आरोपी

Submitted by शुभम् on 16 September, 2020 - 02:30

आरोपी
      
    आयुष्याला कंटाळलाय तो .  नको झालं त्याला जगणं .  त्याने दावं घेतलं , फास बनवला  . पंख्याला लटकवला .  स्टुलवर उभारला . गळ्यात अडकवला .  तो स्टुल पायाने ढकलला .  फास आवळला  . श्वास कोंडला . त्याची तडफड झाली .  हात पाय झाडले .  शेवटी तडफड बंद झाली . त्यांची जीवनयात्रा संपली .

      दुसऱ्या दिवशी पोलिसांना मृतदेह सापडला  . त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला . प्राथमिक चौकशीनंतर आत्महत्येचा निर्वाळा दिला . केस बंद . देशात अगोदरच गोंधळ माजलेला होता .  लोक वैतागले होते . बातम्यांसाठी आपसूकच मसाला मिळाला . मुळातच तो सामान्य नव्हता , प्रसिद्ध होता .  सर्वच माध्यमांनी त्याच्या प्रकरणात रस घेतला . दिवसभर त्याच्याच बातम्या दिसू लागल्या . त्यातच कुणीतरी त्याच्या मैत्रिणीची  मुलाखत घेतली .  तिने सहजच बोलत-बोलत स्वतःला दोष दिला .  माध्यमांना तेवढेच हवं होतं . त्यांनी तिचं तेच वाक्य उचलून धरलं .  त्याच्यावर चर्चा  , वादविवाद आणि विश्लेषण द्यायला सुरुवात केली .

      बंद झालेली केस पुन्हा उघडली .   त्या मैत्रिणीची चौकशी पोलिसांनी सुरू केली . त्यांना काही सापडलं नाही  . मात्र माध्यमांनी तिला आरोपीवरून गुन्हेगार जाहीर केलं होतं . फक्त शिक्षा ठोठावनं बाकी राहिलं होतं .

"  प्रेयसीने केला प्रियकरावरचा खून
"  काळ्या जादूला बळी पडला प्रियकर
"  अच्छा सिला दिया तूने प्यार का
"  प्यार तूने क्या किया

     असे सगळे मथळे चालवुन झाले .  नंतर माध्यमांनी त्यांचे स्वतःचे संशोधक संघ बनवले आणि त्यांना खुनाचा तपास करायला सांगितला .  त्यांच्या संशोधक संघानी कुठून तरी कसे तरी पुरावे गोळा केले आणि खून कसा केला असावा हे सांगायला सुरुवात केली .  प्रत्येक वाहिनीवर प्रत्येक संशोधक संघाची वेगळी  थेरी होती .  कुणी म्हणायचं असा खुन केला ,  कुणी म्हणायचं तसा खून केला आणि कुणी म्हणायचं वेगळ्याच पद्धतीने केला .

      मात्र तिने खून केलाच नव्हता . ती निर्दोष होती .  ती मागचे काही महिने त्याच्या संपर्कातही नव्हती  . फोनवरून हिचा संपर्क नव्हता . मात्र तिला आता विचित्र स्वप्ने पडू लागली होती . तो खोलीत शांत बसला होता . ती ही तिथे होती . तिच्या हातात ते दावे होते .  तिने फास बनवला . त्याच्या गळ्यात अडकवला .  हाताने तो जोरात आवळला . त्याने हात-पाय झाडले , पण ती फास आवळतच राहिली . शेवटी त्याची तडफड बंद झाली .  नंतर तिने त्याला पंख्यावर लटकवाले .

       मागचे काही दिवस तिला असे स्वप्न पडत होते .  एक दिवशी ती स्वप्नातुन  दचकून जागी झाली . समोर टीव्ही चालू होता . ती घाबरली टीव्ही वरती बातमी चालू होती .

"  फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये सापडले प्रेयसीच्या बोटाचे ठसे .  पोलीस अटक करायला निघाले ...
" आता कुठे मिळाला न्याय , अब जा कर हुआ  इन्साफ..
" आमच्या वाहिनीच्या साततच्या दबावामुळे पोलिसांनी केली कामगिरी...

  
    बाहेर सायरनचा आवाज आला .  टीव्हीवर तिचं घर दिसत होतं .  दार उघडलं पोलिसात आले , कॅमेरे आले . तिला अटक झाली .

      कथा काल्पनिक आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users