अगम्य !... (भाग ३)

Submitted by Sujaata Siddha on 11 September, 2020 - 08:13

https://www.maayboli.com/node/76629
https://www.maayboli.com/node/76630

अगम्य !... (भाग ३)

“ क्षमा असावी कन्या ,आपण जागृत अवस्थेत आहात ना ? मी आपणाशी काही संवाद साधू शकतो काय ? रक्षक बाहेर गेलेत ,आणि आपण काही काळ संभाषण करू शकतो”
हा भद्रकच होता .
“हो.. का नाही ? , पण आधी मला इथून मुक्त करा “
“ पण आपण इथे कशा आलात आणि आपल्या येण्याचे प्रयोजन काय ,आपल्या बरोबर अजून किती सैन्य आहे , हे ज्ञात झाल्याखेरीज आपणास जाऊ देणे ईष्ट ठरणार नाही , “
“ अहो मी काही तुमची शत्रू नव्हे , उलटं तुम्ही स्वतः:ला मारून घेत होतात ते मला बघवलं नाही , मी खूप अस्वस्थ झाले , पण इथे कशी आले मला कळत नाहीये , मला .. मला सोडवा ईथुन , . , प्लिज तुमच्या त्या ज्येष्ठ बंधूंना सांगा मला माझ्या घरी जाऊ द्या “ स्वरा त्राग्याने म्हणाली .
“ आपण काहीतरी अगम्य बोलत आहात , मला सगळं ज्ञात होतंय असं नाहीये , पण आपल्या कडे काही शस्त्र नाहीये , केवळ हे पाहूनच फक्त जायबंदी केलं गेलं आहे . आपण आपल्या गुप्त कारस्थानांची स्वंयमुक्ती तसेच आपणाबरोबर जर गुप्त शस्रास्त्रं बाळगली असतील तर त्याची प्रज्ञप्ति दिल्याखेरीज आपल्याला इथून जाऊ देता येणार नाही “ भद्रकाने तिला असं म्हणताच ती उसळली ,
“ अरे भल्या माणसा , भद्रका , मी कसं सांगू तुला , मी केवळ आणि केवळ तुझ्यात नको ईतकी गुंतून गेल्यामुळे हा घोटाळा झाला आहे , पण आता मला कळलं आहे कीं नुसतं दिसायला कोणी छान असतं म्हणून प्रेमात पडणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे ,तझं आणि माझं जग यात लिटरली जमीन अस्मानाचा फरक आहे , आपलं जमणं कठीण आहे , मीच मूर्ख आहे , फँटसी हि फॅन्टसी असते त्याला एवढे इमोशन्स लावायचे नसतात , माझी आई बरोबर म्हणायची , तुम्हा मुलींचा इमोशनल i.Q फार कमी आहे . मला माझी चूक कळली आहे , प्लीज सोडा मला ”
“क्षमा असावी , आपण काय वदला ते मज ज्ञात नाही झाले “
“माठ आहेस तू “ हताश पणे स्वरा उद्गारली .
त्यावर भद्रकही अशक्य आहे अशा अर्थाने खांदे उडवून बाहेर निघून गेला .

