पिक्चर!!

Submitted by वेलांटी on 7 November, 2020 - 07:20

मला लहाणपणी पिक्चर पहायला खूप आवडायचं! टिव्ही समोरून मी हलत नसे. खेडेगावातलं बालपण माझं! मी आजूबाजूला पहायची ती दुनिया अन् टिव्हीतली दुनिया यांत जमिनअस्मानाचा फरक. माझा इवला जीव त्यांत फार रमायचा. घरीदारी या वेडाची फार चेष्टा केली जाई. मला वाटे, आपल्या आयुष्यातपण काहितरी पिक्चरसारखं व्हावं! उन्हात पाऊस पडावा, आपल्याकडे बोलणारा पोपट असावा, पळत असताना आपले केस हिरोईनसारखे उडावे, विस्कटू नयेत, शाळेत वर्गात बसले असताना, वारा आला तरी नेमकी एकच बट गालावर यावी, सगळे केस पिंजारू नयेत, नंतर मोठी झाल्यावर ओढणी वार्याने उडून गेली तर वाटे, आता एखाद्या मुलाच्या तोंडावर जाऊन अडकते की काय? पण ती नेमकी एखाद्या दगडावर किंवा काटेरी झुडूपात तर कधी चक्क मातीत लोळत पडे! सगळ्या मैत्रिणी हसायच्या माझे मनातले विचार ऐकून! म्हणायच्या 'भोळसट आहेस अगदीच! असे कुठे पिक्चरसारखे होत असते होय?'

यथावकाश माझे लग्न झाले.नवरा अगदी हिरोसारखा दिसायला. मैत्रिणी चिडवायच्या, 'झाले तुझ्या मनासारखे. तू सारखी पिक्चर बघते ना म्हणून पिक्चरमधल्यासारखा नवरा मिळाला तुला.'

आता हळूहळू आयुष्याचा पिक्चर पुढे सरकू लागला. मुले झाली. शाळेत जाऊ लागली. दुसरीकडे नवरा यशाची शिखरे चढू लागला अन माणसे पायदळी तुडवू लागला! अन् मी जुन्या काळातील हिरोईनप्रमाणे सोशिक बाई बनू लागले.

आता मी वरवर अगदी हसून, सर्वांशी अगदी मिठ्ठास बोलत असे. छान झकपक कपडे, नट्टापट्टा करून सुखाचा संसार लोकांसमोर मिरवत असे. कार्यक्रम, समारंभात दागिने, साड्या दाखवून नवर्याची प्रतिष्ठा काटेकोरपणे सांभाळत असे. 'मेन्टेन करतेय' म्हणून शरिराची हेळसांड सहज लपत असे. घरी धाकट्या मुलाच्या खेळण्याच्या बाॅक्समधे, दर आठवड्याला एका आयोडेक्सच्या रिकाम्या बाटलीची भर पडायची. फुल बाहीच्या ड्रेसशिवाय मला जमेना. शेवटी मी एका प्रतिष्ठीत माणसाची बायको होते ना!

कधी माहेरी आले, तर मैत्रिणी हेवा करायच्या. म्हणायच्या, 'अगदी पिक्चरमधल्यासारखा, राजाराणीचा सुखाचा संसार मिळालाय तुला!' मग मी पण हिरोईनसारखं गोड हसायचे अन विषय टाळायचे. पण घरी माहेरच्या लोकांसमोर मात्र ' सांगताही येईना अन गप्पही बसवेना' असे व्हायचे. पण तीही लोकं कसली वस्ताद! मी सहज सांगतेय असे दाखवून, काही किरकोळ तक्रार करताच ' तुला सुख बोचतंय! दुसरं काही नाही. एवढा चांगला संसार मिळालाय, त्याची माती करू नको. गुणाने रहा! ', असे म्हणून माझे तोंडच बंद करायची.

