माझी ( भंगलेली ) स्वप्ने :-)

Submitted by डी मृणालिनी on 19 September, 2020 - 10:58

मी लहान असताना ( म्हणजे आताही लहानच आहे Happy ) पण खूSSप लहान असताना 'मी मोठी होऊन काय बनणार ' यावर नेहमी विचार करायचे. मोठ्या माणसांचा तर हा आवडता प्रश्न. कोणी लहान मुलं दिसलं कि हा प्रश्न हमखास विचारतातच . काही मुलांना तो अगदीच नकोसा वाटतो तर काही मुलं अगदी याच प्रश्नाची वाट पाहत असतात. मीही त्यातलीच . मला पण हा प्रश्न विचारलेला आवडायचा. दरवेळी हा प्रश्न तस्साच असला ,तरी माझं उत्तर मात्र बदलत राहायचं.
माझं पहिलं स्वप्न होतं -पायलट बनण्याचं ! एअरपोर्टवर मी तासन् तास सुटकेस गडगडत घेऊन जाणाऱ्या रुबाबदार आणि तडफदार पायलट्सना बघत बसायचे. मला त्यांचा खूप हेवा वाटायचा. एवढं मोठ्ठ विमान ते दोघेचजण कसे काय उडवत असतील बरं ?? त्यांच्या सीटवर तिन्ही बाजूंनी काचेतून त्यांना कित्ती छान दिसत असेल किनई !
पण माझं हे स्वप्न काही फार काळ टिकलं नाही . त्याचं काय झालं ,त्या दिवशी कोणते तरी विमान क्रॅश झाल्याची बातमी आली. अरेच्चा ! मी तर हा विचारच केला नाही . माझं विमान असं क्रॅश झालं तर ?!! छे छे , असे जिवावरचे खेळ नकोच . आणि तेव्हापासून मी पायलट बनण्याचा विचारच सोडून दिला.
त्याचकाळात शाहरुख खानचा 'चक दे इंडिया ' मुव्ही पाहिला. मग काय , हॉकीचं भूत डोक्यावर बसलं . सचिन ( माझा बाबा ) ने मला खेळण्यातली हॉकी स्टिक आणून दिली. दिवसभर मी हॉकीची प्रॅक्टिस ( ? ) करायचे . काही दिवसानंतर दादासोबत खेळताना हॉकी स्टिक पायाखाली येऊन धाड्कन पडले. या अपघातात बिच्चाऱ्या हॉकी स्टिकने तर कुर्बानी दिलीच पण माझं हे स्वप्नही धुळीला मिळालं . 'खेळ ' या विषयात आपण मोठं होऊन काही बनायचं नाही हे मी मनात पक्क ठरवलं .
तब्बल दोन स्वप्नांचा चुराडा झाल्यावर मला कळलं कि नक्की मला काय हवंय ! मला एक धोका नसलेलं, उगाच जीवाला त्रास न देणारं असं स्वप्न हवं होतं . मला ते लवकरच मिळालं . कंडक्टर !
मी नेहमी तिकिटांकडे खूप आकर्षित व्हायचे . अजूनही क्लास ला जाते ,तेव्हा मिळणारी तिकिटं जपून ठेवते. आता तर ती इतकी झालीयेत ,कदाचित कंडक्टर काकांकडे पण इतकी नसतील . पण आताच्या मशीनमधल्या तिकिटांमध्ये एवढी मजा नाही येत. आधी " कुठे जाणाSSर " असं कर्कश्श मोठ्यांनी ओरडत खोक्यातल्या २-३ तिकिटं डाव्या हातातल्या स्टेप्लरने टकटक करून देताना आणि उजव्या हाताने पैसे घेऊन अगडबंब पैशाच्या गड्डीमध्ये व्यवस्थित लावताना कंडक्टर काकांना बघायला मज्जा यायची. माझ्या बालमनावर कंडक्टर काकांचा हा असा प्रभाव होता. कधीकधी घरी आल्यावर एकटीच कंडक्टर - कंडक्टर खेळायचे. कंडक्टर बनण्याचं माझं हे तिसरं स्वप्न ! या व्यवसायात तसा काही धोका नव्हता .पण तरीही हे स्वप्नसुद्धा धुळीला मिळालं . त्याचं कारण दुकानदार काका .. ते हळूहळू माझ्या मनावर प्रभाव पडू लागले. दरवेळेस मम्मासोबत बाजारात जाताना दुकानदारांच्या हालचाली ,बोलण्याची लकब हे सारं मी टिपायचे . कुणी अगदीच आळशी . हळूच उठणार ,काय हवं विचारणार ,आतमध्ये जाऊन ते आणणार आणि इकडे -तिकडे बघत -बघत हळूहळू पिशवी बांधणार .
