जन्मभर चरकात पिळले अनुभवांनी

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 September, 2020 - 00:45

मान्य की घडले-बिघडले अनुभवांनी
हो बदलले... पण बदलले अनुभवांनी

मिसळले नसले जरी डोळ्यांत डोळे
लक्ष असते हे समजले अनुभवांनी

आठवांची गोधडी उबदार असते
दाहल्यावर, भ्रम वितळले अनुभवांनी

हास्य ओठांवर, जरी डोळ्यात पाणी
सूत्र जगण्याचे शिकवले अनुभवांनी

स्वप्नरंजन चालले होते जिण्याचे
खाडकन डोळे उघडले अनुभवांनी

सिद्ध झाला गोडवा माझ्यातला पण
जन्मभर चरकात पिळले अनुभवांनी

फेस तोंडाला, कधी नाकात पाणी
झुंजण्याचे बळ पुरवले अनुभवांनी

चाललो असलो तरी येतो म्हणावे
शिकवणीचे मोल कळले अनुभवांनी

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users