ढीग

Submitted by पूजा जोशी on 2 September, 2020 - 11:35

ढीग
कोरोनाव्हायरस चा प्रसार झाला आणि लॉकडाऊन ने घरोघरी भांड्यांचा कपड्यांचा ढीग जमू लागला. तसा तो आमच्या ही घरी जमतोय आणि तो निस्तरताना नाकीनऊ येत आहेत.

याबरोबर आमच्याकडे प्रश्नांचा ढीग ही वाढत चालला आहे. त्याचं असं झालं की लॉक डाऊनच्या फार फार पूर्वी मी चिरंजीवांना टीव्हीवरचे रटाळ कार्यक्रम बघण्या वरून उपदेश करायचे आणि बातम्या बघाव्या चांगल्या मुलाखती ऐकाव्या अशाच सतत सूचना करायचे.

तेच बहुतेक आता अंगाशी आलं आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून घरात विशेष काही करण्यासारखा नसल्यामुळे चिरंजीव इमानेइतबारे बातम्या ऐकतात मुलाखती बघतात. आणि मग सुरू होते प्रश्नांची सरबत्ती.

प्रत्येक टीव्ही चॅनल वरती येणाऱ्या आर्थिक संकटाबद्दल चर्चा होते. तिथे अनेक ज्ञानी मंडळी बोलावली जातात. काही अर्थतज्ञ तर काही सल्लागार. मग पहिला प्रश्न येतो चिरंजीवानकडून "जे आर्थिक तज्ञ आहे ते सल्ले देत नाहीत का? आणि सल्ले देतात ते आर्थिक तज्ञ नसतात का? मग अशी वेगवेगळी उपाधी कशासाठी? "

मग आधी त्यांची चर्चा ऐकू आणि नंतर या विषयावर आपण चर्चा करू असे सांगून मी वेळ मारून नेते. पण मग लगेच पुढचे प्रश्न येतात चलन फुगवटा म्हणजे काय? दरडोई उत्पन्न म्हणजे काय? रुपया घसरला म्हणजे काय झालं? बाजारने नीचांक गाठला म्हणजे काय झालं? घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत म्हणजे काय? यादी काही संपत नाही.

बरं आपण पेशंन्सनी सगळं समजावून सांगितलं तर पुढचे प्रश्न सुरू.... आपलं दरडोई उत्पन्न किती आहे? रुपया घसरल्याचा आपल्याला फायदा आहे की तोटा? एक ना अनेक. तरी बरं मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्याच्या प्रश्नांची काही ना काही तरी उत्तरं, बहुतांशी बरोबरच देऊ शकते.

पण जर हे असंच चालू राहिलं तर बहुतेक मला माझ्या ऑफिसला कळवावे लागेल की मी वर्क फ्राॕम होम करते आहे पण माझं काम इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणून डिक्लेअर करा आणि मला ताबडतोब ऑफिसचा बोलवून घ्या. नाहीतर या ढिगाऱ्यामधे मी हरवून जाईन.

यातला विनोदाचा भाग सोडून द्या पण अशा संकटसमयी आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यात आपल्या मुलांचा खूप मोठा वाटा आहे. नीलचे प्रश्न न संपणारे असले तरी ते मला सतत बिझी ठेवतात आणि म्हणून मी त्याची ऋणी आहे.

चला पूजाबाई लिखाण काम काय करत बसलात कितीतरी ढिग उपसायचेत अजून.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults