मामाडे लेनेस वलुरकेस

Submitted by डोंगरवेडा on 29 September, 2020 - 05:57

भूतकाळ - (सुमारे २१०० वर्षांपूर्वी. शकसंवताच्याही आधी सुमारे दिडशे ते दोनशे वर्षे )

गोष्ट तशी खूप पूर्वीची, पूर्वीची म्हणजे सुमारे २२०० वर्षापूर्वीची. तेव्हा तो लाखो वर्षांपासून असाच पडून होता. उन्हाळ्यात काळसर पिवळसर दिसणारं त्याचं रापलेलं शरीर पावसकाळ सुरु झाला की हिरवं हिरवं दिसू लागायचं. पाणावलेल्या खडकातनं अलगद धिटुकले कोंब बाहेर पडत. रानवेलींना धुमारे फुट लागत, विविधरंगी फुलं अलगद उमलू लागत. त्याच्या अंगाखांद्यांवरुन निर्झर खळाळत वाहात. सारी सृष्टी तजेलदार होवून अवघं अवघं चैतन्यानं भरुन जात असे. अशी सहस्त्र, लाखो वर्ष जात. अशातच एकेकाळी त्याच्या पायथ्यातून आडवाटेने एक श्रमणांचा तांडा पृथक पृथक वाट चालू लागला. त्यांच्या हाती होते फक्त छिन्नी आणि हातोडे आणि अंगी प्रचंड उर्मी काही नवं भव्य दिव्य असं निर्माण करण्याची.

श्रमणांचा तो प्रचंड तांडा बघून वानरं कल्लोळू लागली, कुणी येक ते सरसर झाडावर गेले, कुणी डोंगराच्या खबदाडीत जाऊन बसले, कुणी हळूच खडकाआडून हळूच डोके वर काढून दात विचकू लागले. श्रमण त्या डोंगराशी भिडू लागले. कुणी दोरांची शिडी करुन त्याच्याशी झट्या घेऊ लागले, कुणी खोबण्यांतून वाट काढू लागले, कुणी माथ्यावर जाऊन वेलींच्या साहाय्याने कातळास येंगू लागले, कुणी आपल्या हत्यारांनी खडकास चाचपून पाहू लागले, कुणी पुढ्यातल्या दरीचा अदमास घेऊ लागले, कुणी असे अवघें अवघें त्या भक्कम पहाडाचा वेध घेऊ लागलें.

त्यांच्यातच होता वैजयंती नगरीचा भूतपाल नामक श्रेष्ठी. वैजयंती म्हणजे आजचं कर्नाटकातलं वनवासी. आपल्या पाथरवटांसह त्याने त्या भव्य कातळी छातीचा अदमास घेतला. त्या पाथरवटांसह काही यवनी शिल्पकारही होते. त्या भव्य पहाडाच्या समोरच एक देखणं लेणं शंभर एक वर्षांपूर्वी कुणीतरी निर्मिलं होतं त्यातल्या त्रुटींवर मात्र करण्याचं आव्हान त्या भूतपालासमोर होत. त्या लेण्याची भव्य कमान खडकाचा आडोसा नसल्याने पर्जन्यधारांमध्ये कणाकणानं झिजली जात होती, तिथले खांब कलते होते. पण इथे मात्र भूतपालाला तसं नको होतं. त्याने काही आराखडे तयार केले. बुद्धाला मनोमन वंदन केलं आणि छिन्नीचा एक अलवार घाव हळूच त्या भव्य पहाडावर घातला.

भूतपाल निर्मित करत असलेल्या लेण्याला हळूहळू आकार येऊ लागला. सर्वात आधी वरची अश्वनालाकृती कमान खोदली गेली. त्यानंतर हळूहळू अंगच्याच खडकाचा आधार घेऊन गजपृष्ठाकार छत खोदण्यात येऊ लागलं, पाणी पडू नये म्हणून बाहेरची जवनिकाही खोदण्यात आली. आयोनियाहून काही यावनी शिल्पकारही आले होते. पर्सिपोलिस शहरातल्या स्तंभांच्या धर्तीवर चैत्यगृहातले स्तंभ कोरण्यात येऊ लागले. इतकं प्रचंड खर्चिक काम पाहून सामान्य लोकसुद्धा दानधर्म करु लागले. कुणी हालिक, कुणी श्रेष्ठी, कुणी व्यापारी तर कुणी राजा. पश्चिम किनार्‍याअवर धेनुकाकट इथे यवनांची मोठी वस्ती आहे. तिकडील यवनही खूप मोठा दानधर्म सुरु करु लागले.

कुणी महारठी अग्निमित्रणक सिंहस्तंभ उभारत होता.
महारठीस गोतिपुतसग्निमित्रणकस सिहथबो दानम्.

तर कुणी धेनुकाकट येथील अत्तरांचा व्यापारी दरवाजांसाठी दान देत होता.
धेनुकाकट गंधिकस सिहदतस दानम् घरमुघ.

कुणी शूर्पारकाचा सातिमित शारीर अवशेषांसह स्तंभांची देणगी देत होता.
सोपारका भयंतानं धमुतरियानं भाणकस सातिमितकस ससरीरो थबो दानम्.

तर कुण्या गृहस्थाची माता भायिला स्तंभासाठी दान देत होती.
गहतस महादेवणकस मातु भायिलाया दानम्.

ह्या सर्व लहानमोठ्या दात्यांच्या श्रमाने, कुणाच्या पैशाने एक भव्य लेणं वेगानं तयार होवू लागलं.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्तमानकाळ - शकसंवत १९३८

कार्ल्याचं लेणं खरं तर कार्ले गावाजवळ नाही. ते आहे कार्ल्यापासून ६/७ किमी अंतरावर. पायथ्याचं मूळ गाव आहे ते वेहेरगांव. हे नाव पडलंय ते वरच्या लेणीत असलेल्या विहारांमुळे. गडावर एकवीरा देवीचं मंदिर आहे. ते कधीपासून आहे ते कुणास ठाऊक. अर्थात हल्ली जे मंदिर आहे ते तसं अलीकडचं. दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं असावं. मात्र इथे खूप आधीपासून देवीचं लहानसं ठाणं असावं असं काही संशोधक मानतात. कार्ले लेणीचं मूळ नाव वलुरक. तसा शिलालेखच इथल्या लेण्यांत आहे. भव्य तिमजली विहार, काही अर्धवट खोदलेले विहार, महायान कालखंडात झालेलं काही मूर्तीकाम आणि अत्यंत देखणा असा हिनयानकालीन शैलीचं उदाहरण असलेला उत्कृष्ट चैत्य अशी ह्याची रचना. इथल्या निर्मिकांनी आपला जीव ओतूनच हे अद्भूत घडवलं असावं.

कार्ले लेणं माझ्या प्रचंड आवडीचं. इकडे अगदी जवळजवळ तीन लेणीसमूह आहेत. एक आहे विसापूरच्या मागच्या डोंगरातलं बेडश्याचं तर एक आहे समोरच असलेलं भाजे डोंगरातलं. हे तर विसापूराच्याच पोटात. ह्या तिन्ही लेण्यांची काही वैशिष्ट्यं त्यांचं वेगळंपण दाखवतात. बेडसे लेणीच्या पुढ्यातले स्तंभ अतिशय देखणे. उच्च. पर्सिपोलिटन धर्तीचे, भाजे लेणीतलं वैशिष्ट्य म्हणजे तिथली अद्भूत सूर्यगुंफा. आजही तिथल्या त्या गूढ मूर्ती कित्येकांना कोड्यात टाकतात. त्यांचं कोडं पूर्णांशानं अजूनही सुटलेलं नाही. आणि कार्ल्याचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे तिथलं चैत्यगृह. इथल्यासारखा चैत्य मी इतरत्र कुठेही पाहिलेला नाही आणि ह्याच्यापेक्षा सुंदर असलेला चैत्य इतरत्र कुठेही अस्तित्वात असणार नाही ह्याचीही मला खात्री आहे. मी अजिंठ्यातला भरजरी महायान चैत्यदेखील पाहिला आहे. पण कार्ल्यासारखा साधेपणातही विलक्षण सौंदर्य असलेला चैत्याची सर त्यालाही येत नाही. कान्हेरीतल्या चैत्यानेही ह्याची नक्कल करायचा प्रयत्न केला. पण अशी विलक्षण सुंदर वास्तू परत कधीही निर्माण करता येत नाही हेच खरे.

कार्ले चैत्याची रचना तशी सह्याद्रीत असणार्‍या सर्वसाधारण चैत्यगृहांसारखीच. पुढ्यात जवनिका, जवनिकेतल्या भिंतींवर उंचच उंच गवाक्षांसारखी रचना. मधेमध्ये युगुलं कोरलेली. ही युगुलं ह्या लेणीसाठी दानधर्म केलेल्या दात्यांची असावीत. त्यानंतर मुख्य चैत्यगृहात प्रवेश, दोन्ही बाजूंना पर्सिपोलीटन धर्तीच्या स्तंभांच्या रांगा, त्यांजवर हत्ती घोडे आणि त्यांवर बसलेली युगुलं खोदलेली. गजपृष्ठाकार छत आणि त्या छताच्या शेवटाकडे आणि दोन्ही बाजूंच्या मधोमध एक भव्य स्तूप. अगदी हर्मिकेवरील २२०० वर्ष जुन्या लाकडी छतासह अस्तित्वात असलेला. ह्याच चैत्याच्या मधल्या दरवाजाच्या उजव्या बाजूच्या पट्टीकेवर कोरलेला दिसतोय तो ऋषभदत्ताचा शिलालेख.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भूतकाळ - शकसंवत ४२

