सांधण घळीतून आरपार

Submitted by अजित केतकर on 13 September, 2020 - 08:49
Sandhan

मुशाफिरी दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख टाकून इथे माझ्या बोलीचा पहिलाच प्रयत्न केला आहे. चू भू द्या घ्या..☺️

दहावीनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी आम्हा शाळकरी मित्रांची पुनर्भेट झाली. गप्पांच्या ओघात स्वैर भटकंतीची आवड जोपासलेले आम्ही ७-८ जण आपोआपच एकत्र झालो. काहींनी १५-२० तर काहींनी चक्क ८० च्या वर गड किल्ले पालथे घातलेले होते. काही अजूनही भटकंतीची नुसतीच आवड बाळगून होते. पण सगळ्यांमध्ये एक साम्य मात्र होते. ते म्हणजे सांधण घळीबद्दल कमालीची उत्सुकता. आमच्यापैकी सगळ्यांनीच तिच्याबद्दल बरेच काही वाचले आणि ऐकले होते पण अजून प्रत्यक्ष भेट दिलेली नव्हती. एकमेकांच्याकडून या घळीबद्दल नवनवीन माहिती कानावर पडल्यावर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. शेवटी ठरले, आम्हा ७-८ शाळासोबत्यांचे सांधण व्हॅलीला जायचे पक्के ठरले. सगळेच चाळीशी पार केलेले असल्याने बऱ्याच जणांना "दिव्य दृष्टी" लाभली होती तर काहींची "छपरे" उडालेली होती म्हणूनच हा दोन दिवसांचा आणि तसा कठीण ट्रेक करण्यापूर्वी एकेक दिवसाच्या काही भटकंत्या करून आमच्या शारीरिक क्षमतेचा अंदाज घेतला. सगळे या परीक्षांत पास झाल्यावर आवश्यक तयारी करून सांधण घळीचा दोन दिवसाचा हा आगळावेगळा ट्रेक करून आलो.

भटकंती करण्याची आवड असणाऱ्यांना नेहमीपेक्षा वेगळा, जरा हटके कुठला ट्रेक करायचा असेल तर सांधण घळ हा उत्तम पर्याय आहे. गम्मत म्हणजे या भटकंतीत आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो पण दम लागत नाही!!! यात इतर ठिकाणांपेक्षाही जास्त म्हणजे १०-१२ तास चालावे लागते पण कुठेच चढ चढावा लागत नाही. इथे श्रम खूप होतात पण घाम येत नाही कारण इथे ऊनच लागत नाही. म्हणूनच अशा या विशेष सांधण घळीला व्हॅली ऑफ शॅडो असेही म्हणतात. सांधण घळ म्हणजे जमिनीला खोल कातळांनाही भेदून आतपर्यंत पडलेली एक प्रचंड भेग आहे. ही भेग जमीन दुभंगून झालेली आहे की पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने खडकांची झीज होऊन झाली आहे याची कल्पना नाही पण ही घळ म्हणजे निसर्गाचा एक अदभूत चमत्कार आहे हे मात्र निश्चित. ७-८ फुटांपासून २०-२५ फुटांपर्यंत रुंदी असणाऱ्या या घळीची खोली काही ठिकाणी ३०० फुटांपर्यंत आहे. अंदाजे २ किमी लांबीच्या या घळीत ऊन खूपच थोडा वेळ असते. घळीतल्या काही भागात तर वर्षभरात एकदाही सूर्यकिरणे पोहोचू शकत नाहीत. बाकीच्या घळीत ११ वाजता सूर्योदय आणि १ वाजता सूर्यास्तही होतो ! म्हणूनच गूगल अर्थ वर कायम सावलीत असणारी ही घळ जाड काळ्या रेघेप्रमाणे उठून दिसते. वरच्या बाजूने या घळीत डोकावून पाहताना सीतामाईला धरणीमातेने पोटात घेतले तो देखावाच डोळ्यासमोर उभा राहतो आणि हीच ती जागा असावी असे वाटते. आता सीतामाईला धरणीमातेच्या पोटात गेल्यावर कसे वाटले असेल याची काहीशी झलक आपल्याला घायची असेल तर आपल्याला घळीत उतारावेच लागेल !

सांधण घळ अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा आणि घाटघर या मोठ्या जलसाठ्यांच्या मधल्या परिसरात रतनवाडीजवळच्या "साम्रद" गावापाशी आहे. हीचे नाशिकपासूनचे अंतर ९३ किमी तर मुंबई-पुण्यापासूनचे साधारण २०० किमी आहे. या घळीत पावसाळ्यात जाणे मात्र शक्य होत नाही. पावसाळ्यानंतर लगेच जाणेही खूप धोक्याचे असते. त्यामुळे सांधण घळीला भेट द्यायला नोव्हेंबर ते एप्रिल हा उत्तम काळ.

