ती आणि तो

Submitted by कविन on 20 September, 2020 - 09:15

आज पुन्हा त्याला 'ती' दिसली. 'तो' त्याच्या बाईकवर आणि 'ती' समोरच्या फूटपाथवर. पण आज सोबत तिची मैत्रिण नव्हती. त्या दोघी एकत्र आल्यापासून हे असं पहिल्यांदाच झालं असेल. चांगली संधी चालून आली म्हणत, तो तिला हाक मारणार इतक्यात 'ती' एका रिक्षात बसली आणि डोळ्यासमोरून एका क्षणात गायब झाली. आज तिचा पाठलाग करायचाच ठरवून, त्याने गिअर बदलला आणि सुसाट त्या दिशेने बाईक धावडवली.
चौकात आल्यावर मात्र त्याची थोडी गडबड झाली. त्याने एक दिशा पकडून त्यादिशेला बाईक वळवली खरी पण थोड्याचवेळात स्मशानभुमीच्या फाटकासमोर त्याची बाईक आली. आत चिटपाखरुही नव्हते. रस्ता तिथेच संपत असल्याने तिच्या रिक्षाने हा रस्ता पकडला नसल्याची त्याला खात्रीच पटली. जड मनाने त्याने यु टर्न घेतला, तंद्रीत अंदाज चुकून बाईक थोडी कलंडलीच. त्या क्षणी त्याचे डोळे भितीने गच्च मिटलेले होते. अंगाला घाम फ़ुटला होता पण तो पुसायचही भान त्याला नव्हतं. संपल सगळं, असं वाटत असतानाच परत कुशीवर वळावं आणि बेडच्या काठावरुन आत यावं इतक्या सहजतेने प्रतिक्षीप्त क्रिया घडून त्याने स्वत:ला आणि बाईकलाही सावरुन घेतलं. त्याने डोळे उघडून सभोवती बघितलं. 'ती' कुठेच दिसत नव्हती. 'ती' त्याच्यासाठी एक अनाकलनीय कोडं झाली होती जणू आणि हे कोडं उलगडेपर्यंत त्याला आता चैन पडणार नव्हती हे मात्र खरं.
त्याने परत डोळे मिटून 'तिला' आठवायचा प्रयत्न केला. त्याला बस स्टॉपवर झालेली त्यांची पहिली भेट आठवली. त्याला भेट असं नाही म्हणता येणार कारण तेव्हा फक्तं त्याला 'ती' दिसली होती. तिने त्याला बघितलं होतं की नाही हे नाही सांगता येणार. पण डबडबलेल्या डोळ्यांनी, मुसमूसत फोनवर नुसतं ’ह्म्म’, ’ह्म्म’ ’ओके’ असं बोलणारी 'ती' मात्र त्याच्या लक्षात राहिली.
त्यानंतरही दोन चार वेळा त्याला 'ती' दिसली होती. सुरवातीला एकटी आणि उदास असलेली 'ती', मग तिच्या मैत्रिणीच्या तिच्या आयुष्यातल्या प्रवेशानंतर खुलत गेलेली 'ती'. दरवेळी त्याला तिच्या आयुष्यातली एक एक घटना उलगडत जायची आणि त्यासोबत 'ती' अजून थोडी कळत जायची.
त्याच्याही नकळत 'तिने' त्याच्या मनाचा मोठा भाग व्यापून टाकला होता. तिच्याविषयी तर्क करत अंदाज बांधायला, तिच्याशी जोडून घ्यायला त्याला आवडायचं आणि दरवेळी त्याचे अंदाज, त्याचे तर्क चुकीचे ठरवायला जणू तिला आवडायचं अशा पद्धतीने घटना घडायच्या.
आत्ताही त्याने अंदाज बांधलेल्या दिशेला ती गेलीच नव्हती. जाताना ज्या उस्ताहाने त्याने बाईक रेमटवली होती त्याच्या निम्मा उस्ताह देखील या परतीच्या प्रवासात नव्हता. सहाजिकच वेगही मंदावला होता. एकीकडे मनात हजार विचार येत होते. गोंधळ वाढवत होते. ती त्यालाच का दिसते? तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना साक्षीदार म्हणून 'ती' त्यालाच का निवडते? आणि जेव्हा त्याला तिच्यापर्यंत पोहोचलो असं वाटतं तेव्हा मात्र 'ती' अलगद निसटून गेलेली असते. असं का?
प्रश्नच खूप होते सध्या. पण एकाचही समाधानकारक उत्तर मिळत नव्हत त्याला.
