माझ्याशीही बोलत नाही--

Submitted by निशिकांत on 30 August, 2020 - 12:02

( तरही. मतल्यातील उला मिसरा प्रसिद्ध गझलकार श्री राज पठाण यांचा. )

कुणास सांगू व्यथा मनाची?, कुणीच येथे ऐकत नाही
अबोल इतका अंतरात, मी माझ्याशीही बोलत नाही

उगाच म्हणती काळ कधीही कोणासाठी थांबत नाही
एकलकोंड्या जिवास माझ्या, वेळ सरकता सरकत नाही

वळून बघता आयुष्या रे! ग्रिष्म असोनी हिरवळ दिसते
कांही केल्या आठवणींची नशा उतरता उतरत नाही

"जन्मू द्यावे का नाही?"चे उत्तर बहुधा "नाही" असते
गर्भीच्या स्त्रीभ्रुणास होते घालमेल जी बघवत नाही

पायथ्यास बसले पांडव अन् उशास बसले कौरव शंभर
कृष्ण आजचा लाच न घेता कधी पारडे झुकवत नाही

बाग बहरली कळ्या फुलांनी, तुळशीची मंजिरी हरवली
सौंदर्याची हाव, कुणीही प्रासादिकता शोधत नाही

मुले विदेशी, घरी सुबत्तेसवे पोकळी नांदत असते
आनंदाचा लेप लाउनी, दु:ख मनीचे झाकत नाही

अजब जाहले! वादळ आले करार करण्या शांतीसाठी
पाश्चातापाविना कुणीही सन्मार्गाला लागत नाही

भार घेउनी इतरांचा तू, नकोस रे! "निशिकांत"वावरू
देव करो काळजी जगाची, माणसास ते शोभत नाही

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणास सांगू व्यथा मनाची?, कुणीच येथे ऐकत नाही
अबोल इतका अंतरात, मी माझ्याशीही बोलत नाही

उगाच म्हणती काळ कधीही कोणासाठी थांबत नाही
एकलकोंड्या जिवास माझ्या, वेळ सरकता सरकत नाही

खूप आवडल्या या ओळी..... अप्रतिम