आणि प्रेतयात्रा निघाली---( कथा )

Submitted by निशिकांत on 5 September, 2020 - 10:04

आणि प्रेतयात्रा निघाली.

गोष्ट खूप जुनी आहे. आम्ही तेंव्हा एका चाळीमधे रहात होतो. चाळ म्हणजे मध्यभागी मोठे अंगण आणि भोवताली दोन दोन खोल्यांची घरे. आमच्या शेजारी एक शिक्षक रहात होते. त्यांचे नाव माधवराव. आडनावाने बोलावायची तेंव्हा रीत नव्हती. त्या वेळच्या पध्दतीप्रमाणे नवर्‍याचे नाव माधवराव तर पत्नीवे नाव मालती! मालती काकू गृहकर्तव्यदक्ष होत्या तर माधवराव जवळच्या एका खेड्यातल्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. रोज शाळेला ते सायकलवरून ८.१० किलोमिटर अंतर कापून जात असत. गरिबीचाच प्रपंच पण दोघेही समाधानी आणि सदैव हसतमुख पाहिल्याचे मला आठवते.
त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. सर्वजण आभ्यासू आणि हुशार असेच होते. आई बाबाचे वळणही बर्‍याच अंशी कारणीभूत होते. मुलीचे यथावकाश लग्न झाले आणि ती सासरी निघून गेली. दोन्ही मुले खूप शिकली आणि कांही काळाने दोघेही परदेशी नोकरीसाठी गेली. एक अमेरिकेत तर दुसरा कॅनडाला. ते तिकडे आपल्या कुटुंबासमवेत मजेत होते.
तेंव्हापासून माधवराव आणि त्यांची पत्नी एकटेच रहात होते. अधूनमधून दोन्ही मुलांचा आलटून पालटून फोन येत असे. खूप गप्पा व्हायच्या. एकूण मजेत दिवस जायचे.
जेंव्हा एक मुलगा प्रथम परदेशातून भारतात भेटायला आला तेंव्हा या जोडप्याला आकाश ठेंगणे झाले होते. किती ते कौतूक! दुसरे दिवशी दूधवाला गवळी दूध घेऊन आला तर मालती काकूनी त्याला थांबायला सांगितले. लगबगीने त्या घरात गेल्या आणि मूठभर चॉकलेट्स त्यांनी दूधवाल्याला दिले. म्हणाल्या मुलगा आमेरिकेहून आला आहे. दे तुझ्या लेकरांना खायला! हे चॉकलेट देण्याचे काम जवळजवळ आठवडाभर चालू होते. दोघांच्याही आनंदाला पारावार नव्हता. आलेल्या मुलाने त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की तो एक घर त्यांना विकत घेऊन देईल. चाळ सोडून त्यांनी त्या घरात आरामात उर्वरीत आयुष्य रहावे. पण दोघांनीही ठाम नकार दिला आणि चाळीत रहाणेच पसंत केले. असे हे जमिनीवर पाय टेकवून जगणारे जोडपे.
जसे जसे दिवस गेले तसे तसे मुले आपल्या संसारात रमली. फोन येणे पण कमी होत गेले. या दोघांचा इकडे गुदमर सुरू झाला. पण शेजार्‍यापाजार्‍यात कधीही वाच्यता केली नाही त्यांनी. लागोपाठ तीन वर्षे गेली पण दोघांपकी एकही मुलगा भारतात भेटायला आला नाही. तगमग पाठ सोडेना. आणि व्हायचे ते झाले. दोघांच्याही तबियती खराब होऊ लागल्या त्यात पुन्हा वय वाढलेले. एकदा एका मुलाचा फोन आला. मालती काकूंनी तबियतीचा विषय काढला. मुलगा लगेच म्हणाला आई कोणी तरी भेटायला आलय. मी नंतर फोन करतो; पण फोन कांही आला नाही. मालतीबाईंना चुटपुट लागली. माधवरावाजवळ त्यांनी हा विषय काढला पण ते म्हणाले कांही अडचण असेल. आपण समजून घ्यायला हवे ना!
माधवरावांची तबियत एकदमच खराब झाली. त्यांना दवाखान्यात दाखल केले शेजार्‍यांच्या मदतीने. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. सर्व शेजारी मदतीला तत्पर होते. पण यश आले नाही आणि चार पाच दिवसात त्यांचा देहांत झाला. मालतीबाईसाठी तर आकाश कोसळले होते. शेजार्‍यांनीच त्यांच्या दोन्ही मुलांना माधवरावांच्या मृत्यूची बातमी कळवली. आमेरिकेचा मुलगा तातडीने आला. मुलगी तर आली होतीच. पण कॅनडाचा मुलगा आलाच नाही. मालतीबाई त्याची वाट बघत होत्या. अंत्यविधी पण रोखले होते. आलेल्या मुलाला दर दोन तासांनी त्या विचारत होत्या की तो निघाला का? किती वेळत पोंचेल, असे बारा तास चालले होते.मालतीबाईंच्या दु:खाला पारावार नव्हता. त्यांची इच्छा होती की दुसर्‍या मुलाने त्याच्या बाबाचे अंतीम दर्शन घ्यावे. त्या जेंव्हा खूपच अस्वस्थ झाल्या तेंव्हा मुलाने त्यांना एका वेगळ्या खोलीत नेले आणि म्हणाला "आई आमच्या दोघांचे बर्‍याच दिवसापूर्वी ठरले आहे की बाबाच्या वेळी मी यायचे आणि तुझ्या वेळी तो येईल. उगीच त्याची वाट पाहू नकोस."
आणि अर्ध्या तासात माधवरावांची प्रेत यात्रा निघाली.

