वर्क फ्रॉम होम (लघु कथा )

Submitted by मुरारी on 24 September, 2020 - 14:13

लाॅकडाऊन सुरु झाले आणि आमच्याही टिम ला घरुन कामास बसवले. तशी माझी टिम अगदीच लहान. मी, तुषार आणि मिष्टर पाटील. तुषार वेंडर मॅनेजमेंट बघायचा आणि पाटील,व मी अकाउंट्स, मी म्हणायला म्हणून त्यांचा बाॅस होतो, बाकी ते दोघेही त्यांच्या कामात इतके तरबेज होते की कधीच कामाचा स्ट्रेस असा आला नाही.
तुषार आणि पाटील म्हणजे दक्षिण आणि उत्तर ध्रुव . तुषार ची टकळी सकाळी आँफिसात आल्यावर जी सुरु व्हायची ती जाईपर्यंत सुरुच असायची, याउलट पाटील, कामाव्यतिरिक्त एखाद दुसराच शब्द बोलले तर. तुषार बद्दल मला सगळी माहिती होती. अगदी मुलगी बघायला जाण्यापासून ते लग्न होईपर्यंत सगळे मला येऊन सांगायचा.
पाटील मात्र कधी पर्सनल आयुष्याबद्दल बोलायचे नाहीत. मी ही स्वतः हुन कधी विचारले नाही.
वर्क फ्राॅम होम सुरु झाले आणि आमचा संपर्क विडिओ काॅल वरुन व्हायला लागला. त्यानिमित्ताने लोकांची घरे दिसायची, वातावरण अजुन कॅजुअल झाले. तुषार काम करताना त्याची बायको त्याच्याच मागे तिचे काम करत बसायची, मी काॅल वर आलो की हाय हॅलो असायचे. पाटील मात्र तशाच गंभीर चेहर्याने काॅल वर यायचे.
त्यांचे घर बघुन थोडी निराशाच झाली . एकदम अंधारी खोली
असायची, उजेड कमी यायचा, मी बरेचदा त्यांना सांगायचो की पाटील अहो तुमचा चेहरा पण दिसत नाहि,लॅपटाॅप घेऊन खिडकीत तरी या, मग ते लगबगीने टेबलावरुन हलुन खिडकीत यायचे.एकदा मात्र त्यांचा मुलगा पाहिला आणि थोडेसे वाईट वाटले. त्यांच्या मागुन हळूच लपून तो लॅपटाॅप कडे बघत होता. स्पेशल चाईल्ड होता तो. वय ही बर्यापैकी मोठे वाटत होते.
मागुन त्यांची बायको पण आतबाहेर करताना दिसायची,तिही एकदम उदास पाय ओढत हळूहळू. मग प्रत्येक काॅल वेळी तो मुलगा मागुन हळूच बघत बसायचा. बिचारा.
खरेतर मी कामाशी काम ठेवायला हवे होते. पण माणसाला उत्सुकता असतेच ना. इतके दिवस पाटील का असे गप्प असायचे याचा उलगडा झाला.
दिव्यांग मुलगा आणि त्याच्या काळजीने खचलेले mr &Mrs पाटील.
आता कामशिवाय ते काहीच बोलायचे नाहीत तर मी स्वतः हुन कसे काय विचारणार. पण अलिकडे ते अजुनच खचल्यासारखे दिसायला लागले. त्यात आमचा पगार पण ५०% कापला होता.ते हि टेन्शन त्यांना असणार .
त्यात एक दिवस मला तुषार चा फोन आला.त्याने पाटलांचा विषय काढला. तुम्हाला समजले का सर, पाटील काकांनी जागा बदलली भांडुप ची. ठाण्यात गेले राहायला. मी म्हटले का रे एकदम अचानक, तुला कसे समजले? त्यांनी त्याला वाॅट्सप वर मेसेज पाठवला होता.
मला कळेना एकदम काय झाले. मी पाटलांना फोन लावला. काय पाटील काय म्हणताय, कोरोनाकाळात कुठे शिफ्टिग केलेत?Any problem?
पाटील चाचरत म्हणाले हो सर. तसा थोडा खाजगी प्राॅब्लेम झालाय.
इतके वर्ष मी असा एकटा जीव दिवसभर आॅफिस आणि रात्री दमून घरी आलो की सकाळी परत आॅफिस. सुट्टीत पुण्याला जायचो तिकडे घर आहे आपले. पण लाॅकडाऊन मध्ये इथे घरात मला भास होतात सर, तुम्ही हसण्यावारी न्याल, पण कोणतरी पाय फरफटत चालतय असे वाटते दिवसभर मी हाॅल मध्ये असलो की किचन मध्ये काहीतरी वावरतय असे वाटते. टेबलावर बसलो की मागे कुणीतरी वाकुन बघतय असे वाटायचे. असे ४ महिने काढले सर मग धीर खचला , अासपास विचारल्यावर समजले की एका बाईने तिच्या अपंग मुलाला कंटाळून याच खोलीत गळफास घेतलेला काही वर्षांपूर्वी, एवढे समजल्यावर मी कसला थांबतो, एक रात्र ही थांबलो नाही, मित्राच्या ओळखीत ठाण्यात शिफ्ट झालो.
आता कामात लक्ष लागेल.
हातातून मोबाईल कधी गळुन पडला समजले नाही, पाटील सुटले मी मात्र चांगलाच अडकलो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच fb वर एका गृप वर वाचली
कथा छान आहे
तुमची आहे न?
सगळीकडे फिरतेय कथा म्हणून विचारलं, राग नसावा

हो Happy

अरे खतरनाक ..!

विचार करतोय कि कॉलवरच त्याने विचारले असते की छोटा पाटील डोकावतोय तर...

बाई दवे
असे जे जीवाला वैतागून आत्महत्या करत असतील आणि तरीही आत्मा बनून अडकत असतील तर ते किती वाईट Sad

मस्त कथा!

पाटीलबद्दल सहानुभुती वाटत असतांनाच एकदम दणका दिलात, आवडली Happy

भारीच...
आधी मला वाटलं होतं..wfh बद्दल साधीसुधी गोष्ट असावी म्हणून उशिरा वाचली पण हि तर हॉन्टेड कथा निघाली...
मजा आली वाचायला...

बाब्बो,
प्रत्येकाने इथे प्रतिसाद देताना मागे बघत जा, न जाणो कोणी डोकावुन तुमचा प्रतिसाद वाचत उभा असु शकतो. खासकरुन रात्री.
आणी हो पाय फरफटत असल्यासारखा आवाज आला तर दुर्लक्ष करु नका.
लॉकडावनात कुठे घर बदलत बसाल?????

छान आहे कथा. पण मला एक शंका आहे की लॉकडाऊन मध्ये पुण्याला पळायचे सोडुन पाटीलकाका मुंबैत का थांबले?
कुछ तो गडबड है दया!

भास होत असल्याने त्यावेळी ट्रॅव्हल पास मिळाला नसेल हो.
Happy
कथा भारी आहे. वपु मोड वर जाता जाता एकदम रत्नाकर मतकरी स्टाईल.

वाह... एकदम अनपेक्षित शेवट.

आता टीममधल्या ज्या लोकांच्या घरून लहान बाळांचे आवाज वगैरे येतायत त्यांना विचारुन कन्फर्म करावं की काय? Happy

Pages