इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला.
या चित्रपटाने उसूलांची सर्व रेकॉर्ड्स मोडली आहेत. पूर्वी ७० च्या दशकात एका चित्रपटात फार फार तर २-३ उसूल असत. इथे उसूलांमधून इतर संवाद शोधावे लागतात. यातले बरेचसे उसूल दिग्दर्शकाने शाहिदच्या कॅरेक्टरला वेळोवेळी वापरायला दिले आहेत. मधेअधे जर खिलजी हातात सापड्ला तर ते वापरायचे. व्हिडिओ गेम्स मधे लोक "लाइव्ह्ज" वापरतात तसे इथे उसूल कामी येतात.
पण त्याव्यतिरिक्त या पिक्चरमधल्या लोकांचा एक अंब्रेला उसूल असा आहे की कोणतीही गोष्ट करताना किंवा न करताना राजपूत लोक ती का करतात किंवा करत नाहीत हे करारी चेहर्याने सांगणे. ते ही मुळात आजूबाजूला सगळे राजपूतच असताना. त्यापेक्षा चितौडच्या गडावर राजपूत लोकांबद्दल चांगली माहिती असलेलेच लोक का नेमत नाहीत हे लोक? म्हणजे प्रत्येक वेळेला असले कॉमन नॉलेज एकमेकांना ऐकवायला नको.
एरव्ही सुद्धा हे लोक असेच बोलत असतील का? म्हणजे दासीने येउन सांगितले की "बडी राणीसा ने बैंगन खाने से मना कर दिया है", की लगेच "राजपूत रानीयाँ अपने चितौड के उगे हुए बैंगन खाने से कभी मना नही कर सकती". स्वतःबद्दल बोलतानाही अनेकदा हे लोक थर्ड पर्सन मधे बोलतात. तो त्यांच्या करारीपणाचा भाग आहे, की सीनमधे इतरांनी त्यांच्याबद्दल म्हणायचे संवादही हेच म्हणून टाकत आहेत कळत नाही. त्यांना अशी वाक्ये बोलता यावीत म्हणून आजूबाजूचे लोक अनेकदा प्लाण्ट केलेले प्रश्न विचारत असतात.
थोरल्या राणीचा एक मोत्यांचा हार रावळ रतन सिंग चुकून कोणालातरी देउन टाकतो.. तो म्हणे फक्त लंकेत मिळणार्या स्पेशल मोत्यांचा असतो. आता लंकेतून मोती आणायचे म्हणजे एखाद्या विश्वासू नोकराला किंवा मंत्र्याला पाठवणे शक्य नसल्याने रावळ स्वतःच जातो तेथे. ते ही राणीला म्हणेल चल जरा लगे हाथो बीच वर जाउन येउ वगैरे नाही. एकटाच जातो. तेथेही चितौडचा फेमस राजा आलेला आहे याचा पत्ता राजकन्येला नसतो. ती जंगलात डिजिटल हरणाची शिकार करण्यात मग्न असते. हाही मोती शोधायला घनदाट जंगलात फिरत असल्याने साहजिकच एक बाण चुकून याला लागतो. मग पुढे थोडा वेळ "शिकार" आणि "मोती" यावरच्या विविध उपमांचा मारा आपल्यावर होतो. तीर सही निशानेपर लगा, लंकेतील सर्वोत्तम मोती आता मी घेउन जाणार वगैरे वगैरे (तेथे दीपिकाचे सुसंस्कृत वागणे पाहून खरे म्हणजे तिला कल्चर्ड मोती म्हणावे लागेल). मग ते चितौडगडावर येतात. पूर्वी कोणी त्यांच्या गावाहून मुंबईत आलेले दाखवायला एक रॅण्डम रेल्वेगाडी दाखवायचे. तसे यात त्या चितौड च्या किल्याच्या तटबंदीवरून जाणारी किंवा येणारी एक वरात दाखवली की हे लोक किल्ल्यात आले किंवा तेथून गेले हे समजायचे.
लग्न करून परत आल्या आल्या रावळ तिला राजगुरू कडे घेउन जातो. तो म्हणजे एक जीता जागता मल्लूअॅप्स असतो. म्हणजे फेबुवर जसे दहा प्रश्न विचारून तुम्ही कोणत्या जागतिक नेत्यासारखे आहात वगैरे निकाल येतो तसे तो राजगुरू त्या अॅप इतकेच काहीतरी तात्त्विक प्रश्न विचारतो, प्रेम म्हणजे काय आहे, सुख म्हणजे काय आहे वगैरे.
- "जीवन का वर्णन, तीन शब्दोंमे?"
