे काळाचा एक जुना तुकडा आज घडीलाही जिवंत करणारी गोष्ट आहे .
कारण काही तुकडे असेच लोप पावलेले !
पूर्वी कृष्णधवल छायाचित्रं असत. त्यामधला छायाप्रकाशाचा परिणाम वादातीत . त्याच्या सौंदर्याची जातकुळी वेगळी. त्याची मोहिनी वेगळी. किती स्त्रिया अन पुरुषांचं सौंदर्य काबीज करून ठेवलंय त्या फोटोंनी. अन आपल्या आठवणींनाही . पण काही वेळा ? -
त्या शाळकरी वयात एक मांजराचं पिल्लू पाळलं होतं . पांढऱ्या रंगाचं , अगदी लहानसं . त्याचा एक डोळा हिरवा होता अन एक निळा . फोटो काढण्यासाठी आईला खूप विनवण्या करून पटवलं. त्यावेळी घरात कॅमेरा वगैरे गोष्टी दुरापास्त.
स्टुडिओत गेलो . पिल्लाला घेऊन उभा राहिलो आणि फोटो काढला . अर्थातच रंगीत नाही . तो काळा - पांढरा फोटो आजही मी जपून ठेवलाय . पण त्यामध्ये त्या पिल्लूचे डोळे वेगवेगळे आहेत हे कळतच नाही . पोरांना तो फोटो दाखवताना मन खंतावतं . तो रंगीत नसण्याचा केवढा हा तोटा .
आईच्या काकांमुळे चांदोबाची ओळख झाली. चांदोबामध्ये विविध प्रकारची चित्रं पहायला मिळायची. भरपूर . त्याचं मुखपृष्ठ, आतली एक जादुई गोष्ट आणि पौराणिक गोष्टींची चित्रं रंगीत असायची. बाकी इतर गोष्टी सिंगल कलरमध्ये . बऱ्याचदा तो रंग आकाशी निळा .
चांदोबा त्या काळातल्या मद्रासचा ( आता चेन्नई ). त्यामुळे चित्रांमधील व्यक्तींचा तोंडावळा तिकडचा . बायका रेखीव, त्यांचे डोळे मासोळीसारखे, काजळ लावलेले, त्या दागिन्यांनी मढलेल्या , केसांना जाडजूड गजरे, तर पुरुष घनदाट केस आणि भरघोस मिशा असलेले असे. आजही राक्षस म्हणलं की मला चांदोबातले राक्षसच आठवतात . त्यातल्या एका क्रमश : गोष्टीतील नायक उदयन , विक्रम -वेताळ , राजू , गोपाळ आणि पौराणिक चित्रं , हनुमान , शंकर , राम , कृष्ण . मी आयुष्यात बॉडीबिल्डरचं जे पहिलं रूप पाहिलं ते चांदोबातच - मारुतीरायाच्या रूपाने . चांदोबाची चित्रं भारी असायची . रेखीव, प्रमाणबद्ध , भावना व्यक्त करणारी. छोट्याशा चौकटीतही प्रभावी वाटणारी . त्यामुळे चांदोबाशी मैत्री जडली. त्या काळात गोष्टींची पुस्तकं फार नसत. जी असत ती मिळत नसत. आणि चांदोबा तर लय भारी होता. नक्कीच ! आणि भरपूर चित्रांचं एक आकर्षण बालजीवाला असेच.
चांदोबा वाचणारी , आवडणारी एक मोठीच पिढी होऊन गेली.
त्यानंतर पहिलीपासून हातात शाळेची पुस्तकं पडली, बालभारतीची ! त्यामध्येही चित्रं असायचीच. पण पुन्हा रंगीत चित्रं कमीच. एकरंगीच जास्त . बालभारतीचं ते ठराविक मुखपृष्ठ . एक ताई अन एक छोटा भाऊ , त्रिकोणात बसवलेले . दोघे तन्मयतेने बालभारतीचं पुस्तक पाहत आहेत . म्हणजे माझ्या मताने ते वाचत नसावेत तर ते आतील चित्रंच पाहत असावेत . चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावर असलेलं शिवाजी महाराजांचं घोड्यावर स्वार असलेलं चित्र तर विसरूच शकत नाही. तिसरीचं ‘थोरांची ओळख ‘ या पुस्तकातील चित्रं , या बालांनो या रे या ही कविता , पाचवीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील सीता आणि गोपाल यांची चित्रं आणि काय काय . हा प्रत्येकाच्या आपापल्या आठवणींचा ऐवज आहे ! ...
केव्हातरी वडलांनी रशियन पुस्तकं आणली, मुलांची . वा ! काय सुंदर ! रशियन साहित्याशी तिथून तर ओळख झाली. ती पुस्तकं बहुदा रादुगा प्रकाशनाची असायची. अनुवाद अनिल हवालदारांचा. ती पुस्तकं छोटी. त्यातल्या गोष्टी मजेशीर . ससे , बदकं , बेडकापासून ते पक्ष्यांपर्यंत सगळे तिथं भेटत . चित्रकला सुंदर आणि पूर्ण रंगीत चित्रांचं पुस्तक असे. प्रत्येक पानावर चित्र म्हणजे कसलं भारी ! केव्हातरी त्या चित्रांची नक्कल करण्याचा प्रयत्न मी करत असे. त्यामधल्या रंगांच्या छटा वेगळ्याच असत. करड्या , राखाडी वगैरे . रशियामधल्या खेडेगावात, मनाने तिथल्या निसर्गात घेऊन जाणाऱ्या .वास्तववादी आणि वेगवेगळ्या शैलींचीही चित्रं असत. वेगळी दिसणारी चित्रं नजरेला पडली ती त्या वेळेस . रशियन असल्याने अर्थातच चेहरे वेगळे असायचे . त्यातल्या ह्युमन फिगर्स जबरदस्त असत . काही कृष्णधवल चित्रांची पुस्तकंही असायची . थोडी मोठ्या मुलांची . वास्तववादी गोष्टी असलेली . पण त्यातील चित्रं अन त्यातला आसपास भारून टाकणारा असे .
पुढे इतर काही मुलं, त्यावेळी कॉमिक्स वाचत . ती इंग्लिश असत त्यामुळे मी त्या वाटेला फारसा जात नसे . बहुतेकदा फँटम आणि मँड्रेक . पण ती रंगीत चित्रं पहायला आवडत . कारण त्याची चित्रं वास्तववादी आणि अचूक असत. त्यामध्ये वापरलेले चित्रांचे अँगल्स फारच अफलातून असत. जणू काही कॅमेऱ्यातून टिपल्यासारखे . क्वचित मिळाल्या तर , मराठीमध्ये वेताळ झालेल्या फँटमच्या चित्रकथा वाचत असे.
मग अमरचित्रकथा येऊ लागल्या. वैविध्यपूर्ण ! पूर्ण रंगीत . त्या आधीपासून असाव्यात ,पण इंग्लिशमध्ये . नंतर ती पुस्तकं मराठीमध्येही येऊ लागली . ऐतिहासिक , पौराणिक , चंगळ नुसती, प्रतापराव मुळीकांच्या चित्रांनी तेव्हापासून भारलेलो आहे. काय अप्रतिम मुखपृष्ठं असत त्यांची, ग्रेट ! नंतर केव्हातरी त्यांच्या चित्रांचं प्रत्यक्ष प्रदर्शनच पहायचा योग आला . हे भाग्यच ! त्यांच्या फिगर्स लाजवाब असत .
त्याकाळापर्यंत मग चित्रांची आणि त्यातल्या त्यात रंगीत चित्रांची वानवा भरून काढणारी बरीच पुस्तकं सगळ्यांच्या हातात पोचू लागली. जमाना बदलला , तंत्रज्ञान बदललं आणि पैसाही !
