व्रण

Submitted by इकेबाना on 23 October, 2020 - 08:48

व्रण

त्याने तिच्या खांदयावर सहेतुक हात ठेवला. तिने त्याच्याकडे वळून बघितले, तिच्या डोळ्यात एक नकार होता.
पण त्याने न जुमानता हट्टानेच तिला जवळ ओढले.

"माझे तुझ्यावर २० वर्षांपूर्वी जेव्हढे प्रेम होते त्यापेक्षा जास्त आत्ता आहे आणि उद्याही राहील" असे म्हणून त्याने तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तिचा पदर खाली ओढला त्याक्षणी तिच्या डोळ्यातून दोन थेम्ब खाली ओघळले. …

स्नेहल वयाच्या २३व्या MCom झाली आणि लगेचच तिला बँकेत नोकरी लागली.आणि घरात तिच्या लग्नाचे बघायला लागले. सुहास C A होता, सुहासचे आई वडील राहायला पुण्याला पण सुहासची नोकरी मुंबईला तेव्हा त्याने तिथेच घर घेतले होते. त्याला नाजूक स्नेहल बघताक्षणी पसंत केली. पुढल्या सहा महिन्यात साखरपुडा आणि लगेचच लग्न झाले आणि माप ओलांडून स्नेहल सुहासच्या घरी आली. दोघांचा राजाराणीचा संसार सुरु झाला,पहिली १-२ वर्षे छानच गेली. दोन वर्षांनी दोन्ही घरातून स्नेहल आणि सुहासकडे गोड बातमीसाठी तगादा सुरु झाला, तसे दोघांनाही मूळ हवेच होते, पण काही केल्या स्नेहलला दिवस गेले नाहीत. मग दोघांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचे ठरवले.

स्नेहल आणि सुहासने दचकून एकमेकांकडे बघितले, स्नेहलच्या डोळ्यात पाणी होते आणि धक्क्याने तिचे ओठ थरथरत होते. सुहासने तिचा हात आपल्या हातात घेतला होता. "मी. आणि मिसेस गोडबोले तुम्ही असा धीर सोडू नका, असे गडबडून जाऊ नका, वैद्यकीय शास्त्र आता ह्या विषयावर खूप प्रगती करत आहे. पुढील काही काळात आपल्याला नक्की उपाय मिळेल आपण सगळे उपाय करूया. तुम्ही पॉझिटिव्ह रहा". प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती कुलकर्णीच्या समोर स्नेहलचे वैद्यकीय अहवाल रिपोर्ट होते आणि ते फारसे चांगले नव्हते. डॉक्टरांनी त्या दोघांना पूर्ण विश्वासात घेतले आणि स्नेहलच्या गर्भाशयाच्या रिपोर्ट बद्दल सांगितले. तिला आई होणे कठीण होते आणि जरी ती गरोदर राहिली तर प्रसूतीत तिच्या जीवाला धोका असू शकला असता.
स्नेहल भरल्या डोळ्यांनी आईच्या कुशीत शिरली "आई मी काय करू ग. मला सुहासच्या बाळाची आई व्हायचय, मला आई व्हायचय. डॉक्टर काय उगाचच घाबरवतात, मला काहीही होणार नाही. " स्नेहलला आई व्हायचे होते, त्यासाठी ती कुठलाही धोका पत्करायला तयार होती, पण सुहास आणि तिचे बाबा तिला हा धोका पत्करून द्यायला तयार नव्हते म्हणून ती आईला त्यांच्याशी बोलायला ती तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. "स्नेहल शांत हो बाळा, अग मी तुझी तगमग समजू शकते. कुठच्याही स्त्रीला मातृत्व हवे असते. आणि तुझ्या सुहासवरच्या प्रेमासाठी तुला त्याच्या बाळाची आई व्हायचं आहे पण त्याच्या मनाचा पण विचार कर. त्याचेही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते तुझ्या आई होण्याच्या अटीवर अवलंबून नाहीये. नवरा आणि बायकोची एकमेकाला साथ हेच सुखी जीवांचे रहस्य असते, डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे अजून काही दिवसात वैद्यकीय शास्त्र काही तरी इलाज काढेलच ह्याची मला खात्री आहे." आई बाबा आणि सुहास सगळ्यांनी स्नेहलची समजूत काढली आणि तिला गरोदर राहण्यापासून प्रवृत्त केलं. सुहासच्या आई वडिलांनी पण तिला धीर दिला.
स्नेहल तात्पुरती सावरली पण मनातून आई होण्यासाठी , बाळासाठी झुरत होती. स्नेहल वाट बघत राहिली, डॉक्टरांकडे जात राहिली पण काही यश आले नाही. ह्या सगळ्यामुळे ती अबोल झाली, नोकरी होती तेव्हा दिवस पार पडायचा पण घरी आल्यावर रिकामे घर खायला उठायचे. सुहासने तिला खूप प्रेम दिले, पण आपण त्याला मूल देऊ शकलो नाही ह्याचा अपराधीपणाची भावना स्नेहलच्या मनात येत राहिली. पुढे काही वर्षात आई बाबा आणि सुहासने मूल दत्तक घेण्याबाबतीत विचार करायचे ठरवले पण स्नेहलची त्याला तयारी नव्हती. तिच्या मनापासून स्वतःचे आणि सुहासचेच मूल हवे होते. तिचे म्हणणे असे पडले की, दुसऱ्या कुणाच्या मुलाला मी आपले म्हणून ते प्रेम देऊ शकणार नाही. सुहासने तिला बऱ्याच डॉक्टरांकडे नेले, अगदी मनोचिकित्सक सुद्धा, पण स्नेहल आपल्या निर्णयावर ठाम राहिली, सुहासने तिच्यावरच्या प्रेमाखातर तेही मानले. ह्या सगळ्याचा स्नेहलवर खूप परिणाम झाला होता. ती निराश राहायला लागली होती, तिला मध्ये मध्ये थोडे डिप्रेशन यायचे, अपराधीपणाची भावना उफाळून यायची , त्यासाठीही काही काळ तिने औषधेही घेतली होती शेवटी महत्प्रयासाने तिने नशिबाचा निर्णय मान्य केला होता.

----//---

त्यादिवशी स्नेहल बँकेत खूप कामात होती तेव्हढ्यात फोन खणखणला. "हॅलो स्नेहल, सुहास बोलतोय ... काय करत्येस , खूप कंटाळा आला आहे . हाल्फ डे टाकतेस? चल कुठे तरी बाहेर जाऊ या, नाटकाला जायचे? संध्याकाळी संध्याकाळी बाहेरच जेवू या ? ".खरे म्हणजे स्नेहलकरता हे सूर्य पश्चिमेकडे उगवण्यासारखे होते. गेल्या काही वर्षात सुहास एव्हढा व्यस्त झालं होता की रोज घरी यायला उशीर व्हायचा, कुठे बाहेर जाणे तर सोडूनच द्या. पण तरी स्नेहल आनंदली, ठरल्याप्रमाणे सुहासने ड्रायव्हरला सुट्टी दिली आणि तो स्वतः गाडी चालवत तिला घ्यायला आला. दोघांनी छान नाटक बघितले, जवळ जवळ दहा वर्षांनी मरीन ड्राईव्ह वर संध्याकाळी हातात हात घालून फिरले आणि संध्याकाळी त्यांच्या आवडीच्या मारिन ड्राईव्ह वर "द बे व्यूह " हॉटेलात जेवायला गेले. रात्री घरी पोचल्यावर, सुहास कपडे बदलून फ्रेश होऊन आला तेव्हा स्नेहल आरश्यासमोर बसून केसावरुन ब्रश फिरवत होती. सुहास तिच्या पाठी जाऊन उभा राहिला आणि त्याने तिच्या गळ्यात हात टाकले. "सुहास, जेव्हढा मी तुला ओळखते तेव्हढे जगात दुसरे कोणी नाही .... बरोबर " सुहास ने मान हलवून उत्तर दिले " मग बोल काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का ? आज एकदम तुझे बदलेले वागणे मला अस्वस्थ करतंय?" सुहासला हे प्रश्न अनपेक्षित होते त्याने असेच वेळ मारून नेण्याकरिता उडवाउडवीची उत्तरे दिली. पण तो फार वेळ लपवू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता दोघांना हॉस्पिटल मध्ये जायचे आहे हे जेव्हा त्याने सांगितले त्यानंतर अख्खी रात्र दोघांनी एकमेकांच्या मिठीत काढली. त्यावर स्नेहालची प्रतिक्रिया शांत होती पण त्या शांततेच्या पाठी किती वादळे लपली असतील याची कल्पना सुहासला होती.

