हसीना

Submitted by रूपाली विशे - पाटील on 8 November, 2020 - 07:41

हसीना

" ए हसीना.. मरना है क्या तुझे?"! ट्रेनच्या दरवाज्या बाहेर डोकं काढून हवा खाणाऱ्या हसीनाला पाहून भेळ विकणारा चाचा जोरात ओरडला. तशी त्याला जीभ काढून दाखवित.. ज्या स्थितीत होती त्या स्थितीत दरवाज्याचा एक हात सोडून हसीना जोर-जोरात गाणं म्हणू लागली.

" तू कधी सुधारणार नाहीस ...हसीना!" स्टेशन वर माझ्या सोबत उतरणाऱ्या हसीनाला मी म्हणाले.

" ऐसीच हूँ मै दिदी!" दात काढत हसीना म्हणाली.

'हसीना' रोज ट्रेनमध्ये वडापाव विकणारी एक फेरीवाली..! रेल्वे स्टेशन पलिकडल्या झोपडपट्टीत राहणारी.. तिचं खरं नाव काय होतं हे मला ठाऊक नव्हतं. पण तिला सगळे 'हसीना' नावानेचं ओळखायचे. ब्लू जिन्स, त्यावर लांब कुर्ता आणि त्यावर वैध फेरीवाली म्हणून रेल्वेने दिलेला खाकी शर्ट मोठ्या मिजाशीत घालणारी, कानात लांब झुमके.. गव्हाळ रंगाची, मध्यम उंचीची , नेहमी तोंडात गाणं गुणगुणारी 'हसीना'... स्टेशनवर असली की लांबून पण ओळखू येई. हसीनाचं बोलणं म्हणजे तोंडात मिरचीचा ठेचा भरलेलं जणू.. अगदी जहाल...!!
बिनधास्त, स्वच्छंदी स्वभावाची हसीना तेवढीच दिलदार स्वभावाची पण होती.. गरीब भाजीपाला विकणाऱ्या स्त्रिया, मजूर यांना ती त्यांच्याजवळ पैसे नसले की उधारीवर वडापाव देत असे. जेव्हा कधी पैसे असतील... तेव्हा दे... असं म्हणणाऱ्या हसीनाच्या वडापावची रोजची गिऱ्हाईकं ठरलेली होती.

हसीना आणि माझ्या ओळखीचा प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तर झालं काय... त्यादिवशी स्टेशनवर पोहचायला मला थोडा उशीर झाला होता. माझ्या डोळ्यासमोर ट्रेन सुटत होती.... सुटणारी ट्रेन पाहून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करु लागले. खरं तर एवढी घाई करण्याची काहीही आवश्यकता नव्हती पण कधी- कधी अती धाडस करण्याच्या नादात आपल्याकडून मूर्खासारख्या चुका होतात. चालत्या ट्रेनमध्ये मला चढताना पाहून दरवाज्यात उभी असलेली हसीना मला हात देण्यासाठी पुढे आली. माझ्या हाताला घट्ट पकडत मला वर खेचून घेत म्हणाली...

"अरे दिदी ! मरना है क्या तुझे? जिंदगी इतनी सस्ती हो गयी क्या? "...
खरंतरं मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. क्षणभरासाठी जर माझा हात सुटला असता तर ?.!! ह्या अभद्र विचाराने माझ्या सर्वांगाला कंप सुटला होता. ट्रेनमधले बाकीचे प्रवासी सुद्धा माझ्या मूर्खपणावर ओरडू लागले होते. माझ्या हातात पाण्याची बाटली देत म्हणाली..

" ले ... पानी पी.. वापस ऐसी गलती मत कर... !!". मी नुसती मान डोलवली.

'अति घाई मसणात नेई' रस्त्यावरून येता - जाता सतरा वेळा वाचला असेल हा संदेश ... पण तो फक्त माझ्या डोळ्यांनीच वाचला बरं... माझ्या डोक्यात मात्र घुसला नाही एवढं मात्र खरं!!

त्या प्रसंगानंतर माझी हसीनाशी मैत्री झाली. तशी ती मला रोज स्टेशनवर दिसत असे पण आमच्यात मैत्री वैगरे काही नव्हती. पण आज तिने मला संकटात मदतीचा हात देऊन माझ्यावर उपकार केले होते. तिच्याशी बंध जुळायला हे कारण खूप मोठं होतं.