- "अमृत, प्रेम और त्याग"
ते प्रश्न व त्याची उत्तरे म्हणजे लॅटिन चे भाषांतर पोर्तुगीजमधे केल्यासारखे आहे. एकतर राणी ला लागणार्या कौशल्याचा त्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही. दुसरे म्हणजे एकूणच त्या राजगुरू चे लॉजिक असे, की पहिले विचारायचे प्रेम म्हणजे काय. मग त्याच्या उत्तरातील एखादा शब्द घेउन मग ते म्हणजे काय. असे करत करत प्रत्येक उत्तर म्हणजे एक व्हॉट्सअॅप पोस्ट होईल अशा पद्धतीने हे चालते. काहीतरी प्रेम म्हणजे अश्रू. अश्रू म्हणजे सुख व दु:ख यांचे काहीतरी. मग सुख म्हणजे अमुक. एकूण तू जास्त अगम्य प्रश्न विचारतोयस की मी जास्त अगम्य उत्तर देते याची एक जुगलबंदी होते. यातून ती राणी हुशार आहे हे सिद्ध होते.
दीपिकाचे दागिने शब्दशः नाकापेक्षा मोती जड टाइपचे आहेत. तिचे डोळे पाणीदार दाखवायचे असल्याने पुलंच्या भाषेत ग्लिसरिनचा वायसर निघाल्यासारखे सतत दिसतात.. करारीपणा दाखवण्याकरता तिची मान पिक्चरभर कायम ताठ दाखवली आहे. जराही खालतीवरती होत नाही. म्हणजे तलवार भिंतीवरून काढायची असेल तर आधी ती वर उचलायची आणि मग पुन्हा सरळ होत रोबॉटिक स्टाइलने इतर एकही अवयव न हलवता पूर्ण वळून रावळकडे द्यायची असला प्रकार.
भाषेच्या बाबतीत भन्साळी येथे मनमोहन देसाई स्कूल मधून आलेला आहे. धरमवीर मधे जसे वेगवेगळ्या काळातील व वेगवेगळ्या प्रदेशांतील कपडे एकाच वेळी एकाच राज्यातील लोक वापरत होते, तसे इथे भाषेचे झाले आहे. कधी ते राजस्थानी, तर कधी इंदौर-लखनवी अदब दाखवतात ("आप है यहाँ के राजगुरू"), तर कधी उर्दू बोलतात, तर कधी शुद्ध हिंदी. तसेच यमकाच्या गरजेकरता भाषेच्या कन्सिस्टन्सीची पर्वा हे लोक करत नाहीत. चितौडच्या राजा व राणीतील प्रेमगीत हे सुफी स्टाइलने चालते. घूमर घूमे, प्रीत, मन भावे बरोबरच रूतबा, कुर्बान, रूह-ए-साज, नब्ज वगैरे मंडळी खेळीमेळीने नांदतात.
आम्हाला इतक्या वर्षांत इथे अजून स्केज्युल अचूक म्हणायला जमत नाही, आणि ही एका दिवसातच जन्मापासूनच चितौड मधे असल्यासारखी लहेजा, स्थानिक शब्द व उच्चार आत्मसात करते, ते ही दिवसभर त्या किल्ल्यात पडद्याआड बसून.
मग एकदा हे दोघे एकत्र असताना तिला शंका येते की तेथे कोणीतरी लपून बघत आहे. “एकत्र असताना” हे त्या प्रसंगाचे पीजी-१३ वर्णन नव्हे. म्हणजे पुढे तसा काहीतरी प्लॅन असेल, पण कपडे आणि दागिने काढण्यातच सकाळ होईल असे कॉस्च्युम आहेत. त्यामुळे स्क्रीनवर फुलेही आपटायची गरज नाही.. कोणीतरी बघत आहे म्हंटल्यावर तेथे रावळ एकदम एक चाकू मारतो. पण कोणी दिसत नाही. वास्तविक ती भिंत किंवा पार्टीशन जे काही असेल तेथे त्या बाजूचा माणूस लख्ख दिसेल असा उजेड व मोकळा भाग असतो.
पण त्या चाकूला लागलेल्या रक्तातून तिला "चंदन की खूशबू" येते. और ऐसी खूशबू पूरे चित्तौड मे एकही आदमी लगाता है! राजगुरू राघव चेतन! आणि ही माहिती हजारो मैलांवरून नुकत्याच आलेल्या नवीन राणीला उपजत माहीत असल्यासारखी दाखवली आहे. तिला काय कोणत्या प्रजेच्या अंगाला कसले वास येत असतात याचे ओरिएण्टेशन दिले गेले होते का?