भूतपालाने निर्मिलेलं लेणं पूर्ण झालं होतं. इथली राजकीय स्थितीही बदललेही होती. आयोनिया, अरबस्तान, रोम आदी शहरांमधून येणार्‍या मणी, सोने, चांदी, रत्ने, प्रवाळ, नक्षीदार भांडी, उंची मद्यपेये इ. वस्तू समुद्रमार्गे चेऊल, कलियान शूर्पारक बंदरात येऊन पडू लागल्या होत्या. सार्थवाह बैलांच्या तांड्यावर त्या वस्तू लादून घाटमार्ग पार करू लागले व प्रतिष्ठान, तगर, नासिक, ब्रह्मपुरी आदी शहरांत येऊ लागले व तिथे त्या वस्तू देऊन तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले. ह्या वापारामुळेच सातवाहन साम्राज्य बलाढ्य होऊ लागले व त्याच सुमारास ह्या व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी येथे पश्चिमी क्षत्रपांचा प्रवेश होणे हा नियतीचाच खेळ होता. हे क्षत्रप म्हणजे कुशाणवंशीय कनिष्काने नेमलेले प्रांताधिकारी. कनिष्काने आधी कच्छ जिंकून तेथे कार्दमक वंशीय चष्टनाची नेमणूक केली तर शूर्पारकाच्या उजवीकडच्या प्रांतात अश्मकाच्या वरील भागात भूमकाची नेमणूक केली. कनिष्काच्या मृत्युनंतर कुशाण साम्राज्य कमजोर होवून हळूहळू लयास जाऊ लागले व ह्याच सुमारास क्षत्रपांची महत्वाकांक्षेने उचल खाऊ लागली. भूमकाने गुर्जर, काठेवाड, माळवा, कुकूर प्रांताचा ताबा मिळवला. भूमकाचा पुत्र नहपान हा पित्याहूनही अधिक महत्वांकांक्षी, स्वपराक्रमाने त्याने इकडील आद्य सत्ताधीशांना हळूहळू प्रतिष्ठानपावेतो ढकलत नेले. शिवस्वातीची राज्यलक्ष्मी हरण केली. हा नहपान मोठा चतुर होता. संस्कृतीविहीन, धर्मविहीन रानटी टोळ्यांतला हा शकवंशीय. पण दुसर्‍याचे राज्य हरण करतानाच इकडील सामान्य जनतेला आपलेसे करण्याचे धोरण मात्र त्याने स्वीकारले. भूमकाने केलेला राज्यविस्तार त्याने गोवर्धन जिंकून अधिक वाढवला व त्याची नजर नंतर तेथून ४० कोसांवर असलेल्या माझ्यावर पडली. मामलहार प्रांत त्याने लवकरच आक्रमिला. नहपानाने त्याची मुलगी दख्खमित्ता (दक्षमित्रा) हिचे लग्न त्याने दिनिकाचा पुत्र उशवदात (ऋषभदत्त) ह्याचेशी लावून दिले. हा उशवदात मोठा दानशूर. ह्याने जो दानधर्म केला तो मनापासून केला का केवळ इथल्या अज्ञ जनांना आपलंसं करण्यासाठी केला हे त्या पहाडाला समजणं अवघड जातंय. उशवदाताने इथे येऊन त्या डोंगरापासून पाच मैलावर असलेले करजिक (करजगाव) गाव धर्मादाय केले त्याबद्दलचा एक लेखच त्याने त्याच्या अंतर्भागात खोदलेल्या त्या भव्य लेण्याच्या एका भिंतीवर कोरून ठेवला.

