विरोधाभास

Submitted by Sameer Jirankalgikar on 29 September, 2020 - 01:00

जीवना रे काय सुंदर हा विरोधाभास आहे!
मोजके हे श्वास उरले, पण तुझी रे आस आहे.

शोधुनी बागेत साऱ्या, गंध काही सापडेना.
बोचऱ्या काट्यात आणी त्या फुलांचा वास आहे.

श्वास पुरते कोंडलेले, पण मिठी का सोडवेना?
तेच म्हणती थांब थोडे, हा सुखाचा भास आहे.

घालुनी जग पालथे हे सौख्य कोणा सापडे का?
काय वेड्या त्या मृगाला कस्तुरीचा ध्यास आहे!

रंग सारे गुंफुनीया शुभ्र वर्णी रंगलेले.
संपवी जो द्वैत सारे रंग तो ही खास आहे.

- समीर जिरांकलगीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults