थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ३

Submitted by अरिष्टनेमि on 27 September, 2020 - 09:35
sarpagarud

कोणताही प्राणी-पक्षी-किडा पुन्हा पुन्हा दिसला तरी पुन्हा पुन्हा मोह होतो फोटोचा. अगदी या सर्पगरुडाचंही तेच. मीही तयार आणि तोही हौसेनं फोटो काढून घेतो. हेच बघा ना. मागच्या भागातला अस्वलहि-याचा गरुड जसा शांत होता, तितकाच, तसाच हा काटेझरीतला. पुन्हा दिसला, अशाच शांत मूडमध्ये. काही घाई नाही.

अशाच एका पावसाळी संध्याकाळी हवा पडलेली. घामाच्या धारा. उमरझरीला हे एवढा मोठ्ठा वाघ बसून. जुने लोक म्हणत ना, गाढवाएवढा वाघ, अगदी तसाच. रिमझिम टिपटीप सुरू झाली. तिकडून परत फिरलो तर समोरच धावड्याच्या फांदीवरून सर्पगरुडानं सूर मारला उजवीकडच्या जंगलात. काही तरी धरत होता. आम्ही थांबलो. पावसाचा जोर वाढू लागला. रस्त्यात पुढं काळीचा पट्टा होता. तिथून निघणार की नाही याच्या चिंतेबरोबरच शिकार पाहण्याचा मोहपण सुटेना. जमिनीपासून सहा फुटावर आडव्या फांदीवर तो सावजावर एक डोळा ठेवून होता. कॅमेरा आज नव्हताच. पाऊस वाढत होता. अखेरीस पाऊस वाढण्यापूर्वी निघावं लागलं. नंतर जे काही अंदाधुंद झोडपलं म्हणताय पावसानं, की ज्याचं नाव ते! रातोरात नद्यांना पूर आले. असो.

तर हा सर्पगरुड, एकदा जामणी चौकातल्या नाल्यात बसला होता. मी अर्ध्या तासानं तिथून परत गेलो तरी हा तिथंच. पण त्या दिवशीपण कॅमेराच नव्हता. नेमकं त्या दिवशी मला तिथंच ग्रिझल्ड स्कीपर दिसलं, अर्जुनाच्या खाली पडून सडत आलेल्या फळावर बसलं होतं. रपट्यावरच्या रानकुत्र्यांच्या लेंडकांवर टॉनी राजा आणि ब्लॅक राजा ही दोन्ही फुलपाखरं एकत्र.

सोनकुत्र्याचं टोळकं तिथून गेलं होतं. नाल्याच्या रपट्यावरची त्यांची लेंडकंच सांगत होती. ही कुत्री अख्ख्या रस्त्यानं लेंडकं टाकत जातात.
कुंभी बोडीच्या पुढं एकदा ही नऊ कुत्र्याची टोळी रस्त्यावर मिळाली.

9E3A5753.jpg

एकानं मागचे दोन पाय हवेत उचलून शीर्षासन केलं आणि खालच्या दगडावर मुत्राचे थेंब उडवले. हा त्यांचा अजब कार्यक्रम असतो. अजून एकानं रस्त्यावर मागचे पाय वाकवून शरीरधर्म आटोपला. तोवर दुसरा आला. पहिल्याच्या विष्ठेचा वास घेतला. त्यानं उत्तेजित होऊन की काय, पण चार-आठ पावलं चालून त्यानंही दोन लेंडकं टाकली. मग तिसरा. हे चालूच. ही टोळी पुढं बरीच चालत गेली. चालत कुठली? कुत्रा चालताना कधी दिसत नाही, तो असा टुकूटुकू पळतच असतो.

मग खातोड्याच्या अलीकडं नेहमीप्रमाणेच झाडो-यात चितळं होती. तिथं हे टोळकं पसरलं. चितळाला तपास नाही रस्त्याला काय चाललंय त्याचा. पसरून काही व्यूह रचून मग हे टोळकं आपआपल्या जागा धरून आत आत जात राहिलं. पुढं आता काय घडलं हे त्या रानानंच बघितलं.

ही कुत्री जरी क्रूर आणि धाडशी मानली गेली असली तरी आक्रमक नसावीत असं दिसतं. कधी म्हणता कधी धावली नाहीत माणसावर. तशी मला मजेशीर वाटतात.

पेंचला सलाम्याजवळ दिसायची. एकदा वेणूबनाकडं गवतात चितळं होती. सलाम्याच्या पुलावर कुत्रे. यांना चितळं दिसेनात. मग जागेवरच उड्या मारायचे चितळं पाहायला. मग रस्ता सोडून उतरले.

_MG_0390.JPG

एकेकानं आपली जागा धरली आणि वेणूबनाच्या आडोशाची चितळं उधळली.

_MG_0603a.jpg

मी पुढं जाऊन आलो. तोवर वेणूबनातून यांनी एक चितळ हाकून एकटं पाडलं आणि त्याचा ताण काढला. पुलापाशीच त्याला धरून तोडलं. वरुन भुरुभुरु पाऊस.
_MG_0400.JPG

मी पोहोचेस्तोवर शेलका माल संपून कुत्री हाडातोडांना झोंबली होती.

_MG_0418.JPG

तर ताडोबातल्या त्या जामणी चौकाजवळच्या नाल्याच्या रपट्यावर या कुत्र्यांच्या विष्ठेवर टॉनी राजा आणि ब्लॅक राजा ही दोन्ही फुलपाखरं एकत्र. खरं तर ही निव्वळ त्या कुळात जन्मली म्हणून यांना ‘फुल’पाखरं म्हणायचं, नाहीतर मी यांना कायम बघत आलो वाघा-सोनकुत्र्याच्या विष्ठेवर, उदा-सारईच्या लांबोडया लेंड्यांवर. देवा रे देवा! अन नावं पण काय दिली आहेत तर ‘राजा’. कॅमेरा हाती नसल्यानं नुसता बघत बसलो. अर्थात मला ते ग्रिझल्ड स्कीपर नंतर मिळालं पांगडी रस्त्याला. तेही नाट्यमयच झालं.

मला हे स्कीपर दिसलं, उन्हाला बसलेलं. पण फोटो काढू गेलं की भुरुभुरु उडायचं. आणि मी मागं एकदा टाकलेला ‘फारसे न पाहिलेले शिकारी’ हा लेख वाचला असेल तर आठवून बघाल. कसं फुलपाखराला रॉबरं फ्लायनं हवेतच उचलून खाल्लं. तेच इथं पुन्हा घडलं. हे स्कीपर भुरभुरत पळालं आणि एका तुटक्या फांदाडाच्या वाळलेल्या पानाच्या दाटीमागून एक चतुर निघाला. भिर्रर्रर्र............... अन हे माझं लाडकं स्कीपर त्यानं धरून नेलं. मी त्याला हर्रर्र, होहोहो करूस्तोवर सफाईनं धारदार जबड्यानं स्कीपरचं मुंडकं चावून-चापलून त्याला तसंच पानावर सोडून चतुर पळून गेला.
9E3A5143.jpg

त्याच्या आयुष्यात कदाचित इतकेच दिवस लिहिलेले होते.

तो टॉनी राजासुद्धा याआधी लख्ख दिसला तो पेंचमध्ये सुरेवानीला. त्यानंतर तो पुन्हा असा जवळून म्हणाल तर पेंचमध्येच रेताडघाटला दिसला. वाघिणीच्या ताज्या विष्ठेवर होता.

रेताडघाटला वाघिणीचे ताजे पंजे. तिथंच उकेर आणि विष्ठा. त्यावर तो टॉनी राजा. हे पाहतानाच मला ते हे पण दिसलं. काय त्याचं नाव बघा.....

अशा टोकं चिकटलेल्या पाकळ्या. लांबट फूल, धोत-याच्या कळीसारखं पण लाल-तपकिरी.........

..............................

अंधार, अंधार............................

हां, आठवलं. कंदीलपुष्प. सेरोपेजिया. असं काही पटकन सांगू म्हटलं ना, की आठवतच नाही. हे असं नॉर्मल आहे का? जाऊ द्या. फूल बघा ते.

