मन आहे माझे की आहे पानफुटी ही ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 22 October, 2020 - 09:24

उमगेना, गवसेना.. वाह्यात कारटी ही !!
रंग बदलती दुनिया बेमीसाल नटी ही

छाटू जाता इच्छा फुटती नवे धुमारे
मन आहे माझे की आहे पानफुटी ही ?

उभ्याउभ्या जिंदगीस म्हटले होशिल माझी ?
उठता बसता घालत सुटली किती अटी ही

वर्तमान नासवते, करते भविष्य अस्थिर
आठवणींची बसे भुतावळ मानगुटी ही

येताजाता मी नशिबाच्या टपल्या खाते
सहिष्णुतेची उगाच पाजवलीस गुटी ही

मनात त्याच्या प्रेम रहावे जिवंत माझे
कुठे मिळावी अमरत्वाची जडीबुटी ही ?

आपण त्याचे होतो जो नसतोच स्वतःचा
चूक आपली की काळाची म्हणू त्रुटी ही ?

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.