राजा व राणीचे जे अंतःपूर का काय असेल ती जागा जरा बंदिस्त, बाहेर पहारा असलेली हवी ना? कोणी तेथे रंगे हाथ दिसला नाही तरी वाटेत कोठेतरी शिपायांना कोणी येताना किंवा जाताना दिसला का विचारावे? पण हा प्रकार अनेकदा दिसतो. चितौडच काय पण दिल्लीची सुद्धा सगळी फौज रिस्ट्रेनिंग ऑर्डर असल्यासारखी कायम सीमेवरच असते. कोणाच्याही महालात कोणीही जाउ शकतो. रावळच्या बेडरूम मधे राजगुरू, खिलजीच्या महालात "किसी को आने न दिया जाय" ऑर्डर लागू असून सुद्धा शत्रूचा बंदी राजा रावळ. टोटल ओपन ऑफिस प्लॅन.
बरं तो राजगुरू आहे. त्याला अंतःपुर किंवा जे काही असेल तेथपर्यंत थेट प्रवेश आहे. तर तो आला तर किमान कशासाठी आला होता वगैरे काही विचारा? थेट शिक्षा. त्या अपमानाचे प्रतीक म्हणून तो बाजूच्या मशालीतील थोडी आग खाउन दाखवतो. म्हणजे रिव्हर्स द्रकारिस. आग खाण्यापेक्षा त्याच्या उलटे करून राज्ये बळकावता येतात हे त्याला माहीत नसते. त्याला तेथून हाकलले जाते. तो जातो थेट दिल्लीला.
अल्लाउद्दिन खिलजीला मुंडकी जमा करायचा शौक असतो (आणि सिंहासनावर बसून डुलक्या मारणे ही एक फॅमिली ट्रेट). चित्रपट ३डी असल्याने एका सीन मधे तो काही कारण नसताना एक शहामृग घेउन येतो. त्याची मुख्य कामगिरी म्हणजे मंगोल टोळ्यांविरूद्धच्या युद्धात सगळे सैनिक लढाईत गर्क असताना हा लांबवर उभा असतो त्या रणधुमाळीकडे पाहात. मग एकाच फटक्यात आत घुसतो ते एक मंगोल मुण्डके घेउनच परत. आपल्याला ते सगळे मंगोल सारखेच दिसतात पण याला त्या धुळीतूनही योग्य डोके बरोब्बर सापडते. मग पुढे काका जलालउद्दीन, मेवाडचा राजगुरू अशी अनेक मुंडकी त्याच्या संग्रही जमा होतात. गेम ऑफ थ्रोन्स मधल्या त्या हॉल ऑफ फेसेस मधे त्यातले काही अल्लाउद्दीनने दान केल्याचा उल्लेख नक्की असेल.
त्याची बेगम कधी मलिका-ए-जहाँ असते, तर कधी मलिका-ए-हिंद. बहुधा अधूनमधून मलिका-ए-आउटर जमना पार ही असेल. माहीत नाही.
एका रात्री खिलजी बेगमबरोबर असताना सर्वत्र शांतता असते. त्यामुळे खिलजी ला दूरवर बासरी ऐकू येते. खेडेगावात एखाद्या लग्नातील लाउडस्पीकर ची गाणी जशी मधूनच अगदी मैलभर लांब ऐकू येतात तशी. मग ती वाजवणार्याला म्हणजे त्या राजगुरूला बोलावले जाते. तो याला सांगतो की तू सिकंदराप्रमाणे जग जिंकणार आहेस (सिकंदरला अर्धा भारत सुद्धा न जिंकता परत जावे लागले होते हे दोघांच्याही लक्षात येत नाही), पण त्या करता तुला "ती" ची गरज आहे. ती कोण? तर ती म्हणे साक्षात माया आहे. खिलजी हा वेदांचा प्रकांडपंडित असल्याने "माया" चा कन्सेप्ट त्याला लगेच समजतो.
तो रावळला दिल्लीला यायचे आमंत्रण देतो. पण रावळ ते धुडकावतो. त्यामुळे खिलजी जंग का ऐलान करून चितौडवर हमला करायला येतो. मग तो व त्याची फौज किल्ल्यासमोर तळ ठोकून बसतात. बरेच दिवस होतात. राणीच्या म्हणण्यानुसार तो म्हणे "तपते रण मे" सहा महिने थांबलेला असतो. दिवाळी ते होळी हा काळ. चितौड त्याकाळात बहुधा दक्षिण गोलार्धात असावे.
मग बराच काळ तिढा सुटत नाही म्हणून मग खिलजी रावळला भेटायला येतो तह करायला. पण तेथे तो पद्मावतीला भेटायची मागणी करतो तहाची अट म्हणून. या भेटीपर्यंत तो फक्त युद्ध किंवा तह करायला आलेला दुसरा एक राजा असतो. त्याने राणीला भेटायची इच्छा व्यक्त केल्यावर रावळ प्रचंड संतापणे व बाजूच्या शिपायांनी खिलजीच्या गळ्यापर्यंत भाले आणण्याइतके काय होते माहीत नाही. तेव्हा काय राजे व राण्या इतर राजे व राण्यांना भेटत नव्हते? राजनैतिक प्रोटोकॉल वापरून, घूँंघट, पडदा जे काय असेल त्याच्यासकट भेटत असतीलच की. हा जणू काही पुढच्या गोष्टी आधीच माहीत असल्यासारखा त्याला दुश्मन म्हणूनच वागणूक देतो. पण राणीने आग्रह केल्यामुळे कोठूनतरी राणीचे प्रतिबिंब दाखवले जाते.
मग खिलजी याला बोलावतो. त्याची फौज सगळी म्हणे परत गेलेली असते. त्यावर रावळही विश्वास ठेवतो. इतकेच नव्हे तर वाळवंटाच्या मध्यभागी असलेल्या तंबूत त्याला भेटायला जाताना यांचे लोक एकाच बाजूला पहारा देत उभे राहतात. तेथून त्याला खिलजी कैद करून दिल्लीला घेउन जातो. आता पेच उभा राहतो. राजपुतांबद्दलची माहिती राजपुतांना कोण सांगणार, समोर शत्रू तळ ठोकून बसल्यावर युद्धाची तयारी करा हे सेनापतीला कोण सांगणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे खिलजीने बोलावल्याप्रमाणे राणी दिल्लीला जाणार असे ती स्वतः ठरवते.
मग राणी तिकडे जाते व त्याला खिलजीच्या बेगमच्या मदतीने सोडवते. त्याची बेगम जेव्हा पद्मावती व रावळ ला पळून जायला मदत करते तेव्हा खिलजी तिच्याकडे बघून मोठ्ठा डॉयलॉग मारतो "हमारे अपनोंनेही हमे जख्मी कर दिया"! त्याआधी त्याने स्वतःच्या काकाला व पुतण्याला -म्हणजे तिच्या वडलांना व भाच्याला त्या आधी मारलेले असते. मग तिलाही बंदी करून टाकतात व दुप्पट फौज घेउन व रोमन साम्राज्यातील उखळी तोफांसारखी काही शस्त्रे घेउन खिलजी पुन्हा चितौडवर चालून येतो. तेथेही एकदा खिलजीच्या बाजूने उसूल ऑलरेडी तोडलेला असताना यांचे सैनिक त्याला मारण्याची संधी सोडून देतात. आणि मग पुढची कथा आपल्याला माहीत आहे.
त्यामुळे त्यापेक्षा दिग्दर्शकाचे डीटेलिंग बघू.
यांची हेरयंत्रणा इतकी भारी असते की इकडे खिलजीच्या फौजा दिल्लीहून निघाल्या आहेत ही खबर सेनापतीला मिळते तोवर तिकडे अंतःपुरात सगळे हादरू लागते टी-रेक्स येत असल्यासारखे. लगेच उठून राणी व राजा तटाकडे जातात तर तिकडून धुळीचे लोळ दिसतात लगेच एक दोन मैलावर. राजाला गडावरून जे सहज दिसेल ते किमान एखादा दिवस आधी हेराने सांगणे आवश्यक आहे वगैरे नाही. सगळे झटपट.
गडाच्या तटावरून बाण मारणार्यांचे कौशल्य मात्र जबरी आहे. खिलजीच्या सेनेच्या दिशेने आडव्या रेषेत मारलेले बाण मधेच कोणीतरी एक्सेल मधे पिव्हट केल्यासारखे तेथे जाउन उभ्या रेषेत पडतात. तसेच त्यांच्या तटावरून थेट खिलजी झोपला आहे त्या जागेवर बाण मारता येउ शकतो. पण ८-१० महिन्यांच्या काळात ते तो मारत नाहीत. का ते विचारू नका, कारण काहीतरी "राजपूत अपने दुश्मनको..." चालू होईल. आणि त्याचे आधीचे आवाहन नाकारल्यावरही यांची युद्धाकरता सगळी तयारी खिलजी चितौडच्या दारात आल्यावर सुरू होते. लोकांना किल्ल्यात बोलवा, धान्य वगैरे भरून ठेवा ई.ई.
