" तुम्हारे लिये "

Submitted by santosh watpade on 26 October, 2020 - 23:29

मनावर गारुड केलेली अनेक हिंदी गाणी आहेत जी अत्यंत आनंदाच्या अथवा एकांतात आठवतात आणि आपल्याला हवा तो दिलासा देतात. सध्याच्या काळात कितीही सुपरहिट संगीतमय अथवा अगदी अर्थाच्या दृष्टीनेही उत्तम गाणी कानावर पडत असली/भावत असली तरी जुन्या गाण्यांच्या ठेक्यात मान हलवताना आपली जी समाधी लागते ती फ़ार आनंददायी असते.

कितीही निरस व्यक्ती असली तरी किशोरदा वा रफ़ींच्या गाण्यांनी मनोमन सुखावतेच. गाण्याचा मुड दुःखी असो किंवा शांत असो वा प्रणयाधीन असो आपल्या विविध अवस्थांतरावर ही गाणी मनावर अधिराज्य गाजवतात. कधी कधी अत्यंत आनंदी असताना रफी- नौशाद ची विरही दुःखी गाणी ऐकावीशी वाटतात कारण या गाण्यांमधे भरलेले चैतन्य सर्वकालीन आहे. कधी गझलेच्या जादूई विश्वात स्वतःला हरवून घ्यावेसे वाटते. सध्या तीशी चाळीशी आणि त्यापुढे असलेल्या सर्व व्यक्तींनी या गाण्यांचा गोडवा चाखलाय त्यामुळे आजही प्रवासात किंवा एकांतवासात ही गाणी आवर्जून ऐकली जातात.

https://youtu.be/LGPttUlg2Do

असेच एक गाणे आहे "तुम्हारे लिये" या चित्रपटातले , जे जयदेव यांनी संगीतबद्ध केलेय. संजीव कुमार आणि विद्या सिन्हा या गोड युगुलावर चित्रित केलेलं " तुम्हे देखती हू " हे गाणं गानकोकिळा लतादिदींच्या आवाजातून मनाच्या कातळावर एक अत्यंत विलक्षण सुंद्र कोरीव मुर्त कोरू लागते. भुजंगप्रयाताच्या लयीत लिहिली गेलेली नक्ष ल्यालपुरी यांची ही रचना कणाकणात अशी पाझरत जाते की गाणे ऐकताना भवतालाचा विसर पडून जातो.या गाण्यात चित्रपटाच्या मागणीनुसार जरी शब्द असले तरी ते सारे शब्द वैश्विक होऊन बसलेत. चित्रफितीत दाखवलेला शांत निर्विकार संजीव जसा आतून ढवळला जातोय तसेच ऐकताना आपलेही अंतःकरण ढवळले जाते. माझ्या मते याहून निरामय मोहक गाणे शांततेच्या पटलावर कधीच झंकारले गेले नसावे.

तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे
के जैसे युगों से तुम्हे जानती हूँ
अगर तुम हो सागर, मैं प्यासी नदी हूँ
अगर तुम हो सावन, मैं जलती कली हूँ

गाण्याची सुरुवातच इतकी छान होतेय की आपोआप पापण्या मिटल्या जातात आणि मिटलेल्या पापणीच्या पडद्यावर एक चलचित्र सुरु होतेय. या ओळींमधून विचारांचे/ संवेदनांचे मोहक इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर उभे रहाते. अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांचा वापर केला असल्याने प्रत्येक सुक्ष्मभाव मनापर्यंत अलगद पोहोचतोय.

मुझे मेरी नींदें, मेरा चैन दे दो
मुझे मेरी सपनों की इक रैन, दे दो न
यही बात पहले भी तुमसे कही थी
वही बात फिर आज, दोहरा रही हूँ

प्रेमातली निस्पृहता या ओळींमधे भरलीय. अपेक्षा करावी तरी कसली ! एक रात्र हवीय प्रियकराच्या स्वप्नांनी भरलेली...वास्तवातच हे सुख मिळावे अशीही अपेक्षा या प्रेमाला नाहीय. ही कैक जन्मांची तहान जी तुझ्या केवळ स्विकृत अस्तित्वाने शमली जाणार आहे. यातली व्याकूळता आपण मनापासून फील केली तरच तिची खोली कळते म्हणून नुसते शब्द न ऐकता, त्या पात्रात प्रवेश करुन आपण या जाणिवा ओंजळीत गोळा करायला हव्यात...

तुम्हें छूके पल में, बने धूल चन्दन
तुम्हारी महक से, महकने लगे तन
मेरे पास आओ, गले से लगाओ
पिया और तुमसे मैं क्या चाहती हूँ..