दिवसभर पायाला भिंगरी लावून ट्रेनमध्ये वडापाव विकणारी 'हसीना' बोलायला एकदम फटकळ पण तेवढीच दिलखुलास स्वभावाची होती. तिचा वाईट गुण म्हणजे कधीकधी तिला ट्रेनमध्ये दादागिरी करण्याची हुक्की यायची. तिचा हा एक दुर्गुण सोडला तर माणूस म्हणून ती खूप चांगली होती. ट्रेनमध्ये सीटवर बसण्याच्या जागेवरून नेहमीच भांडणं होत असतात. पण हसीना मात्र अश्या भांडणात अगदी हमरी-तुमरीवर यायची. लेडीज डब्यातल्या बायका तिच्यावर खूप चिडून असायच्या. एरव्ही कुठल्याही गोष्टीवर एकमत न होणाऱ्या त्या बायकांचं हसीनाची तक्रार रेल्वे पोलिसांकडे करायला पाहीजेच... या एका गोष्टीवर मात्र पक्कं झालं होतं... आणि एके दिवशी डब्यातील बायकांना हसीनाची तक्रार करण्याची संधी तिच्या नसत्या करामतींमुळे आयतीच चालून आली.

×××× ××× ×××

"साब ! मेरी भी सुनो... मुझे ये मारपीट करने का कोई शौक नही है... पर ..ये.. ये.. कल की लडकी मुझे बोली की ..तू धंधा करती है! .... हाँ ! करती हूँ मैं धंदा ... पर इमान का धंदा करती हूँ... साब! ....कुछ गलत काम नही करती!... गरीब हूँ इसलिए कोई कुछ भी बोलेगा तो मै सुननेवाली नही हूँ! ये लडकी माँ-बाप के पैसे से कॉलेज जाती है ना... पढने ?... यही पढ़ाते क्या इसे... कॉलेज में?" हसीनाचा गुस्सा सातवे आसमान वर पोहचला होता.

"तू यहाँ आके कंम्प्लेन्ट करती ना उसकी..!!. मारामारी करायची काय गरज होती तुला?" पोलिसांनी तिला खडसावले.

ट्रेनच्या डब्यात सीटवर बसण्याच्या जागेवरून एक कॉलेज युवती आणि हसीना मध्ये बाचाबाची झाली. त्यांच्या भांडणात दोन्हीकडून शिवीगाळ झाली. त्या मुलीने दिलेली एक शिवी मात्र हसीनाच्या जिव्हारी लागली आणि मग प्रचंड संतापलेल्या हसीनाची हाताची पाच बोटं त्या मुलीच्या गालावर उमटली. हसीनाच्या अश्या मनमानी वागण्यामुळे डब्यातल्या बायका खूप चवताळल्या होत्या. त्या गप्प राहणं शक्यचं नव्हतं. त्यांनी स्टेशनवर उतरून रेल्वे पोलिस चौकीत तिची तक्रार केली आणि ही सगळी कहाणी तिने मला संध्याकाळी स्टेशनवर भावूक होत सांगितली.

" मग काय? तुझी चांगली पूजा झाली असेल पोलिस चौकीत? काय गरज होती गं... तुला त्या मुलीला मारायची?" मी तिला जरा रागात म्हटले.

" दिदी... साबने पेपर पर लिख के लिया की वापस मै ऐसा बर्ताव नही करूँगी ! पर वो लडकी जो बोली ना दिदी.....मुझे बहुत बुरा लगा !"

" हो.. ती चुकलीचं गं ... तिने असं बोलायला नको होतं... कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं गुन्हाच आहे पण तू सुद्धा तिच्यावर हात उचलून गुन्हाच केलास!! बरं.. पुन्हा असं काही करु नकोस."

"ठिक है दिदी!!"

×××× ××× ×××

"ए, दहा रुपये दे की.. देव तुझं भलं करेल" !!.. भिकारी माझ्या जवळ येऊन म्हणाला .. त्याच्या तोंडातून दारूचा भपकारा मारत होता. त्या भिकाऱ्याला टाळायला मी ज्या बाकड्यावर बसले होते तिथून उठून दुसऱ्या बाकड्यावर जाऊन बसले. तरी पण तो दारू प्यायलेला भिकारी माझा पिच्छा सोडायला काही तयार नव्हता. त्या दिवशी मला ऑफिस मधून घरी जाण्यास उशीर झालेला.... त्यावेळेस स्टेशनवर गर्दी हि कमी होती आणि हिवाळ्याचे दिवस असल्याने अंधारही लवकर पडू लागलेला...

" भीक मागायची आणि दारू प्यायची .. लाज वाटत नाही का....भीक मागायला ?"

नेहमी लोकांकडून भीक घेण्याची सवय असलेला भिकारी माझ्या असल्या सौम्य भाषेला थोडी भीक घालतोय? .. मी पैसे न दिल्याने तो आता शिवराळ भाषा वापरू लागला. 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला ' मला काय करावं सुचेना..!! ट्रेन यायला अजून अवधी होता. एरव्ही प्लॅटफॉर्मवर रेल्वे पोलिस गस्त घालत असतात पण म्हणतात ना.. असले काही कटू आणि मनस्ताप देणारे प्रसंग आयुष्यात घडायचे असले ना की... मग दुर्दैव सगळीकडून आडवं येतं. त्या दिवशी पोलिसांचाही कुठे जवळपास पत्ता नव्हता. ह्या बेवड्याच्या नादाला कुणी लागावं म्हणून आसपास असलेली दोन- चार टाळकी पण तोंडात मूग धरून बसली होती.

" अकेली औरत देखी और आया छेडने ××× ! " मागून भिकाऱ्याला बखोटीला खेचत त्याच्या गालावर थाड्- थाड् थपडा बसल्या. झोकांड्या खात भिकारी खाली पडला.

" चल निघ इथून!"

" हसीना तू...?" माझ्या आश्चर्याला पारावर उरला नव्हता.

" हाँ ... मीच! क्या रे दिदी.. ये सँन्डल क्या सिर्फ पैरो की शान बढाने के लिए पहनती क्या? मघाशी काढून त्याच्या कानाखाली वाजवली असती तर?... ऐसे लोगों के साथ ऐसाही बर्ताव करना चाहिए!"

योगायोगाने त्या दिवशी तिची आधीची ट्रेन चुकल्यामुळे ती मागच्या ट्रेनसाठी थांबली होती. हसीनाची ट्रेन चुकणं आणि माझ्या मदतीला धावत येणं हा एक जणू नशिबाचा योगायोगच होता.

पण खरं सांगू...! त्या दिवशी मला माझी खूप लाज वाटली. आपण स्वतःचा बचाव करू शकत नाही ह्याची...! शिक्षणाने माणूस सुशिक्षित , सुसंस्कृत होतो.. आपला उदरनिर्वाह करण्याएवढा सक्षम होतो असं म्हणतात. पण आयुष्यात येणाऱ्या संकटांना , जीवनात घडणाऱ्या अश्या मनस्ताप देणाऱ्या प्रसंगाना सामोरे जाण्याचे धैर्य आणि हिंमत कुठल्या शाळेत शिकायला मिळते ...देव जाणे!... 'हसीना' चौथीपर्यंत शिकलेली... पण आज तिने जी हिंमत दाखवली ती मला दाखवता आली नाही. गरिबी पाचवीला पुजलेली, अशिक्षितपणा, व्यसनाधिनता, रोजच्या जगण्याची भ्रांत ...अश्या वातावरणात वाढलेली , दिवसभर ट्रेनमध्ये पायाला अक्षरशः भिंगरी लावून वडापाव विकणारी... एक सामान्य कष्टकरी स्त्री माझ्या रक्षणाकरिता उभी राहीली!!. खूप अभिमान वाटला मला तिचा..!!. तिच्या विषयीचा माझ्या मनात असलेला आदर आणखी दुणावला.

" चल दिदी.. ! ट्रेन आयी देख!"

मी उठून तिच्या मागे चालू लागली.

×××× ×××× ×××

" ये.. देख तेरे लिए क्या लायी मै... अजमेरसे !"

" उघडून तर बघ... !" माझ्या हातात पिशवी देत हसीना म्हणाली.

" कशाला एवढी महाग भेट आणलीस गं?" ...लाल- हिरव्या रंगाचा बांधणीचा ड्रेसपीस पाहून मी आश्चर्याने म्हणाले.

" हसीना..! तू ह्याचे पैसे घेणार असशील तर मी घेईन हा ड्रेसपीस!" मला तिची भेट स्वीकारताना खूप अवघडल्यासारखं झालं होतं.