बाकी हे चितौड चे महाराज असोत किंवा सल्तनत-ए-हिंद चे सुल्तान. त्यांचे सरसेनापती अगदीच कामचलाऊ असावेत. त्यांच्याकडे कोणी शत्रूचे लोक येउ लागले की राजाला विचारायचे "इसे काट दूँ बॉस?" मग राजाने काहीतरी युद्धनीती ऐकवत त्याला थांबवायचे. अरे इतकी बेसिक माहिती जर राजाने सांगावी लागत असेल तर तुझे काय काम. एकूणच राजनैतिक प्रोटोकॉल वगैरे कोणी काही पाळताना दिसत नाही. खिलजी रावळला भेटायला येताना जुन्या गावातील बोळकांडीतून फिरवून आणल्यासारखा त्याला आणतात. नंतर रावळ त्याच्याकडे जातो तेव्हा व्हिलनच्या अड्ड्यात हीरो घुसतो तसा पडदे झटकत जातो त्याच्या शामियान्यात.
त्या दिल्लीहून सुटकेच्या सीनचे असेच. तेथून पळून यायच्या आधी हा तेथून एकटाच घुसतो खिलजीच्या महालात. सगळे सैनिक नमाज अदा करत असतात, पण ते याला माहीत नसते. तेथेही खिलजी त्याला तलवार देतो मला मार म्हणून. पण तेथे तो "घायल आदमी पर" उसूल वापरून त्याला सोडून देतो.
मूळ कथेचा अंत ठरलेला आहे. पण मधे नाट्यमय प्रसंग तर व्हायला हवेत. अडीच तीन तासांचा चित्रपट बनवताना जे युद्धप्रसंग लिहीले जातात त्यात मधेच जर रावळ च्या हातात खिलजी सापड्ला तर तो मरेल. अशा वेळेस ते नाट्यपूर्ण प्रसंग बदलण्याऐवजी एखादा उसूल वापरायचा आणि खिलजीला सोडून द्यायचे. कधी तो याच्याकडे "घर आये मेहमान पर" सिच्युएशन मधे, तर कधी हा त्याच्याकडे. कधी तो निहत्ता असतो म्हणून, तर कधी घायल असतो म्हणून. कधी त्याच्या तंबूवर जळते बाण टाकले जातात पण खिलजीला मारले जात नाही. तेव्हा आपल्या लक्षात येते की या सगळ्याचा संबंध खर्या उसूलांशी नसून चित्रपट अजून बाकी असण्याशी आहे.
जबरदस्त क्लचर्ड मोती, उसूल,
जबरदस्त
क्लचर्ड मोती, उसूल, राजगुरू प्रश्ननोत्तरे, दागिने सगळेच भारी
लै भारी लिहिलंय! मी तो
लै भारी लिहिलंय! मी तो चित्रपट बघून वाया घालवलेला वेळ आत्ता एवढे उसूल वाचून वसूल झाला.
जबरदस्त लिहलंय. मजा आली
जबरदस्त लिहलंय. मजा आली वाचताना. चित्रपट पाहिला नाही पण लेख वाचून आतामात्र पाहावासा वाटतोय.
(No subject)
हरचंद पालव यांचा प्रतिसाद
हरचंद पालव यांचा प्रतिसाद वाचून एक कल्पना सुचली. 'झीरो' पिक्चर बघून फारएन्ड किंवा अजून कुणी तरी त्यावर असा एखादा लेख लिहा. म्हणजे माझेपण गेलेले पैसे वसूल होतील
>>माझेपण गेलेले पैसे वसूल
>>माझेपण गेलेले पैसे वसूल होतील >> वावे
वावे
वावे
खरंच! मला जमत असतं तर मीच
खरंच! मला जमत असतं तर मीच लिहिलं असतं. चार तिकिटांचे पैसे पाण्यात गेल्याचं दुःख तरी जरा कमी झालं असतं
परवा 'पद्मावत' बघत असताना मला
परवा 'पद्मावत' बघत असताना मला अचानक 'पुराना मंदिर' आठवला. हो तोच रामसेंचा. फार महान सिनेमा. म्हणून तातडीने लिहायला आले.
तर पुराना मंदिर मध्ये सामरीला पकडून आणल्यानंतर राजपुरोहित जीव तोडून सांगत असतो 'इसे पवित्र अग्नी मे जला दो...' तर तो राजा शहाणपणा करत 'नाही. इसका सर और धड अलग कर दो. धड मंदिरात पुरा आणि सर आमच्या अंतःपुरात पुरा...' वगैरे रँडम शिक्षा सांगत बसतो. त्यामुळे जे काय नुकसान व्हायचे ते होतेच.