तोंडावर पाणी मारुन त्याने टेबलवर ठेवलेली डायरी उघडली. डायरीत तिच्याविषयी केलेल्या नोंदी वाचल्या. नवीन काही नोंदी केल्या. मैत्रिण भेटण्यापूर्वीची एकटी, उदास अशी 'ती', मैत्रिण भेटल्यानंतरची हसरी आनंदी 'ती', मैत्रिणीचं आजारपण धीराने निभावून नेणारी 'ती' आणि आज मैत्रिणीशिवायही आत्मविश्वासाने बाहेर पाऊल टाकू पहाणारी 'ती' .. पहिल्या नोंदीपासून ते आजच्या नोंदीपर्यंत एक एक बिंदू तो जोडत गेला.
असे बिंदू जोडत मग त्याने कॅनव्हासवर आकार रेखाटायला, त्या आकारांमधे रंग भरायला सुरवात केली. आता जरा कुठे 'ती' पकडीत आल्यासारखी वाटली. आज 'तीचं' स्केच तो पूर्ण करणार या विचाराने त्याने खुषीत एक शीळही घातली. त्याचा हात झरझर चालत होता. समोर स्केच उमटत होतं. पण.. पण दरवेळेसारखीच याहीवेळी शेवटी त्याची निराशाच झाली. मागचे आणि आत्ताचे डॉट्स जोडत 'ती' कळलीय असं वाटून तिचं स्केच करायला सुरू केलं खरं त्याने, पण तयार झालेलं स्केच पूर्णपणे अनोळखी व्यक्तीच होतं. तिचा फ़क्तं पुसटसा भास होता त्यात.
त्याने आता डायरी मिटून ठेवली. पेनाला टोपण लावून ते ही बाजूला ठेवून दिलं आणि सपशेल हार पत्करत टेबलवर डोकं टेकवलं.
अर्धवट जाग आणि झोपेच्या सिमारेषेवर असताना उन्हाची एक तिरीप अर्धवट उघड्या खिडकीतून डोळ्यावर आली पाठोपाठ पैजणांचा आवाज झाला, मस्क परफ़्युमचा सुगंध हवेत भरुन राहिला. अर्धमिटल्या तनात, 'मन' टक्क जागं झालं. मनाने ग्वाही दिली ’हा सुगंध नक्कीच तिचा आहे. पैजणांबद्दल खात्रीने नाही सांगता येणार पण सुगंधाबद्दल नक्कीच १००% खात्रीने सांगता येईल’
मनाने कौल देताच त्याने आजुबाजूला 'तिचा' कानोसा घ्यायला सुरवात केली. अर्धमिटल्या खिडकी मधून उन्हाचा एक पट्टा असंख्य कण स्वत:बरोबर वाहून आणत त्याच्यापर्यंत आला होता. एक सेकंदभरासाठी तो पट्टा सावलीने झाकोळला आणि त्या सेकंदभरात त्याला एक आकृती झरकन तिथून गेल्याचं त्याला जाणवलं. आता त्याने स्वत:ला ओढतच घराच्या बाहेर आणलं. अजूनही हवेत मंदसा सुगंध दरवळत होता. त्याने बिल्डींगच्या गेटच्या दिशेने बघितलं. गेटपाशी त्याला 'ती' आकृती दिसली. आकृती पाठमोरी असली तरी स्पष्ट होती. त्याच्या मनाने दिलेला कौल बरोबर होता. ती “तीच” होती. आताही ती एकटीच होती. गेटबाहेर पडता पडता एक तिरपा कटाक्ष 'तिने' तो उभा होता तिथे टाकला तेव्हा तिच्या नजरेत एक खट्याळ आव्हान होते किंवा त्याला तरी तसा भास झाला.
पण तरी आत्ता यावेळेस 'ती' तिथे त्याच्या घराबाहेर काय करत होती हा नवा प्रश्न मनात तयार झालाच होता. आज त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायचीच होती. त्याने तीन चार ढांगांमधेच गेटपर्यंतच अंतर पार केलं आणि तो देखील रस्त्यावर आला.
त्याच्यापुढे शंभर पावलांवर 'ती' होती. तिच्या चालण्यात घाई नव्हती पण तरिही त्याने त्याचा चालण्याचा वेग वाढवला. त्याला आज 'तिला' नजरेआड होऊच द्यायची नव्हती. 'ती' आता हाकेच्या अंतरावर होती. अचानक तिने १८० च्या कोनात वळण घेतलं आणि त्याच्या अगदी समोर हाताची घडी घालून 'ती' निश्चल उभी राहिली. त्याला त्याच्या वेगाला अचानक ब्रेक लावताना गडबडायलाच झालं. त्याची त्रेधा तिरपीट बघून 'तिची' मात्र चांगलीच करमणूक झाली. आपण खरच तिच्यासमोर उभे आहोत या धक्क्यातून त्याला बाहेरही येऊ न देता 'तिने' त्याच्यापुढे हस्तांदोलनासाठी हात पुढे करत म्हंटलं, “हॅलो! मिस्टर वेधस ब्रह्मे. हाऊ आर यु?"