पुढे माझी मुलांच्या कथांची पुस्तकं आली. प्रत्येक पानावर चित्रं . तेही रंगीत. पूर्ण फोरकलर पुस्तकं. तीन पुस्तकांचा संच .
त्यानंतर बालभारतीमध्ये माझ्या कथेचा समावेश झाला. त्या गोष्टीला पूरक ,गोड रंगीत चित्रं. ती सगळी पुस्तकं हातात घेऊन पाहताना मला माझे जुने दिवस आठवतात. नवीन पिढी नशीबवान असल्याचा आनंद वाटतो आणि हेवादेखील !
तिसरीत असताना वर्गात एक मुलगा होता. तो खूप छान चित्रं काढायचा , वह्यांवर असलेली देवादिकांची वगैरे . त्याच्यामुळे चित्रं काढायचा नाद लागला . माझ्याकडे एक वही होती, त्याच्यावर कृष्णाचं चित्रं होतं. गोड चित्र होतं , कुरळ्या केसांच्या बालकृष्णाचं. ते दहावीस वेळा काढलं असेल. मग कुठे जमलं जरासं . मग ते रंगवलं . शाळेत चित्रकलेसाठी तेलकट खडू असत . तेच घरी . मग जलरंग कुठले ? मिळवले कुठून तरी. ते अक्षरशः मातीचे रंग असत . वडयांच्या स्वरूपात . त्या रंगात हवा तो परिणाम साधता येत नसे. माझा तर आनंदीआनंद . मला तर रंगवताही येत नव्हतं. आणि रंगही धड नाहीत . प्रत्येकवेळी मी कृष्णासाठी गडद जांभळी छटा वापरायचो . शेड बनवता येत नसल्याने . शेवटपर्यंत मी ते चित्र रंगवूच शकलो नाही. मी रंगवलेला तो कुरळ्या केसांचा, जांभळा कृष्ण पाहिला तर गोकुळ आफ्रिकेत होतं की काय , असं वाटण्यासारखी परिस्थिती .
तो मित्र तर सारखीच नवीन चित्रं आणून दाखवायला लागला . मी हैराण !
मग एका दुसऱ्याच मुलाने त्याच्या चित्रकलेचं रहस्य सांगितलं. तो जिथे रहायचा , तिथे एक स्टुडिओ होता. चित्रपटांची पोस्टर्स तयार करणारा . हा पठ्ठया तिथला शिष्य होता .
तो सुवर्णकाळ ! ...
त्याकाळात फ्लेक्स प्रिंटिंग प्रकार नव्हताच . पूर्णपणे रंगवण्यावर भिस्त . त्या सुवर्णकाळात सिनेमांची हाताने रंगवलेली भलीमोठी पोस्टर्स बनवली जायची . आणि त्या रंगशाळेत ती बनायची. अर्थात पुण्यात ते काही एकमेव नसावेत . वाईट वाटतं की तो स्टुडिओ म्हणजे पॅसेजसारखा होता . ऐसपैस जागा नसलेला . पण जागा छोटी असली तरी चित्रांची श्रीमंती मोठी होती .
मला मोठाच शोध लागला. तो चित्रकार मुलगा स्वभावाने चांगला होता. तो त्या कलाकारांचं काम पाहून शिकला होता . तो माझ्या घराच्या जवळच रहायचा. मग मी त्याच्याकडे जायचो आणि तिथून त्या पेंटरकडे. मोठी मोठी चित्रं कशी रंगवतात ते मी मन लावून, भान हरपून पाहत असे . तिथे बरेच कलाकार काम करत असत . अनामिक !
हिरो आणि हिरोईन अनेकरंगी. तर इतर पात्रं कुठल्याही एकाच रंगात . लाल , निळ्या , जांभळ्या वगैरे . सिनेमांची पोस्टर्स हा खरं तर एक वेगळाच कलाप्रकार. नंतर तिथे मी त्या वेळच्या अनेक चित्रपटांची पोस्टर्स होताना प्रत्यक्ष पहिली. सिनेमा टॉकीजला लागायच्या आधी त्याचं चित्र पाहायला मिळणं म्हणजे लै भारी वाटायचं . त्यातल्या हिरो -हिरोईनची नावं पोरांना सांगताना फुकट छाती फुगायची . अर्थात , त्यातला एखादाच सिनेमा पहायला नसीब व्हायचा . ते दुःख वेगळंच . ते दुःख आत्ताच्या ओटीटी जमान्यामध्ये कळणार नाही . आता - अती झालं अन हसू आलं , अशी परिस्थिती . त्यावेळेस बालमनाला काय माहिती की एक दिवस ही कला काळाच्या ओघात गडप होऊन जाणार आहे म्हणून.
मग जिथे जिथे टॉकीजेस असतील तिथे तिथे पोस्टर्स पाहण्याचा चाळाच लागला. अर्थात , सिनेमा हा सगळ्याच भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय .पण मी त्या पोस्टरमध्ये सिनेमा, हिरो व हिरोईन या व्यतिरिक्त रंगांचे फर्राटेदार स्ट्रोक्स शोधत असे. रंगाचा मनमुराद वापर . नाईफ पेंटिंगचा प्रकार . तुम्ही ती पोस्टर्स आजही पाहिलीत तर माझे म्हणणे पटेल.
लक्ष्मीरोडवर एक अल्पना नावाचं थिएटर होतं. ते एवढ्यात पाडलं . त्यावेळेस तिथे भारी, भारी म्हणजे चालणारे सिनेमे लागत . तिथे ‘लव्ह अँड गॉड’ सिनेमा लागला होता. मुगल- ए- आझम बनवलेल्या के. असिफचा . मुगल-ए-आझम थोडा रंगीत आहे. सरळ आहे, त्याकाळी पूर्ण रंगीत सिनेमा बनवणं परवडायचं नाही . पुन्हा माझा मुद्दा , चित्र रंगीत नसण्याचा . असिफने हा एकमेव सिनेमा पूर्ण रंगीत बनवला. सिनेमा दुर्दैवी होता. १९६३ मध्ये शूटिंग सुरु झालं आणि तो प्रदर्शित झाला कधी ? तर १९८६ मध्ये. लैला मजूनची कथा. लैला निम्मी आणि मजनू संजीवकुमार . निम्मी म्हणजे बरसातपासून बसंतबहारपर्यंत अनेक सिनेमात गाजलेली .
त्या टॉकीजशेजारी एक झरा वाहतो . त्याच नाव नागझरा. आता त्याच्यामध्ये गटाराचं पाणी सोडून त्याची नागझरी झालीये. त्याच्या काठावर टॉकीज . त्यामुळे अडथळा नसल्याने लांबूनच टॉकीजची भलीमोठी तीन मजली आयताकृती , उंच भिंत दिसायची.
पोस्टर लावण्यासाठी अगदी आदर्श जागा.
त्या भिंतीवर सिनेमाचं भलंमोठं पोस्टर लागलेलं . पेंटरने दिल खोलके चितारलेलं निम्मीचं कातिल सौन्दर्य ! काय चित्र होतं. त्या पोस्टरची रंगसंगती, तिने घातलेला नकाब . त्या नकाबाची पारदर्शकता आणि त्यातून दिसणारा तिचा मोठ्या साईझमध्ये रंगवलेला नुसता चेहरा. खलास पेंटिंगच होतं ते ! नुसता चेहराच पाच बाय पाचमध्ये असावा . सिनेमा चालला नाही पण खूप महिने तो तिथे असावा.