तद्वतच राजा रतनसिंग चांगला राघव चेतनला काळकोठडीत टाकायला सांगत असतो तर पद्मावती ditto पुराना मंदिर मधल्या राजासारखी सजा बदलून त्याला देशनिकाला करत खुला सोडून देते, मग जातंय ते बेणं खिलजीकडं.
तात्पर्य काय, दरवेळी आपण सजा बदलत बसू नये.प्रॉब्लेम्स वाढतात.
"दरवेळी आपण सजा बदलत बसू नये
"दरवेळी आपण सजा बदलत बसू नये.प्रॉब्लेम्स वाढतात." -
रवेळी आपण सजा बदलत बसू नये
रवेळी आपण सजा बदलत बसू नये.प्रॉब्लेम्स वाढतात>>

काल जॉन विक बघताना हेच उसूल आठवलेले. कंपनीच्या आवारात मारामार्या करायच्या नाहीत हा एक उसूल. आता इकडे हा उसूल व्हिलन ही पाळणार पण हिरो पाळणार नाही याची आपल्याला पक्की खात्री असते. मग हिरोने चटकन उसूल मोडावा की नाही? तर नाही, आधी दोन चार डायलॉग मारणार आणि मगच्यानं तो उसूल मोडणार.
एक मुकी स्त्री व्हिलन आहे. आता मला आधी वाटलं की औरत पे हात न उठवायचा उसूल आहे म्हणून पहिल्या दोन एनकाऊंटर मध्ये याने तिला सोडून दिले, तर नाही शेवटी मारले पण आणि नाही पण मारले. विचारा कसं? हिरण्यकश्यपू ++! मला तर ते बघून हिरण्यकश्यपू दिसूच लागला.
तर डॅगर अॅओर्टा मध्ये खुपसला. पण असा खुबीने खुपसला की तो डॅगर बाहेर काढला तर व्यक्ती मरेल. जोवर तो डॅगर आत आहे तोवर हार्ट पंपिंग अॅज युज्वल. आहे की नाही उसूलचा पक्का! मारलं का? तर नाही!
दरवेळी आपण सजा बदलत बसू नये
दरवेळी आपण सजा बदलत बसू नये.प्रॉब्लेम्स वाढतात. >>>
उसूल व्हिलन ही पाळणार पण हिरो
उसूल व्हिलन ही पाळणार पण हिरो पाळणार नाही याची आपल्याला पक्की खात्री असते. मग हिरोने चटकन उसूल मोडावा की नाही? तर नाही, आधी दोन चार डायलॉग मारणार आणि मगच्यानं तो उसूल मोडणार.<<<<<<
म्हणजे रतनसिंग जॉन विक पेक्षाही भारी आहे कारण तो आजाबात उसूल मोडत नाही.
अरे! हा रिव्ह्यू कसा काय मिस
अरे! हा रिव्ह्यू कसा काय मिस झाला होता माझ्याकडून कोण जाणे!
काय काय कोट करू यातलं? पूर्ण लेख भारी झाला आहे. ध मा ल !!
अफलातून लिहिलं आहेस, फा
र्म्द +१२३
र्म्द +१२३
rmd ला मम.
rmd ला मम.
धमाल धमाल लिहिल आहे, फा.
भारी लिहीलंय.
भारी लिहीलंय.
पहिल्यांदा माफी मागतो. पद्मावत बद्दल जे लिहायचं आहे त्यासाठी तीन पैकी या धाग्याची निवड केली म्हणून. या धाग्याचा सूर जवळचा वाटला.
पद्यावत हे काव्य चित्तौड वर अल्लाउद्दीन खिलजीच्या च्या आक्रमणांनंतर २३७ वर्षांनी लिहीले गेले आहे. हा जो कवी आहे तो जॉनपूर या उत्तर प्रदेशमधल्या जिल्ह्यातला रहिवासी होता. हा माणूस कधीही चितोडला गेलेला नाही, ना त्याला श्रीलंका माहिती. संदर्भासहीत सांगायचे तर..
इ.स. १५४० मध्ये) मलिक मोहम्मद जायसी या कवीने अवधी भाषेत पद्मावत काव्य लिहिले ते function at() { [native code] }इरंजित आणि काल्पनिक आहे.