आता सटपटायची पाळी त्याची होती. त्याचं नाव, पत्ता सगळच तिला माहिती होतं आणि इतक्या दिवसात त्याला मात्र 'ती' समजलीय असा नुसता भास होता. प्रत्यक्षात तिचं स्केच करायला सुरू केलं की दरवेळी वेगळंच स्केच आकार घ्यायचं. ज्यात 'तिचा' थोडा भास असायचा पण ते 'तीचं' नसायचं. त्याला तिचं साधं नावही ठावूक नव्हतं.
तिच्या हातात हात देऊन हस्तांदोलन करताना आता ती कोण आहे? तिला त्याच्याबद्दल इतकी माहिती कशी? हे आणि असे आणखीही बरेच प्रश्न मनात तयार झाल्याची त्याला जाणीव झाली आणि तिने हात किंचीत दाबत जेव्हा तिला याची कल्पना असल्याचं सांगितलं तेव्हा या प्रश्नांमधे नुसतीच भर पडल्याचं त्याला जाणवलं.
अजूनही तिचा हात तसाच त्याच्या हातात होता. तिने रस्ता ओलांडला तसा त्यानेही ओलांडला. कुठे जातोय हे विचारण्याचेही भान त्याला राहिले नव्हते. खरतर सध्या त्याच्या मनात हे असले काही प्रश्नच फेर धरत नव्हते. संमोहीत झाल्यासारखा किंवा झोपेत चालल्यासारखा तो 'तिच्या' सोबत चालत निघाला. एक रस्ता पार करुन ते चौकात आले. समोर तीन फाटे दिसत होते. एक फाटा त्यादिवशी ज्या फुटपाथवरुन तिने ऑटो पकडली तिथे जात होता. दुसरा त्यादिवशी तो ज्या रस्त्याने स्मशानभुमीपर्यंत गेला होता तिथे जात होता. ती त्या दोन्ही रस्त्यांकडे न वळता समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळली. तो ही तिच्यासोबत भारावल्यासारखा चालत राहिला. दोघेही चालत किनाऱ्याजवळ आले. जरा बरी कोरडी जागा बघून ती बसली. तो देखील तिच्या बाजूला बसला.
आता जरा त्याला आजूबाजूचे थोडे भान यायला सुरवात झाली. तिच्या पैंजणांची किणकीण आता समुद्राच्या लाटेच्या गाजेत मिसळून येत होती. मस्कचा सुगंध आणि समुद्रावरुन येणारा खारट सुगंध एकमेकांमधे मिसळून एक वेगळाच गंध तयार झाला होता. तो आवाज ऐकताना, तो गंध रंध्रात भरून घेताना त्याची गात्रे शहारली. तेव्हाच त्याला जाणीव झाली आज हे कोडं सुटणार.. नक्कीच. पण याक्षणी मात्र त्याला नक्की कुठून सुरवात करावी हे कळत नव्हतं. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तेव्हा ती बोटांनी वाळूत काहीतरी गिरमीटताना दिसली. नाव असेल का तिचं? मनातल्या मनात परत त्याने डायरीतल्या नोंदींमधे काही भर घातली. काही जुने नवे डॉट्स जुळवत मनातच स्केच पूर्ण करायला घेतलं. आता खरं तर असं अंदाज बांधत स्केच करायची त्याला काही गरजच नव्हती. ती त्याच्या बाजूलाच बसली होती. पण आज त्याला प्रश्न सुचत असले तरी ते घशातून बाहेर उमटत नव्हते. बराच वेळ असाच शांततेत गेल्यावर तिनेच विचारलं, “का करतोयस माझा पाठलाग?”
“जाणून घ्यायचय तुझ्याबद्दल” त्याने एकदाचा धीर एकवटून उत्तर दिलं
“का?” तिच्या या प्रश्नावर मात्र नक्की काय काय सांगाव हे कळेना त्याला. शेवटी त्याने अगदी बस स्टॉपवरच्या पहिल्या भेटीपासून सगळं सांगितलं.
“तुझ्या पहिल्या भेटीपासून मी तुझं स्केच करायला सुरवात केली पण दरवेळी तू चकवा दिलास. पूर्ण झालेलं स्केच कधीच तुझं नसायचं. त्यात तुझा भास असायचा पण ते 'तुझं' नसायचं. असं का? या प्रश्नाचं उत्तर शोधत मी 'तुझ्यापाशी' पोहोचायचो.
