थरार : भाग ३

Submitted by सोहनी सोहनी on 19 October, 2020 - 05:29

थरार : भाग ३

पाण्यात काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज. मी किती दचकलो.
मी केदार आणि नीरजला विचारलं तुम्हाला काही आवाज आला का? पण ते दोघे त्यांच्यातच मग्न होते. त्यांनी मला ओढून खाली बसवलं.
"धप्प" पुन्हा तसाच आवाज झाला, ह्यावेळेस त्यांनाही ऐकू गेलं. ते दोघे कुतूहलाने एकमेकांकडे पाहत होते आणि मी आवाजाच्या दिशेने.
मला तर हा आवाज कुणीतरी पाण्यात उडी मारल्या सारखा वाटला.
मला इथे आल्यापासूनच विचित्र वाटत होतं, आणि आता भीती सुद्धा पण हे दोघे मला हसू नयेत म्हणून मी माझ्या भीतीवर तात्पुरता आवर घातला आणि मी नीरज कडे वळलो " इथे जवळपास कुठे पाणी आहे रे ???आणि कुणी राहत का ह्या रानात?? म्हणजे आदिवासी वैगेरे"

झरा होता जवळ पण कुणी राहत नव्हतंच, त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर थोडीशी भिती मला जाणवली, मी त्यांना म्हणणार होतोच की निघुया मला भीती वाटतेय आणि इथे काहीतरी वेगळचं जाणवत आहे,
तितक्यात
पुन्हा धप्प करून पाण्यात काहीतरी पुन्हा पडलं, आम्ही तिघे एकसोबत दचकतोय त्या आधीच एक किंचाळी ऐकू आली.
आम्ही खूप घाबरलो होतो.
मी त्यांना म्हणालो निघुयात आपण आताच्या आता इथे काहीतरी विचित्र घडत आहे, वेळ हातून निघायच्या आधी जाऊयात इथून आणि आम्ही तिघेही घाबरून पळत सुटलो. पन्नास पाउलांवर आमची गाडी होती, तिथे पोहोचलो कि सुटलो ह्या विचाराने आम्ही पळत होतो.

आम्ही?? मी आजूबाजू पाहिलं, मी एकटाच धावत होतो, कसं शक्य होतं ते?? दोन मिनिट आधी आम्ही सोबत पळालो तिथून आणि क्षणात ते दोघे गायब कसे झाले?? माझ्या लक्ष्यात कसं नाही आलं?? मी जागीच थांबलो.
मी एकटा कसा जाऊ शकतो त्यांना सोडून?? आणि ते हि मला एकटा सोडून जाणार नाहीत.

भीती इतकी वाटत होती कि त्या क्षणाला मी तिथे एकटा होता त्यामुळे एक पाऊल मागे कि पुढे करायची माझी हिम्मत होतं नव्हती, पण त्या दोघांना शोधणं भाग होतं मला, मी हिम्मत करून चौफेर नजर फिरवली, निव्वळ काळा कुट्ट अंधार आणि अंगावर धावणाऱ्या झाडांच्या सावल्या.
कित्येक तास ज्या सावल्यांखाली आवडीने बसायचो आज त्याच सावल्या मला खातील गिळून टाकतील असं जाणवत होतं.
मिट्ट अंधारात त्या अतिशय भयानक दिसत होत्या. मी डोळे मिटून घेतले, मनावर आवर घालायचा प्रयत्न करू लागलो, इतकं सहज नव्हतं ते. कारण मनाला हे कळून चुकलं होतं कि जे काही घडत आहे ते अमानवीव आहे, जीवाला धोका आहे माझ्या.
इथून पळ इतकंच माझी बुद्धी मला सांगत होती पण मला तिथून एकटं निघायचं नव्हतं, मला त्यांना सोबत घेऊन जायला हवं असं मला वाटून गेलं आणि मी कसला आवाज येतोय का ते पाहू लागलो, माझ्या फुलणाऱ्या श्वासांचाच आवाज इतका होता कि मला दुसरं काही ऐकू येत नव्हतं.
मी कसंतरी स्वतःला आवरलं, पळणाऱ्या पावलांचा अस्पष्ट असा आवाज येत होता, मी त्या दिशेने धावलो, "नीरज" "केदार" कुठे आहात तुम्ही?? काही उत्तर नाही, मात्र पावलांचे आवाज स्पष्ट आणि जवळूनच यायला लागले.
कदाचित ते दोघेही इथेच कुठे जवळ असतील ह्या आशेने मी पावलांच्या मागे जात राहिलो.
त्या आवाजाच्या नादात मी किती लांब आलोय आणि कुठे आलोय याचं मला भानचं नव्हतं. मी पावलांचा मागोवा घेत त्या झऱ्या जवळ येऊन पोहोचलो होतो आणि माझ्या समोरच एका बाईमाणसाने त्यात उडी घेतली.
तसाच आवाज जो मला आधी आला होता, "धप्प" करून ती खोल पाण्यात गेली माझ्यासमोर आणि मी जागीच थिजलो, पाहत राहिलो.