"हॅलो, सी एफ ओ ऑफिस " सेक्रेटरीने फोन उचलला ."कॅन आय स्पिक तो मिस्टर सुहास गोडबोले प्लिज, चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर राव ना त्यांच्याशी लगेच बोलायचे आहे" सेक्रेटरीने फोन आतमध्ये दिला. डॉक्टर राव नी सुहासला लगेचच त्यांच्या केबिनमध्ये लगेच येण्यास सांगितले तेव्हाच सुहासच्या मनात पाल चुकचुकली होती. सुहास आता खूप मोठा ऑफिसर होता, कंपनीच्या ताण तणावात त्याचेही प्रकुर्तीकडे दुर्लक्ष झाले होते. मधेच छातीत कळ आल्यासारखे वाटायचे पण पित्ताने असेल म्हणून दुर्लक्ष केलं होते. मागच्याच आठवड्यात त्याची आणि स्नेहलची वार्षिक वैद्यकीय तपासणी झाली होती. ती करत असताना त्याला स्ट्रेस टेस्ट मध्ये थोडी धाप लागत असल्याचे निदर्शनास आले होते. डॉक्टर राव त्याचे चांगले मित्र होते म्हणूनच हक्काने रागावण्याकरता बोलावले असेल किंवा कदाचित बाय-पास अथवा अँजिओप्लास्टी करून घेण्यासाठी सांगायचे असेल. तसे असेल तर घरी स्नेहलला काय सांगायचे? डॉक्टर राव च्या ऑफिसकडे जाताना सगळे विचार त्याच्या मनात येत होते.

डॉक्टर राव, एव्हढे सिरियसली नका बघू माझ्याकडे, तुम्ही सांगाल ती औषधे घेईन, सांगाल ते व्यायाम करीन पत्थ्य करीन अगदी पाहिजे तर बायपास पण करूया पण स्नेहल ला फोन करून टेन्शन देऊ नका " सुहासने नेहेमीप्रमाणे हसत खेळत बोलायला सुरवात केली , पण डॉक्टर रावच्या चेहेऱ्यावरचे हसू नेहेमीसारखे नव्हते याची सुहासला जाणीव झाली.
"सुहास, तुम्हाला मी लगोलग बोलावले कारण तसेच महत्वाचे बोलायचे होते. मागच्या आठवड्यात तुमच्या दोघांची मेडिकल टेस्ट झाली आणि रिपोर्ट तितके चांगले नाहीत. तुझ्या ECG , स्ट्रेस टेस्ट आणि 2D रिपोर्ट वरून तुला अँजिओग्राफी लवकर करून घेण्याचा सल्ला मी देईन. त्याच्या रिपोर्ट वरून मग आपण पुढचे ठरवू. पण त्याच्यासाठी मी तुला लगेच बोलावले नाही, मिसेस गोडबोले चा रिपोर्ट ...."
पुढची दोन मिनिटे डॉक्टर राव जे बोलले त्याने सुहासच्या डोळ्यासमोर अंधारी आली, त्याने डॉक्टरांच्या टेबलावर डोकं ठेवलं आणि तो हमसाहमशी रडायला लागला. डॉक्टर राव नि त्याच्या खांद्यावर हाथ ठेवला, प्यायला पाणी दिले .
"का? का? आमच्याच बाबतीत हे का? स्नेहलच्या नशिबात अजून किती यातना आहेत ?" सुहास च्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते."मी तुमची अवस्था समजू शकतो सुहास पण आता तुम्हाला खंबीर झालं झालं पाहिजे. आपल्याला लगेचच हालचाल करायला हवी. मी आधीच व्हिनस हॉस्पिटलमध्ये बोलून ठेवलं आहे. आपण उद्याच्या उद्याच सगळ्या टेस्ट करूया, हॉस्पिटल आणि डॉक्टर ऑपरेशन साठी सगळं सहकार्य करतील. शक्य तितक्या लवकर आपल्याला डाव्या ब्रेस्ट चे मास्टेक्टॉमी ऑपरेशन करणे गरजेचे आहे, गाठ दुसऱ्या स्टेजमध्ये आहे कदाचित पूर्ण स्तन काढावा लागेल ,लगेच ऑपरेशन केले नाही तर खूप उशीर होईल. ऑपरेशन नंतर किमो थेरपी पण करायला लागेल पण सगळ्यात आधी ऑपरेशन. तुम्ही घाबरू नका , मी तुमच्या बरोबर आहे, लागेल ती मदत आपण घेऊ. तुम्ही घरी निघा , मिसेस गोडबोलेंशी बोला आणि उद्या सकाळी ९ वाजता हॉस्पिटलमध्ये या. बाकी सगळी व्यवस्था मी करून ठेवतो " सुहास थरथरत्या पायाने उठला, स्नेहलला काय सांगायचे, कसे सांगायचे त्याला कळत नव्हते पण सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. सुहास तसाच ऑफिसच्या बाहेर आला आणि गाडीत जाऊन डोळे मिटून बसला. ५-१० मिनिटाने त्याने स्नेहल ला बँकेत फोन लावला ....

---//---

स्नेहल तिच्या हॉस्पिटलच्या रूम मधून भकास चेहऱ्याने बाहेर बघत होती. तिच्या डोळ्यात जणू निराशा दाटून आली होती. डॉक्टर राव आणि सुहास रूममध्ये आले. " मिसेस गोडबोले आता काळजी करायचे काही कारण नाही. ऑपरेशन नीट पार पडले आहे, औषधे नीट चालू आहेत, थोड्या दिवसात आपण किमोपण सुरु करू. सगळे काही सुरळीत होईल. काही आठवड्यातच तुम्ही तुमच्या नॉर्मल आयुष्यात परत जाल. आता तुम्ही फक्त आराम करायचा आणि सकारात्मक विचार मनात आणायचे. " डॉक्टर राव निघून गेले , सुहास तिच्या बाजूला बसला होता . सुहासने तिचा हात हातात घेतला, स्नेहल त्याच्याकडे बघून हसली पण त्या हसण्यात काही वेगळाच अर्थ होता. त्याने तिच्या हाताचे चुंबन घेतले तसे तिने निग्रहाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी बांध सोडला. त्यादिवशी दोघांचे अश्रू एकमेकात मिसळून गेले.
काही दिवसातच स्नेहल घरी आली, घरात तिच्यासाठी कामाला बाई ठेवलेली होतीच , पण तिची आईही तिच्यासाठी आलेली होती. खरेतर सुहास आणि स्नेहलनी तो कठीण काळ एकमेकांना धीर देत काढला होता पण घरी आल्यापासून स्नेहल अजून निराश राहायला लागली होती. सुहास जेव्हा जेव्हा तिच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा तेव्हा ती त्याच्यापासून अजून दूर राहायची, त्याला दूर ढकलायची. सुहासला ते काळात होते पण त्याचे स्नेहलवर आत्यंतिक प्रेम होते आणि तिच्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती.
त्या दिवशी रात्री जेवल्यावर सुहास तिच्या जवळ आला पण नेहेमीप्रमाणे तिने त्याला दूर ढकलले . "प्लिज सुहास नको, माझ्या मनात प्रचंड यातना होतात. एकतर आधीच मी तुला मुलाचे सुख देऊ शकले नाही. मी आई होऊ शकले नाही ह्यापेक्षा तुला बाप होण्याचे सुख देऊ शकले नाही ह्याचे दुःख माझ्या मनाला खात होते. तुझ्या मनात माझी एक प्रेयसी म्हणून जी प्रतिमा होती तीही आता मी कायम ठेवू शकले नाही. तुझे माझ्यावर असलेले असीम प्रेम मला ठाऊक आहे त्यामुळेच आता मी तुला स्त्रीसुखही देऊ शकणार नाही ह्या कल्पनेने मी आतमधून कोलमडले आहे. मला माफ कर सुहास मला माफ कर, मला तुझ्या सुखाच्या आड यायचे नाही , मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे, तू परत लग्न कर, आणि सुखी हो."
सुहासने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले " स्नेहल तुझ्या मनाची स्थिती मी समजू शकतो. मूल ना होण्याच्या धक्क्यानंतर हा दुसरा धक्का कुठच्याही स्त्रीकरता पचवणे सोप्पे नाही. तू हॉस्पिटल मध्ये गेल्या पासून मी ह्या विषयावर खूप वाचन केले, काही डॉक्टरांना भेटलो. कुठच्याही स्त्रीकरता मास्टेक्टॉमी नंतर, स्वतःला आरश्यात स्तनहीन बघणे ही एक परीक्षा असते. तिच्या फक्त शरीराचा एक भाग काढला जात नाही तर जणू तिच्या स्त्रीत्वाचा एक हिस्साच ओरबाडले जातो. तिला असे वाटले की तिची एक ओळख काढून टाकली जाते. आणि नंतर सगळ्यांची तिच्याकडे बघायची नजर बदलते. ऑपरेशनचा व्रण जरी छातीवर असला तरी त्यापेक्षा जास्त मोठा व्रण तिच्या मनावर बिम्बतो. छातीवरची जखम भरते , व्रण हळूहळू कमी होता पण मनावरचा व्रण आणि बोच कधीच जात नाही. तू आणि मी वेगळे नाही , आपण दोघे बरोबरीने याला सामोरे जाऊ. माझे तुझ्यावर असलेले प्रेम तुझ्या शरीराच्या अवयवांवर अवलंबून नाही. आपण मनाने एकमेकांवर प्रेम केले आहे. ह्या माझ्या प्रेमाच्या लेपाने मी तुझ्या मनावर उमटलेला व्रण बरं करायचा मी प्रयत्न करीन. ये आजपासून आपण परत एक नवी सुरवात करूया "
त्याने तिच्या खांदयावर सहेतुक हात ठेवला. तिने त्याच्याकडे वळून बघितले, तिच्या डोळ्यात एक नकार होता. पण त्याने ना जुमानता हट्टानेच तिला जवळ ओढले. "माझे तुझ्यावर २० वर्षांपूर्वी जेव्हढे प्रेम होते त्यापेक्षा जास्त आत्ता आहे आणि उद्याही राहील" असे म्हणून त्याने तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तिचा पदर खाली ओढला त्याक्षणी तिच्या डोळ्यातून दोन थेम्ब खाली ओघळले. शरीरावरचा आणि मनावरचा व्रण भरायला सुरवात झाली होती.....

-महेश इंदुमती वसंत बिळगीकर

Group content visibility: 
Use group defaults