माझा कॉलेजचा रोजचा रस्ता. रोज त्या चित्राचं रसपान करायचं, मग पुढे जायचं. त्या कलाकारांना कधी प्रसिद्धी नाही . काय पेटिंग होतं , पण ते नंतर कुठेतरी एखाद्या भिंतीला टेकून , फाटून गेलं असणार ! ... चितारणारा तो कलाकार तर पडद्यामागेच . सिनेमासारखीच परिस्थिती .
इंटरनेटवर ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल ; पण त्या स्थानिक चित्रकाराने रंगवलेल्या चित्राची सर त्याला नाहीच .
पुढे छपाई तंत्रज्ञान सुधारलं. टॉकीजची पोस्टर्स कायम राहिली ,पण जाहिरात करणारी कागदी पोस्टर्स आली.
त्यावेळी बाजीराव रस्ता दुहेरी होता. आता तिथे नूमवि शाळेसमोर थोडं तिरकं, एक बस स्टॉप आहे . रुंदीकरणात तो रस्ता आता सलग झाला. आधी तिथे हुजूरपागा शाळेची एक छोटी इमारत होती. रस्त्यावर मध्येच बाहेर आलेली. एखाद्या हटवादी जनावराने थोडं कळपाबाहेर अंग काढून उभं राहिल्यासारखी . अगदी बेलबाग चौकात , त्या भिंतीवर विजयपथमधलं ' रुक रुक रुक ' या गाजलेल्या गाण्याचं पोस्टर लागलं होतं. लाल रंगाचा ड्रेस घातलेली तब्बू . लक्षवेधक . पण छापील , कागदी. जातायेता ते बघायचो . नवीन प्रकार होता, आकर्षून घेणारा. पण हळूहळू पोस्टर्स रंगवण्याची कला त्याने खाऊनच टाकली.
मग मी वेड्यासारखा चित्रप्रदर्शनं पहायला लागलो. मी काही कलामहाविद्यालयाचा विद्यार्थी नाही. पण चित्र बघणं आणि काढणं याने झपाटून गेलेलो. असंख्य प्रदर्शनं, उत्तमोत्तम . असंख्य कलाकारांची . प्रसिद्ध -अप्रसिद्ध . त्यात अगदी प्रत्यक्ष स्वतः एस .एम. पंडितांनी भरवलेल्या प्रदर्शनापासून ते दलाल आणि गोविंद बेंद्र्यांपर्यंत. मला त्या पद्धतीची अस्सल देखणी, कलायुक्त चित्रं आवडतात.
पुढे तर चित्रकारांशीच मैत्री झाली. आणि तीही ठरवून नाही तर ते भेटत गेले. वेगवेगळ्या कारणांमधून . चांगले, उत्तम चित्रकार. चित्रं आणि रंग पाहण्याची हौस देव पुरवतच गेला .
आणखीही चित्रकारांना भेटण्याची आस आहेच ...
आता अगदी अलीकडे , पुण्यात एका तरुण चित्रकाराने मोठ्या, रिकाम्या भिंती रंगवण्याचा उपक्रम केला. त्याची बातमी आली होती. त्या कलाकाराचे मला नाव आठवत नाही. त्यातलं एक मोठं चित्र पहायला मिळालं. कसबा पेठेत ,पोवळे चौकात. एका जुन्या वाड्याच्या सपाट भिंतीवर, लक्ष वेधेलसं . अजूनही ते चित्र त्या भिंतीवर आहे . पण उन्हा - पावसात त्याचे रंग आता फिकटले .