_MG_0897.JPG

फारसं न दिसणारं आहे हे. दुर्मिळ म्हणू शकतो. इथंच पहाल. याच्या अनेक प्रजाती आहेत. तुम्हालाही दिसलं कुठं तर त्याच्या नादी लागायला हरकत नाही बरं! एखादी नवीनच जात तुम्हाला सापडलेली असू शकते.

मी तर जरा काही वेगळे असे किडे, पाली, फुलं असं काही सोडत नाही. नवीनच जातीचा शोध लागलाच तर काय? मी त्यासाठी नावं पण शोधून ठेवली आहेत. बस आता फक्त असं काही सापडायचाच अवकाश. पण असं काही सापडतच नाहीये ही एक किरकोळ अशी अडचण आहे. मुळात स्वभाव शोधक असल्यामुळं मी या अडचणीवरही संशोधन केलं आहे. की बुवा असं का? आणि अचंबित करणारे निष्कर्ष हाती लागले. या सगळ्याच्या मागं फार मोठ्या परकीय शक्तीचा हात आहे. हो खर्रंर्रंय बर्का!!! इंग्लंड म्हणू नका, जर्मनी म्हणू नका, फ्रांस म्हणू नका. सगळे गोरे संशोधक आपल्या विरोधात ठाकलेत. सांगू नका कोणाला, पण या गो-या लोकांनी पद्धतशीर आपली नाकाबंदी केलेली आहे. मजबूतच. अहो कोणताही पक्षी घ्या, किडा घ्या, पाल घ्या, फुलपाखरू घ्या; या बेट्यांनी सा-यांचा शोध आधीच लावून ठेवलाय.

बघा म्हणजे, आपलं गाव कुठं? आपण चाललो कुठं? काही आहे की नाही? मस्त आपल्या गावात थंडगार हवेत शेकोटी पेटवून शेकत-शेकत चहा किंवा वारुणीचे घोट घेत बसावं सुखासुखी. तर ते नाही. खुशाल आठ-आठ, दहा-दहा हजार किलोमीटर लांब इकडं उन्हा-तान्हात करपून काळे झाले तरी आपली इकडची रानं फिरून यच्चयावत जाती शोधून टाकल्या. हा काय न्याय झाला? आम्ही आता काय शोधणार? एवढं होऊन यावर मोर्चासुद्धा कोणी काढत नाही???

असो. अपनाभी दिन आयेगा.

बाकी टॉनी राजाचा सुरेख असा हा फोटो म्हणाल तर जामुनझो-याजवळ ताडोबात मिळाला.

9E3A4722.jpg

असाच ताडोबात नेहमी दिसणारा मत्स्यगरुडपण पेंचला तोतलाडोहमध्ये इनटेकला दिसला. मी मागच्या भागात सांगायचंच विसरलो खरं. एकदा पेंचमध्ये इनटेकला उभा होतो.

या इनटेकच्या ना, भारीभन्नाट आठवणी आहेत.
इनटेकच कशाला? थेट पुढं मॅगझीन नाला, राज्यपाल रोड, तुमडीमट्टा, बोदलझिरा, पिवरथडी काय नं काय. लिहितो म्हटलं तर लांबत जातील. जाऊ द्या. आता निघालाच विषय तर सांगतो इनटेकच्या दोन.

पहिली आठवण म्हणजे एकदम सुरूवातीला आपण तो मत्स्यगरुड पाहिला होता ना, तो मी पेंचमध्ये दोन-चार वेळा छान बघितला, पण फोटो काढायला वेळच नव्हता. तर एकदा असाच इनटेकला उभा होतो. झप-झप-झप हा आला की; मत्स्यगरुड. आणि बसला समोर. बघा म्हणजे, ध्यानीमनी काही नाही हां. मी म्हटलं हे काय आलं बुवा. बघतो तर हा. पळत गाडीकडे आलो कॅमेरा काढला. लेन्स-बिन्स जोडली. पुन्हा तिकडं गेलो. हा बसूनच की. आता अशा वेळी काय आनंद होतो काय सांगू? मी मस्त आरामात त्याचे हर पोझमध्ये फोटो घेत राहिलो अन तो देत राहिला. पन्नासेक असतील. हा थोडा हावरटपणा आहे खरा. पण काय करता आता? काढलेले फोटो बघण्यापेक्षा फोटो काढणं हीच एक नशा असते. हा त्यातलाच एक.
_MG_0590_0.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खतरनाक पोझ दिलीय शेवटच्या फोटोत.
तुमच्या जंगल पाहण्याच्या अप्रोच चं कौतुक वाटतं.असा व्यासंग करण्याची इच्छा आहे.

