चंद्री पराली

Submitted by मित्रहो on 3 September, 2020 - 02:27

“बे शाम्या चंद्रिले पायल का?”
“बे पोट्टेहो चंद्रि आलती का तिकड?”
गज्या ज्याले त्याले इचारत होता पण त्याची चंद्री काही सापडत नव्हती. गज्या लय परेसान झालता. सकाळपासून उन्हान परेसान करुन सो़डल होत आन आता चंद्रीनं परेसान केलतं. चांगल आभाळ भरुन आलतं, वारं सुटल होतं, तवा आराम कराव म्हणाव तर चंद्री गायब झालती. ते कालवड कुणाच्या आगूट्यात येत नव्हती. गज्याच का तिले पाहात होता. तशी होती हुषार, दिसभर कितीही उड्या मारल्या तरी सांजच्या टायमाले घऱात हाजिर राहे. आज कोठ पराली होती का सारा गाव हुडकुन काढला होता पण चंद्री काही गावत नव्हती.
“ओ वामनराव चंद्री दिसली का जी?” गज्यान मारुतीच्या देवळाच्या जोत्यावर बसलेल्या वामनराव आन त्याच्या सोबत्यायले इचारल.
“कोण चंद्री बे, रम्याची बायको का?”
“नाही जी, मालकाची कालवड” दोन घुंघराचा आवाज आला. हातातले तंबाखू घोटतच नजरा तिकड वळल्या.
“कधी घुंघरं पाहाची, कधी नथ पाहाची, कधी पायल पाहाची. ते सोडून तू कालवड शोधून रायला का बे?”
“आबे त्या झेल्यान या वयात बाई आणून ठेवली. लगन करते का ...त्याच का सांगता येते. तो साठ वर्षाचा बुढा आन तू पोरासारखा पोरगा, लगन गिगन कराच सोडून तू कालवड शोधून रायला.”
“झेल्याच का कराच हाय आपल्याले. तो कसा माणूस हाय ते बंद्या गावाले मालूम हाय.”
“आता तू येड पांघरुन पेडगावले जाच म्हणते तर तुले कोण शाणपण शिकवन गा, बोल का म्हणत होता तुया कालवडीच?”
“अजी लय परेसान हाय माणूस.”
“आबे जनावर हाय ते, कोठबी हिंडत रायते, कोठबी धसते. येईन घरी जाते कुठ? तू बस घटकाभर.” त्यान तंबाखू गज्याच्या समोर धरला. गज्या चिमिटीत तंबाखू उचलत बोलला.
“कुठ बसता जी माया मालक मले खाउन टाकन.”
“लय खाणारा आला तुया मालक. जनावराले उन्हाचे चारे भेटत नाही तवा धसली असन कोणाच्या वाडीत. वाडीवाल्यान डांबली कांजीत”
“नाही न जी कांजीत नाही हाय. मालक पाहून आला.”
“थेच कालवड का बे. ढवरी, तू त्या जरसी गाईच्या गोऱ्ह्याकड घेउन गेलता.”
“थेच”
“मंग रायली का गाभण?”
“कायची जी, ठैरतच नाही. नुसती परते. रामाच्या ढोऱासंग तिले चराले धाडल, बोरगावच्या गोऱ्हाकड नेल पण काही उपेग नाही. पार नाकात दम आणला तिन. आज अशी गायब झाली. माया मालक मले उसाच्या कांडावाणी पिळून खाणार हाय आता.”
“तुयी मालकिण मालकाच्या नाकात दम आणते कालवड तुया नाकात दम आणते. बरे भेटले येकमेकाले.”
“बरसादीच वारं आल का हे दाव तोडून शिद्दी छपरीत म्हणून मंग मालकान तिले संकल बांधली तर थे खुटा उपटून छपरीत आलती ”
“अस जनावर कोठ जात नाही. तू का करत व्हता बे?”
“म्या ढोर घेउन गेलतो पडतात, ते आमराईच्या बाजूच पडीत नाही? उन कसं तापल होत. तवा म्या ढोर देले सोडून बसलो आंब्याच्या सावलीत. जरा डोरा लागला. उठून पायतो तर बंदे ढोर हाय पण चंद्रीच गायब.”
“का बे तू आमराईत कायले गेलता?”
“तुम्हाले ठाव नाही वामनराव?”
“का”
“तो भोरवाडीतला अरण्या.”
“झेल्याचा रोजंदार, मांग गावात यिळा घेउन हिंडला होता. तंगड तोडतो म्हणे. त्याचा काय संबंध?”
“संबंध कसा नाही. त्याले मांग डाउट आलतां आपल्या गावातलं पोरगं त्याच्या बहिणीले फिरविते. का नांव होत गा तिच.”
“सुमी”
“त्याचा डाउट का खोटा व्हता का?” आस म्हणत शामरावन गज्याकड डाउट खात पायल. गज्या लाजला पर लगेच सावरला. वामनरावन इचारलं
“कारं गज्या का आय़कून रायलो?”
“नाही जी काही बोलते”
“नाही कसं. आज सोमवारचा बजार होता. सुमीची माय टमाटे घेउन मार्केटात गेलती. दुपारी मले दिसली होती.”
“माय मार्केटात गेलती आन सुमी फनं वेचाले आमराईच्या बाजूच्या पठारात?”
“तिला बरा सोमवारचा दिस सापडला फनं वेचाले. का रं गज्या?”
“नाही जी, काही का” गज्या आतातर लयच लाजला. आपुन पकडल्या गेलो त्याले खातरी झालती.
“आबे लाजते कायले. असाच धुवा पेटते का? लाकूड जळलच रायते. तिच्या भावापासून सांभाळून रायजो, लय डेंजर माणूस हाय. हाफ मर्डरच्या केसमंधी होता.”
“म्या नाही भेत कोणाले?” गज्याच बोलणं आय़कून बंदे डोये वटारुन पाहत होते. हे बारकं येवढ्या गोष्टी कसं सांगून रायलं हेच काही समजत नव्हतं. तेवढ्यात समोर झेल्या हातात चाकू घेउन हिंडताना दिसला. तो ‘मुडदा पाडीन उभा चिरुन टाकीन’ अशा शिव्या देत होता.
“झेल्या कोणाच्या नावान बोंबलून रायला?.” वामनराव आवाज आयकताच बोलला. “आता पुन्हा कोणाचा मर्डर करते हा”
असे म्हणत बंदे विठू पाटलाकडे चालाले लागले. गज्या आल्यापावली घराच्या रस्त्यानं लागला.