आता महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणच्या भिंती चित्रांनी रंगवण्याचा उपक्रम हाती घेतलाय . उत्तम उपक्रम ! त्यामुळे ओक्याबोक्या, घाणेरड्या भिंती सुशोभित होऊन गेल्या आहेत. छान वाटतं ! बालनजरांना त्याचं किती अप्रूप असेल ! निसर्गचित्रांचं, वारली चित्रांचं. झाडांचं , फळा - फुलांचं , पक्ष्यांचं - प्राण्यांचं अन फुलपाखरांचं. फुलपाखरं म्हणजे उडणारे रंग. उडणारी चित्रंच ! जर कधी मला ते जाणवलं नाही, तर मनाचा कोवळा रसरशीतपणा हरवल्याची खंत वाटते. वाटतं - लहानपण देगा देवा !
असा हा रंगीत चित्रांचा धांडोळा आहे .
तशी अनेक उत्तम चित्रं आपल्याला खरं तर सिनेमाने दाखवली . अगदी कृष्णधवलच्या जमान्यापासून . पण छायाचित्रण हा या लेखाचा विषय नाही . तशी तर अनेक उत्तम कॅलेंडर्स निघाली आहेत , निघत आहेत , जी चित्रांशी संबंधित आहेत . पण ते सगळं इथे घेतलेलं नाही .
रसिकांच्या मनात अनेक चित्रं जागी असतील , ताजी असतील . आणि ती पुन्हा नव्याने मनात उमटावीत यासाठीच हा लेखन प्रपंच .
पण, यामध्ये काही जिवंत रंगीत चित्रांचा उल्लेख केल्याशिवाय हा रंगरंजनाचा सोस पूर्ण होणार नाही.
दोन-चार वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ, कात्रज इथे एकाच्या घरी जायचं होतं. रस्ता चुकलो. तिथे अनेक छोट्या छोट्या गल्ल्या.एका गल्लीत गेलो. अन पुढे रस्ताच बंद. मार्च महिना . तळपतं ऊन . घामाघूम झालेलो. वैतागलेलो. पण तिथे समोर एक बहावा दिसला आणि मी उन्हाचा ताप हरवून बसलो.
समोर भला प्रचंड बहावा . एवढं मोठं झाड मी कधीच पाहिलं नाही. आणि पूर्ण पिवळ्याधमक फुलांनी बहरलेला . बापरे ! काय सौन्दर्यसंपन्न ! एखादी सौन्दर्याने घायाळ करणारी , भरलेली रुपगर्विता की एखादा बलदंड योद्धा की एखादा तेज:पुंज ,जटा वाढवलेला, धिप्पाड वृद्ध संन्यासी , सांगता येत नाही.
काही जिवंत लॅण्डस्केप्स , माझ्या लहानपणीची…
लहानपणी काही महिने तळेगावला राहिलो. म्हणायला तळेगाव. खरंतर घोरावाडीला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आदरणीय गोनीदा तिथं रहायचे .
लहान होतो . पहिलीला. आषाढ लागलेला . रेल्वे स्टेशनजवळ एक देऊळ होतं, बहुदा मरीआईचं.
आई आणि तिच्या मैत्रिणी त्या देवळात आषाढाचा नैवेद्य द्यायला गेलेल्या . सोबत मी. मनातून आनंद झालेला , शाळा बुडाल्याचा .
थोडा पाऊस होता. तिथे पोचलो. एक छोटंसं, खोलीवजा देऊळ. आतमध्ये त्या तीन-चार बायका . मी बाहेर . बाकी आत, आजूबाजूला कोणीच नाही. बाकी परिसर पूर्ण-पूर्ण मोकळा. माळच तो,रिकामा. नजरेच्या टप्प्यात कोणी नाही. समोर पुणे - मुंबई रेल्वेमार्ग . मग धोधो पाऊस पडायला लागला. तसा मी दारात सरकलो . आडोशाला . भिजायला नको म्हणून , आई ओरडायला नको म्हणून. तशा पावसात एक मालगाडी आलेली . त्या पावसाच्या कोसळथेंबांना ती मालगाडी मस्तीत ढकलत हिरीरीने पुढे धावत होती.
मागे देऊळ. मी दारात. देऊळ सोडता एक माणूस नाही. समोर सगळं हिरवंगार. त्यावर बरसणारा तो बेभान पाऊस आणि तो चिरत जाणारी भिजल्याची पर्वा न करणारी ती मालगाडी. ते दृश्य डोळ्यांसमोर आजही तसंच.
हे विशेष वाटण्याचं कारण म्हणजे तो रिकामपणा, तो मोकळेपणा, आता अनुभवास येत नाही. आता त्या घोरावाडी स्टेशनला गेला तर ते देऊळ सापडणार नाही ,इतकी घरांची दाटीवाटी त्या मोकळ्या माळावर झालीये. स्टेशनचा मोकळा रस्ता आता बोळकांड्यासारखा झालाय,
येरवड्याच्या पलीकडे होळकर ब्रिज आहे. तो पार करायला नको वाटेल इतकी मरणाची गर्दी असते गाड्यांची. हे आजकालचं चित्र.
मी शाळेच्या वयातला . सायकल घेऊन कुठेकुठे भटकायचो . त्या परिसरात गेलेलो एकटाच. मला तो परिसर माहिती नव्हता. त्यावेळी रस्त्यांची माहिती नव्हती.
कुठला रस्ता कुठे जातो, हे माहिती नव्हतं. सायकलची हवा गेली तर ती भरायला पाच पैसे नसायचे , हाफ पॅन्टच्या खिशात . पण वय वेडं असतं . ते दिवसही तसे होते . आता लहान मुलांना असे सोडायचे दिवस नाही राहिले . किती गोष्टींना मुकली ही पिढी .किती भारी गॅजेट्स आहेत हातात खेळायला यापेक्षा मोकळं हुंदडणंच जास्त महत्वाचं .
मला तो होळकर पूल सापडला. थंडीचे दिवस. सकाळची दहाची वेळ. मी आलेल्या रस्त्यावर, पुलावर गर्दी सोडाच. एक माणूस नाही. उबदार ऊन अंगाला बरं वाटत होतं. खालून वाहणारी स्वछ पाण्याची नदी. वर तो दगडी पूल. निर्मनुष्य . सायकल लावली कठड्यापाशी . वरून वाकून पाहिलं . खाली नदीही शांत. नदीला बऱ्यापैकी पाणी . त्यात बुड्या मारणारा खंड्या . पलीकडे बगळे आणि पुलाच्या खाली दोन होड्या. एक पांढरी एक फिकट निळी .रिकाम्या , बांधून ठेवलेल्या. पाण्यावर संथ डुचमळणाऱ्या . एकमेकींना खेटून निवांत उभ्या असलेल्या गायींसारख्या . शांत. शांतता अनुभवणाऱ्या, परिसर न्याहाळणाऱ्या . काय विलक्षण दृश्य !
आता ती नदी घाणेरड्या जलपर्णीने पूर्ण भरून गेलीये . जुनं सोनं हरवत चाललंय .
नंतर अशी लॅण्डस्केप्स पाहण्यात आली . पण ते दृश्य त्या वयात प्रत्यक्ष पाहण्यात जी मजा आली . क्या कहने !
अशी खूप दृश्ये असतील गाव- खेड्यातून . पण मी पूर्ण शहरी माणूस . मला ते त्यावेळी पहायला मिळालं . मी हरखून जायचो . माझ्यापेक्षा जी मंडळी ज्येष्ठ असतील , त्यांनीही यापेक्षा सुंदर पुणं अनुभवलं असेल ...
त्याच वयात एक नवीन मित्र झाला. त्याच्याकडे असंख्य पुस्तकं होती. अफाट . अगदी इंग्लिश सुद्धा . विविध विषयांवर . त्यात चित्रकलेची पुस्तकंही . त्यात दोन चार लँड्स्केपची होती . मोठी . पेंटिंगची प्रक्रिया उलगडून सांगणारी . फॉस्टर नावाच्या चित्रकाराची . त्यातलं एक पुस्तक माझं खूप आवडतं. कितीदा ते पुस्तक त्याच्याकडून आणायचो आणि ती चित्रं नकलायचो . त्यामध्ये एक साधं पण प्रभावी चित्र होतं ...