तर कुणी एकदम राजधानी एक्सप्रेस ! दुकानात पाय ठेवतो न ठेवतो तोच धाड्कन उठणार , तोंडातला लालभडक पदार्थ तोंडातच एका कोपऱ्यात ढकलून "काय हवं वयनी ? " असं विचारणार . सांगतो न सांगतो तोच विद्युत वेगाने आतमध्ये जाणार ,हवं ते घेऊन येणार ,टांगलेल्या पिशवीतून झर्रकन एक पिशवी काढणार आणि सर्रसर्र फिरवून तिला झक्कपैकी एक गाठ मारणार . हे सगळं बघायला मला खूप आवडायचं . दर महिन्याला आमच्या घरी वाणसामान आणल्यावर ते मम्मा डब्यात भरताना मी असंच खिडकीपाशी दुकान थाटायचे. पण सर्रसर्र फिरवून पिशवीला झक्कपैकी गाठ मारताना नेमकं काहीतरी खाली पडायचं. त्यातच जर रव्यासारखी गोष्ट असली तर खाल्लाच ओरडा ! मी दुकानदार बनण्याचा नादच सोडला . दरवेळेस मला नाही जमणार बुवा ओरडा खायला .
शेवटी मी द्राक्ष विक्रेता बनण्याचा निश्चय केला . द्राक्ष हे माझे आवडतं फळ ! त्यामुळे मम्मा म्हणाली " नको मृणाल , तू नेहमी तोट्यातच जाशील. " परत माझ्या स्वप्नाचा बट्ट्याबोळ उडाला.
अशी सांगायला गेले तर ,तर पुस्तकच होईल या स्वप्नाचं ! जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये मी स्वतःला पाहिलंय ! पण खरं सांगू ? आता जेव्हा कोणी मला " मग पुढे काय करणार " हा प्रश्न विचारतात ,तेव्हा अस्सा कंटाळा येतो न !
कारण १६ वर्षाच्या मुलीकडून कुणालाही कंडक्टर ,दुकानदार ,द्राक्ष -विक्रेता अशा स्वप्नांची अपेक्षाच नसते न ! त्यामुळे तशी उत्तरही देता येत नाहीत.
" अजून ठरवलं नाही " असं उत्तर दिलं तर विचारूच नका . समोरचा माणूस खूपच गंभीर मुद्रा करून म्हणतो " अजूSSन नाही ठरवलं ! " मला खरंच कळत नाही लहानपणीचा हा गमतीदार प्रश्न मोठेपणी इतका कंटाळवाणा कसा बनतो बरं ????? !
26168213_1800425376656851_1721303226394674258_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान लिहलयं.. माझा मोठा मुलगा ६ वर्षाचा होता तेव्हा बाजारात घेऊन गेले होते तेव्हा मटणाच्या दुकानदाराला पाहुन मला म्हणतो की मी मोठा झाला की मटणवाला बनेन.. बालवयातील स्वप्ने खरचं मजेशीर असतात.

शेतातील फोटो पाहून लहानपणी अशीच शेतात भाताची लावणी केल्याची आठवण ताजी झाली. खूप छान फोटो...

छान लिहिलंय.
मला ड्रायव्हर व्हायचं होतं.
आणि वेटर. लोकांकडून ऑर्डर घेऊन ती ओरडून कूकला सांगून, रुबाबात गल्ल्यावरच्या मालकाला कुणाकडून किती पैसे घ्यायचे सांगणारा.