हाही भाग मस्त! टॉनी राजा भारीच!
काढलेले फोटो बघण्यापेक्षा फोटो काढणं हीच एक नशा असते. >> हे बरोब्बर अगदी Lol मला मी काढलेले फोटो बघताना त्यात कुठे काय चुकलंय ते दिसायला लागतं.

वाह

लवकर आटोपला का हा भाग
असं वाटणं हा माझा हावरटपणा

एकेक भाग निदान पन्नास साठ पानांचा हवा

छान !

ही मालिका फार आवडली आहे, तुमच्या नजरेतून जंगल कसे 'वाचावे' हे शिकायला मिळते आहे.

प्रत्येक भाग वाचला की पुढे काय असेल याची उत्सुकता ताणली जाते.

असं खूप जाडजुड पुस्तक तयार होईपर्यंत तुम्ही लिहीत रहा ..आम्ही तुमच्या सोबत जंगलवाचन करत राहतो !!
खूप मस्त लेखमाला आणि फोटो तर क मा ल !!

छान लिहिलय..
लेखनशैली पण छानच म्हणजे वाचतेय असं न वाटता ऐकतेय असं वाटलं.. फोटोज पण सुंदर टिपलेत.

छान.
पण सामान्य पर्यटकास म्हणजे टेलिफोटोवाला क्याम्रा किंवा बाइनो न वापरणाऱ्यांना अरण्यात गेल्यास मजा येइल का? साधा मोबाईलचा क्याम्रा नेऊन?

नेहमीसारखंच अप्रतिम. एका वेगळ्याच नजरेनं जंगल बघता तुम्ही. शेवटच्या फोटोतली गरुडाची पोझ निव्वळ महान!

तुमचे लेख वाचताना आधी भरभर सगळे फोटो बघून घेऊ कि सावकाश वर्णन वाचत वाचत फोटो बघू कळत नाही Happy शेवटच्या फोटो मध्ये गरुडाने १८० डिग्री मान वळवून पोझ दिलीये ??

सुंदर फोटो, मस्त लेख.
तुमचे लेख वाचताना आधी भरभर सगळे फोटो बघून घेऊ कि सावकाश वर्णन वाचत वाचत फोटो बघू कळत नाही >> + 1

धन्यवाद वर्षा, वावे, मानव पृथ्वीकर, रॉनी, जिज्ञासा, उमा_ , टवणे सर, हर्पेन, चैत्रगंधा, प्रणवंत, अनिंद्य, विनिता.झक्कास, मी_आर्या, anjali_kool, mrunali.samad, Srd, मामी, ए_श्रद्धा, वर्णिता, सुमुक्ता

@Srd - जंगलात कॅमेरा न्यावाच असं काही नाही. कित्येक लोक केवळ नजर तृप्त करायला येतात. कॅमेरा कधीच नसतो. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की कॅमेरा नसताना जंगल जास्त मनाशी भिडतं. समजा छोटा, साधासुधा कॅमेरा जरी नेला, तरी सुरेख फोटो येतात. अर्थात तो कौशल्याचा भाग झाला.

कॅमेरा नसताना जंगल जास्त मनाशी भिडतं...
पूर्णतः सहमत. आमचा कॅमेरा अगदी साधा आहे, तो सुद्धा नवऱ्याच्या हाती, मोबाईलला बंदी. त्यामुळेच मी जंगलाचा संपूर्ण अनुभव घेऊ शकले. तुम्ही काढलेले फोटो अप्रतिम आहेतच. पण माझ्या हाती किती अत्याधुनिक कॅमेरा असला तरीही ही कला अवगत नाही, त्यामुळे कॅमेरा नसल्याचे दुःख झाले नाही.
आता पुढील ताडोबा भेटीची प्रतीक्षा...