…………
दुपारच्याले ढोर सोडून गज्या आन सुमी आंब्याच्या खाली बसले होते. सोमवार म्हटलं का सारा गावा बाजाराले जात होता. तवा दोघाले येकमेकासंग बोलाले येळ सापडे. आज दुपारी बी दोघ असेच आमराईत बसले होते. गज्यान झाडावर चढून दोनचार आंबे तोडले सुमीले खाले देल्ले. आता फुड जिंदगानीचा औत कसा हाकाचा याचाच इचार करत होते. त्या दोघाच्या मंधी सुमीचा भाऊ अरण्या लय मोठ ढेकूळ होत. ते ढेकूळ कस फोडाच काही समजत नव्हत. दोघालेबी ठाऊक होत त्याले कितीबी समजावल तरी तो काही आयकाच नाही. सुमीच्या मायले सुमीच लगन लावून द्याची घाई झालती. परुन जाव म्हणाव तर आताच सैराट पायला होता तवा परुन गेल का कसे येले होते ते चांगल ठाउक होत. तवा येकच उपाव होतं कस बी करुन अरण्याले कटवाच. त्याले गावापासून दूर धाडाच. पण कस ते काही समजत नव्हत. आजकाल तर प्रेमाच्या गोष्टी कमी आन याच गोष्टी जास्त होत होत्या. दोघबी असेच निवांत इचार करत बसले होते तर ढोरक्यान आवाज देल्ला.
“ओ गजाभाऊ”
“का बे इन्या का झालं?”
“ढवरी कालवड दिसत नाही नं ढोरात”
“आबे इकडं तिकडं कुठ धसली असन पाय.”
“नाही वावरात बी नाही”
“कोठ वाडीत धसली का हे कालवड. नाकात दम आणला हिनं.” अस म्हणत गज्या उठला आन पडतात, वावरात, शिवन, रस्त्यान तो कालवड शोधाले लागला पण कालवड काही सापडत नव्हती. लय परेसान झालता. उन्हाच हिंडून तहान लागली होती. झेल्याच्या खळ्यावर मांडव घातला होता. त्याले तेथ झेल्याची फटफटी उभी दिसली. झेल्या मांडवातच असनं, तवा घुटभर पाणी प्याव आन मंग कालवड शोधाले जाव म्हणून त्याने झेल्याले आवाज देल्ला.
“ओ झेले मालक, मायी कालवड दिसली काजी?” गज्यान जोऱ्यात आवाज देला, येकदा दोनदा आवाज देला पण तिकडून कोणाचाच आवाज आला नाही.
“कोणीच नाही का जी मांडवात? फटफटी अशीच टाकून कोठ पराले जी?” गज्या मनातल्या मनात बोलला. मांडवात तुरीचे ढिग होते झेल्याच्या तुरी निघाच्या होत्या. गव्हाच कुटार मांडल, होत, कडब्याचा ढिग होता. कडब्याच्या ढिगापाशी गज्याले चपला दिसल्या त्यानं झेल्याले पुन्हा आवाज देल्ला.
“ओ मालक, चिलिम गिलिम फुकुन रायले का?” काही आवाज आला नाही म्हणून गज्याने पुन्हा आवाज देल्ला.
“झोपले का जी.”
आता गज्याच्यान काही राहवल नाही. त्याने कडब्याच्या पेंड्या बाजूल केल्या आन उडी टाकून तो तिकडं गेल्या. कुटाराची ढोली आन कडब्याच्या पेंड्यामधे त्यान जे पायल ते पाहून त्याचे डोयेच पांढरे झाले. झेल्याची बाई आन सुमीचा भाऊ अरण्या तेथ लपून बसले होते. गज्याले पाहून दोघबी घाबरले होते आन त्यायले पाहून गज्या घाबरला होता. का बोलाव काही सुचत नव्हत. गज्यान इचारल
“तुम्ही येथ?”
“गज्या झेल्याले सांगू नको.” अस म्हणत सुमीच्या भावान गज्याचे पाय धरले. ते पोरगी दुसरीकडे जाउन उभी रायली.
“झेल्याच्या खळ्यावर त्याच्याच बाईसंग. लय हिंमत बा तुमची”
