साध्या गुन्ह्याची केवढी मोठी सजा ही !

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 September, 2020 - 01:44

हिटलर मनाची केवढी बेबंदशाही !
होकार देण्याऐवजी म्हणतेय नाही

वृद्धाश्रमांमध्ये अताशा जात नाही
येथेच नंतर यायचे आहे मलाही

नजरेत त्याच्या कैद होते नजर माझी
साध्या गुन्ह्याची केवढी मोठी सजा ही !

प्रत्येक येणारा ऋतू येतो नि जातो
त्याच्या स्मृती रेंगाळलेल्या बारमाही

प्रतिबिंब दिसते आपल्याला त्याप्रमाणे
न्याहाळतो ऐन्यात कोनातून ज्याही

जेव्हा नदीचे पात्र बघते आटलेले
सहवेदना माझ्यातली होते प्रवाही

अस्थिर जगाला का उगाचच दोष द्यावा
स्थित्यंतरे माझ्यातही झालीच ना ही ?

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users