तुझ्यासवे रूजताना...

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 15 October, 2020 - 12:52

तू पाणी द्यावंस अशी माझी अपेक्षा नव्हतीच कधी..
बाहेर फोफावून वाढणाऱ्या मला तू तुझ्या बागेत रूजवलंस तरी
आभाळातून पाणी येतं आणि त्यावर वाढत राहणं हेच माझ्या जगात मला ठाऊक होतं त्या आधीहि लाखो वर्ष..
पण तू....
माझं एखादं पान जरी वाळलं तरी कोमेजतेस
येता जाता पाहत असतेस मला काही होतंय का
उन्हं उतरतात त्या खिडकीतून माझ्याकडे बघत राहतेस
माझ्या अंगावर फुलणारी फुलं तुझ्या नजरेत हसू फुलवतात
माझ्या पानांवरुन हात फिरवत राहतेस
मला जणू वाटतं कोणीतरी बोलतंय माझ्याशी
खूप काही सांगावं वाटतं
पण नाही सांगू शकत मी
मी न्याहाळत राहतो तुला
इतकी कशी तू वेडी...
गेली कित्येक वर्ष पाहतोय मी तुला
अगदी अल्लड होतीस तेंव्हा माझ्याभोवती घुटमळत काहीबाही वाचत असायचीस
एकटीच खुद्कन हसायचीस
पुढे त्याच्याबरोबर गेलीस त्या दिवशीच्या आदल्या रात्री माझ्याजवळ बसून हमसून हमसून रडलीस.
तुला कुशीत घ्यावं असं खूप वाटलं होतं तेंव्हा...
पण काही पान गाळण्यापेक्षा जास्त काय करू शकणार होतो मी
पुढे लेकुरवाळ्या तुला बघून किती आनंदलो होतो मी
माझ्यासारखाच नवनिर्मितीच्या वेदना झेलूनही हसणारी तू
जगणं, मोठं होत राहणं, वादळे पेलूनही ताठ उभं राहणं हे मला कोणी शिकवलं नाही
पण तुझ्याकडे बघितलं कि येणाऱ्या प्रत्येक वादळाला आव्हान द्यायची खुमखमी संचारते
तू आताशा फारशी भेटत नाहीस
पण आलीस कि फार बरं वाटत मला
भेटतेस तेंव्हा शांत असतेस अगदी. कृतार्थ. तृप्त.
परवा आलीस तेंव्हा माझ्या वाळायला लागलेल्या एका फांदीकडे एकटक बघत होतीस
“जुनं झालंय ते झाड आता. कधीतरी हे होणारच” कोणीतरी म्हणालं.
आणि तुझे हसरे डोळे डबडबले. दोन्ही हातांनी कवटाळून बसली होतीस मला.
वेडे!
कधी ना कधी ती वेळ येणारच गं. तो निसर्गाचा नियम आहे.
मला कवटाळलंस ना तेंव्हा एक वाऱ्याची झुळूक आली होती आठवतंय?
तो मी होतो.... तू माझ्यासोबत घालवलेल्या त्या साऱ्या क्षणांचं मोल कसं चुकतं करू हे विचारणारा.
नाहीच चुकतं करता येणार मला ते.
पुढे तू येशील तेंव्हा मी असेन नसेन
वाईट वाटून घेशील, हळहळशील.
पण तुला एक सांगू? माझ्या सावलीत एक चिमुकलं रोप उगवलंय. तुझं अजून लक्ष गेलेलं नाही त्याच्याकडे.
जेंव्हा जाईल तेंव्हा तुला माझी आठवण येईल मला माहिती आहे.
एक करशील? त्याला मदत करशील मोठं व्हायला?
मी जाऊन जाऊन कुठे जाणार? त्याच्या मुळांशी असलेल्या मातीतच असेन मी.
हसणाऱ्या तुझ्याकडे पाहत.

Group content visibility: 
Use group defaults