तू समजलीस तर स्केचही जमेल असं वाटायचं म्हणून 'तुझा' शोध घ्यायचो. पण सुरवातीला कधीच तुझा पाठलाग मी ठरवून वगैरे नाही केला. मला कळायचं नाही मी नेमका 'तू' असशील तिथेच कसा काय पोहोचायचो? तुझ्या आयुष्यातल्या टर्निंग पॉईंट्सचा मी निव्वळ लांबून का होईना पण एखादा सिनेमा बघावा तसा साक्षीदार कसा काय व्हायचो? आणि बघितलेल्या घटनांनी तुझ्या विषयी आराखडे बांधायला जायचो तर सपशेल तोंडावर आपटायचो. असं का व्हायचं याचं उत्तर शोधायला म्हणून मी नंतर तुझा पाठलाग करायला लागलो.”
माझ्या या स्पष्टीकरणावर ती फक्तं हसली.
“तुला काय वाटतं? काय असेल यामागचं लॉजीक? मुळात लॉजीक असं काही असेल का?
खरं सांगू? त्या बसस्टॉपवरच्या भेटीच्यावेळी रडवेल्या झालेल्या मला पाहून तुझा चेहरा इतका भावूक झाला होता की त्याचवेळी मला वाटलं तूच आहेस, जो टिपून घेऊ शकेल माझं पूर्ण अस्तित्व. मला जगासमोर यायचं होतं. माझ्या एकटेपणाविषयी सांगायचं होतं, माझ्या आयुष्यात मैत्रिण म्हणून आलेल्या माझ्या पेट डॉगीविषयी सांगायचं होतं. तू माझं 'माध्यम' होतास 'हे' सगळ्या जगासमोर मांडण्यासाठीचं. तू फक्तं टिपून घेणं अपेक्षीत होतं रे मला. माझ्याकडचे रंग जसे आहेत तसे दाखवायचे होते मला जगाला.
पण मधेच तुला 'तुझ्या मनातले रंग' भरून चित्र पूर्ण करावसं वाटलं आणि मग गाडं बिघडत गेलं. मग तुझं तयार झालेलं स्केच आणि मी यात बरच अंतर तयार व्हायचं.
बरं हे मात्र तुला कळायचं आणि नेमकं स्केच उतरत नाही म्हणून तुझं स्वत:वरचं चिडणं सुरू व्हायचं. मला कळायचं नाही मी नेमकं कसं समजावू तुला. शेवटी तू निर्माता आहेस आणि मी तुझी निर्मिती. तुझ्या नावाचा ’वेधसचा’ अर्थच निर्माता आहे ना! पण तू निर्माता असलास तरी माझ्यासाठी मात्र तू एक 'माध्यम' आहेस. तुला वाटतय तू माझी निवड केली आहेस, तू माझं स्केच करणार आहेस पण मी आहेच इथे. फक्तं सध्या तुझ्या मनात आहे इतकच. पण मला स्वत:चा असा आकार, रंग, गंध आहे. तुझ्याकडचे रंग, गंध, आकार बाजूला ठेवून बघितलस ना तरच तुला गवसेन मी. आणि असं गवसल्यावर मग डॉट्स जोडत स्केच करायची गरजच भासणार नाही तुला. तयार झालेल्या स्केचमधे माझा भास नसेल मग. ते पूर्णपणे माझच स्केच असेल आणि त्यावेळी तू खरच माझा निर्माता असशील आणि मी तुझी निर्मिती.
समुद्र बराच शांत वाटत होता, तिच्या शब्दांचा नाद तेव्हढा कानाला जाणवत होता. हवेतही आता खारट वास नव्हता. मस्क परफ़्युमचा गंध अगदी हलके जाणवत होता. तिचा सोनसळी रंग आभाळभर पसरला होता. आणि माझ्या समोर आता फक्तं एक कोरा कॅनव्हास होता. रंग तिचे, गंध तिचा, नाद तिचा, साज तिचा. मी फक्तं माध्यम. तिला शरण गेलो तेव्हा 'ती' समजली. आता स्केच अगदी परफ़ेक्ट येईल कारण ते 'ती' माझ्या माध्यमातून स्वत: काढेल. पण गंमत अशी की लोकांना वाटेल मी निर्माता आणि ती माझी निर्मिती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है!
आम्ही पण धावत सुटलो पाठीमागून Happy

वांह ! अखेर सागर किनारी गवसलेली निर्मिती. रूपक खूपच अप्रतिम!

>> निर्माता आणि निर्मिती मधलं नातं आणि संकल्पना ते निर्मितीमधला प्रवास छान गुंफला आहेस.

+१

व्वा !
निर्माता आणि निर्मिती मधलं नातं आणि संकल्पना ते निर्मितीमधला प्रवास छान गुंफला आहेस.>> +१