एकदा सायकल घेऊन हिंडायला गेलेलो . अर्थात एकटाच . कॅम्पच्या पलीकडे . घोरपडी गावातून पुढे गेलं की दोन रस्ते . एक रस्ता मुंढव्याला जातो तर दुसरा कोरेगाव पार्ककडे जातो .
तो दुसरा रस्ता म्हणजे एखाद्या खेडेगावातून गेल्याचा फील देणारा . त्यावेळी छोटा . खड्ड्यांनी भरलेला . झाडांनी भरलेला . मोकळा . त्याची एक बाजू मिलिटरीची . त्या रस्त्याच्या पलीकडे एक ओढा आहे . झुळझुळ वाहणारा. मजेत खळखळणारा . लहान मुलासारखा अवखळ पळणारा. स्वच्छ पाण्याचा . गटाराचं पाणी न सोडलेला . थोडं पाणी . खोल तर तो नव्हताच.
आजूबाजूला सगळं मोकळं . ओढ्याच्या परिसरात ऐलपैल कोणीच नाही . एक मी सोडता. रस्ता शांत . रस्त्यावरून जाणारी एखादी सायकल , एखादी गाडी .
रस्त्यावरून खाली उतरलो . ओढ्याच्या काठाने त्याची संगत धरून छान मऊशार गवत धरलेलं .त्यावर बसलो. मागे निळं आकाश . पण निळाई कमीच कारण आकाशात हे मोठे मोठे हत्त्तीएवढे पांढरे ढग. पार्श्वभूमीवर तो पांढरा रंग आणि त्यावर आकाशी रंगाचं बाटिक नक्षीकाम . खाली हिरवंगार गवत . एखादी बुलबुलची जोडी . नाजूक शीळ घालत जाणारी . खळाळणारा ओढा अन मी एकटाच की, हे सारं पहायला …आणि माझ्या पलीकडे एक झाड . नाजूक, उंच, सडसडीत . एखाद्या शेलाट्या पोरीसारखं भाव खात.
मी ते पाहतच राहिलो . हे पूर्ण चित्र तर मी फॉस्टरच्या पुस्तकात कितीदा पाहिलेलं . फॉस्टर कुठला हे आता आठवत नाही . अमेरीकन असावा . किंवा परदेशातला नक्कीच. पण ते फॉस्टरबाबाचं चित्र माझ्या समोर चक्क जिवंत होऊन उभं होतं . परदेशी चित्र चक्क माझ्या मातीत उमटलेलं . सही न सही ! ओढयात पाय घालून बसलो. पाय आणि मन दोन्ही शीतल झाले . मन भारुन गेलं अन मन भरून आलं . मन भरल्यावर निघालो .
आजही तो ओढा तिथेच आहे . पण ... काळजात दुखतं .
अनेकांनी यापेक्षा सुंदर निसर्ग अनुभवला असेल , अनेक निसर्गदृश्यं पहिली असतील; पण मला हे नम्रपणे सांगावसं वाटतं की ही दृश्यं माझ्या बालवयाशी निगडित आहेत .मनात रुजून बसलेली . मुख्य म्हणजे सिमेंटचं गजबजाटी जंगल झालेल्या पुण्यात मी ती त्या काळी पाहू शकलो .
मला चित्रांबद्दल प्रेम वाटतं, ओढ वाटते. मला चित्रकार मंडळींबद्दल उत्सुकता वाटते , कुतूहल वाटतं , हेवा वाटतो आणि मत्सरही . पण चांगल्या अर्थानं . कारण सरळ आहे हो . सगळ्यात मोठा चित्रकार तर तो आहे ! वर बसलेला .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults