गाभार्‍यातिल ज्योत तेवते

Submitted by निशिकांत on 5 November, 2020 - 12:19

वादळातही गाभार्‍यातिल ज्योत तेवते
घडायचे ते ईश कृपेने सदैव घडते

जखम मनीची उगाच भरली असे भासते
आठवणीने पुन्हा पुन्हा भळभळू लागते

जुन्या वहीचे पान अचानक उगा चाळता
मनात असुनी मिठीत नसणे तिचे काचते

कधी बेरजा, कधी वजावट हिशोब चुकले
व्यवहाराच्या दलदलीत का हे जग फसते?

दगडाखाली हात अडकला जर नसता तर
खुर्चीवरच्याला का कोणी पुसले असते?

अर्ज पोटगीसाठी केला न्यायमंदिरी
निकाल आला; पण दोघेही हयात नव्हते

शुभंकरोती नको पर्वचा, नकोत गोष्टी
मूल आजचे सायंकाळी टिव्ही बघते

आठवणीविन जगायचा ती सराव करण्या
आरशात पारा नसलेल्या बिंब पाहते

थोर विभूती इतिहासातिल, पास व्हावया
जरी वाचल्या, तत्व तयांचे कोण पाळते?

जाऊ आता क्षितिजावरती, सांग सखे तू
आकाशाला धरा नेमकी कुठे भेटते?

ठेव जरा "निशिकांत" जटा, दाढी, बन बाबा
नुसत्या विद्वानास कुणी का गुरू मानते?

निशिकांत देशपांडे. पुणे.
मो क्र ९८९०७ ९९०२३
वृत्त--मात्रा वृत्तांतर्गत अनलज्वाला-मात्रा २४

Group content visibility: 
Public - accessible to all site users