सांधणला जायचे म्हणजे सगळे भटके गडी पक्के पाहिजेत आणि त्यांची तयारीही. इतर ठिकाणी भटकताना आपण पडलो तर आपल्याला झेलायला दगडांच्या बरोबरीने गवत, पालापाचोळा आणि मातीही असते. पण या घळीत मात्र केवळ खडकांचेच साम्राज्य असल्यामुळे पाय घसरला की एकदम खडकांशीच गाठ ! म्हणूनच चांगली पकड असलेले बूट, खात्रीची नजर आणि पावलांचा पक्का अंदाज अशा बाबींना सांधण घळीच्या भटकंतीत विशेष महत्व प्राप्त होते. बरीचशी रपेट ही या खडकावरून त्या खडकावर उड्या मारतच होत असल्याने पायाच्या घोट्यापासून मानेपर्यंत सगळ्या सांध्यांची तपासणीच या भटकंतीत होत असते. त्यामुळे यापैकी कुठेही दुखापत झालेली असेल तर हा ट्रेक करण्याचे धाडस न केलेलेच बरे. ही भटकंती गावकऱ्यांच्या किंवा पक्क्या माहितगाराच्या बरोबरच करावी कारण घळ तीच असली तरी पावसाळ्यात वाटेतले शिळा, खडक जागा बदलत असतात त्यामुळे दर वर्षी वेगळ्या अडचणींना आपल्याला तोंड द्यायचे असते.

सांधण घळीला भेट द्यायची म्हणजे आपल्याला तिच्या सगळ्यात जवळच्या साम्रद गावात पहाटेपर्यंत पोहोचावे लागते. साम्रद साठी सोयीस्कर बस नसल्याने खाजगी वाहनानेच इथे पोहचणे सोपे ठरते. पुणेकर नारायणगाव - जुन्नर मार्गे साधारण ५ तासात तर नाशिककर घोटी मार्गे अवघ्या दोन तासात साम्रद गावात पोहोचू शकतात. आपण मुंबईतून शेवटच्या कसाऱ्या लोकलने निघून मध्यरात्री कसाऱ्याला आणि तेथून आधीच ठरवलेल्या जीपने पाच वाजे पर्यंत साम्रदला पोहोचतो. साम्रदला पहाटेच्या प्रसन्न वातावरणात आपण पोहोचेपर्यंत गाव जागा झालेलाच असतो. कोंबडे बांग देत असतात, आयाबहिणींची सकाळच्या कामांची लगबग, अंगणाची झाडलोट चालू असते. थोडक्यात "घनश्याम सुंदरा ..." या गाण्याचे वर्णनच आपल्याला गावात पाहायला मिळते. सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडल्यावर ती गावातली स्वच्छ हवा, थोडा शेणाचा वास, कोंबड्याचे आरवणे, गायींचे, बकऱ्यांचे, त्यांच्या पाडसांचे कानावर पडणारे आवाज या साऱ्या वातावरणाने मन अधिकच सुखावते आणि चांगलाच उत्साह वाटतो. सूर्योदयाची चाहूल लागताच सभोवतालच्या डोंगर रांगा बदलत्या प्रकाशात वेगवेगळ्या रंगछटांचा मेकअप करून दर्शन देतात व अधिकाधिक सुस्पष्ट होतात. या डोंगररांगांच्या पार्श्वभूमीवर गावाची दृश्ये फारच मोहक दिसतात. मात्र या वेळेस त्या डोंगरांना नाराज करून आपल्याला घळीत जायचे असते.
20200913_190508.jpg
गावात पोहोचल्यावर काही जण जागा मिळेल तिथे लवंडतात तर काही गावाचा फेरफटका मारायला जातात आणि त्या स्वच्छ वातावरणाचा आस्वाद घेत पोटे हलकी करून येतात ! एव्हाना चांगले उजाडलेले असते. एखाद्या कौलारू घरातून कांदे पोह्याचा वास येऊ लागतो आणि मंडळी घराबाहेरच्या ओट्यावर, अंगणात कांदे पोहे खायला जमा होतात. पोहे चहा झाल्यावर आपापल्या सॅक पाठुंगळी मारून आपण सांधण घळीचा आगळा वेगळा अनुभव घ्यायला निघतो.

