शोध घ्याया लागलो

Submitted by निशिकांत on 10 November, 2020 - 22:16

आपुल्यांनी दंश करता, तळमळाया लागलो
सर्पविष त्यावर उतारा, शोध घ्याया लागलो

व्यर्थ असुनी कारमागे श्वान तर पळतेच ना!
मृगजळी स्वप्नी सुखांच्या वावराया लागलो

बाहुला अन् बाहुलीचे लग्न स्मरताना, मनी
बाहुली होती जिची तिज आठवाया लागलो

ना कधी जमले त्सुनामी काळजाची व्हायला
शेवटी तुझिया कपातच वादळाया लागलो

रंगरंगोटी कशाला जीर्ण भिंतीला उगा?
ढासळू दे, मुक्त कर "श्री" गिडगिडाया लागलो

एकटे तुजविन जगाया शक्य ना झाले कधी
आठवांनी मान माझी करकचाया लागलो

नोंद नाही मालकीची, सात बारा हा कसा?
पाहुनी लिव्ह-इन-रिलेशन, गोंधळाया लागलो

मी इबोलाग्रस्त असुनी, धीर नाही सोडला
पण अबोला भोगताना, थरथराया लागलो

संशयी चष्म्यातुनी जग पाहसी "निशिकांत" का?
पोळल्याने दूध फुंकत ताक प्याया लागलो

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र.९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users