" बस क्या दिदी! .. तुझ्यासाठी एवढं हि नाही आणू शकत का मी? तू पैसे की बात मत कर!"

" हो.. गं.. पण... मी कधी तुला काही भेट म्हणून दिलं नाही!"

" तू मुझसे प्यार और इज्जत से बात करती है... बस ! वही काफी है मेरे लिए!"

आज परत एकदा मी तिच्या दिलदारपणा पुढे खुजी ठरले होते. अजमेर वरून येताना माझ्यासाठी आठवणीने ड्रेस पीसची भेट आणणारी हसीना मला जवळची मैत्रिण वाटू लागली होती. तिने भेट दिलेला ड्रेस शिवून मी घातल्यावर मला पाहून एवढी आनंदी झाली की विचारू नका!

" बहोत सुंदर दिख रही है तू... इस ड्रेस में! मला माहित होतं हा रंग तुला छानच दिसणार!" हसत- हसत ती मला म्हणाली.

"पुरे झालं तुझं कौतुक ! आता हरभर्‍याच्या झाडावर नको चढवूस मला!" ... पण खरं सांगते..मनातून मला खरचं खूप आनंद झाला होता... नैसर्गिक स्त्रीसुलभ भावना आहे ती बरं!!
××× ×××× .×××

मधल्या काळात मी सुट्टीवर गेले त्या काळात माझी हसीनाशी भेट झाली नाही. माझ्या आयुष्यात येऊ पाहणाऱ्या नव्या जीवाच्या स्वागतात मी गुरफटून गेले होते. अन् एके दिवशी सकाळी- सकाळी whatsapp वरील मेसेजने माझी झोप उडाली. एका मयत स्त्री मृतदेहाचा फोटो whatsapp वर फिरत होता.
'सदर फोटोतील मृत महिलेला ओळखत असल्यास खालील नंबरवर संपर्क साधण्यात यावा' असा मेसेज होता तो....

अरे..!. हि तर हुबेहुब हसीनासारखी दिसतेयं... काय झालं हसीनाला? काय घडलं असेल तिच्याबाबतीत? ...माझं डोकं शंका- कुशंकानी भणभणून गेलं. मी सुट्टीवर असल्यामुळे तिच्याशी काही संपर्कसुद्धा राहिला नव्हता.
"देवा! ती हसीना नसू दे...!" मी मनातल्या मनात देवाचा धावा करीत होते. पण जर खरचं ती 'हसीना' असेल तर? ...माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. बिनधास्त, स्वच्छंदी , दिलखुलास स्वभावाच्या हसीनाला एवढ्या निदर्यतेने कुणी मारलं असेल? स्वभावाने फटकळ जरी असली तरी तिला हया जगातूनचं नाहीसं करतील असे कोण शत्रू असणार तिला? ...

हसीनाच्या प्रेमळ आठवणींनी माझे डोळे भरून आले. पण काळ हे जखमेवरचं औषध असतं असं म्हणतात... माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या वाढत्या जबाबदारीमुळे माझ्या मनातील हसीना काळाबरोबर कुठेतरी मागे पडू लागली.

×××× ×××× ××××

सुट्टी संपली आणि मी पुन्हा नोकरीवर रुजू झाले. सकाळी ट्रेनमधून उतरले की, स्टेशन जवळ असलेल्या दत्तमंदिरात देवाचं दर्शन घेऊन समोर असलेल्या भाजी मंडईतून भाजीपाला खरेदी करणं हे माझे नित्याचे आणि आवडीचं काम होतं.

" ए! काय आहे? कोण माझी ओढणी खेचतयं?" मी मागे वळून चिडून म्हणाले.

" अरे! तू,... हसिना...!! तू इथे कशी?"

माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला म्हणते कशी...
" अरे दिदी !! भूत देखा क्या मेरा? ....तुझे लगा मै मर गयी?... अरे.. वो फोनपे मेरी जैसी शकलवाली औरत का फोटो देखके बहुत लोग धोका खा गए! सबको लगा की हसीना मर गयी!!" खळखळून हसत हसीना मला सांगत होती.

" चल मेरे साथ...तुझे कुछ दिखाना है!" मला हाताला धरुन बाजारातील नविनच बनलेल्या इमारतीजवळ ती घेऊन गेली. एका दुकानवजा गाळ्याजवळ थांबत मला म्हणाली.