साम्रद गावातून निघालो की १५-२० मिनिटातच आपण घळीजवळच्या परिसरात पोहोचतो. गाव मागे धूसर दिसत असतानाच आपण झाडीतून उजवीकडे एक वळण घेतो आणि आपल्याला घळीची झलक दिसायला लागते. हळूहळू वाटेवरचे खडे जाऊन दगड, दगड जाऊन खडक आणि खडक नाहीसे होऊन शिळा दिसू लागतात. निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत याची कल्पना येऊ लागते. माती, गवत, पालापाचोळा हे नाहीसे होऊन घळीत फक्त मोठमोठाल्या शिळांचेच साम्राज्य दिसू लागते. आपण त्यांच्यावर चढ उतार करत करत पुढे जातो आणि हळू हळू घळ उतरत जातो. दोन्ही बाजूनी डोंगराची उंची हळू हळू वाढत जाते आणि लवकरच आपल्याला दोन अजस्त्र कातळभिंतीमधून चालण्याचा विलक्षण अनुभव येऊ लागतो. साधारण अर्धा पाऊण तास चालल्यावर आपण पहिल्या पाणवठ्याशी येतो. हा साधारण १-२ फूट खोल तर १५-२० फूट लांबीचा आहे. याच्या बाजूच्या कातळावरून कपारीत हाताची बोटे अडकवत उतरत्या खडकाच्या धारेवर जेमतेम पाऊले टाकत पाय न भिजवता जात येते. पण येथे कोरडे राहण्याचा प्रयत्नात घसरून पडण्याची शक्यता असते. शिवाय कोरडे राहून राहून किती वेळ राहणार? आम्ही सांधणला गेलो होतो तेव्हा आमच्यापैकी काही जण इथून जाताना प्रयत्नपूर्वक कोरडे राहिले होते खरे. पण पुढच्याच टप्प्यात भिजण्यावाचून गत्यंतर नाही हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा ते "कोरडे" एकमेकांकडे पाहून मिश्किल हसत होते आणि "मगाशी उगाचच कसरत केली" हे पटल्याची पावती देत होते. तेव्हा खडकावरून कसरत करत न जाता खुशाल त्या गुडघाभर पाण्यातून चालत जावे हे उत्तम. तेवढीच त्या थंड पाण्याशी आपल्या शरीराची ओळख पण होते ! या बेबी टॅंक मधून निघून अर्धा तास चालतो तोच पुढच्या ३०-४० मीटर अंतरापर्यंत घळीत पाणी भरलेले दिसते. या ठिकाणी घळीची रुंदी १५-२० फूट आणि दोन्ही बाजूच्या कातळभिंती २०० फुटाच्या वर ऊंच दिसतात. पावसाळा संपल्यावर हे पाणी ४-६ फुटापर्यंत खोल असते. नंतर ते १-२ फूटांनी कमी होते. पण तळातल्या दगडांचा काहीच अंदाज येत नसल्याने मधूनच तोल जाऊन अभ्यंग स्नान होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा मानसिक आधार म्हणून बाजूला दोर लावलेला असतो. येथे सॅक कोरडी ठेवायची असेल तर खांद्यावर घेण्यावाचून पर्यंत नसतो. खिशातले पैसे, मोबाईल सॅक मध्ये ढकलायचे आणि एका हाताने सॅक खांद्यावर घेऊन दुसऱ्या हातात दोर धरत आपण जपूनच त्या थंड पाण्यात शिरायचे. पोटाला त्या थंडगार पाण्याचा स्पर्श होताच क्षणभर अंग थरथरते. तसेच स्थिरस्थावर होत खांद्यावरची सॅक सांभाळत पाण्याखाली चाचपडत आपण पुढे सरकतो. पुढच्याकडनं पायाखालच्या धोक्याच्या सूचना घेत आणि मागच्यांना त्या देत आपण सॅक सांभाळत पलीकडे पोहोचतो. सगळ्यांना सॅक घेऊन हे पाणी पार करता येतेच असे नाही. तसे झाल्यास सराईत मंडळी पाण्यात मानवी साखळी करून बाकीचांच्या सॅक भराभर पास करतात. एकदा आमच्या मागच्या ग्रुप मध्ये एक मुलगी होती. उंची जेमतेम 5 फूट पण गडी पक्की हिम्मतवाली. आम्ही बाजूला साखळीत होतो पण "पडले तरच हात द्या" असे ठासून सांगत, सावकाश पण आत्मविश्वासाने पाण्यात शिरली. पाणी खांद्याला लागले तरी पठ्ठी कोणाचाही आधार न घेता सॅक डोक्यावर धरून सावधपणे एकेक पाऊल टाकत होती. टाळ्यांच्या कडकडाटातच ती बाहेर पडली तेव्हा सगळ्यांनी तिला हात दिला. पण मदतीसाठी नव्हे तर तिच्या जिद्दीला दाद देण्यासाठी, तिचे अभिनंदन करण्यासाठी.

येथून प्रत्येक जण निथळतच बाहेर पडतो. सॅक भिजलेली नसली म्हणजे रात्री कोरडी चादर आणि कोरडे कपडे घालायला मिळणार या आनंदात असतो. पुढे अंदाजे तासभर खडकचाल केल्यावर आपण पहिल्या रॅपलिंग पॅच पाशी पोहोचतो. येथून खाली ४५-५० फुटाची खोली आणि वरती दोन्ही बाजूना २००-२५० फुटांच्या कातळ भिंती. येथूनच आपण उतरणार आहोत या विचाराने उरात धडकीच भरते. काही कारणांनी कोणाला परतायचेच असेल तर मात्र येथूनच परतावे कारण एकदा येथून खाली उतरले की सहजासहजी वर येत येत नाही म्हणजे परतीचा मार्ग बंद.