सिधं | रञो खखरातस खतपस नहपानस जामातरा दीनीकपुतेन उसभदातेन...........भोजापयिता वलूरकेसु लेणवासिनं पवजितानं चातुदिसस सघसयानपथ गामो करजिको दतो सवान वासवासितानं |

राजा क्षहरात वंशीय क्षत्रप नहपान ह्याचा जावई दिनिकाचा पुत्र ऋषभदत्त ह्याने तीन हजार गाई दान दिल्या, बनासा नदीवर सुवर्णदान करुन घाट बांधला, देवांना व ब्राह्मणांना सोळा गावे दान दिली. पुण्यक्षेत्र प्रभास येथे ब्राह्मणांना ८ भार्या दान केल्या, दरवर्षी एक लाख जनांना भोजन घातले त्याने ह्या वलूरक लेण्यात वर्षाऋतूत राहणार्‍या सर्व भि़क्षूंच्या निर्वारार्थ करजिक गाव दान दिले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्तमानकाळ - शकसंवत १९३८

कार्ले चैत्यगृहामुळे मी प्रचंड आश्चर्यचकित झालेलो आहे. हे बघा बाहेरच दिसतोय तो अग्मिमित्रणकाने उभारलेला सिंहस्तंभ. अर्थात अशोकन लायन पिलर. अतिशय भव्य. घेरा इतका प्रचंड कि चार माणसांच्याही कवेत मावू शकणार नाही. महाराष्ट्रात असे अशोकस्तंभ केवळ दोनच ठिकाणी आहेत. एक इथे आणि दुसरा कान्हेरी येथे. कान्हेरी ही कार्ले चैत्याची भ्रष्ट नक्कल आहे. तिथे चैत्यगृहाच्या बाहेरील दोन्ही बाजूस असे एकेक स्तंभ आहेत. त्याजवरुन कार्ले येथेही पूर्वी अजून एक सिंहस्तंभ असावा असे वाटते. अर्थात आज केवळ एकच स्तंभ येथे शिल्लक दिसतोय. पहा ह्याची रचना तरी कशी. उंचच उंच जवळपास सोळा कोनी स्तंभ, त्यावर आमलक, त्यावर हर्मिकेची चौकट आणि त्यावर सिंहप्रतिमा. निर्विवादपणे देखणं.

aa---a

ह्या स्तंभाच्या पुढेच आपला प्रवेश जवनिकेत होतो. ती पहा ती जवनिका., आज हिचे दोन आधाराचे दोन स्तंभ पूर्णपणे तुटलेले दिसत आहेत. त्या स्तंभांच्या समोरच आहे ती चैत्याची भव्य पिंपळपानाकृती कमान. ह्या कमानीच्या बरोबर खाली एक भव्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या द्प्न्ही बाजूंना लहान लहान उपद्वारे. पहा त्या जवनिकेच्या दोन्ही बाजूंना तीन तीन भले प्रचंड गजराज दिसत आहेत. त्यांनी जणू वरचा भव्य प्रासाद आपल्या भक्कम पाठीवर तोललेला आहे. बघा ह्या हत्तींसाठी दान कोणी दिलंय ते. थेरानाम भयंत इंददेवस हथि च पुवा दो हथिनम् च उपरिमा हेथिमा च वेयिका दानम् अर्थात दोन हत्ती व हत्तींच्या वर व खाली असलेल्या वेदिकांची भदंत इंद्रदेव ह्याने दिलेली देणगी.

a

पहा ही पुष्ट युगुलं. किती देखणी आहेत ही. हीनयान शिल्पकलेचा अतिशय उत्कट अविष्कार.
कुणी एकमेकांच्या कवेत हात घालून उभं आहे तर कुणी किंचितसं फटकून उभं आहे.
a---a

कुणी उभ्याउभ्याच नमस्कार करीत आहे तर कुणी अगदी आरामात मस्तकी हात घेऊन उभं आहे.

a---a

काय देखणे विभ्रम आहेत एकेकाचे.

a

ह्यांचे वेष तरी पाहा ना. साधा, जणू ही शेतकरी कुटुंबे आहेत. पुरुषांनी मुंडासं बांधलंय. कासोटा पक्का खेचून बांधलाय. स्त्रीयांच्या कपाळी मोठा दागिना, कानांत डूल, गळ्यात माळ आणि कमरेला मेखला. साधासाच पण सुंदर वेष.

a

ह्या शिल्पांच्या वर आहे ती गवाक्षांसारखी उंचच उंच रचना. इथे अगदी त्रिमितिय आभास दिसत आहे. प्रत्येक मजल्याला वेदिकापट्टी व त्यांवर पिंपळपानाकृती गवाक्ष. असे एकावर एक मजले.

aaa

मधूनच युगुलांमध्ये बोधीसत्व, अवलोकितेश्वर आदी प्रतिमा कोरलेल्या दिसत आहेत. ही महायान शिल्पकला. बोधीसत्वाच्या ह्या मूर्ती ३र्‍या/४ थ्या शतकात येथे कोरलेल्या असाव्यात.

a

हे भव्य सौंदर्य बघून मी अगदी विस्मित होतो आहे. कितीही वेळा इकडं आलं तर मला दर वेळी नवीनच काही दिसत आहे. मागच्या वेळी निसटलेलं ह्यावेळी दिसतं तर मागच्या वेळी दिसलेलं ह्यावेळी निसटतं. हे असं नेहमीच इथं होतं. मी जणू येथे संमोहित झालो आहे. हा पहा त्या उजवीकडील दरवाजांच्या चौकटीवर शिलालेख दिसतोय तो आहे खुद्द गौतमीपुत्र सातकर्णीचा. तो महान राजासुद्धा येथे पूर्वी येऊन गेलाय. नहपानाचा संपूर्ण वंशविच्छेद केल्यावर येथीलच विजयी शिबिरातून त्याने त्या करजक गावातील भूमी धर्मासाठी दान केल्याची आज्ञा काढली असेल. तो येथेच उभा असेल जेथे मी आज उभा आहे. ह्या राजाचं महाराष्ट्रावर मोठं ऋण आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भूतकाळ - शकसंवत ४७ च्या आसपास

नहपान हा महाक्षत्रप झाल्यानंतरच सातवाहन साम्राज्य खूपच क्षीण झाले होते. पश्चिमेकडून होणार्‍या व्यापारावर शकांचे नियंत्रण प्रस्थापित झाले होते. सातवाहनांशी होणारा व्यापारच बंद पडल्यावर धनाचा ओघ वेगाने आटू लागला. सातवाहनांचे बलशाली साम्राज्य केवळ प्रतिष्ठान आणि त्याच्या आसपासचा प्रदेश इतक्या मर्यादित परिसरापुरतेच सिमीत झाले होते. शिवस्वाती सातकर्णी अतिशय नाकर्ता ठरला होता. अशातच शकसंवताच्या जवळजवळ प्रारंभीच शिवस्वाती आणि गौतमी बलश्रीच्या पोटी एक पराक्रमी पुत्र जन्माला आला, तो म्हणजे गोतमीपुतस सातकनिस अर्थात गौतमीपुत्र सातकर्णी.
जनांना संघटीत करुन ह्याने आधी बेणा (वैनगंगा) नदीकाठचा प्रदेश जिंकून घेतला आणि पौनी (पवनार) प्रदेशावर ताबा मिळविला व स्वत:स बेणाकटकस्वामी असे घोषित करुन घेतले. त्यानंतर त्याने नाशिकजवळील गोवर्धनावर स्वारी करुन नहपान क्षत्रपाचा संपूर्ण पराभव केला. गोवर्धनातील विजयी शिबिरातून त्याने जवळील त्रिरश्मी पर्वतावरील भिख्खूसंघासाठी अजकालकीय नावाच्या शेताचे दान दिले. युद्धाच्या ह्या धामधूमीत नहपान मात्र पसार झाला आणि सह्याद्रीच्या निबिड पर्वतराजीचा आश्रय घेऊन लपला. पण गौतमीपुत्राने त्याचा पाठलाग सोडला नाही. गोवर्धन ते ह्या वलुरकादरम्यानच्या सह्याद्री पर्वतात त्याचे नहपानाबरोबर तुमूळ युद्ध झाले शेवटी त्याने नहपानाचा संपूर्ण वंशविच्छेद केला व स्वतःस क्षहरातवंसनिर्वंसकरस असे म्हणवून घेतले. परकीय शकांपासून त्याने ह्या भूमीला मुक्त केले व महाराष्ट्राच्या आद्य राजवंशाची पुनर्स्थापना केली. नहपानाचा नासिक्यातील पराभव ते त्याचा सह्याद्रीत झालेला वंशसंहार ह्या घटना केवळ १५ दिवसांतच वेगाने घडून आल्या.त्यानंतर गौतमीपुत्राने वलुरक लेणीसमूहाला भेट देऊन करजक ग्राम पुन्हा धर्मादाय केले.

मामाडे अमच परगत. मसु एथ लेनेस वालुरकेस वाथवान
पवजितान भिखुन निकायस महासघियान यपनय एथ मामालारे उतरे मगे गामे करजके..........भिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि अवियेन आनत छतो विजयठसातारे दतो ठे पटिका सव १० [+] [८]