" बघ .. माझं स्वतःचं दुकान! ' हसीन वडापाव' ....कैसा है नाम? अच्छा है ना? भाडे से लिया है .. पर अभी मेरा खुद का दुकान और वडापाव भी मै खूद ही बनाऊँगी!" तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता.

" मग आता ट्रेनमध्ये वडापाव विकायला जात नसशील तू?"

" नही ! अभी दो लड़के रखे है ट्रेनमें वडापाव बेचने के लिए!"

" क्या बात ...हसीना! तू तर आता मोठी झालीस ... आता मला विसरशील!" मी तिची मस्करी करत म्हणाले...

" बस क्या दिदी! इतकंचं ओळखतेसं का तू मला?"

" ले... ये वडापाव खा .." मला खूर्चीवर बसवत माझ्या हातात वडापावची प्लेट देत म्हणाली.

" तू वडापावचे पैसे घेणार असशील... तर मी खाईन .. नाहीतर नको मला तुझा वडापाव!"

" तू कभी नही सुधरेगी ... दिदी!" हसत हसीना म्हणाली.

×××× ×××× ×××

तर ...अशी ही माझी मैत्रिण 'हसीना...' !! कुठल्याही संकटाला, आपल्या गरीब जगण्याला नशिबाचे बोल न लावता स्वतःच्या हिंमतीवर शून्यातून जग उभं करणारी...! गरिबीमुळे तिला शिकता आलं नाही पण आपल्या मुलींना चांगल्या शाळेत शिकायला पाठवून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबणारी एक कष्टकरी स्त्री.!!. मेहनत, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास ह्या साऱ्या गुणांची सरमिसळ असणारी 'हसीना' आपल्या पुढील आयुष्यात नक्कीच पुढे जाईल ह्याची मला पूरेपूर खात्री आहे. अशी मेहनती, दिलखुलास, फटकळ पण तेवढीच प्रेमळ' हसीना' माझी मैत्रिण आहे ह्याचा मला खूप अभिमान वाटतो.

××× ×××× ×××

तर मंडळी,... कधी आलात पालघरला तर हसीनाचा ' हसीन' वडापाव खाल्ल्याशिवाय जाऊ नका बरं...!! पण बरं का... तुमच्याजवळ पेपरमीटची गोळी आठवणीने बाळगा... कारण त्याच काय आहे... हसीनाच्या वडापाव सोबतच्या तिखटजाळ मिरचीचा ठसका तुम्हांला लागू शकतो... हसीनाच्या वडापावची मिरची मात्र खूप ठसकेबाज आहे बरं !!!... अगदी हसीनाच्या बोलण्यासारखी....!!!".

धन्यवाद!

रुपाली विशे- पाटील

( कथेतील नाव आणि घटनांशी काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजण्यात यावा.)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त

वर्णिता, अज्ञातवासी, मृणाली, सायो, म्हाळसा, हर्पेनजी, स्वातीताई, वीरुजी, एविता, नंबर १ वाचक, आबासाहेब....
मनापासून धन्यवाद तुम्हांला ...

@ वीरुजी- कथेचा शेवट तंतोतंत खरा आहे ..

अस्मिता... लावण्या...
मनापासून धन्यवाद ... तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी..

कथेतील नाव आणि घटनांशी काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजण्यात यावा.>>>> मग पालघराला हसीन वडापाव खरंच आहे की नाही? Uhoh

कथा छान आहे। Happy

@ ऋन्मेष - धन्यवाद..
@ अनंतनी - धन्यवाद
@ पद्म - धन्यवाद... हसीनाचे वडापावचे दुकान आहे बरं... पण नाव दुसरं आहे .
@ शब्दसखी - धन्यवाद
@ निरूजी - धन्यवाद
@ विनिताजी - धन्यवाद ... मी नक्कीच प्रयत्न करेन...
@ किशोरजी - धन्यवाद ... तुमचा नेहमीचा प्रतिसाद माझा नेहमीच हुरुप वाढवतो.
@ अनघा - धन्यवाद
@ सस्मित - धन्यवाद
@ वावे - धन्यवाद

खूप धन्यवाद तुम्हां सर्वांना ... कथा आवडल्याबद्दल..!

खूप सुंदर लिहिलंय व्यक्तीचित्र. डोळ्यापुढे अगदी उभी राहिली हसीना.

जमलयं खरं.
छान लिहीताय, लिहीत रहा. पुलेशु.

Pages