संजय लीला भन्साळीने याच काव्याचा संदर्भ घेतला आहे. मुळात ज्या राणीच्या सौंदर्याची इथे चर्चा आहे तिचे नाव पद्मिनी आहे का याबद्दलच शंका आहे. त्याबाबत इतिहासकारात एकवाक्यता नाही. पद्मिनी हे नाव गृहीत धरले तरी सुद्धा ती श्रीलंकेची नाही असे मानण्यास मोठी जागा आहे. मलिक मोहम्मदचा गोंधळ कसा झाला?
सिंघल नावाची जागा राजस्थानात आहे. तर श्रीलंकेला सिंहल बेट म्हटले जायचे. उत्तरप्रदेशात बसलेल्या एका कवीने त्यांच्याकडच्या मायबोलीवर अवधीत कविता लिहीताना राजस्तानला न गेल्याने सिंघल ऐवजी सिंहल ऐकले असावे. सिंघल हे आज आडनाव आहे. हे बिकानेर जिल्ह्यात आहे. तिथल्या पुगल या छोट्या राज्याची / संस्थानची / जमीनदाराची ही कन्या.
हे कशावरून?
तर तत्कालीन श्रीलंकेत गंधर्वसेन नावाचा कोणताही राजा नव्हता. अशी नोंद इतिहासात आढळत नाही. म्हणजे कवीने आधी स्वतःची फसगत करून घेतली, मग त्याला आधार म्हणून एका राजाची निर्मिती केली. काही लोक वास्तवावर आधारीत फिक्शन लिहीतात तसं.
दुसरे म्हणजे राजस्थानातली राज्ये ही लँडलॉक राज्ये आहेत. त्यांच्याकडे नेव्ही नसे. स्वतःची जहाजं नसत. चित्तोडचा राजकुमार सात आठ वर्षे श्रीलंकेत जात असेल तर त्याची फौज त्याच्या सोबत जाईल. कुठलाही राजा एकट्याने लाईन मारायला जाणार नाही. अशी गलबतं तेव्हां व्यापार्यांकडेच असत. ज्या चौल राजांच्या नेव्हीबद्दल पीएस १ मुळे बोललं जातं, त्यांच्याकडेही प्रबळ नेवी नव्हती. त्यांनी सिंगापूरच्या राजावर आक्रमण करताना व्यापार्यांची जहाजं वापरली होती. ती त्यांची लढाऊ नेवी नाही. त्यामुळं चित्तोडचा राजा भारताच्या दक्षिण किनार्यावर नेवी ठेवण्याचा संबंधच येत नाही.
तिसरं महत्वाचं सत्य म्हणजे या चित्तोडच्या राजाचा कार्यकाळ फक्त एक वर्षे इतकाच राहिला. त्यामुळं सात आठ वर्षे त्याने प्रणयाराधन केले हे अचायला अवघड आहे.
अजून एक गोष्ट. राजस्थानात जर कुणी मुलगा लग्नाला नखरे करत असेल, म्हणजे घरच्यांना पसंत पडलेल्या मुलीशी लग्न करायला नकार देत असेल तर तिथे असे म्हणतात " देख्हे कौनसी पुगलकी पद्मिनी लावे है"
म्हणजे पदिमिनी ही पुगलची ही लोककथांमधून, म्हणींमधून प्रचलित मान्यता आहे.
याचे पुरावे पण देतो.
राघव चेतन नावाच्या
राघव चेतन नावाच्या ब्राह्मणाने दिल्लीत जाऊन खिलजीला पद्मिनीच्या सौंदर्याबद्दल सांगितले आणि तिच्यसाठी आक्रमण झाले.या दाव्याची ऐतिहासिक छाननी केली तर काय आढळते?
खिलजीचे मुख्य उद्देश साम्राज्य विस्तार, चित्तौडचे सामरिक व व्यापारी महत्त्व, आणि गुजरात-माळवा मार्गावरील कर हे होते . मेवाड हे दिल्लीच्या जवळचे राज्य आहे. मेवाडवर सिसोदिया वंशाचे राजे राज्य करत होते. या आक्रमणानंतर राजधानी चित्तोडच्या किल्ल्यावर हलवली. हा किल्ला उंचावर आहे.
कवीने हिरामण नावाच्या पोपटाचा उल्लेख केला आहे. या पोपटाने राजाला येऊन सांगितले का "रामराम, मी हिरामण"
हा पोपट माणसातला स्त्री आणि पुरूष हा फरक ओळखू शकत होता आणि स्त्रियांचं सौंदर्य, त्यातही कुठली स्त्री सर्वात सुंदर आहे हे ओळखू शकत होता, इतकंच नाही तर राजकुमारीच्या सौंदयाची बातमी ही राजाला सांगितली पाहीजे मासेमारी करणार्याला नाही हे त्याला समजत होतं.