पिक्चर त्याच्या वेगाने पुढे सरकत होता. पण सगळे सुरळीत चालले, तर तो कसला पिक्चर? एक मोठा ट्विस्ट आला! एक दिवस दुपारी मुले शाळेत गेली होती. काही खरेदीच्या निमित्ताने आम्ही दोघेच गाडीने जरा लांबच्या ठिकाणी निघालो होतो. मुले शाळेतून यायच्या आत घरी परतायची घाई होती. नवरा नेहमीप्रमाणे सुसाट वेगाने गाडी पळवत होता. अन अचानक एका वळणावर, जरा निर्जन रस्त्यावर त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी रस्ता सोडून खाली उतारावर वेगाने जाऊन दूरवर एका मोठ्या खडकाला धडकली!

आज बरोबर एक महिना झाला! सर्व नातेवाईक आपापल्या घरी कधीचेच गेले होते! वरचेवर फोनवर मात्र माझी खुशाली विचारत असायचे. तसे मला काही कमी नव्हते आणि माझा कुणावरही भार होणार नव्हता! मी माझा स्वतंत्र नविन व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले होते! तसे मी माहेरी बोलून दाखवले आणि तयारीला लागले.

आज माझ्या नविन व्यवसायाचा शुभारंभ झाला! कितीतरी दिवसांनी आनंदाचा प्रसंग आला होता! मैत्रिणी म्हणाल्यासुद्धा, 'पिक्चरमधे येतो तसा ट्विस्ट आला होता तुझ्या आयुष्यात असे समज. पण शेवट नेहमी गोडच होतो. आता हा आयुष्यातला पार्ट टू देखील छानच असेल. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.'

मी घरी आले. मुलांची शाळेतून यायची वेळ झाली होती. सर्वात आधी खेळण्याचा बाॅक्स उघडला. होत्या-नव्हत्या तेव्हढ्या सर्व आयोडेक्सच्या बाटल्या काढल्या. कपाटातून बरनाॅल, वेगवेगळ्या वेदनाशामक क्रिम्स बाहेर काढून गोळा केल्या आणि शांतपणे डस्टबिनमधे फेकल्या! आता त्यांची गरज पडणार नव्हती! कपड्यांच्या कपाटातील सर्वात तळाशी गेलेला एक सुंदर हाफस्लिव्हजचा टाॅप काढून घातला.आरशात बघितले. आता अगदी पूर्वीसारखेच सुंदर दिसत होते हात. कसलेही वळ नव्हते. मी स्वतःशीच हसले! खूप दिवसांनी! आणि मग हसतच राहिले!! या मैत्रिणीही किती भोळसट आहेत? असे कुठे पिक्चरमधल्यासारखे होते होय? वेड्या कुठल्या!

त्यादिवशी गाडी जोरात खडकाला धडकली अन मी दारातून बाहेर फेकले गेले! मुकामार लागला. स्वतःला सावरून कशीतरी धडपडत उठून आधी नवर्याला शोधू लागले. गाडीने पलट्या खाल्ल्या होत्या अन नवरा दूरवर झाडीत पडला होता. त्याला बहुतेक चालता येत नसावे. खाली बसूनच खुरडत तो वरती यायचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या मदतीला धावणार तोच, माझ्याकडे पाहून तो जोरात खेकसला, "ये..!! कुठं बघतेस ×××. नवरा ईकडे अडकलाय... अक्कल आहे का? आधी ईकडे ये..!!" तिडिक उठली! जवळच एक मोठा पण मला उचलता येण्याजोगा दगड होता. माझी नजर त्यावर पडली!!

आता लोकांना हे कसे कळत नाही की, असा काही आपोआप ट्विस्ट येत नसतो आयुष्यात पिक्चरसारखा! आपल्याला आयुष्य पिक्चरसारखं हवं असेल.., तर त्याची स्टोरी आपणच नको का लिहायला !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
आधी मला वाटलं, दोघेही अपघातात जातात कि काय आणि नायिकेचा आत्मा बोलतोय..
मस्तच ट्वीस्ट..आवडली.

Mast

जबरी. Lol

खुप दिवसांनी मायबोलीवर काहीतरी छान वाचता आले ह्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
ट्विस्ट आवडला !

धन्यवाद स्वरा, जाई.
@अनंतनी, अहो माझे कसले आभार मानताय? मला सुचली तशी कथा लिहिली. उलट एवढ्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

Pages