निशिकांत देशपांडे. पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

:'(

ठरलेच होते तर १२ तास कशाला गप्प बसला?
वाईट वाटले Sad......

कारण १२ तासांनंतरच कथा वाचली. मी फक्त माझे मत नोंदवले. लेखनाबद्दल आक्षेप नव्हता घेतला. लेखन छानंच आहे हे प्रतिसादात लिहिले आहे.

@ अभिरुप, तुम्ही असे काय लिहीलेय?

मी तुम्हांला प्रतिसाद दिलेला नाहीये. कथेत मुलगा १२ तासाने आईला खरं काय ते सांगतो, त्याबद्द्ल बोललेय.

छान कथा. आवडली. सत्यही यापासून फार लांब नसावे.

जेवढे प्रेम आईबाप आपल्या मुलांवर करतात तेवढे मुले मोठेपणी आपल्या आईबापांवर नाही करू शकत. किंबहुना मोठी झाली की ते आपल्या मुलांवर तितके प्रेम करू लागतात. हे नैसर्गिक असावे बहुधा. अपवाद वगळता गरज सरो आईबाप मरो हेच बघायला मिळते.

कथा आणि त्यामागील भावना दोन्ही पोचल्या. पण सद्ध्याच्या परिस्थिती मधे मुलां कडेही पर्याय राहिला नाही आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. दोन जवळच्या मित्रांना अगदी गेल्या काही दिवसातच ह्या परिस्थितीमधुन जाताना बघितले आहे. आई / वडील निवर्तले परंतु ते भारतात येऊ शकले नाहीत कारण कोरोनामुळे प्रथम तिथे येऊन विलगीकरण करावेच लागेल आणि नंतर परत यायचे असल्यास बर्‍याच गोष्टींची पुर्तता करणे जवळपास अशक्य झाले होते. कॉन्सुलेट बंद आहेत किंवा खुप जास्त वेळ लावत आहेत ह्यामुळे पटकन भारतात येणे व परत जाणे सहज शक्य राहिले नाही आहे.
एका मित्राच्या आईने त्याला सांगितले कि "येऊ नको कारण आमच्याकडे बाधितांचे आकडे वाढत आहेत आणि तु व तुझी मुले आहात तिथेच सुरक्षित रहा. जाणारे निघुन गेले आणि तुझ्या येण्याने त्यात फरक पडणार नाही. इथे सतत नातेवाईक भेटायला येत आहेत आणि तुझे विलगीकरण अवघड होऊन बसेल. त्या ऐवजी पाण रोज फोन / व्हिडीओ वर बोलु.. तेवढाच मलाही विषय बदल होईल." भारतात परिस्थिती बरी झाली कि आता त्याची आईच परदेशी त्याच्याकडे येणार आहे.
दुसर्‍या एका मित्राच्या बाबतीत तो जायला तयार होता पण जाण्याच्या एक दिवस आधी विमाने रद्द होत राहिली आणि त्याच्या जाण्या अगोदर सर्व विधी करावेच लागले.
वर प्रतिसादांमधे >>जेवढे प्रेम आईबाप आपल्या मुलांवर करतात तेवढे मुले मोठेपणी आपल्या आईबापांवर नाही करू शकत. >> वगैरे वाचले पण असली सरसकट विधाने करताना आणि "होय हो, असेच वागतात लोक" असा सुर लावताना, मुलांचेही हात बांधलेले असु शकतात, एवढेच नाही तर भावनांच्या आहारी न जाता काही कुटुंबीय व्यवहारी पण कठीण निर्णय घेतात हे ही लक्षात घ्यावे. धन्यवाद.

