आयुष्याचे नाव

Submitted by santosh watpade on 29 October, 2020 - 04:34

जितके मिळते तितके घ्यावे व्यर्थ लालसा करू नये
आयुष्याचे नाव शेवटी केवळ तगमग ठरू नये...

रोज नवे चमचमते मृगजळ डोळ्यांना दिसणार पुढे
पळताना या वाटेवरती पायाला रुतणार खडे
असल्या चकव्यांना जन्माने उगाच शोधत फिरू नये
आयुष्याचे नाव शेवटी केवळ तगमग ठरू नये...

निकोप निर्मळ स्वच्छंदी क्षण जगतो आपण बालपणी
त्यानंतर आयुष्य ठेवते समोर त्यांच्या आठवणी
कर्तव्याच्या ओझ्याखाली कोणीही गुदमरू नये
आयुष्याचे नाव शेवटी केवळ तगमग ठरू नये...

नातीगोती पैसाअडका यांची बाळगणार भिती
दोन मुठींच्या आत सुखाचे भ्रम आपण भरणार किती
मुठी राहतिल सताड उघड्या सत्य कुणी विस्मरू नये
आयुष्याचे नाव शेवटी केवळ तगमग ठरू नये...

आत्म्याचा आनंद शोधण्या पाय पुढे टाकाल जरी
देह आपला लोभी असतो , तो मागे ओढेल तरी
वेळप्रसंगी युद्ध करावे पण आत्म्याने हरू नये
आयुष्याचे नाव शेवटी केवळ तगमग ठरू नये...

-- संतोष

Group content visibility: 
Use group defaults

वाह!

Sundar!!!

मला ही रचना फटक्यासारखी वाटली. फटक्याची चाल आणि उद्देश दोन्ही कवितेला चपखल बसत आहेत! बिकट वाट.. ची आठवण झाली!!