मामाड येथील अमात्य (पुरुगुप्त) यास आज्ञा करतात की येथील वलुरक लेण्यांत वास्तव्य करणार्‍या महासंघिक नामक भिक्षू संघाला निर्वाहाकरिता मामाड आहारातील उत्तरेच्या मार्गावरील करजक ग्रामात आम्ही भिक्षुहल दिले आहे म्हणून तुम्ही त्यांना त्या करजक गावातील भिक्षुहलाचा ताबा द्यावा.
या करजक ग्रामातील भिक्षुहल जमिनीच्या सवलती आम्ही देत आहोत- या जमिनीत कोणी (अधिकार्‍यांनी) प्रवेश करु नये, त्यात हस्तक्षेप करु नये तशाच अन्य सवलती दिल्या आहेत. या सर्व सवलती तुम्ही त्यांना द्याव्या आणि हा करजक गाव आणि त्याच्या भि़क्षुहलविषयक सवलती यांची नोंद तुम्ही करवावी. ही आज्ञा तोंडी दिली आहे. ती या विजयी शिबिरात राजाने दिलेली आहे. ती पट्टीका संवत्सर १८, वर्षापक्ष ४, दिवस १ या दिवशी शिवस्कंदगुप्ताने तयार केली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्तमानकाळ - शकसंवत १९३८

कार्ले येथील हे चैत्यगृह भारतातील सर्व चैत्यात सर्वात मोठे आहे. सर्वाधिक उंचीचाही हाच चैत्य असून सर्वाधिक सालंकृतही आहे. कार्ल्याच्या चैत्यगृहातील स्तंभ नक्षीदार असून साधे स्तंभ स्तूपाच्या पिछाडीस आहेत. कार्ले चैत्यातील अंतर्भागातले हे स्तंभही पर्सिपोलीटन धर्तीचे. जणू काही ते हंड्यात उभे केलेले आहेत. त्या स्तंभावंर आमलक. आमलकावर हर्मिकेसारखं चौकटीचं स्तंभशीर्ष आणि स्तंभशीर्षावर हत्तींवर आरूढ झालेली देखणी युगुलं. बरोबर समोरासमोर ह्या देखण्या स्तंभांच्या रांगा. प्रमाणात अजिबात फरक नाही. त्या स्तंभावलीच्या शेवटी भव्य असा स्तूप. त्याच्या शिरी असलेलं छत्र आजही तसंच आहे. भूतपालाने हे छत्र प्रथम चैत्यावर धरले असेल, नहपान क्षत्रप, त्याचा जावई ऋषभदत्त पत्नी दक्षमित्रासह ह्याच चैत्याला नमन करत असेल, गौतमीपुत्रानेही ह्याच चैत्याला वंदन केले असेल आणि वाशिष्ठीपुत्र पुळुवामी सुद्धा ह्याच चैत्यगृहात प्रार्थना करण्यासाठी येत असेल. आज मीही त्याच चैत्यासमोर उभा आहे, जिथे हे दिग्गज आणि कित्येक अनामिकही पूर्वी येऊन गेले असतील.

कार्ले चैत्यातील स्तंभांच्या कामासाठी धेनुकाकटच्या बर्‍याच यवनांनी देणगी दिलेली आहे. आधी मला हे धेनुकाकट म्हणजे डहाणू वाटायचं.पण नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यांतील ऋषभदत्ताच्या शिलालेखात दाहानुका ह्या नदीचा उल्लेख आलाय. ही दाहनुका म्हणजे आजच्या डहाणूतील खाडी. तेव्हा डहाणू म्हणजे धेनुकाकट हे तसे संभवत नाही. डॉ. दामोदर कोसंबींच्या मते धेनुकाकट म्हणजे आजच्या कार्ल्याजवळचेच देवघर. पण मला तर्क योग्य वाटत नाही कारण धेनुकाकटच्या यवनांनी इतर दूरच्या लेण्यांनाही देणग्या दिलेल्या आहेत. काही संशोधकांच्या मते धेनुकाकट म्हणाजे आजच्या आंध्र प्रदेशातील पूर्व किनार्‍यावरील एखादे शहर असावे. पण कार्ले लेण्यातील शिलालेखांचा काल बघता यवनांची वस्ती पूर्व किनार्‍यावर असणॅ तसे असंभाव्य वाटते तेव्हा धेनुकाकट हे पश्चिम किनार्‍यावर भडोच ते आजच्या उत्तर मुंबई दरम्यान कुठेतरी असावे असे मला ठामपणे वाटते. हे यवन नेहमीच किनार्‍याचा आश्रय धरुन राहात कारण ते हाडाचे व्यापारी होते.

पहा तरी ह्या स्तंभांना कुणी कुणी देणगी दिलीय ते.

धेनुकाकटा उसभदत पुतस मितदेवणकस थबो दानम

धेनुकाकटच्या उसभदत्ताच्या पुत्राने मित्रदेवणकाने दिलेले स्तंभाचे दान

धेनुकाकटा धंमयवनस

धेनुकाकटच्या धर्म नामक यवनाचा

धेनुकाकटशिवाय उमेहनाकटच्या यवनाने देखील येथील येथील स्तंभासाठी देणगी दिलीय

उमेहनाकटा यवनस विटसमगतानं दानं थबो

उमेहनाकट येथील यवन विटसमगत याने दान दिलेला स्तंभ

तर कुण्या गोणेकाक नामक गावातील धमुल उपासकाने देखील एक स्तंभ दान दिलेला असतो.
गोणेकाकस धमुल उपासकसं देयधंमं थंवो

कार्ले लेण्यातील जवळपास सर्वच स्तंभ शिलालेखांनी भरलेले आहेत. इतके विपुल शिलालेख कार्ले व्यतिरिक्त कान्हेरी लेणीसमूहांतही आहेत.

aaa---aa---aaa---aa---a

चैत्यातील एका स्तंभांवर बौद्धांची पवित्र चिन्हे कोरली आहेत. अशोकचक्र, स्तूप आणि अशोकस्तंभ. ही चिन्हे प्रचंड देखणी आहेत.

a

ह्याच चैत्यगृहात एका स्तंभांवर एक आश्चर्य कोरलेले आहे. ते म्हणजे स्फिंक्स. स्फिंक्स हा ग्रीक दंतकथांमधील मानवी शिर आणि शरीर सिंहाचे असलेला काल्पनिक प्राणी. इजिप्तच्या पिरॅमिड्ससमोरील स्फिंक्स तर प्रसिद्धच आहे. पण भारतातही काही लेण्यांत ह्या स्फिंक्स प्रतिमा कोरलेल्या आहेत. स्फिंक्सबरोबरच अजूनही काही काल्पनिक प्राणी इकडील लेण्यांत दिसत राहतात. पैकी स्फिंक्स, ग्रिफिन, अथेनियन घुबड मी नाशिक लेण्यांत पाहिले आहेत तर भाजे लेण्यांत मी पॅगेसस, सेंटॉर इत्यादी प्राणी कोरलेले पाहिलेले आहेत. कार्ले लेण्यात मात्र केवळ स्फिंक्स आहे आणि तोही एकमेव. हा स्फिंक्स येथे शोधणॅ तसे जिकिरीचे आहे. हा आहे स्तूपाच्या डावीकडील खांबावरच्या मागच्या बाजूस. ही जागा प्रचंड अंधारी आहे. कृत्रिम प्रकाशझोताशिवाय हा स्फिंक्स दिसणे केवळ अशक्य आणि दिसला तरी हा स्फिंक्स उंचीवर असल्याने ह्याला नीटसे टिपता येणे तसे दुर्लभ आहे. ह्या स्फिंक्सवरही एक युगुल आरुढ झालेले दिसते.

a

कार्ले चैत्यातील लाकडी फासळ्या आणि स्तूपावरील हर्मिकेवरील छत्र आजही तितकेच जुने आहे. अर्थात काही काही फासळ्या मात्र जीर्णोद्धार करताना नव्याने बसवलेल्या दिसतात. ह्या फासळ्या बसवताना दोन्ही बाजूंना आधी खाचा कोरल्या जायच्या व त्यात ह्या फासळ्या बसवल्या जायच्या. अर्धवर्तुळाकार अशा ह्या फासळ्या स्तूपानजीक गेल्यावर मात्र एकत्रित येतात व त्यामुळे स्तूप कमालीचा देखणा दिसत राहतो.

कार्ल्याचा स्तूपही भव्य. खाली जोतं जे पाताळ दर्शवतं. जोत्यावर वेदिकापट्टी. बांधीव स्तूपांवर वेदिकापट्टी ही रुंद आणि विस्तीर्ण असे ज्यावरुन चालत स्तूपाला फेरी मारणे शक्य व्हावे पण सह्याद्रीतील गिरिकुहरांत असणार्‍या कोरीव स्तूपांवर हे शक्य नाही. वेदिकापट्टीच्या वर गोलाकार अण्ड जे पृथ्वीचं प्रतिक आहे. आणि त्या अण्डावर हर्मिकेची चौकट व त्यावर सात पायर्‍या जे बौद्ध धर्मातील सप्तस्वर्गांचं प्रतिक आहे. ह्या हर्मिकेत एक छिद्र. स्तूप कोरल्यावर ह्या छिद्रात बुद्धाचे किंवा काही श्रेष्ठ बौद्ध धर्मगुरुंचे शारीर अवशेष ठेवले जात. हर्मिकेवरील ह्या छिद्रात लाकडी छत्र बसवले जाई. भाजेतील छत्र आज नाहिसे झाले आहे तर बेडसे चैत्यातील कमळाच्या फुलासारखे देखणे छत्र आजही विद्यमान आहे तर ह्या कार्ले स्तूपातील छत्र चौकोनी असून आजही तितकेच देखणे आणि त्याने जणू संपूर्ण स्तूपाला कवेत घेतल्यासारखे दिसू लागते.