एका कर्णकर्कश किंचाळीने मी भानावर आलो, म्हणजे ती किंचाळी ह्या बाईची होती तर जी ऐकून आम्ही पळालो होतो. पाण्यातून छोटे छोटे बुडबुडे येऊ लागले, ती वर यायचा प्रयत्न करत होती म्हणजे ती बुडत होती, पाण्यावर हात पाय मारत होती, वाचावा, मला वाचावा. . . मी आवाजाच्या मागे धावत होतो तेव्हा तर खूप अंधार होता मग ती मला स्पष्ट दिसत कशी होती??मनात एखादा विचार येत होता पण लगेच परत जात होता.
तीच डोकं आता रक्ताने भरत होतं, पूर्ण चेहरा रक्ताने माखला होता, ती आशेने माझ्याकडे मदतीचा हात मागत होती, पण मी जागीच थिजलो होतो, खरंतर भीतीने कि तिच्या मायेने. . .

माझ्याही नकळत मी तिच्याकडे वळत होतो, ती मला मदतीसाठी बोलावत होती, मी तीन चार पाऊले पुढे जाऊन तिला हात देण्यासाठी वाकलो आणि हात पुढे करतोय तोच पाण्यातून नीरज वर आला, तो पाण्यावर आकाशाकडे तोंड करून तरंगलेला होता, निश्चल आणि निर्जीव. . .

मी झटका लागल्या सारखा सात आठ पाऊले मागे झालो. ती खवळून माझ्याकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचे हिंस्रक भाव पाहून मी लटपटू लागलो, मी एकवार तिच्याकडे तर एकवार नीरज कडे पाहत होतो. मी सुन्न झालो, पळावं हे देखील मनात येत नव्हतं, हे नक्की काय पाहतोय, नक्की विश्वास ठेवावा कि नाही ह्या संभ्रमात मन अडकलं कारण ह्या आधी असं काही पाहिलं नव्हतं आणि मी भरल्यागत एकटक पाहत राहिलो.

माझ्या अंगातलं त्राण गेलं, पाय आपोआप कापायला लागले आणि मी गुढग्यावर पडलो. ती कुत्सितपणे माझ्याकडे पाहून हसायला लागली, तिच्या हसण्याचा आवाज त्या भयाण रात्रीच्या अंधारात असा घुमला कि मरणाच्या भीतीने रडायलाच लागलो.
ती अजून जोरात हसून मला तिच्याकडे बोलावू लागली, ती हळूहळू काठाला टेकून मला इशारे करत होती. तिने दोन्ही हाताने नीरजला जोरात ओढलं आणि माझ्या अंगावर फेकलं, त्याचा निर्जीव देह माझ्यासमोर पडला होता, त्याच्या उघड्या लाल गर्द डोळ्यांतली भीती पाहून मी त्याला तसाच टाकून तिथून पळालो, धावत राहिलो, झाडांचा आपटून किती वेळा पडलो, रक्त वाहत होतं, आणि मी पळत होतो, रस्ता दिसत नव्हता, पण मी पळत राहिलो, तिचा आवाज कानांत घुमत राहिला आणि नीरजचा देह डोळ्यांसमोरून हटत नव्हता.
खूप दमलो, श्वास घेता येईना म्हणून गुढग्यांवर हात ठेवून डोळे बंद करून तसाच थांबलो.
डोळे उघडले तर मी नीरजच्या देहाच्या समोरच उभा होतो, आणि ती माझ्याकडे तुच्छ नजरेने पाहत हसत होती,
"इथून सुटका नाही" तिचे शब्द कानावर पडले, मी जागीच कोसळलो. डोक्यात तीव्र कळ उठली, मला सहन झाली नाही, माझे डोळे मिटायला लागले, समोर पाण्यातून तिचे लांब लचक हात माझ्याकडे येताना दिसले आणि मी नीरजच्या छातीवर पडलो. . .

माझं डोकं खूप जास्त दुखत होतं, खूप जोर लावून मी डोळे उघडले समोर केदार, घरचे आणि पोलीस होते.
केदार नशिबाने तिथून निसटला होता आणि गाडीजवळ पोहोचला, खूप शोधून देखील आम्ही मिळालो नाही म्हणून मदतीस माणसांना आणायला गेला.
तिथे काय होतं कि अजूनही आहे कोणालाच काहीच माहित नव्हतं. नीरजचा पाण्यात बुडून जीव गेला असं निदान झालं, मी जे घडलं ते सगळ्यांसमोर सांगितलं, कुणी विश्वास ठेवला कि नाही माहित नाही पण नीरजच्या मृत्यूला केदारपेक्षा जास्त मला जबाबदार ठरवण्यात आलं.

तेच मनाचं ओझं घेऊन मी इथे जगतोय, निसर्गापासून, माणसांपासून सगळ्यापासून लांब. . .पण विचारांपासून आठवणींपासून कुठे लपावं ??

समाप्त . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults