Novak Djokovic

Submitted by बिथोवन on 8 September, 2020 - 23:28

जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला रविवारी यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत खळबळजनक प्रकारे अपात्र ठरवण्यात आले. स्पेनच्या पाब्लो कारेनो बुस्टाविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये मागे पडल्यानंतर त्याने मारलेला बॉल लाइन जजला लागल्यानंतर असे झाले. त्याने जाणून बुजून अधिकार्याला मारले नाही असे सांगून जोकोविचने माफी मागितली तरी त्याला शिक्षा झाली. ५-६ ने मागे पडल्यानंतर जोकोविचने कोर्टच्या मागील बाजूला जोरात बॉल मारला. तो महिला लाइन जजच्या मानेवर आदळला.
ती वेदनांनी विव्हळत खाली पडली. घाबरून जोकोविच तिच्याकडे धावत गेला व त्याने तिची माफी मागितली. नंतर रेफ्री आले व तिथे १२ मिनिटे चर्चा झाली. जोकोविचचे भवितव्य १३ व्या मिनिटाला निश्चित झाले. त्याला स्पर्धेतील सर्व रॅकिंग गुण गमावण्यासह अडीच लाख डॉलर्स दंड होईल. अखेरीस जोकोविच आश्चर्यचकित बुस्टाबरोबर हस्तांदोलनासाठी गेला आणि जड अंत:करणाने निघून गेला. नंतर त्याने सोशल मीडियावर 'या परिस्थितीमुळे मी खूप दुःखी आहे. त्यांना माझ्यामुळे झालेल्या त्रासाबदल माफी मागतो. झाले ते खूप चुकीचे होते,' अशा शब्दांत माफी मागितली.

ग्रँड स्लॅमचे नियम : 'खेळाडू कधीही अधिकारी, प्रतिस्पर्धी, प्रेक्षक किंवा स्पर्धेच्या हद्दीत उपस्थित असलेल्या कोणालाही दुखापत करू शकत नाहीत.' ग्रँड स्लॅमच्या एका नियमाच्या उल्लंघनानेही शिक्षा मिळू शकते.

तुम्हीही हा कार्यक्रम थेट किंवा माझ्याप्रमाणे व्हिडिओवर पाहिला असेल तर हा एक शुद्ध अपघात आहे, हे तुम्हाला समजले असेल. मला वाटले की माफी मागणार्या जोकोविचला अपात्र ठरवणे चुकीचे होते. ग्रँड स्लॅमच्या अधिकार्यांनी नियमांच्या शब्दांचे पालन केले, त्याची भावना समजून घेतली नाही. क्रीडाप्रेमी म्हणून मला वाटले की, एकदा समज देणे योग्य आणि न्याय्य ठरले असते.

या घटनेने मला माझे जुने दिवस आठवले. मला बियोर्न बोर्ग आवडायचा तर जॉन मॅकॅन्रोचे कोर्टवरील वागणे खटकायचे. मॅकॅन्रोची आक्रमक प्रतिमा झाली होती, तर बोर्ग आईस कूल. १९९० च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जेव्हा मूळ बॅड बॉय मॅकॅन्रोला अपात्र ठरवण्यात आले तेव्हा असे होईल हे वाटलेच होते .परवाच्या घटनेची तुलना इतर कोणत्याही घटनेशी करायची असेल तर ब्रिटिश खेळाडू टिम हेनमनने वॉली नेटवर आदळल्यावर बॉल असा मारला की तो बॉलगर्लच्या कानावर आदळला आणि ती रडू लागली या घटनेशी करता येईल. १९९५ मध्ये विम्बल्डनमधून अपात्र ठरणारा तो पहिला खेळाडू होता. रविवारच्या घटनेतील खेळाडू जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू आहे,तर हेनमन अपात्र ठरला तेव्हा तो २० वर्षांचा उदयोन्मुख खेळाडू होता.

....

Group content visibility: 
Use group defaults

मी देखिल जोकोविचची मोठी फॅन आहे.. पण माझ्यामते तो अपघात नव्हता तर हलगर्जीपणा होता.. त्याने बाॅल मागे मारायची गरजच नव्हती असं मला तरी वाटतं..एनीवेज जे झालं त्याबद्दल फार वाईट वाटलं

लेखातल्या मुद्यांशी सहमत !
शिक्षा जास्त वाटली , जोकोविच चा चेहेरा बरेच काही सांगून जात होता ...
तरीही एका स्टार खेळाडू साठी पण नियम वाकवले जात नाहीत , TRP ची गणिते पहिली जात नाहीत आणि सर्व समान हि वागणूक दिली जाते ,हा सुखद धक्का होता. भारतात IPL मध्ये असे कधीच होऊ शकणार नाही ....उलट ज्या व्यक्तीला लागले तीच कशी चुकीच्या जागी उभी होती असे सांगितले गेले असते ...