aa---aa

कार्ल्याच्या ह्या चैत्यगृहाशिवाय वलुरक लेणीसमूहात इतर फारसे काही पाहण्यासारखे नाही. अर्धवट बंद केलेले तीमजली विहार, काही महायान शिल्पे आणि काही अंतरावर खोदीव विहार आणि पाण्याची काही टाकी. बस्स. पण इथल्या चैत्यगृहानेच इतके काही मानसिक समाधान दिलेले असते की इतर काही पाहायची येथे जरूरच वाटत नाही. खरोखरच ग्रॅण्ड असं.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भूतकाळ - (सुमारे २१०० वर्षांपूर्वी. शकसंवताच्याही आधी सुमारे दिडशे ते दोनशे वर्षे )

भूतपालाच्या डोळ्यांदेखतच हे भव्य लेणं पूर्ण झालं. ज्याचं स्वप्न त्यानं पाहिलं होतं ते आज सत्यात उतरलं होतं. दूरच्या द्राविड देशांतून तो केवळ असा कातळ शोधत शोधत आला होता. त्याचा तो शोध आज पूर्ण झाला होता. आपलं सर्व कसब पणास लावून त्याने एक अजोड चैत्य आज पूर्ण केला होता. अशी निर्मिती पूर्वीही कधी झाली नव्हती ह्या पुढेही कधी होणार नव्हती.

त्याने त्या चैत्यगृहातील जवनिकेच्या डाव्या बाजूच्या भिंतीत ह्या निर्मितीची नोद करुन ठेवली जी ह्यापुढेही अजून कोण्या नवशिल्पकारांना प्रेरणा देत राहावी.

वैजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्हि उतमम्

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर्तमानकाळ - शकसंवत १९३८

२१०० वर्षे उलटून गेलीत आज ह्या चैत्याला. काळाचे असंख्य घाव झेललेत ह्याने. सातवाहन, क्षत्रप, पुन्हा सातवाहन असा काळ पाहिलाय ह्याने. नहपान, ऋषभदत्त, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठीपुत्र पुळुवामि अशा महान राजांची राजवट ह्याने अगदी जवळून पाहिली आहे. ह्या चैत्यापूर्वीही कोंडाणे, ठाणाळे, भाजे आदि हिनयान चैत्यांची उभारणी झाली, ह्या चैत्यानंतरही अजिंठा, वेरुळ इथले भरजरी, प्रचंड कलाकुसर असलेले महायान चैत्य उभारले गेले. पण ह्या कुणाचीही सर इथल्या अजोड चैत्याला येत नाही. हा एकमेवाद्वितिय. ह्यासम हाच.

२१०० वर्षापूर्वी भूतपालाने खोदलेले शब्द आजही यथार्थ आहेत.

वैजयंती नगरीचा श्रेष्ठी भूतपाल ह्याने निर्माण केलेले हे शैलगृह भरतखंडात सर्वोत्कृष्ट आहे.

a

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कुशाण लोक हे भारतात येईपर्यंतच्या प्रवासात रानटी, धर्महीन, संस्कृतीहीन असे राहिले नव्हते. In fact कुशाण काळ हा गुप्तांच्या आधीचे सुवर्णयुग मानता येईल इतका समृद्ध होता.

सुरेख आणि माहितीपूर्ण लेख. याबाबतीत विषेश अभ्यास वा वाचन नसल्याने बरेच शिलालेख अजून समजलेले नाहीत असेच मला वाटायचे.
जेंव्हा पुनः जमेल तेंव्हा कार्ल्याची लेणी पुन्हा नविन दृष्टीने बघता येतील. धन्यवाद.

एक शंका - तुम्हाला माहिती असेल म्हणून विचारतो. महाराष्ट्रातले किल्ले कुणी आणि कधी बांधले आहेत. ?

@हीरा: धर्महीन, संस्कृतीहीन हे शकांच्या बाबतीत लिहिलेले आहे, कुशाणांच्या नव्हे. सुरुवातीला शक हे टोळ्यांच्या रुपात आले, इथरुकजल्यानंतर ते कुशाणांचे प्रांताधिकारी (क्षत्रप) झाले

@विक्रमसिंहः अगदी महाभारतकालापासून किल्ले बांधले गेलेले आहेत. शांतीपर्वात दुर्गांचे महत्व विस्ताराने विशद केलेले आहे. महाराष्ट्रात आजमितीस जे किल्ले दिसतात ते सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, अभीर, चालुक्य, शिलाहार. यादव, बहमनी, मराठे इत्यांदीच्या राजवटीत बांधले गेलेले दिसून येतात.