चौकट राजा यांच्याशी सहमत कारण त्यांनी लिहल्याप्रमाणे नुकतेच या प्रसंगातुन आम्ही गेलो आहोत. काही दिवसांपुर्वी सासुबाईचे अचानकच निधन झाले. कुठलाही त्रास न्हवता. वय साधारन सत्तरीच्या पुढे. त्यांची बातमी कळाल्यावर भारतात जाण्याचा बराच प्रयन्त केला पण नाही जमू शकले. तसेच लोकांनी पण हा सल्ला दिला की येउन काही होणार नाही. अंतिम दर्शन तर मिळणार नाहिच. त्या पेक्षा आहात तिथे सुरक्षित रहा. नवर्‍याची त्या वेळी तिथे पोहचू शकलो नाही अथवा जाता येत नाही या मुळे झालेली घालमेल जवळून पाहिली आहे.
हा झाला करोनामुळे न जाता येण्याचा प्रसंग.
परंतु जेव्हा दोन्ही मुले बाहेर असतात. तेथे घडण्यार्‍या घडामोडी किंवा ईतर गोष्टी यामुळे नक्किच काही निर्णय कठोर घ्यावे लागत असतिल तर लगेच जेवढे प्रेम आईबाप आपल्या मुलांवर करतात तेवढे मुले मोठेपणी आपल्या आईबापांवर नाही करू शकत. अशी विधाने करणे योग्य नाही. कारण आपण जाउ शकलो नाही हा विचार खुप दुखदायी असतो. जो नेहमीच त्यांच्या मनाला लागुन राहत असणार.
फक्त वर त्या मुलाने दुसरा मुलगा येणार नाही हे लगेच सांगायला हवे होते.

जेवढे प्रेम आईबाप आपल्या मुलांवर करतात तेवढे मुले मोठेपणी आपल्या आईबापांवर नाही करू शकत. >> वगैरे वाचले पण असली सरसकट विधाने करताना
>>>>>

हे सरसकट विधान नाही तर शास्त्रीय अभ्यासावर आधारीत आहे. प्रेम वात्सल्य माया ममता या भावना उपजत असतात त्या आपल्या मुलांबद्दल आपल्याला वाटतात. पण मुलांक्डून पालकांसाठी त्या तितक्याच उपजत नसतात हे एक सत्य आहे. हे पचवायला बरेच जणांना जड जाते म्हणून मग प्रॉब्लेम होतात.

मी नंतर सविस्तर धागा काढतो यावर.
कथेवर ही चर्चा नको Happy

कथा टोचलीच एकदम,
वर त्या मुलाने दुसरा मुलगा येणार नाही हे लगेच सांगायला हवे होते.>>>>>कदाचित आईला इतकं वास्तव सांगायला त्याला अवघड वाटले असेल पण आई 12 तास वाट पाहतच आहे म्हटल्यावर त्याने खरे सांगून टाकले असेल

रच्याकने अभिरुप यांच्या प्रतिसादाने आईने अकबरी ची आठवण आली

हे अस ठरवणं जास्तच वाटतय. ऐनवेळी ज्याला जमेल त्याने जायला पाहिजे ना? कधी जमत नाही काही कारणाने तर ते समजण्यासारखं आहे.

रच्याकने अभिरुप यांच्या प्रतिसादाने आईने अकबरी ची आठवण आली >> हो ना...माझ्या प्रतिसादाचा त्यांनी असा अर्थ कसा घेतला देव जाणे

बाकी 'आईने अकबरी' तर ग्रेटच Lol

कारण आपण जाउ शकलो नाही हा विचार खुप दुखदायी असतो">>>>कथेत तो दुसरा मुलगा जमले नाही म्हणून आला नाही असे नाहीये,उलट तसे परवडले असते पण,त्या दोघांनी आधीच ठरवून ठेवले आहे कोण वारल्यावर कोणत्या मुलाने जायचे ते,आणि ते माझ्यामते तरी खूप भयानक आहे,

त्या दोघांनी आधीच ठरवून ठेवले आहे कोण वारल्यावर कोणत्या मुलाने जायचे ते, >> हेच खटकले.
काही कारणाने येता आले नाही हे समजू शकतो. पण आईवडीलांच्या कार्यांची पण वाटणी?? Sad

मी तुम्हांला प्रतिसाद दिलेला नाहीये. कथेत मुलगा १२ तासाने आईला खरं काय ते सांगतो, त्याबद्द्ल बोललेय.....

विनिताजी, गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. खरंच गैरसमज झाला. मनावर घेउ नये.

@ अभिरुप,
अहो, दिलगीरी काय....
मलाच ऑकवर्ड झाले की माझ्यामुळे तुम्ही नकळत दुखावले गेलात म्हणून...असो Happy

छान कथा.

गेल्या दोनेक वर्षात ही कथा अनेक वेळा व्हॉट्सअ‍ॅप वर वाचली. तिचे जनक आज कळाले.