सत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग

Submitted by बिथोवन on 14 September, 2020 - 05:09

सत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग

मोझार्ट, बिथोवन आणि बाख म्हणजे पाश्चात्य संगीतातले ब्रह्मा विष्णु आणि महेश. त्यातल्या बिथोवन वरती सत्यजित रे यांचे फार प्रेम होते. रे यांच्या ‘शाखा-प्रशाखा’ या सिनेमात नायक प्रशांत बीथोव्हनच्या संगीतानं झपाटलेला असतो. ही भूमिका सौमित्र चॅटर्जी यांनी केली आहे. या सिनेमात बिथोवन यांच्या व्हायोलीन कन्चेर्तोच्या पहिल्या मूव्हमेंटमधील एक तुकडा प्रशांत गातो तो रे यांनी गायला आहे. या चित्रपटात बाख आणि बिथोवन यांच्या संगीताचा मुक्त हस्ते उपयोग केला आहे.

इंगमार बर्गमन, सेग्रेई आयझेन्स्टाइन, चार्ल्स चॅप्लिन, फेडरिको फेलिनी, अकिरा कुरोसावा आणि चार्ल्स चॅप्लिन, अशा दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत सत्यजीत रे हे नाव (१९२१-१९९२) सहजपणे सामावलं जातं. परंतु या यादीत त्याचं नाव सुरुवातीला ठेवावं का? सर्वसाधारणपणे आजवरचे सर्वश्रेष्ठ भारतीय दिग्दर्शक म्हणून देखील त्यांना मानलं जातं. पण ते केवळ दिग्दर्शक होते का? नाही. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, पटकथा, संगीत, सिनेमाची गीतं, ग्राफिक आर्टिस्ट जाहिराततज्ज्ञ, प्रकाशक, सिनेमाचे सेट, वेशभूषा, श्रेय नामावली आणि सेट डिझाइन असं सिनेमाचं संपूर्ण वनमॅन युनिट होण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. तशी क्षमता सेग्रेई आयझेन्स्टाइन, इंगमार बर्गमन, चार्ल्स चॅप्लिन, फेडरिको फेलिनी आणि अकिरा कुरोसावा या असामान्य दिग्दर्शकांच्यामध्ये नव्हती. त्या दृष्टीने सत्यजित रे हे असामान्य अष्टपैलू ठरतात आणि म्हणून त्यांचं नाव यादीत सुरुवातीला ठेवायला हरकत नाही.

सत्यजित रे यांच्या या अष्टपैलू क्षमतेतील संगीत या क्षमतेकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आहे.
त्यांच्या ३६ चित्रपटातल्या ३० चित्रपटांना रे यांनी संगीत दिलंय. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचे ते फार मोठे ज्ञानी होते आणि त्यांच्या सिनेमात त्यांनी याचा मुक्त हस्ते वापर केला.
मोझार्टच्या सेराग्लिओ या ऑपेरातील ऑसमिन या पात्राच्या तोंडची गाणी आणि मोझार्टचाच दुसरा एक ऑपेरा ‘द मॅजिक फ्लूट’मधील पापाजेनो या पात्राची गाणी रे यांना तोंडपाठ होती.
रे लहान असताना त्यांच्या मामाच्या कडे त्यांनी बिथोवनचा व्हायोलीन कंचर्तो ऐकला. तेव्हापासून पाश्चात्त्य संगीताची त्यांना जी गोडी लागली, त्याने ते झपाटले गेले आणि बिथोवनच्या रचना आत्मसात करण्याचा त्यांनी चंगच बांधला. शांतीनिकेतनमध्ये त्यांना इंग्रजी शिकवायला जे एक जर्मन ज्युईश प्रोफेसर होते, त्यानी स्वत:चा खासगी संग्रह रे यांना ऐकायला दिला आणि पुढे त्यांनी पाश्चात्त्य संगीतात असे प्राविण्य मिळवले की बी.बी.सी. (लंडन) यांनी मोझार्टच्या डॉन जिओवानी या ऑपेरावर माहितीपट तयार करण्यासाठी रे यांना आमंत्रित केले. पाश्चात्त्य संगीतावरील त्यांच्या ज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता होती याची ही पावतीच म्हणावी लागेल. बिथोवन हा त्यांचा सर्वात आवडता संगीतकार आणि त्याचा एक अर्धपुतळा त्यांच्या पियानोवर ठेवलेला होता आणि मोझार्टची चित्रे त्यांच्या घरातील भिंतीवर लावलेली होती.

अभिजात पाश्चात्त्य संगीताचा सढळ वापर आपण आपल्या सिनेमात का केलंय या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की भारतीय संगीत आलंकारिक असल्यामुळे सौंदर्यनिर्मिती किंवा उदात्त भाव निर्माण होऊ शकतात, पण नाटय़मयता निर्माण करायची असेल तर पाश्चात्य संगीतच लागतं कारण पाश्चात्त्य संगीतात षड्ज आपल्यासारखा स्थिर नसतो, तो बदलता येतो आणि अशा बदलाला मेजर आणि मायनर स्केल्सचा वापर केला तर भावनांची आंदोलनं निर्माण करता येतात जी परस्परविरोध, संघर्ष अशा भावना व्यक्त करू शकतात.
त्यांच्या महानगर, चारुलता आणि पथेर पांचाली या चित्रपटात बिथोवनची पाचवी सिंफनी बऱ्याच वेळा वाजवली गेली आहे.

अशा सत्यजित रे यांची 'बांकुबाबुर बोंधू' या नावाची सायन्स फिवशन कथा "द एलियन" या नावाने कोलंबिया पिक्चर्स निर्माण करणार होते आणि सत्यजित रे दिग्दर्शन करणार होते. मार्लन ब्रांडो मुख्य भूमिका करणार हे निश्चित झाले होते पण मार्लन ब्रांडो नंतर नाही म्हणाला आणि पीटर सेलर्स ची वर्णी लागली. त्यानेही काही महिन्यानंतर नकार कळवला तेंव्हा त्याला सत्यजित रे यांनी खालील पत्र पाठवले.

Dear Peter, if you had wanted bigger part,

Why, you should have told me right at the start,

By disclosing it at this juncture

You have surely already punctured

The Alien- balloon

Which I dare say

Will be grounded soon

Causing a great deal of dismay

To Satyajit Ray

सत्यजित रे यांची ती स्क्रिप्ट नंतर स्टीव्हन स्पीलबर्गने ढापली आणि "इ टी" बनवला अशी वदंता आहे. अर्थात् ढापल्याबद्दल त्याने नकार दिला. याच स्क्रिप्ट वरून राकेश रोशनने कोई मिल गया हा चित्रपट बनवला.

.....

Group content visibility: 
Use group defaults