. मला वाटले की माफी मागणार्या जोकोविचला अपात्र ठरवणे चुकीचे होते.>>>>

भारतात एव्हाना सो मि वर भयंकर अणु युद्ध सुरू झाले असते.

नियम म्हणजे नियम हा चांगला पायंडा पाडल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन.

मी देखिल जोकोविचचा मोठी फॅन आहे.. पण माझ्यामते तो अपघात नव्हता तर हलगर्जीपणा होता.. त्याने बाॅल मागे मारायची गरजच नव्हती असं मला तरी वाटतं..>>>>>+१

नियम म्हणजे नियम हा चांगला पायंडा पाडल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन. >>>> अनुमोदन.

मुद्दाम असो वा चुकीने, त्याने केलेल्या कृतीमुळे दुखापत झाली व नियमानुसार शिक्षा झाली. त्याने केलेली कृती हा खेळाचा भाग नव्हती तर खेळ संपल्यावर (बॉल डेड झाल्यावर) मारलेला फटका होता.

ही व्हिडिय क्लिप पहा. त्याच्या हातून असे काही घडेल याबद्दल पत्रकारांनी शंका पूर्वीच व्यक्त केली होती.
https://youtu.be/FjpivhHD_qU

यात एक मोठा नैतिक धडा आहे, चुकीने सुध्दा नियमाचे उल्लंघन सहन केले जाणार नाही .... खूप प्रशंसात्मक आहे आणि हे भारतात घडले नाही ही खूप आनंदाची बाब आहे नाही तर आहेतच सेल्फ स्टाइल्ड एक्सपर्ट्स
मध्यंतरी सोशल मिडियावर एक क्लिइप आली होती ज्यात लहान मुळाचा चुकून कुणाला तरी धक्का लागतो, दोघेही जबाबदार असतात तेव्हा वडिल मुलाला सांगतात की माफी माग, मुलगाशयगय करतो... तेव्हा वडिल सांगतात ते कृत्य चुकीचे आहे , आणि त्यास तू कारणीभूत आहेस मग ते अहेतुक असो की सहेतुक!!!!

आधीच नदाल/ फेडरर यांची अनुपस्थिती.. त्यात जाकोव्हिकचे असे दुर्दैवी व शॉकिंग एक्झिट.. व पँडेमिक मुळे असलेली प्रेक्षकांची अनुपस्थिती.. त्यामुळे यंदाचे यु एस ओपन या नाहक गोष्टींमुळे लक्षात राहील.

मलाही जाकोव्हिकचा खेळ ( फेडरर/ नदाल इतका नाही पण तरीही) खुप आवडतो. पण मीही याच मताचा आहे की जी कारवाई त्याच्यावर झाली ती कितीही कठोर वाटली तरी योग्यच होती. नशीब त्या लाइनवुमनला जास्त दुखापत झाली नाही.. पण चुकुन मानेला लागायच्या ऐवजी डोळ्याला जर बॉल लागला असता तर तिचा डोळा फुटु शकला असता.. जरी चुक जाणुनबुजुन केलेली नसली तरी.. ही वॉज डेफिनेटली केअरलेस...

पण या सगळ्या दुर्दैवी प्रकरणात... प्लिज... पाब्लो करिनिओ बुस्टाला विसरु नका!

मी तो पहिला सेट.. जाकोव्हिक बरोबरचा ..बघीतला... कसल्या रॅलिज होत होत्या त्यांच्यात... जाकोव्हिक ती मॅच जिंकला असता असे गृहीत धरुन चालणार नाही.. हाच पाब्लो... २०१७ मधे यु एस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. आजही..शॅपेव्ह्लॉव्हला ५ सेट मधे हरवुन तो परत एकदा यु एस ओपनच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

कागदावर तरी डॉमिनिक थिम- डॅनिल मेड्वेडेव्ह( गेल्या वर्षीचा इथला उपविजेता) यांच्यातला उपांत्य फेरीतला सामना जो जिंकेल तोच यंदाच्या यु एस ओपनमधे बाजी मारेल असे वाटले तरी या पाब्लो करिनिओ बुस्टाला विसरु नका..

जोकोविचने करोनाच्या कहरात टुर्नामेंट आयोजित केल्यापासून मनात तो जरा खालच्या पादानवर गेला आहे.
त्यांची पोस्ट वाचली.
त्याने शिक्षेबद्दल अवाक्षर काढलेले नाही, हे आवडलं.

द्योकोविचला अपात्र ठरवत प्रतिस्पर्ध्याच्या पंचांनी विजेता घोषित केलं. अशा आशयाची बातमी आधी वरवर वाचली होती आणि चक्रावलोच होतो.

ही नाईनसाफी आहे. जोकोविच आता घरी जाईल आणि रडेल. नन्तर काही दिवसांनी मित्राच्या लग्नात मित्राला जबरदस्ती घोड्यावर बसायला लावेल आणि मग जोकोविच वरातीत नाचेल. वरच्या मोहल्ल्यातून जाताना काही लोक्स यांच्या वरातीवर हल्ला करून यांना मारतील. नन्तर पोलीस केस होऊन एक बाबा येईल आणि जोकोविचच्या माणसांना यातून बाहेर काढेल.

हे होणारच होत कधी तरी. हरायला लागला की जोकोची वर्तणूक प्रथम क्रमांकाला साजेशी कधीच नव्हती. त्याच्या नाटकांमुळे एका युएस ओपनला फेडरर जवळ जवळ जिंकला असताना हरला होता.
यावेळेस ही घटना घडायच्या थोडेच आधी त्याने यापेक्षाही जोरात चेंडू रागाने मारला होता. तेंव्हा कुणालाही लागला नाही येवढेच.
खेळामधे कुणिही VIP नसतोच.

मलाही जोकोचा खेळ आवडतो. (फेडरर येवढा नाही, पण कशाला नाही म्हणा, नादालपेक्षा जास्त Happy ) पण त्याची ही नाटक अजिबात आवडत नाहीत. आता त्याचे player's union वर काम चालू आहे.

बुस्टा हरला.. ५ सेटमधे... तेही पहिले २ सेट जिंकुनसुद्धा! मागच्या सामन्यात जो ५ सेटचाच झाला होता... त्याच्यात झालेली दमछाक आज त्याला बहुतेक भोवली.

थिम परत एकदा ग्रँड स्लॅम फायनलमधे (ही त्याची पाचवी ग्रँड स्लॅम फायनल असेल) आला आहे.. पहिल्या चार फायनलमधे २ वेळा तो नदालकडुन व प्रत्येकी एक वेळा तो फेडरर व जाकोव्हिकच्या हातुन हरला होता. मग त्या तिघांच्या अनुपस्थितीत आता तरी एकदाचा तो ग्रँड स्लॅम जिंकेल का?

Thiem fell to his back in celebration at becoming the first player born in the 1990s to claim a men’s Grand

Interesting. नव्वदीच्या दशकात जमलेली खेळाडूंची एक अख्खी पिढी ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून दूर आहे. Wow.

सकाळी लवकर जाग आली. मॅच लावली स्कोअर तिसर्‍या सेट मधे ४-४ होता. तिथून मॅच फिरली. Happy
पण एकंदरच खेळ उच्च नव्हता. दोघेही मित्र असल्याने जिंकायलाच पाहिजे अशी इंटेंसिटी नव्हती बहुतेक. शेवटच्या सेटमधे तर आप लो, नही नही आपही लो, असे चालले होते. एकंदरीत खेळ बघता टॉप थ्री पैकी कोणीही असते तर किरकोळीत जिंकले असते.
टॉप थ्री नंतरची नेक्स्ट जेन खूपच मागे आहे. शिवाय त्यांच्यानंतर इतक डोमिनेटींग करू शकणारे कोणी दिसत नाहीये.

त्या बाईंना बॉल मानेला नाही तर गळ्याला लागला. त्यांचे वय, त्या उभ्या होत्या ती जागा आणि ज्या वेगात बॉल आला ते बघता आणखी गंभीर दुखापत होउ शकली असती. मॅचमध्ये जोकोविचनं आधी पण एक पॉइंट गेल्यावर बॉल जोरात मारला जो कॅमेरामनला लागता-लागता राहिला. जोकोविचचे निर्बुद्ध समर्थन करणारे लोक आता त्यांना धमक्या देत आहेत.
"The woman has been sent death threats, labelled an alcoholic, told she exaggerated her injury and has even received cruel comments about the death of her son." या बातमीतल्या ओळी. काहीही चूक नसताना दुखापत आणि आता मनस्ताप अशी दुहेरी शिक्षा त्यांना मिळतेय, जोकोविचला मिळालेली शिक्षा त्यामानानं कमीच म्हणता येइल.

नियम म्हणजे नियम हा चांगला पायंडा पाडल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन >>> +१

काल बीबीसीवर जोकोची मुलाखत होती. तो लस का घेत नाही याचं उत्तर देत होता - लशीने माझ्या शरीरावर काय परिणाम होतील याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही...
एवढ्यात युक्रेनबद्दल लाइव्ह दाखवायला लागले.
आज जोकोने त्याच्या फेसबुक पेजवर ती मुलाखत शेअर केली आहे
https://www.facebook.com/djokovicofficial/posts/499040358253750

जोकोसारखं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. जोकोला यातून बराच त्रास होत राहील, भुर्दंड देखील सोसावा लागेल. सामान्य माणसाला कसलेच प्रिव्हीलेज नाही.