सूर लाउनी गुणगुणतो मी

Submitted by निशिकांत on 10 October, 2020 - 00:30

( माझ्या ७६ व्या वाढदिवसा निमित्त लिहिलेली कविता )

केशर लाली क्षितिजावरची
सांज सकाळी अनुभवतो मी
गीत जीवना तुझेच ओठी
सूर लाउनी गणगुणतो मी

हजार असुनी एक त्यातली
मीच निवडली वाट चालण्या
यश माझे अपयशही माझे
नको कुणीही दूषण देण्या
खाचा, खळगे नसे काळजी
पडतो, उठतो, सावरतो मी
गीत जीवना तुझेच ओठी
सूर लाउनी गणगुणतो मी

जे जे आम्हा हवे हवेसे
दिले मुक्त हस्ते देवाने
नसे शिकायत मनात कुठली
जगून झाले आनंदाने
रंगबिरंगी उत्सवास या
इंद्रधनूने चितारतो मी
गीत जीवना तुझेच ओठी
सूर लाउनी गणगुणतो मी

आयुष्याच्या मैफिलीत ती
ज्योत होउनी तेवत असते
सखी सोबती, बघता बघता
जगावयाचे सूत्र गवसते
तिचा राबता गझलेमध्ये
अन् मक्त्यातच** आढळतो मी
गीत जीवना तुझेच ओठी
सूर लाउनी गणगुणतो मी

सार्थ जीवनी खंत कशाची?
जरी लांबल्या सांज सावल्या
गर्वगीत कोलंबसचे का
लिहावयाला ओळी सुचल्या?
भाव दाटले असे अनामिक
कलमेमधुनी निर्झरतो मी
गीत जीवना तुझेच ओठी
सूर लाउनी गणगुणतो मी

वाढदिवस हे पर्व असावे
क्षमा याचना करावयाचे
आदरपूर्वक स्मरण करावे
गणगोतांचे अन् मित्रांचे
अपूर्ण असुनी पूर्णत्वाच्या
रस्त्यावरती वावरतो मी
गीत जीवना तुझेच ओठी
सूर लाउनी गणगुणतो मी

** मक्ता म्हणजे गझलेतील शेवटचा शेर ज्यामधे शायराचे नाव गुंफलेले असते.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users