कुठे हरवून जगलो मी

Submitted by निशिकांत on 4 October, 2020 - 10:07

कळेना सावलीलाही कुठे हरवून जगलो मी
कुठे मज जायचे होते, कुठे पोंचून जगलो मी

अहं चा कोष, श्रीमंतीस कंटाळून जगलो मी
जगाशी जोडताना नाळ आनंदून जगलो मी

कधी आश्रम, कधी प्रवचन, कधी धुंडाळली क्षेत्रे
मिळाली ना कुठे शांती, तसा उसवून जगलो मी

तिला आहेत सक्षम पंख याची आठवण देता
उडाया सोबतीने लागली, हुरळून जगलो मी

कधी ओलांडला कातळ, कधी रेतीतही फिरलो
ठशांना पावलांच्या मागुती सोडून जगलो मी

पिता वृध्दाश्रमीचा एक चिट्ठी सोडुनी गेला
" कधी काळी मुलांना सावली देवून जगलो मी "

उद्याच्या मृगजळांसाठी कशाला आज गमवावा?
म्हणोनी रोज दारी तोरणे लावून जगलो मी

पित्याचा त्रास मरणोत्तर मुलांनाही नको म्हणुनी
स्वतःच्या पिंडदानाची क्रिया उरकून जगलो मी

अशी " निशिकांत" ने केली तयारी अश्वमेधाची
हिमालय जिंकण्याचे लक्ष्यही ठेवून जगलो मी

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users