मघाशीच म्हटलंय की प्रेम ही ईश्वराने/निसर्गाने बनवलेली सर्वात सुंदर अनुभूती आहे त्यामुळे ज्याच्यावर/जिच्यावर प्रेम जडते ती व्यक्ती साधारण राहत नाही. आपल्या आवडत्या माणसात जगातल्या सर्वात मौल्यवान गोष्टी/नाती/व्यक्ती निरंतर बघणे हीच तीव्रता प्रेमाला दिर्घायुषी बनवत राहते. तुझ्या एका स्पर्शानेही धुळीचे चंदन बनेल आणि तुझ्या नुसत्या सुगंधानेसुद्धा माझी संपुर्ण काया दरवळू लागेल मात्र त्यासाठी तुझे केवळ एक अलिंगन हवेय.. आसक्तीच्या पल्याड असलेली ही तृष्णा गाणे ऐकताना आपल्याला अत्यंत निर्मळ सुखाच्या दारात नेऊन उभी करते.

मुरलिया समझकर, मुझे तुम उठा लो
बस इक बार होंठों से अपने, लगा लो न
कोई सुर तो जागे, मेरी धड़कनों में
के मैं अपनी सर्गम से रूठी हुई हूँ

गाण्याचा शेवट इतका प्रणयाराधना करणारा असूनही आपण इथवर वेचून आणलेली ईश्वरीय सापेक्षता, उपमांच्या धुक्यात दडलेली कोवळी नाजूक सोनचाफ्याची फुले आपल्या पदरात टाकते. मला निर्जीव मुरली समजून का होईना तुझ्या ओठांवर धर ,माझ्या स्पंदनांतून एखादा सूर झंकारु शकेल... तुझे अस्तित्व माझ्या आत कुठल्या न कुठल्या रुपात कणाकणातून धावत राहील. असल्या प्रेमळ आर्जवांनी ओतप्रोत भरलेले हे गाणे ऐकताना सदेह /विदेह सार्‍याच संवेदना जागृत होतात याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही .अर्थात गाण्यांची आवड निवड ही व्यक्तिनुसार बदलू शकते. जे आपल्याला आवडेल ते इतर सर्वांना आवडेलच असेही नाही. या गाण्याच्या अथांग डोहात उतरण्यापुर्वी पुर्वग्रहांची/ व्यापांची/ अस्वस्थतेची सारी वस्त्रे काठावर उतरवून ठेवायला हवीत. प्रत्येक गाण्याचा मुड/आशय जरी वेगळे असले तरी गाण्याला शरण जाण्याची जी अवस्था आहे तीच खरी सुखाची अनुभूती असावी असे मला वाटते. परकायाप्रवेशातून प्रणयाराधन चाखणे जितके कुणाला आवडू शकते तितकेच त्रयस्थ भुमिकेतून शांततेने स्वतःभोवती विणलेल्या समाधीच्या घुमटाकडे बघणे आवडू शकते. इथे तल्लीनता मिळवणे हा मूळ हेतू आहे.

आपण कुणा व्यक्तीच्या प्रेमात आहोत तर आपल्याला हे गाणे स्वतःशी रिलेट होताना जाणवणे साहजिक आहे मात्र जरी आपण प्रेमात नाही आहोत तरी या विशुद्ध प्रेमाच्या कल्पनेने रोमांचाच्या सरी अंगावर बरसून गेल्याच्या खुणा दिसत राहतील. शब्दरचनेत ज्या उपमा वापरल्यात त्या इतक्या मनस्वी आहेत की फुलांच्या परिमळासारख्या त्या श्वासांतून आत दरवळत जातात. प्रेम ही भावना ब्रम्हांडातली सर्वात सुंदर आणि निर्मळ भावना आहे आणि म्हणूनच हृदयाच्या विशाल समुद्रात पडलेले तिचे प्रतिबिंबसुद्धा तितकेच मोहक असणारे. तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसे भयंकर उन्हाळ्यात अंगावरुन वाहत गेलेल्या गार हवेच्या झुळूकेवरसुद्धा प्रेम करुन बसतो मग असल्या उत्कट अनुभूतीतून ओंजळीत पडलेल्या सोनचाफ़्यासारख्या मुग्ध जाणिवेच्या प्रेमात नक्कीच पडू.

गच्च आभाळ भरुन आलेले असताना अथवा रिमझिम पाऊस पडत असताना ,भिंतीला डोकं टेकवून , हेडफोन लावून गाण्याच्या भारावलेल्या लयीत एकदा तुम्हीही प्रवेश करुन पहा....

- संतोष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults