वडापाव फॅन क्लब

Submitted by VB on 9 October, 2020 - 01:01

लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही Happy
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.

सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते Happy

असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.

*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेक्कन क्वीन मध्ये ब्रेड ऑमलेट पेंट्री कार मध्ये टेबलवर बसुन खायला जाम म्हणजे जाम भारी वाटते. पण ती अत्यंत गैरसोयीची गाडी आहे. कल्याणच्या आधी विठ्ठलवाडीला स्लो झाली की चालत्या गाडीतुन उतरणे किंवा दादरला जाउन परत येणे असलं करायला लागतं. Happy
कॉलेजला असताना जॉब मिळाला की महिन्याच्या पगाराचं पॅकेज वडापावच्या हिशेबात करायचो. रोज १०० वडापाव खाता येतील इतके पैसे मिळणारेत! Proud

वडा तळलेला असतो म्हणून खाऊ नको असं कुणी सांगितलं की, ग्रेव्हीच्या भाजीत त्याच्या दहापट तेल असतं तरी खाताच ना? अशी एक पळवाट होती पूर्वी.

मला मुंबईत पहिला जॉब लागल्याची (गावातला पॉलिटेक्निक लेक्चररचा जॉब सोडून गेलो होतो मुंबईला) दोन मित्रांना दिलेली पहिली पार्टी वडापाव आणि भजी पावचीच होती.

परग्याची पार्टी

या धाग्यावरून एक खूप जुना विनोदी किस्सा माझ्या मनात जागा झाला. तेंव्हा मी नुकताच कॉलेजात दाखल झालो होतो. एका अतिशय छोट्या खेडेगावातल्या शाळेतून थेट शहरातल्या मोठ्या कॉलेजात. तिथे सगळी अनोळखी मुले. ती एकमेकांना आधीपासूनच ओळखत, वर्गात दंगा धुडगूस घालत. मी मात्र एकटाच. मनावर दडपण असायचे. अजून कोणी मित्र झाले नव्हते. हि सगळी मुले प्रचंड श्रीमंत आहेत, इथे आपले कोणी मित्र होणार नाही असे उगीचच वाटायचे. एक दिवस लंच ब्रेक मध्ये एकाने वर्गात जाहीर केले,

"परग्या क्लास मॉनीटर झाला. तो आज पार्टी देणार आहे. चला रे..."

झाले. सगळे पार्टीला गेले. मी तोवर "पार्टी" क्वचित सिनेमातच बघितलेली, वर्तमानपत्रात वाचलेली. म्हणजे जोरजोरात मुझिक लावून हातातल्या ग्लासातले लालगुलाबी पेय पीत नाचायचे. मी गेलो नाही. भरदुपारी हे सगळे कुणाच्या घरी कसली पार्टी करतात काय माहित, असा काहीसा विचार केला. एकटाच कुठेतरी बसून डबा खाल्ला.

काही दिवसांनी एकजण माझा चांगला मित्र झाला. नंतर पुन्हा एकदिवस "पार्टी" जाहीर झाल्यावर या मित्राने मला विचारले,

"अरे तू का येत नाहीस पार्टीला"

मी विनम्रपणे सांगितले "मला नाही सवय पार्टीची. आवडत सुद्धा नाही असे पार्टीला जाऊन खाणे पिणे"

त्याला जरा विचित्र वाटले. तरीही त्याने आग्रह केला. म्हणाला तू नुसता मला सोबत म्हणून तरी चल. काही खाऊ पिऊ नकोस. मोठ्या नाखुशीने मी त्याच्या सोबत गेलो. मला वाटले आता आपण सगळे कुणाच्यातरी घरी जाणार. तिथे नाच गाणे "पार्टी" होणार. पण प्रत्यक्षात मात्र पार्टी देणारा सर्वाना कॉलेजच्या बाहेर वडापावच्या गाड्यावर घेऊन गेला आणि सर्वाना एकेक वडापाव आणि चहा दिला. त्यासाठी त्याने किती रुपये खर्च केले ते सांगून फुशारकी सुद्धा मारली. अशा रीतीने आयुष्यातील पहिली "पार्टी" वडापाव खावून साजरी झाली Lol

पहिली "पार्टी" वडापाव खावून साजरी झाली>> Lol
आम्ही महाविद्यालयात होतो तेव्हा पार्टी म्हणजे चहा आणि वडापाव हे ठरलेलेच असायचे.

मी अजून वाचलं नाही कोणाचे, खूप पोस्टी आहेत, वाचते निवांत पण पहीलं नुसतं वड्यांबद्दल लिहिते.

मी लहान असताना नुसते वडे फेमस होते, वडापाव एकत्र जरा उशिरा सुरु झाला. डोंबिवली रामनगर मधे एक बाई वडे करायच्या, आफळे राममंदिर तेव्हाचे आत्ता स्वामी समर्थ मठ म्हणून ओळखतात त्यासमोर छोटा गाळा होता. मोठा आणि अतिशय टेस्टी वडा, हा अजूनपर्यंतचा सर्वात आवडणारा वडा, तेव्हा चार आण्याला मिळायचा. त्यांना काहीजण मामी म्हणायचे पण आम्ही बाईच म्हणायचो, बाईंचे वडे. नंतर त्या आम्ही पूर्वी राहायचो त्याच रोडवर जरा मोठं स्वत:चं दुकान घेऊन बिझनेस करू लागल्या, पाटकर शाळा मैदानाजवळ, त्या सर्व मुलींना राणी म्हणायच्या. साबुदाणे वडे पण छान मिळायचे त्यांच्याकडे. एक मुलगा मदतनीस शेवटपर्यंत होता. माहेर शिफ्ट होऊन मानपाडा रोडवर आल्याने आणि मीही डोंबिवलीत त्याच रोड एरियात राहायला आल्याने, फार क्वचित बाईचे वडे आणले जायचे. नंतर त्यांनी दुसरी मदतनीस करायला ठेवली त्यांचा हात दुखायचा म्हणून, तो मुलगा होताच मदतीला. इथे पाव मिळत नाहीत हा त्यांनी बोर्ड लावलेला शेवटपर्यंत Lol . अर्थात आधी लावायला लागला नव्हता जोपर्यंत लोकं वडा पाव एकत्र खात नव्हते. नंतर सर्व त्यांना पाव आहेत का विचारू लागले. त्यांचं लसणीचे तिखट पण फार टेस्टी असायचं.

आता त्या बाई नाहीत पण त्यांच्याबाबत एक tragedy झाल्यावर त्यांनी दुकान विकलंच पण हे मला उशिरा समजलं आणि नंतर त्या देवाघरी गेल्याची बातमी पेपर मधे वाचली. माझी वडे खायची सुरुवात इथून होते, सर्व family रामनगर मधे वेटिंग वर उभे राहून खायचो, कधी समोर नवरे चाळ होती त्यावर मोर नाचलेला पण दिसायचा. रम्य ते दिवस, रम्य त्या आठवणी.

बाकी लिहिते नंतर.

एकंदरीत जोशी वडेवाले (म्हणजे त्यांचे वडे) कुणालाच फारसे आवडत नाहीत असं दिसतंय. Happy
टिळक स्मारकच्या कँटीनचा वडाही चांगला असायचा. अगदी खूप वेळा नाही खाल्लाय, पण जेव्हा खाल्ला तेव्हा आवडला.

दिवेआगरला समुद्रावरून परत येताना कोपऱ्यावर एक वडापावची गाडी आहे. पाटील बहुतेक त्यांचं आडनाव. तिथला वडापाव हमखास खाल्ला जातो नेहमी. मस्त झणझणीत असतो.

हाव मंगन. कुठी कुठी फिरल्याले दिसता तुम्ही. > मनी जन्मभूमी, गाव बठ्ठ नांदेड मराठवाडामा शे, शाळा जयगाव खानदेश, कॉलेज चोपडा, हल्ली मुक्काम अन नोकरी पुनामा शे. मंधमा म्हैसूर कर्नाटकमा बी राही येल शे अडीज साल.

घाशीलालना वडा म्हणजे दुसरा दिन सकायले डायरेक जलजला! जेसनी पचाडानी ताकत हुई तेसनीच तेन्हा नांद करो भो. त्येनाशिवाय आखो जयगाव गोलानीमार्केटजोयचा सकायचा रगडा, लोकप्रियनी मिसय, कोर्टाजोय आबाची चहा (आते बंद पडी जायेल शे). प्रभातची सीताफळ रबडी, प्रभात चौकना सोडा, केबीसीनं भरीत, नटराज टाकीसमोरनी कुल्फी.. हाई बठ्ठ आवडस.

आते लिखी ऱ्हाईनु त चोपडानं बी लिखी टाकस.. चोपडाम्ह ब्रेडवडा भलता खातीस लोके.. सकायले उठनं का बापू टीसमोर दोनचार नाष्टावाला रहातीस, तठुन ब्रेडवडा, नही त रस्सा पोहे खाई लिधात का डायरेक बापू टी म्हा जैशीन चहान टोकन लेवानं, तठली चहासारखी चहा आजवर कोठेच भेटेल नहीं..

२००२-०३ च्या मुंबईच्या पावसाळ्यात सीप्झ च्या गेट (गेट नंबर विसरलो..बहुधा ३) बाहेरचा भजी पाव अनेक वेळा खाल्ला.
आता हिंमत होणार नाही खायची पण तेव्हा खूप एन्जॉय केला. त्यातल्या आयसीच कंटीन मधले सगळे आवडत असे पण वडापाव मात्र आवडला नाही... कोकोनट बेस्ड चटण्या मात्र अफलातून असत सगळ्याच.

ब्रेडवडा सिंहगड ईंजि कॉलेजच्या टेकडीच्या पायथ्याच्या वडगाव बुद्रूक गावात एका राजस्थानी नाष्टा सेंटर मध्ये खूप म्हणजे खूप खाल्ला.

>>आमच्याइथे टिळकनगर चेंबुर ला ४० नंच्या इथे वडापाव मिळायचा आता तो बंद झाला. <<
बंद झलेला नाहि. माझ्या माहिती नुसार तो आता बिल्डिंग #४८ कडे लावतो. मुंबईच्या टॉप ५ मधे असायचा, आता क्ल्पना नाहि.

चांगला (गुड) वडापाव कोणिहि बनवु शकतो, पण ग्रेट वडापाव मोजकेच बनवु शकतात. टिळकनगर, किर्ती कॉलेज हे त्यातले एक...

स्वीट होमचा ब वडा मस्त असतो. त्याच्याच बरोबर मागे राहुल म्हणून एक हाटेल होते, एकदम जुनाट.. लाकडी खुर्च्या, जुनाट पंखे ..त्यांच्याकडे फक्त ब वडा आणि चा मिळे बहुदा. ब वडा चटणी आणि लिंबाची फोड , हो लिंबाची फोड Happy प्रभाचा घरी इतरांना आवडतो मला अजिबात नाही आवडत, एकतर हळद नाही आणि कव्हर आणि मसाला पण बंडल, हां माज मात्र एकदम घाऊक प्रमाणात. गार्डनचा मस्त असतो एकदम गरमागरम. कालेजात असताना आम्ही बी एम सी सी ते मनपा भवन चालत जायचो आणि त्या पैशांचा जोशी वडेवाल्याकडे वडा खायचो. त्याच्याकडे मिळणाऱ्या चटणीत अख्खे धणे असायचे, नंतर एकदम चव बिघडली. नव्या पेठेत विठठल मंदिरापुढे अप्पाचा वडा मिळायचा , ऱ्याची हातगाडी होती. मस्त असायचा, काय गर्दी व्हायची तिथे संध्याकाळी.

मी सांगतोय तो वडा अजून ग्रुपवर आला नाहीये.
बारवी डॅमला जाताना मूळगांव म्हणून गांव लागतं.
तिथे उत्तम वडा देणारी दोन दुकानं आहेत. (महाराष्ट्रीयन ढाबे वजा)
एक वैजयंता ढाबा आणि दुसरं सह्याद्री हाॅटेल.
हे दोन्ही वडे मूळगांवचा वडा म्हणून प्रसिद्ध आहेत.
लोकं नुसती वडाप्लेटही घेतात, अस्सल वड्यात पावाची भेसळ नको म्हणून, वडा-पावही खातात, वडापावच्या एकत्र चवीसाठी किंवा पोटभरीसाठी वडा-उसळही खातात. उसळ अप्रतिम असते हे वेगळे सांगणे न लगे.
वैजयंता वडा जरा जहाल असतो. थोड्या मारधाड, तडकभडक पद्धतीने बनवलेला.
सह्याद्रीचा किंचित कमी जहाल आणि घरगुती, स्थानिक, ताजी कोथिंबिर, आलं वगैरे वापरुन.
आणि सोबतचा तेलात बनवलेला मिरचीचा ठेचा दोघांचाही अप्रतिम.
आमचे काही मित्र तर ठेचा सुद्धा घरी पार्सल घेऊन जातात.

पुण्यातला अजून चविष्ट वडापाव: हत्ती गणती वरून येऊन टिळक रोड क्रॉस केला की थोड्याच अंतरावर एक हातगाडी असते. पूर्वी एक जाड चष्मा वाले अण्णा असायचे. आता त्यांचा मुलगा असतो बहुदा..

माझा आवडता वडा हा लोणावळ्याला एस्टी स्टँडच्या गल्लीत वळताना कोपऱ्यावर ए वन चिक्कीचं दुकान आहे त्याच्याच रांगेत एक गोल्डन वडापाव चं दुकान आहे. एक नंबर वडा! त्या वड्याच्या सारणात थोडासाच पुदिना घातलेला असतो. त्याचा स्वाद फार छान लागतो.>>+१. धणे टाकणं बंद केलं का त्यांनी? २०-२५ वर्षांपूर्वी वडापावचे भाव आताच्या भावांशी मिळते जुळते होते. पण अशी चव मुंबई पुण्यात काय दुबई इंग्लंडात पण नाही. गोल्डन इज गोल्डन. भुशी डॅमहून भिजून यायचं आणि मग या वडापाववर ताव मारायचा, सुख होतं. Happy

मस्त धागा!
ठाण्याचे कुंजविहार, गजानन हे नेहेमीचे होते.
आपल्या त्या ह्या कंपनीत गेट नं ३ ला (मेन रोड, लोकमत प्रेस वरून म्हापे/महापे गावात जाणारा रस्ता) संध्याकाळच्या वेळी मावशी ठेला लावायच्या. अगदी उकळत्या तेलातून काढलेले गरमागरम वडे, ताज्या तळलेल्या मिरच्या आणि ताजेच पाव. फार अफलातून लागायचं. त्यांच्याचकडे पातळ बटाट्याच्या कापांची भजीही फार सुरेख. तिथे एका ठिकाणी चहाही फार सुरेख मिळायचा.

नंतर विशिष्ट शहरात वेगवेगळे वडापाव चाखले पण नाही तितकेसे आवडले. जोश्यांचे तर अजिबातच नाही.
गार्डन चा एकदाच झाला आहे खाऊन नंतर जमलच नाही जाणं.

हो निरू, तो मुळगांव चा वडा खाल्ला आहे एकदा. सुरेख असतो.

वडापाव आणि वडा हे टोटली भिन्न मेनू आहेत.
जो वडा नुसता खायला मस्त वाटेल तोच पावात टाकून वडापाव म्हणून खायला तितकाच चांगला लागेल असे नाही.
आणि व्हायसे व्हर्सा !

आमच्या दादर फेमस उदाहरणांबाबत बोलायचे झाल्यास आयडीयल शेजारचा श्रीकृष्णचा वडा म्हणून उत्तम. पण किर्ती जवळचा वडापाव म्हणून ऊत्तम.
च्यामारी तिथे तर चुरापाव खायलाही गर्दी होते Happy

मला आमच्या शाळेच्या, राजा शिवाजी विद्यालय दादर. कॅन्टीनमधील वडा चटणी आणि कॉफी फार आवडायची.
पण त्यापेक्षा जास्त बाहेरच्या गाडीवरचा वडापाव आवडायचा. रोज म्हणजे रोज म्हणजे रोजच खायचो तो वडापाव
आणि मग नंतर कॉलेजला असताना भायखळ्याला उतरलो की ग्रॅज्युएट वडापाव खायचो.
मी जसा विजेटीआय, वालचंद आणि एसपी कॉलेजला होतो. तसेच मी किर्ती कॉलेजलाही होतो. तिथे मी जितके लेक्चर बसलोय त्याच्या दहापट वडापाव खाल्ले आहेत.

वाशीला जिथे चार वर्षे भाड्याने राहिलो तिथे समोरच गर्दी खेचणारा वडा समोसा पाव मिळायचा हे मी माझे भाग्यच समजायचो. घर घेताना त्यामुळे जवळपास चांगला वडापाव समोसापाव मिळणे हे सुद्धा माझ्या क्रायटेरीयात होते. आणि जिथे घेतलेय तिथे वॉकिंग डिस्टन्सवर बरेच छान पर्याय आहेत. जेव्हा नवीन घराचे काम चालू होते तेव्हा बायकोबरोबर रोज तिथे जायचो तेव्हा रोज आमची वडा समोसापाव पार्टी चालायची. कोरोनाला जराही ईज्जत द्यायचो नाही. कारण वडापाव आम्हा दोघांचा वीकनेस Happy

किनवट ची गोडमबी प्रसिद्ध आहे ना आणि जंगल Happy
@अजिंक्य पाटील1

कोणतं गाव? मी नाव ऐकलं असेल.. बाबांची फिरतीची नौकरी होती

@लंपन: अरे हो ! तिथल्या विठ्ठल मंदिरासमोर च आहे !
पण त्यांचं नाव तर अण्णा होतं. अप्पा कधी झाले ते ? Happy

अण्णा / अप्पा एवढ आता आठवत नाहिये, २० एक वर्ष झाली असतील. आता ती गाडी असते का ते पण बघावे लागेल. आणि ही गाडी ते फक्त सांच्याला लावायचे. ईतर वेळी तिलकला ब्रेड पॅटीस Happy

मला पण तिथला वडापाव खाऊन १५-१६ वर्ष झाली.. नंतर अधून मधून जाताना गाडी तर दिसली होती.. तिलक (टिळक) ला चहा / लिंबू सरबत दोन्ही छान मिळायचं..

@ऋन्मेष, तू ग्रॅज्युएट वडापाव खाल्ला असशील असे वाटलेच होते मला. ग्रॅज्युएट वडापाव नावामागे काही स्टोरी आहे का?

तिलकच ते. हो सरबत आणि सा. खिचडी आणि सा. वडा पण. दिवस दिवसभर क्लास असायचे. एक पॅटीस आणि चा घेतला की बराच वेळ निश्चिन्ती Happy तिथे समोर शरद तळवलकर रहायचे.

चेंबूर च्या गावठाण चा अतिशय प्रसिध्द, आणि चविष्ट..!
दादर चा श्री क्रुष्ण वडा......+१.
साईबाबा mandirakadacha (चेंबूर) वडा आणि इंपिरियल ठेयेतरच्या गल्लीतील शिवसेना वडा अफलातून.

तिलकच ते. हो सरबत आणि सा. खिचडी आणि सा. वडा पण. दिवस दिवसभर क्लास असायचे. एक पॅटीस आणि चा घेतला की बराच वेळ निश्चिन्ती Happy तिथे समोर शरद तळवलकर रहायचे. >> हो हो! नावाने आठवत नव्हते पण शरद तळवलकरांच्या घराची आठवण एकदम आलीच.
एकदा तिथे रेडिओवर भारताची कुठलीशी मॅच लाऊन खूप आरडा ओरडा ग्गोंधळ चालू होता तर ...तळवलकरांनी लुंगीवर बाहेर येऊन सगळ्यांना खूप ओरडा घातला...त्यांचे वय तेव्हा बरेच होते आणि अर्थात तेव्हा असे मोठे कोणी ओरडले की खाली मान घालून लुनाला पेडल मारून गप गुमान निघून जायचे दिवस होते.

Pages