या ठिकाणी गावातल्या दोस्त मंडळींची मदत घेणे आवश्यक ठरते. या गावदोस्तांना आपल्यासारख्याच काही भटक्या मंडळींनी गिर्यारोहणाचे आवश्यक साहित्य घेऊन दिले आहे. त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने रॅपलिंग कसे करायचे ? सुरक्षेचे कोणते नियम पाळायचे ? हे सारे समजावूनही सांगितले आहे. त्यामुळे आता बरेच गावकरी या बाबतीत चांगले तयार झाले आहेत. याचा आपल्याला फायदा म्हणजे आपल्याला ही सर्व तयारी बरोबर घेऊन जावी लागत नाही. तसेच गांवकसाठी हा उत्पन्नाचा एक चांगला मार्गही मिळाला आहे. या ठिकाणी गावदोस्त मंडळी हार्नेस, हेल्मेट, रोप इ rappelling ची सर्व जय्यत तयारी करून ठेवतात. यासाठी कधी कधी थोडे थांबावे लागते तेव्हा आपल्याला निवांत घळ पाहता येते. वर आकाश केवळ एका अरुंद पट्टीपुरतेच दिसत असते. सीतामाईला शेवटी असेच दिसले असेल का काय अशी शंका मनात येते. गर्दीचा अंदाज घेऊन आवश्यकतेप्रमाणे डाव्या व उजव्या दोन्ही कातळभिंतीवर दोर सोडलेले असतात. डाव्या बाजूने गेलात तर पाय टेकवायला खाली उतरेपर्यंत कातळाचा आधार मिळतो. पण उजव्या बाजूला मात्र शेवटी १२-१५ फुटांचा cantilever / फ्री फॉल असल्याने आपण हे शेवटचे १५ फूट फक्त दोराच्या आधारावरच खाली उतरतो. म्हणूनच साधारणपणे लटपटणाऱ्या पहिलटकरांना या बाजूने उतरू दिले जात नाही. आधी उतरणाऱ्या मंडळींना हातात दोर सरकवत आणि उभ्या कातळभिंतींवर पाय दाबून उड्या मारत झरझर खाली उतरताना पाहून नवीन गाडी घाबरत घाबरत पण खूप उत्साहाने तयार होतात. नाणेघाटात पहिल्यावेळी रॅपलिंग करताना माझी उडालेली घाबरगुंडी माझ्या चांगलीच लक्षात आहे. करंगळीएवढ्या जाड दोरावर शरीराचा भार टाकायला मन धजत नव्हते पण पुढच्याच क्षणी तेच मन "दे झोकून. जा थरारून " असे सांगत होते. शेवटी लीडरच्या धाकाने शरीर मागे झुकवले आणि जीव दोरावर टांगला! मिळेल त्या खाचेवर पाय रोवून शरीर परत उभे राहण्याचा प्रयत्न करीत होते. नेमके हेच चुकतंय हे कळत होते पण वळत नव्हते. एकदा पाय सटकला आणि खांदा खडकावर आपटलाच. शेवटी पुनः एकदा धीर करून दोन्ही पाय गुडघ्यात ताठ ठेवत खडकावर लंब रेषेत दाबले आणि शरीर दोरावर तोलून धरले तोच कानावर "येस्स ", "बरोब्बर", "एकदम परफेक्ट " अशा आरोळ्या आदळल्या. वरचे शिकाऊ आणि खालचे अनुभवी टाळ्या वाजवत होते. बेले ढील सोडला तरी माझी पकड आणि पोझिशन पक्की राहिली होती. आडव्या उड्या मारत दोर हातात सरकवत झपाट्याने खाली आल्यावर मला रॅपलिंग जमल्याच्या अनेक पावत्या पाठीवर मिळत होत्या.
20200913_190702.jpg
या ठिकाणी बरेच जण रॅपलिंगचा अविस्मरणीय असा पहिलावहिला अनुभव घेतात. एकेक करत सगळेच जण दोरावर विश्वास ठेवत ५० फूट खाली घसरण्यातले थ्रिल अनुभवतात. हा अनुभव पहिल्यांदाच घेतलेल्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसतो. आता 'कुठूनही उतरू आणि कुठेही जाऊ' असा आत्मविश्वास आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा रॅपलिंग पॅच म्हणजे या भटकंतीतला सर्वात थरारक अनुभव ठरतो.

एकेक ग्रुप उतरून पुढे चालू पडतो. आता घळ हळूहळू रुंदावत जाते आणि घळीच्या शेवटी पलीकडचे झाडी असलेले डोंगर दिसू लागतात. आता पुढचे ७-८ फुटाचे रॅपलिंग पॅच मंडळी लीलया पार करतात आणि त्यांच्या खालच्या कंबरेइतक्या पाण्यातूनही बिनधास्त हसत खेळत बाहेर पडतात. एव्हाना दुपारचे दोन अडीच झालेले असतात. ऊन नसल्याने वेळेचा अंदाज येत नाही पण पोटात मात्र कावळे ओरडू लागलेले असतात. पुढच्या रॅपलिंग पॅचच्या आधी कोठेतरी बाजूला पाणी आहे हे पाहून जेवणासाठी आपण थांबतो. घळीतला एक दीड च्या सुमारास होणारा सूर्योदय आणि अडीच वाजता सूर्यास्तही झालेला आपण पाहतो !!! गावकरी मित्र लवकरच मोठाल्या डब्यातून जेवण घेऊन येतात. बेत साधाच म्हणजे 'पिठलं - भाकरी - कांदा' किंवा 'पोळ्या - बटाटा भाजी - ठेचा' असाच असतो पण त्या घळीच्या वातावरणात त्याची चव काही औरच लागते. आपण इतर वेळी साधारण जेवायची वेळ होते म्हणून जेवतो पण इथे मात्र खरमरून भूक लागलेली असते म्हणून जेवतो. अधाशासारखे सगळे जण जेवणावर तुटून पडतात. जेवणे झाल्यावर बाजूच्या झऱ्याचे पाणी पिऊन तृप्त होत आपण पुढच्या पायपिटीला निघतो. शेवटच्या रॅपलिंग पॅच पाशी पोहोचण्याच्या आधी एका कपारीतून लागते. जागा खूपच अरुंद असल्याने आपण सॅकसकट या कपारीत शिरत नाही. त्यामुळे सॅक दोराबरोबर खाली पाठवून आपल्याला त्या छोट्याशा कपारीतून दोराच्या गाठींना पकडत उतरावे लागते. उंची ८-१० फूटच असल्याने येथून सगळे पटापट बाहेर पडतात. लवकरच आपण शेवटच्या रॅपलिंग पॅचला पोहोचतो. येथे वरच्या बाजूला छोटेसे तळे आणि भोवताली अर्थातच मोठाले खडक आहेत. त्यामुळे आपला नंबर लागेपर्यंत त्या थंड पाण्यात पाय सोडत मागच्या खडकावर अंग टाकून मस्त पहुडायला छान वेळ मिळतो. दोन्ही बाजूंनी आकाशाला भिडणाऱ्या उंच काळ्याशार कातळभिंती आणि त्यातून दिसणारी निळीशार आकाशाची पट्टी पाहात आराम करण्याची मजा आणखीन कुठे मिळणार. एकदा इथे असाच पहुडलेला असताना माझ्या मनात विचार आला की वरच्या बाजूला एखाद्या गावदोस्ताने चहा नाश्त्याची गाडी टाकावी आणि रहाटावरून दोराला बांधून टोपल्यातून चहा नाश्ता खाली घळीत सोडावा. गिऱ्हाईकाने पैसेही दोराबरोबर वर पाठवावे म्हणजे हॉटेल वरती आणि गिऱ्हाईके २५० फूट खाली. येईल की नाही मजा ?

या शेवटच्या पॅचला बरेचसे फ्री रॅपलिंग करावे लागते. या पद्धतीत आपला हात सोडून आपला सम्पूर्ण ताबा वरच्या माणसाकडे द्यायचा असतो आणि तो रोप सोडेल तसे आपण उतरत जातो. हा प्रकार काही जणांच्या पचनी पडायला वेळ लागतो. त्यांचे हात रोप सोडायला लवकर तयार होत नाहीत. पण ट्रेकिंगमध्ये सगळेच जण पूर्ण विश्वास टाकायला आणि तो मिळवायला शिकतात. शेवटी या प्रकारालाही सगळे जण सरावतात आणि एकेक करत खाली पोहोचतात. इथेही आपण ३-४ फूट खोल पाण्यातच उतरतो आणि तेवढ्याच पाण्यातून ३०-३५ फूटाचे चालून चिंब भिजूनच बाहेर येतो. ज्यांना सॅक घेऊन उतरता येत नाही त्यांच्या सॅक दोरावरून खाली सोडून पाण्यात साखळी करून वरच्यावर बाहेर पास केल्या जातात. सॅक शिवाय आलेली मंडळी आपली सॅक कोरडी पोहोचली ना याची खात्री करून सुखावतात. सगळे मोठे अडथळे आपण इथे पार केलेले असतात. वेळेचे नियोजन, गावदोस्तांची साथ आणि आपल्या साथीदारांचा वेग याचा मेळ बरोबर जमला तर उन्हे झुकली असताना म्हणजे साधारण पाच वाजेपर्यंत आपण इथे पोहोचलेले असतो. पण नियोजनात काही गडबड झाली की मात्र अंधाराशी सामना करत हा पॅच उतरण्याची वेळ येते. असेच एकदा वेळेचे गणित चुकल्यामुळे आम्हाला हे रॅपलिंग अंधारात करावे लागले होते. हा अनुभव घेण्यासारखा नसला तरी सांगण्यासारखा मात्र नक्कीच आहे.

थोड्याश्या उजेडात आम्ही काही जण हा पॅच उतरून खाली आलो होतो पण अजूनही बरेच जण उतरायचे होते. एकेक जण खाली पाण्यात उतरत होता. पण अंधारामुळे पाण्याचा अंदाज येत नव्हता या सगळ्या प्रकारामुळे उरलेल्या मंडळींना जास्तच वेळ लागत होता. ज्यांना सॅक घेऊन उतरता नाही आले त्यांच्या सॅक वरच होत्या. एव्हाना जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या बॅटऱ्या बाहेर निघाल्या होत्या. काही बॅटऱ्या दोराबरोबर वर पाठवल्या. आमचा लीडर राहुल, दत्ता आणि अनिकेत वरची आघाडी सांभाळत होते. खाली आम्ही पाण्यात साखळी केली होती. यावेळी अंधार असल्याने जास्त जवळ जवळ उभे राहिलो होतो - येणाऱ्यांना आणि एकमेकांना आधार देत. विशेष म्हणजे यावेळी पहिल्या क्रमांकावर आमच्या बरोबरची शुभदा ३-४ फूट खोल पाण्यात पाय रोवून शेवट पर्यंत ठामपणे उभी होती. दोरावरून खाली आलेल्याना धीर देत पुढे आमच्या कडे सोपवत होती. मधेच वरून सोडलेल्या सॅक आमच्याकडे पास करत होती. बॅटर्यांचा उजेड डोळ्यावर पडल्यावर अंधारी येत होती पण तरीही त्या बंद करणे शक्य नव्हते. हा शो तब्बल दीड तास चालू होता. खाली उतरल्यावर विशीतली मुलगी पाण्यात उभी राहून आपल्याला गाईड करतेय, धीर देतेय हे पाहून कोणाचे धाडस झाले नाही "मला भीती वाटतेय" म्हणण्याचे. तसा पर्यायही नव्हता. पाण्यात आम्ही सांगू त्या ठिकाणी "पूर्ण विश्वासाने" पाय टाकत एकेक जण बाहेर पडत होता. बॅटऱ्यांच्या चमचमाटात rappelling चा शेवटचा सोहळा पार पडत होता. सुदैवाने सगळे धडधाकट बाहेर पडले होते. कितीही थ्रिलिंग झाला असला तरी हा शेवटचा अंक कोणालाच आवडला नव्हता.

या पाण्यातून शेवटचे भिजून बाहेर पडल्यावर पुढे खडकांचा आकार छोटा होत जातो. १५-२० मिनिटे चालल्यावर सभोवती नेहमीची माती, गवत, पालापाचोळा, झाडे-झुडुपे दिसू लागतात. वाटेत अवाजवी वेळ घालवला नसेल तर आपण संध्याकाळी साडेपाच सहा पर्यंत कॅम्प साईटला पोहोचतो आणि सगळ्यांना हायसे वाटते. तीनही बाजू डोंगरांनी वेढलेला हा काहीसा सपाटीचा भाग चांगलाच गजबजलेला असतो. ४-५ ठिकाणी चुली पेटलेल्या असतात गावकरी आपल्यासाठी चहा - जेवणाची सोय करण्यात गुंतलेले दिसतात. तंबू लागेपर्यंत एकेक जण छानसा दगड पाहून त्यावर अंग टाकतो. काही उत्साह शिल्लक असलेले तंबू लावायला गावकऱ्यांच्या मदतीला जातात. तंबू लावून झाल्यावर सगळे थोडे खाली उतरून झुळूझुळू वाहणाऱ्या ओढ्यावर हात पाय धुवून घेतात. काही हौशी त्यात "हे शेवटचे" म्हणून पुनः भिजून येतात आणि मग एकेक जण ओले कपडे बदलायला तंबूत घुसतात. एव्हाना अंधार पडायला लागतो. सभोवतालच्या डोंगरांच्या छायाकृत्या दिसू लागतात. आकाश हळूहळू चमचमत्या चांदण्यानी भरू लागते. १०-११ तास ओल्या कपड्यातून निघून स्वच्छ कोरड्या कपड्यात शिरल्यावर खूपच छान उबदार वाटते. थोड्याच वेळात छान आले घातलेला वाफाळलेला चहा समोर येतो येतो. अहाहा !!! अशा वातावरणात हा चहा स्वर्गसुख देऊन जातो. मंडळी दोन दोन, तीन तीन कप चहा हाणतात. तंबूत सॅक आणि मॅट्स लाऊन जरा आळसावतात तोच जेवण येते. तंबूत शिरल्यावर खरे तर सुस्तीच येते पण भूकही ऐकत नसल्याने सगळे जेवायला घेतात. गावकऱ्यांनी आणलेले चुलीवरचे ते गरमागरम जेवण बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातून गावातल्या तांदुळाचाच गरमागरम भात जेवणात असल्यामुळे जेवण अधिकच रुचकर लागते. भरपेट जेवणे झाल्यावर ग्रुपमध्ये थकल्यानंतरचा उत्साह दिसू लागतो तो कॅम्प फायर साठी. वाटेमध्ये घळीतून येताना "जाऊन जेवणार आणि मेल्यागत झोपणार" असं वारंवार सांगणारे अधिक उत्साहात दिसतात. विजेऱ्यांच्या उजेडात गवत, वाळक्या काटक्या गोळा करून कॅम्प फायर लागते. गाणी, भेंड्या, गप्पा-गोष्टीना जोर चढतो. वाटेतले आपापल्याच फजित्यांचे किस्से अगदी दिलखुलासपणे रंगवून सांगितले जातात. काही ग्रुप मध्ये भुताच्या गोष्टीना ऊत आलेला असतो. पण सगळेच कमालीचे दमले असल्याने ही मेहफील फार वेळ लांबत नाही. एकेक करत अकरा साडेअकरा पर्यंत सगळे गुडूप होतात आणि कॅम्प फायरही. तरीही काही गडी स्वच्छ चांदण्याचा अनुभव घेत फिरत असतात. या ठिकाणापर्यंत मानवनिर्मित कुठलाच प्रकाश पोहोचू शकत नसल्यामुळे इथल्यासारखा स्वच्छ चांदण्याचा अनुभव अन्य कुठेही मिळत नाही असे म्हणतात. खरंच आकाशात पाहिल्यावर एखाद्या काळ्या घोंगडीवर लहान मोठे तेजस्वी हिरे विखरून टाकावे असे चांदणे दिसते. चंद्र असताना त्याच्या प्रकाशात चांदण्या लाजून थोडेसे नमते घेत असल्या तरी तो नजारादेखील आभाळाचे सौंदर्य अधिकच खुलवतो.

