ती

Submitted by sneha1 on 30 October, 2020 - 13:04

"ती"

१)
सकाळचा गजर वाजला, तशी ती झोपेतून जागी झाली. खरे तर उठायची इच्छाच नव्हती, पण इलाजही नव्हता. पांघरूण फेकून ती उठली आणि घाईघाईत सगळं आवरायला लागली. सकाळचा सगळ्यांचा चहा, नाश्ता, डबे केले पटापटा. घरातले सगळे निघाले तशी स्वतःचे आवरून ती पण घराबाहेर पडली, पापड, लोणची ,शेवया वगैरे घेऊन.
ऊन तापले होते चांगलेच. घरोघरी फिरताना डोक्यात विचारचक्र चालू होतेच नेहमीसारखे. घरभाडं थकलं आहे अजून, किराणा संपला आहे. यावर्षी जमलं तर गावी जाऊन यायचे होते. नेहमीचेच होते हे, खर्चाचा ताळमेळ लावताना जीव मेटाकुटीला यायचा नेहमी.
आज थोडीफार विक्री झाली दारोदार फिरून. खूप जास्त नाही, पण खूप कमी पण नाही. घराकडे जाताना तिच्या मनात आले, संपला दिवस आजचा. जितके नशिबात होते तितके मिळाले.

२)
सकाळी फोनमधे अलार्म वाजला, तशी ती जागी झाली. काल पार्टीमुळे जागरण झाले होते, पण उठणे भाग होतेच. पटापटा आवरून तिने मस्त कॉफी तयार केली, आणि ती लॅपटॉप समोर येऊन बसली. एकीकडे फोनमधले इ ट्रेड चे अ‍ॅप उघडून लॉग इन केले. एकदा पोर्ट्फोलिओ कडे नजर टाकली. कोणते स्टॉक्स खाली गेले आहेत, कोणते वर त्याची मनाशी नोंद घेतली. भराभर लॅपटॉप वर ब्राउजिन्ग सुरू केले. प्रीमार्केट मधे कोणते टिकर्स टॉप गेनर्स आहेत, कोणते टॉप लूजर्स आहेत ते बघायला सुरूवात केली. न्यूजचा अंदाज घेतला. स्टॉक मार्केट सुरू होण्याच्या आधी एक दोन ट्रेड केले पण. नंतर उठून पटकन सॅन्ड्विचेस करून ठेवले घरच्यांसाठी. हळूहळू बाकीचे मेंबर्स तयार होऊन निघाले, तसे तिने स्वतःचे आवरले. साडेनऊ च्या आधी पटकन थोडा नाश्ता केला आणि पुन्हा ट्रेडिन्ग सुरू केले. करता करता मनात विचार चालू होतेच, नवीन घराचे बुकिंग करायचे होते अजून. अजून युरोप ट्रिप चे प्लॅनिन्ग ही करायचे होते.
दिवसभरात काही ट्रेड्स सक्सेसफुल झाले, तर काहीमधे लॉस झाला. चार वाजता स्टॉक मार्केट बंद झाले, तशी ती आळस देत लॅपटॉप समोरून उठली. तिच्या मनात आले, संपला दिवस आजचा. जितके नशिबात होते तितके मिळाले.

(छोटीशी तुलनात्मक कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आज.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली Happy