पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - मोक्षदा मोदक - मंजूडी

Submitted by मंजूडी on 29 August, 2020 - 05:07

घरात खप नसलेले परंतु टाकून द्यायचं जीवावर आलेल्या पदार्थांना मोक्ष देणारे "मोक्षदा मोदक" Proud

ही खरी मँगो कलाकंदाचीच पाककृती, सर्वांच्या माहितीची आहेच. इथे स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणून त्याचे नेहमीसारखे पेढे न करता मोदकांसारखा आकार दिला आहे.

गणपतीच्या निमित्ताने घरी उत्तम प्रकारचा खाऊ येतो. प्रसाद म्हणून वाटला तरी तो सगळा संपतो असं नाही. काही पदार्थ घरच्यांच्या विशेष आवडीचे नसतात. काही पदार्थ नव्याची नवलाई संपेपर्यंत कौतुकास पात्र ठरतात, मग बॉक्सच्या तळाशी, कडेकडेला वगैरे केविलवाणे जमून राहतात. ते खराब होऊ नयेत म्हणून त्यांची रवानगी फ्रिजमधे केली तर त्यांचं मूळ रूप, स्वाद, गंध सगळंच हरवून जातं. त्यामुळे ते खराब व्हायच्या आत मुखी लागण्यासाठी फार सुगरणगिरी करावी लागते. त्यातलाच एक प्रयोग गणेशोत्सवाच्या निमित्ताने इकडे देते आहे.

बदामी हलव्याचे चार पापुद्रे घरात होते. कालचं थोडं दूध पण शिल्लक होतं. ते दूध उकळून थोडं थोडं लिंबू पिळत फाडलं आणि पनीर गाळून स्वच्छ धुवून घेतलं. ते साधारण पाऊण वाटी पनीर झालं. बदामी हलव्याचे तुकडे आणि पनीर एका पॅनमधे एकत्र करून मंद गॅसवर परतायला ठेवलं.

IMG_20200829_131303.jpg

मग त्यात डीपफ्रिजमध्ये ठेवलेले आंब्याचे तुकडे घातले.

IMG_20200829_131543.jpg

मिश्रणातलं पाणी आटत आल्यावर त्यात दोन चमचे मिल्क पावडर घातली.

IMG_20200829_142851.jpg

सगळ्या मिश्रणाचा गोळा होऊन पॅनमध्ये एकत्र झाल्यावर गॅस बंद केला आणि परतणं चालूच ठेवलं.

IMG_20200829_142915.jpg

हाताला सोसेल एवढं कोमट झाल्यावर इथे फोटो देण्यासाठी ६ मोदक केले, कारणं तेवढंच मिश्रण कसंबसं शिल्लक राहिलं होतं, बाकीचं सगळं मिश्रण घरातल्या वासावर असणार्‍या मंडळींनी वाटीत घेऊन सोफ्यावर मांडा ठोकून खायला सुरूवात केली होती Proud

IMG_20200829_142934.jpg

फोटोसाठी म्हणून खास त्यावर केशर सिरपचा थेंब घालून फोटो घ्यायचा प्रयत्न केला, पण टायमिंग न जुळल्याने तो अयशस्वी झाला आहे Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.