आदल्या दिवशी इतके दमूनही सकाळी ६ वाजता छान जाग येते. स्वच्छ मोकळ्या हवेमुळे झोप लवकर पूर्ण होते असे वाटते. काहीजण तर आधीच अंधाराचा फायदा घेत हलके होऊन आलेले असतात. सकाळच्या डोंगरामागून येणाऱ्या उजेडामुळे तीनही बाजूच्या डोंगरांचे वेगळेच रूप आज पाहायला मिळते. ओढ्यावर सकाळचे कार्यक्रम उरकून पोहे चहा झाल्यावर निघायची वेळ होते. तंबू गुंडाळून गावकऱ्यांचा निरोप घेऊन आपण कॅम्प सोडतो. इथून देहणे गावाच्या वाटेत विशेष चढ उतार नाहीत. नुसतेच जंगलातून, नदीच्या कोरड्या पात्रातून दगडांवरून चालायचे असल्याने सगळे रमत गमत चालत असतात. मधेच कोणी नदीत डुंबतात तर कोणी हलके होतात... काहींचे विशेषतः मुलींचे नदीकिनारे मनसोक्त फोटो सेशन्स होतात. दोन अडीच तासातच आपण देहणे गावात पोहोचतो. आधीच सांगून ठेवलेल्या जीप ठरलेल्या वेळी हजार असतात. आपण वेळेत पोहोचलो म्हणजे लगेचच निघून आपण लोकलच्या वेळेत आसनगाव स्टेशनला पोहोचतो. एका आगळावेगळ्या भटकंतीच्या आठवणी घेऊन आपण घरी यायला निघतो ते सांधण घळीत पुन्हा यायच्या निश्चयानेच.

एखाद दुसरा "गणपती बाप्पा" आणि काही जणांच्या किरकोळ इजा सोडल्या तर आपण सगळेचजण या ट्रेकचा पुरेपूर आनंद उपभोगतो. एकमेकांवर संपूर्ण विश्वास टाकायला शिकतो तसेच तो इतरांकडून मिळवायला शिकतो. एवढा खडतर प्रवास इतके अडथळे पण कुठेही भांडण तंटा दिसत नाही. कोणाच्यातही अहं दिसत नाही. छोट्या मोठ्या अडचणीत कोणीही अनोळखी येतो आणि आपल्याला मदतीचा हात देऊन जातो. कळत नकळत आपणही अनेकांना मदतीचा हात दिलेला असतो. एकमेकाना धीर देऊन मनोधैर्य वाढवलेले असते. एकूणच सांधण घळीची भटकंती आपल्याला बरेच काही शिकवून जाते. एक मोठा अनुभव गाठीशी जमा होतो. एकूण ट्रेकमध्ये नवीन मित्रमंडळी, आनंद आणि अनुभवाच्या रूपात मिळकतच भरपूर होते. नंतर What's App वर ट्रेकचे फोटो आणि गमती जमतीच्या पोस्ट्स ओसंडून जातात. एकमेकाला जोडल्या तर कदाचित सांधण घळीपेक्षाही लांब !!!
1600000861302_image.png1600000861306_image.png

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलेय... फोटो हवे होते सोबतीला.

वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या, सांधणघळी ट्रेकच्या नव्हे तर त्याच्या मायबोलीवरील चर्चेच्या Lol

आवडले लिखाण
मला जायचे आहे अजून इथे
इतके सविस्तर वर्णन वाचून भितीच वाटायला लागली आहे जमेल की नाही म्हणून

@हर्पेन, पूर्ण घळ उतरुन दुसऱ्या बाजूने न उतरता एक ठराविक टप्पा पार करुन जिथून जास्त स्टीप उतार वगैरे सुरु होतो तिथूनच परत मागे फिरायचे हायकायनायकाय. तिथवरचा ट्रेकही धमाल आहे एकदम. परत वर साम्रदलाच यायचे भोजनादी कार्यक्रमाला

आम्ही लेडीज स्पेशल ट्रेक (महिला दिन उपक्रम) आणि लहान मुलांचा ट्रेकही नेलाय असाच सेम आणि एकदा(च) रॅपलिंगही केलय (तिन्हीवेळेला काही ना काही नवीन अनुभव जमा झाले आणि जुन्याची उजळणी झाली ती वेगळीच :D) माझ्यासारखीला जमले ते तुम्हाला तर सहज जमेल

FB_IMG_1600007541637_0.jpg

अरे वा!
आला का हा लेख इथे... Happy

(कवे, मला वाटलंच होतं तू इथे बागडणार Proud )

कवे, मला वाटलंच होतं तू इथे बागडणार Proud )>> हा लेख वाचून नॉस्टाल्जीक होऊन काल मी आणि सानिकाने बरेच जुने फोटो परत बघितले घरी, अगदी तुझ्या बरोबरच्या गोरखगडाचेही Lol सानु किती लहान होती तेव्हा, हे फोटो पाहून जाणवलं नव्याने Lol

@हर्पेन, पूर्ण घळ उतरुन दुसऱ्या बाजूने न उतरता एक ठराविक टप्पा पार करुन जिथून जास्त स्टीप उतार वगैरे सुरु होतो तिथूनच परत मागे फिरायचे हायकायनायकाय. >>>

असंकसं असंकसं Proud

मी सामरद गावातून रतनगडाला गेलो आहे. पण ही दरी तेव्हा माहीत नव्हती. एका गाववाल्याने मला वरच्या धबधब्यावरच्या खिंडीत सोडले आणि तो डावीकडच्या उतारावर गवत कापायला गेला. मी उजवीकडे तुटक्या पायऱ्यांपर्यंत जाऊन वर दरवाजाने नेढ्यापर्यंत जाऊन परत खिंडीत येऊन अमृतेश्वरला उतरलो होतो.

