चिडता का हो?

Submitted by निशिकांत on 31 October, 2020 - 00:57

चिडता का हो ?
(मी बर्‍याच दिवसापूर्वी गझलकार इलाही जमादार यांच्याकडे गेलो होतो गझलेबाबात चर्चा करण्यासाठी. माझ्या कांही गझला ऐकून त्यांनी कांही टिप्स दिल्या. नंतर त्यांची एक तरी गझल ऐकवावी म्हणून मी त्यांना गळ घातली. त्यांनी चुकले का हो? ही रदीफ असलेली गझल ऐकवली आणि मी त्या गझलेच्या प्रमातच पडलो. निघताना मी त्यांना विचारले की सर याच जमिनीवर आणि हीच रदीफ वाचून मी गझल लिहू का?.ते म्हणाले की जमीनीवर आणि रदीफवर कोणाचाही आधिकार नसतो. जरूर लिहा. पण नंतर मला हे प्रशस्त वाटेन. जमीन तीच पण रदीफ बदलून एक गझल लिहिली. या गझलेला त्यांनी खूप आशिर्वाद दिला. ती हीच गझल. )

वेडे मी जगतास म्हणालो चिडता का हो?
कुचकामी इतिहास म्हणालो चिडता का हो?

श्रीमंतीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाला
गरिबीचा उपहास म्हणालो चिडता का हो ?

खटपट केली मंत्री झाले ते दरबारी
श्रेष्ठी घरचे दास म्हणालो चिडता का हो?

उंची कपडे ओळख झाली या नेत्यांची
खादीचा हा -हास म्हणालो चिडता का हो?

लम्बे चौडे भाषण त्यांचे ऐकू कैसे?
मिनिटाला मी तास म्हणालो चिडता का हो?

काळे धंदे काळी करनी रुतबा त्याना
काळा मी सुर्यास म्हणालो चिडता का हो?

लफडी उघडी करण्या लिहिती त्या शूरांना
वंदन करुनी व्यास म्हणालो चिडता का हो?

निर्मोही बाबांच्या पदरी पैसा अडका
ढोंग्यांना बकवास म्हणालो चिडता का हो?

गोंगाटाने नवगीताच्या डोके उठले
सप्तसुरांना श्वास म्हणालो चिडता का हो?

भडकाऊ प्रक्षेपण बघता टी व्ही वरती
"सह्याद्री"ला पास म्हणालो चिडता का हो?

हसणे "निशिकांतास" मिळाले जगता जगता
ग्रिष्माला मधुमास म्हणालो चिडता का हो?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users