“सत्येनं दादा मी एक काम करू का ? स्वरा जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे डेमो साठी आली होती त्यावेळेस जे मंत्र म्हटले तेच पुन्हा म्हणू का ? “ त्रिविक्रमजी आणि त्यांचे गुरूबंधू ‘स्वरा’ च्या बेड भोवती उभे होते .
“ तो काय हिंदी सिनेमातला अपघात आहे का ? ज्या आघाताने स्मृती गेल्या त्याच आघाताने यायला ? “
“ मग आता कसं करायचं आपणच सांगा . “
“ पहिले त्यांनी मंत्र कोणते म्हटले हे विचार त्यांना, त्यांच्यामुळेच हे झालं आहे “ स्वराची आई मध्येच म्हणाली
. “ ताई थांबा , आधी तुमचा गैरसमज दूर करू आपण , तुम्हाला आधी सविस्तर माहिती देतो, ऐका, त्रिविक्रमने काही बीज मंत्र म्हटले आहेत , जे आपल्या उन्नतीसाठी , मेंदूला नवीन संजीवनी देण्यासाठी , किंवा ईतर अनेक चांगल्या कारणांसाठी उपयोगी पडतात उदा. ओम..हा बीज मंत्र म्हणजे ब्रम्हांडाचा ध्वनी आहे, सर्व सृष्टीची लय, उत्पत्ती, स्थिती यांच्यावरच आहे,
. ह्रौं .. हा भगवान शिवाचा मंत्र आहे , जो आपल्याला अनेक रोग , संकटं यापासून वाचविण्यासाठी शक्ती प्रदान करतो
३.ऐं. .. हा देवी सरस्वतीचा मंत्र आहे जो आपल्याला ज्ञान,' success' मिळवून देतो. असे अनेक बीजमंत्र आहेत जे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये म्हणल्यास वातावरणात हव्या त्या वाईब्स निर्माण करून आपल्याला सुख ,शांती , सगळं प्रदान करू शकतात, कधी कधी एखाद्या अँटीव्हायरस सारखं काम करून आपल्या सुपर कॉम्पुटर ब्रेन ला प्रोटेक्ट करू शकतात , आपले ऋषीमुनी म्हणजे एक प्रकारे शास्त्रज्ञच होते ते जंगलात राहायचे ते त्यांना एकांत मिळून संशोधन करता यावं म्हणून आणि आपल्या कडे असलेली विविधं उपनिषद आणि वेद हे त्याचंच फलित आहे ,महाभारतात अशा अनेक चमत्कारिक गोष्टींचा उल्लेख आहेच ना , द्रोणाचार्य, कृपाचार्य हे’ टेस्ट टुयब बेबी ‘असू शकतात ,असं त्याच्या जन्माची कथा ऐकल्यावर वाटत नाही का तुम्हाला? पाशात्य देशात यावर अभ्यास करण्यासाठी इन्टिट्यूट्स आहेत , दुर्दैवाने आपल्याकडे त्याचं महत्व कळण्यासाठी अजून काही पिढ्या जाव्या लागतील , तुमच्या मुलीसारखी थोडीच लोकं आहेत जे याचं महत्व जाणतात, तेव्हा प्रथम आपल्या मुलीला नावं ठेवणं बंद करा , आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की स्वराला यातून बाहेर कसं काढायचं , माझ्या अनुमानप्रमाणे स्वरा ने जेव्हा हे बीजमंत्र ऐकले असतील तेव्हा ती मुळातच रिसेप्टिव्ह असल्यामुळे ट्रान्स मध्ये गेली असावी .ट्रान्स म्हणजे विचारशून्य अवस्था, ज्यामध्ये मन इतकं तरल होतं कीं ते एखाद्या हलक्या फुलक्या वाऱ्यावर उडणाऱ्या पानासारखं तरंगत जाऊ शकतं ,अशा वेळेस तीने ज्या ठिकाणी फोकस केलं असेल ती वाट तिला मोकळी झाली असेल.“
“ हे मला नाही समजलं, विचारशून्य अवस्थेत ती फोकस कशी करेल?”
“ ओके, अजून सोपं करून सांगतो, तुम्हाला मी म्हटलं की एक तरंगतं पान डोळ्यासमोर आणा , आता ते तरंगतं का आहे ? “
“ कारण त्याला वजन नाही, “
“नाही वजन आहे, पण ते हवेच्या वजनापेक्षा हि कमी आहे ,बरोबर? “
“हो..”
“आता मला एक सांगा हवेचा दाब जिथे कुठे जास्त होईल तिथे ते पडेल की नाही?”
“हो ,अर्थातच “
“मग तसंच तिचं तरल मन कोणत्या तरी अशा भूखंडात जाऊन सेटल झाल असेल जिथंपर्यँत त्याची फ्रिक्वेन्सी पोहोचते .आणि रेडिओ स्टेशन जसं fm , 91.5 वैगेरे ला आपण एकदा सेट करून ठेवलं की प्रत्येक वेळेस ते सेट करायची गरज उरत नाही , ते बरोब्बर लागतं , तसंच स्वराचं मन तिकडे पोहोचत असेल आणि ते जेव्हा जेव्हा तिथे पोहोचतं तेव्हा ती घटना घडत असते, वर्तमान काळ असतो तिथे .”