“तुल तर मालूम हाय गज्या, तो झेल्या लय नालायक माणूस हाय. आमच प्रेम हाय, आम्हाले लगन कराच हाय. तू त्याले सांगतल तर तो आमाले सोडनार नाही आमाले. माया मुडदा पाडन.” सुमीच्या भावान असे अचानक पाय धरले तसा गज्या घाबरला. का बोलाव त्याले काही समजत नव्हत. मंग त्याच्या लक्षात आलं त्याले घाबराच कारण नाही. त्यान थोडा इचार केला हाच मोका हाय. याले या कारणानं जर येथून परवला तर सुमीच्या आन त्याच लगन लागून जाईल.
“आरं पण तू काही कमी हाय का. तू कायले भेते?”
“आबे दोन मर्डर पचवलेला माणूस हाय तो.”
“त्याले मालूम झाल का मले मालूम होत तर तो माया मुडदा पाडन. म्या कायले रिस्क घेउ?”
“त्याले काही मालूम नाही होनार गज्या, तू फकस्त आमाले असा वाघाच्या फुडं नेउन टाकू नको.”
“तस मले तुमच्या भानगडीत पडाच काही कारण नाही. तो झेल्या कसा माणूस हाय मले बी मालूम हाय तवा माणुसकी म्हणून म्या येकच गारंटी देतो म्या कोठ बोलनार नाही पण तुम्हाले येक काम करा लागन.”
“बोल गज्या आमची जिंदगी तुयाच हातात हाय.”
“तुमाले लगन कराच हाय ना?”
“हो” दोघबी येकसाथ बोलले.
“या गावात राहून तुमच लगन होणार नाही. झेल्या होऊ देणार नाही. गावात असे कोणाकोणाचे तोंड किती दिस बंद ठेवणार तुम्ही. आज मले दिसला, उद्या दुसऱ्या कोणाले दिसान. किती दिस लपून राहान. सारेच गज्यावाणी माणुसकीचे राहत नाही.”
“ते खरं हाय रे गज्या पण आता का कराचं?”
“येकच काम करा. परुन जा. काय कपडेलत्ते, पैसेआडके घ्याचे ते घ्या आन आजच गाव सोडा. आता सोडा. दोन तासात कोठतरी दूर निघून जा.”
“कोठ जाऊ. सैराट पायला ना गा. कसे येले व्हते राजा परुन गेलं का?”
“मंग राहा येथंच मरा असेच झेल्याच्या हातून.”
“गज्याभाऊ म्हणते ते बराबर हाय. आज बंदा गाव बाजाराले गेला हाय तवा आजचा दिवस परुन जाले बेस हाय.”
“अव पण जाणार कुठ?”
“चिमूरले जाऊ. माया येक चुलता रायते तेथ. झेल्या त्या भागात येणार नाही.” अरण्याच मन अजूनही तयार होत नव्हत. तो इचार करत होता.
“मायावर प्रेम हाय न. लगन कराच हाय ना. मंग काही इचार करु नका. आताच चला. माया चुलता तुमाले खदानीत कामाले लावून देइन. कालरीत वलख हाय त्याची.”
झेल्याची बाय परुन गेली ही बातमी समजताच तो बावरला होता. त्याले कोण तरी सांगतल तिले समुद्रपूरच्या बस स्टँडवर पायल. तो का समजाचे ते समजला. ते कोणातरी सोबत परुन गेली होती. त्याची लग्नाची बायको नाही तवा बोंबाबोब करनार किती.
“कोण हाय त्याचा पता लागला तर मुडदा पा़डल्याशिवाय राहनार नाही. तो अरण्याच असला पायजे मले डाउट आलताच.”
झेल्याचे अस चिल्लावण आय़कून गज्या मनातल्या मनात हासला. आन जोरात आवाज देला.
“अजी कोणाले मायी चंद्री दिसली का घऱाकड धाडून द्या जी?”
आभाळ आता चांगलच भरुन आल होत. इजा चमकल्या, ढगाचा आवाज झाला आन पयल्या पावासाले सुरवात झाली. अर्धा तास तरी चांगला धो धो पाउस पडला. दोन दिवसान चंद्री गपगुमान खुट्यापाशी येउन उभी रायली. येक दिस गज्यान मालकाले खुशीतच आवाज देल्ला.
“मालक चंद्री गाभण हाय जी.” मालक लय खूष झाला. त्यान गज्याले बक्षिसी देली. चंद्रिले कालवड झाली. तीन चांगल दुभत केल आन येक दिस चंद्री पुन्हा पराली.

………………….
आता चंद्री पराली का गज्या अजिबात लोड घेत नाही. तो आंगणातूनच सुमीले आवाज देते.
“ए सुमे चंद्री पुन्ह्यान पराली व.”
सुमी लाजते आन गज्या दरवाज्याची कडी लावून घेतो.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिली आहे.
जरा विदर्भाची भाषा वाटते, पण काही शब्द वेगळे आहेत. आणि तिथे पयाली म्हणतात, पराली नाही.
कुठली भाषा ही?

धन्यवाद हर्पेन, मानव पृथ्वीकर
भाषा वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातली आहे. अजिंक्यराव पाटील यांनी बरोबर ओळखले. मी जे शब्द ऐकले ते लिहिले तेच लिहितो. कधी कधी गडबड होते.

भंडारा गोंदिया या जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाडीबोली बोलली जाते. ती वेगळी आहे.

चंद्री नावाची गाय आमच्याकडे होती. ती अशीच गायब व्हायची एक दिवस कायमची गायब झाली. खूप वर्षे होती.

कथा आवडली Happy

एक दिवस कायमची गायब झाली. >> कुठे गेली म्हणायची? तुम्ही शोधली नाही का? Sad

धन्यवाद विनिता.झक्कास
शोध घेतला पण नाही सापडली. आता त्या घटनेलाही २२ वर्षे झाली.

परत एकदा धन्यवाद अजिंक्यराव पाटील
जनावर कधी कोणत्या रोगाने त्रस्त होतील सांगता येत नाही. जपावे लागते

धन्यवाद म्हाळसा
नेहमीच्या बोलण्यातली भाषा नसल्याने कधी कधी भाषा वाचायला वेळ लागतो.