अलाउद्दीन खिलजीने आरशात किंवा काचेमध्ये राणी पद्मिनीचे प्रतिबिंब पाहिले >>>.१३व्या-१४व्या शतकात भारतात असे मोठे पारदर्शक आरसे उपलब्ध नव्हते. ही गोष्ट नंतरच्या काळात जोडलेली एक दंतकथा आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या
संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमामध्ये इतके तथ्य आणि लॉजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या चोखपणा कोण अपेक्षा करते आहे?????
आणि त्याचे सिनेमामध्ये जे दाखवले आहे ते बरोबर आहेवासा दावा कोण करते आहे ???
की ज्यासाठी इतका जीव तोडून आणि वेळ देऊन मोठे मोठे प्रतिसाद लिहावेत ????
संजय लीला भन्साळी यांच्या
संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमामध्ये इतके तथ्य आणि लॉजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या चोखपणा कोण अपेक्षा करते आहे?????
आणि त्याचे सिनेमामध्ये जे दाखवले आहे ते बरोबर आहेवासा दावा कोण करते आहे ???
>>> असं मी म्हटलंय का? असल्यास दाखवून द्या.
की ज्यासाठी इतका जीव तोडून आणि वेळ देऊन मोठे मोठे प्रतिसाद लिहावेत ???? >> प्रॉब्लेम काय आहे तुमचा? नीट वाचून आगपाखड करायची ना..
पद्यावतचा खरा इतिहास मांडला हा तुमचा प्रॉब्लेम आहे? असे असेल तर क्रुपया या संदर्भातला नियम मला सांगावा.
मोठे प्रतिसाद दिले हा तुमचा प्रॉब्लेम आहे? प्रतिसादाची लांबी किती मान्य आहे हे सांगावे.
तुम्हाला व्यक्तिशः (म्हणजे या आयडीला) तर मी काहीच कधी कुठे बोलल्याचे आठवत नाही. मग हा थयथयाट कशासाठी?
या संपूर्ण प्रतिसादात कुणी असे दावे केलेत असे मी म्हटल्याचे कृपया दाखवून द्या.
कि हे प्रतिसाद माझे आहेत याचा तुम्हाला त्रास आहे असे समजू?
उत्तराच्या प्रतिक्षेत.
पहिल्या प्रतिसादात स्पष्ट
पहिल्या प्रतिसादात स्पष्ट केले होते कि पद्मिनीचा इतिहास रंजक वाटल्याने मायबोलीवर सर्च दिल्यानंतर जे तीन धागे येतात त्या पैकी हा धागा निवडला. फक्त एव्हढ्यासाठी अजून एक धागा नको होता. चित्रपटाच्या निमित्ताने पद्मिनीचा खरा खोटा जो असेल तो इतिहास पुन्हा चर्चेत आला. चित्रपटाविषयी किंवा त्याच्याबद्दलच्या लेखनावरचा हा अभिप्राय नव्हता. उर्वरीत भाग लिहीण्याआधी ज्या प्रतिक्रिया आल्या त्यानंतर उत्साह मावळला.
लेखकाचा आक्षेप असल्यास माझे प्रतिसाद डिलीट व्हावेत ही विनंती.
रोचक माहिती
रोचक माहिती
रा. अ. इंटरेस्टिंग माहिती.
रा. अ.
इंटरेस्टिंग माहिती. आणि आक्षेप काय त्यात. एकतर हा लेख बराच जुना आहे. त्यावर प्रतिक्रियांच्या एक दोन लाटा येऊन गेल्या आहेत. आता त्यातील विषयाबद्दल आणखी काहीतरी आले तर काहीच प्रॉब्लेम नाही.
माझे याबाबतीत जनरल मत असे आहे की लेख नवीन आहे, लोक अजून ज्या उद्देशाने तो लेख लिहीला आहे त्यावर प्रतिक्रिया देत आहेत तोपर्यंत त्यावर अवांतर लिहू नये. ते ही मूळ लेखकाचा हिरेमोड होतो म्हणून - म्हणजे ३० नवीन प्रतिसाद आले म्हणून उत्साहाने उघडायला जावे तर तेथे कोणीतरी वेगळीच एक प्रतिसादांची चेन तयार केली आहे आणि लेखाबद्दल त्यात काहीच नाही - असे व्हायला नको
म्हणजे पहिल्या ४-५ दिवसांत साधारण. नंतर काहीच प्रश्न नाही. याला तर सहा वर्षे होत आली. तेव्हा जरूर लिहा.
Pages