“पण असं कसं काय ? स्वानंदी म्हणाली की मध्ये काही काळ तिला ते भास झाले नव्हते , मग तोपर्यंत त्या भद्रकचं आयुष्य पण थांबून राहिलं होतं कीं काय? “
“ नाही, काळाचं गणित आपल्या इथे वेगळं आणि ब्रम्हांडात वेगळं असू शकतं , आपलं ज्ञान लिमिटेड आहे ताई , आपली लॉजिक सगळीकडे लावू नका .समजा तुम्ही बस मधून प्रवास करत आहात , खिडकीबाहेर बघताना काही मुली तुम्हाला झोका खेळताना दिसल्या ,मग तुमची बस पुढे गेली , तर तुम्ही काय विचार कराल ? मुली तिथे झोका खेळत ' होत्या' , बरोबर ? “
“हो बरोबर “
“म्हणजे तुमच्या दृष्टीने तो भूतकाळ झाला , पण मुली अजूनही झोका खेळतच असतील ना तिथे ? “
“ हो की “
“म्हणजेच मुलींच्या दृष्टीने तोच वर्तमान काळ झाला , तेव्हा काळाची गणितं हि अगम्य आहेत तसाच सृष्टीचा पसाराही अगम्य आहे , दृश्य जगापेक्षा कदाचित अदृष्य जगाचा पसारा मोठा आहे , सध्या आपण स्वराला कसं परत बोलवायचं याकडे लक्ष देऊ , माझ्या मते तुमचं प्रेम तिला परत आणू शकेल , तेव्हा मी सांगतो ते करा , आज संध्याकाळी बरोब्बर सात वाजता ,स्वराच्या बेडभोवती आपण सारे जण जमूयात , “
संध्याकाळी, सत्येन दादांनी सांगितल्या प्रमाणे आधी आईने घरात धूप लावला मग विघ्नहर्त्या गजाननाला प्रार्थना करून स्वराच्या बेडभोवती सारे जण जमले , सत्येन दादांनी काही मंत्रावली दिली ती सर्वांनी मनातल्या मनात म्हणायला सुरूवात केली आणि आईने मात्र दादांनी सांगितल्या प्रमाणे स्वराच्या कानात आवाज द्यायला सुरूवात केली , सर्व प्रेमानीशी आणि जितकं शक्य होईल तितक्या आर्ततेने .
“ श्रीमान त्या विचित्र युवतीची काहीही हालचाल दिसत नसून , ती वायु विलीन होत आहे की काय ही आशंका मज येऊ लागली आहे . “ रक्षकाने हि बातमी आणताच भद्रक पळतच अंधारकोठडीकडे गेला असता , समोरचे दृश्य पाहून चकित झाला . परग्रहावरून आलेली ती विचित्र पोशाख घातलेली युवती खरोखरच हवेत विरघळत असल्याचे दिसत होते ,
“श्रीमान आपणास वायुविद्या अवगत आहे , शिवाय वायुमापकाने आपण अदमास घेऊन तिज पुनश्च इथे आणून सजा देऊ शकतो, थांबवा तिला ..”
“नाही रक्षका, जाऊ दे तिला , ती निष्कलंक आहे ,निष्पाप आहे “ ती गेली त्या दिशेने उसासा सोडत भद्रक म्हणाला .
“आपणास कसे ज्ञात झाले? “
‘काय माहिती’ ? अशा अर्थाने भद्रकाने हात हलवले आणि तो राजमहालाकडे निघून गेला .
इकडे घरी आईच्या आर्त हाका चालूच होत्या , आणि स्वराची हालचाल झालेली स्वानंदीला दिसली त्याबरोबर ती ओरडली “ काकू SSSSSS ..स्वरा इज बॅक !.. ते पहा .. “
मग काय तिकडे एकाच कल्लोळ उडाला आणि सर्वजण आनंदात बुडून गेले .

सूचना :
वरील कथा व कथेतील पात्र काल्पनिक असून त्याचा वास्तवतेशी काहीही संबंध नाही . असे काही आढळल्यास तो योगायोग समजावा !..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त आहे कथा. एका बैठकीत तिन्ही भाग वाचले- पण खरंच कथा इथे संपली? अजून थोडी फुलवायची ना. फारच इंटरेस्टिंग प्लॉट होता

किल्ली ,मनस्विता , peacelily2025,विनिता.झक्कास ,चैत्रगंधा , गायतरी, माऊमैया ,शब्दसखी , Kranti Deshpande , सर्वांचे मनापासून आभार !.. कथा अजुन  फुलवता आली असती , पण मग ती पाणी घालून पातळ केलेल्या  आमटी सारखी झाली असती  Happy

खुप छान कथा!

मला आऊटलँडर सिरिजची आठवण झाली Happy