सामरदला पुन्हा जाऊन मला ती घळ थोडी पाहायची आहे. याचा शेवट सामरदपासून जवळच असेल तर तिकडेही जाईन. किती लांबीची आहे? घळीतले रापलिंग वगैरे करायचं नाही. तर शक्य आहे का?

आणि तुमची भटकंती कोणत्या महिन्यातली? मी साकुरली कडून वर जाण्याचा प्रयत्न केला होता पण वाट चुकल्याने परतलो होतो. मग संध्याकाळी नोव्हेंबरमध्ये ही तुफान पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी चोंढेकडून पावरहाऊसच्या मागून जुन्या घाटघर घाटाने घाटघर पोहोचून व नंतर सामरदला राहिलो. तिसऱ्या दिवशी रतनगड- अमृतेश्वर - मूरशेत -शेंडी - भंडारदरा -( एसटीने) कल्याण केलं.
पण आता सांधण एकदा पाहायची दुरूनच ठरवले आहे. बघू. जमतं का.

वॉव .. मला ट्रेकिंगची शून्य आवड आहे.. पण या दरीचे फोटो बघून तिथे जावेसे वाटते नेहमी.. कोणी आयते सोडेल तर बरे होईल...
लेख छान सविस्तर..

वॉव .. मला ट्रेकिंगची शून्य आवड आहे.. पण या दरीचे फोटो बघून तिथे जावेसे वाटते नेहमी.. कोणी आयते सोडेल तर बरे होईल...
लेख छान सविस्तर..

वॉव .. मला ट्रेकिंगची शून्य आवड आहे.. पण या दरीचे फोटो बघून तिथे जावेसे वाटते नेहमी.. कोणी आयते सोडेल तर बरे होईल...
लेख छान सविस्तर..

@ अजित केतकर
खूप सुरेख वर्णन आणि अतिशय ओघवती लिखाण शैली. केदार सुद्धा तुमच्यासारखा trekking करतो असं ऐकलंय....तुम्ही अशा वेगवेगळ्या treks चे अनुभव एक एक करत लिहीत जा, मजा येईल वाचायला !

खूप छान लेखन केलय..
संघभावना , गावकऱ्यांबरोबर मिसळून ग्रामीण समाजजीवनाच्या आनंदाच्या अनुभवाचं वर्णन , निसर्गाचं शब्दात पिक्चरस्क वर्णन... काय नाही यात..
पूर्वी गडांच्या भटकंती चा अनुभव असणाऱ्याना तर थेट प्रत्यक्ष ट्रेक घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे या लेखात...
व्वा !

पशुपत, अगदी पर्फेक्ट प्रतीसाद. Happy जिथे आपण जातो, तिथल्या गावकरी / अदिवासींची मदत घेणे व आपणही त्यांच्यात एक होऊन त्यांना काहीतरी देणे, त्यांच्या समस्या शहरी लोकां पर्यंत पोहोचवणे हे इतके जरी प्रत्येक ट्रेकर्स नी केले तर खर्‍या अर्थाने ते सहजीवन होईल.

केतकर साहेब, मस्त ट्रिप झाली की तुमची. असे अजून अनूभव असतील तर फोटोसहीत लिहा. Happy

रश्मी,
हाडाचे ट्रेकर कुवतीप्रमाणे गावकऱ्यांसाठी खूप काही करतच असतात ! त्यांच्या साठी तिथे उपलब्ध नसलेल्या वस्तू मुद्दाम घेऊन जातात... जसे की औषधे, खास ऊबदार कपडे...
वाटाड्या म्हणून मुद्दाम कोणी गावकरी बरोबर घेतात आणि भरघोस मानधन देतात...
आम्ही १९९० मधे अगम्य ट्रेकच्या वाटेवर एक आदिवासी वस्ती पाहिली होती..ज्या लोकांनी ५०.रुपयांची नोटही आयुष्यात पाहिली नव्हती...आम्ही थंडगार पाण्यासाठी त्या म्हातारी ला १०० रुपये दिले तेव्हा तिच्या डोळ्यात जो आनंद दिसला होता तो एक मोठी कायमची आठवण देऊन गेला...

सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
Srd, साम्रद गावाजवळच्या पठारावरून खाली घळ पहाता येईल. रॅपलिंग न करता अर्ध्या घळीत जाऊन साम्रद ला परत येऊ शकता. अंदाजे 2km लांबीची असेल घळ. आम्ही नोव्हेंबर, 2016 मध्ये गेलो होतो