पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे, तिखट रस्सा मोदक, म्हाळसा

Submitted by म्हाळसा on 24 August, 2020 - 22:20

दोन दिवस गोड मोदक खाऊन घसा खवखवला असेल तर हा घ्या..तिखट, झणझणीत, रसरशीत असा मोदक रस्सा.

सारणासाठी लागणारे साहित्य -
१ वाटी चिरलेला कांदा, १ वाटी किसलेलं सुकं खोबरं, २ चमचे तीळ, १ चमचा खसखस, ५-६ पाकळ्या लसूण, मीठ, गरम मसाला पावडर १/२ चमचा, थोडीशी कोथिंबीर

पारीते साहित्य -
१ चणाडाळीचे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ, मीठ, तेल, हळद, लाल तिखट

रस्स्यासाठीचे (काही जणं हे ‘रस्त्यासाठीचे’ असेही वाचतील :)) साहित्य -
जीरे, अर्धा वाटी चिरलेला कांदा, पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, २ चमचे डाळे, २ पळ्या तेल, २ मोठे चमचे लाल तिखट , १ मोठा चमचा मालवणी मसाला/काळा मसाला, कोथिंबीर

पटापट कृतीकडे पळूयात -

रेसिपी अगदी सोप्पीए ओ.. मोदक म्हंटलं की सासू आणि आई उगाचच बाऊ करतात असं वाटतं..
ही रेसिपी पूर्वी ह्या दोघींनाही शिकवून झाली आहे, त्यामुळे आता जगात कोणालाही शिकऊ शकेन इतका आत्मविश्वास वाढला आहे..
यापूर्वी जर तुमच्याकडे कोणीही असा ‘तिखट रस्सा मोदक’ खाल्ला नसेल तर बिंधास्त किचनच्या रणांगणात उतरा आणि मसाल्याचा धुराळा उडवायला सज्ज व्हा..

सर्वप्रथम पेटत्या शेगडीवर कढई ठेऊन चमचाभर तेलात चिरलेला कांदा, किसलेलं खोबर, तीळ, खसखस, लसूण हे सगळं एकत्र न भाजचा, एका वेळेस एक या पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर भाजलेलं जिन्नस, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरला फिरवायचं. सारण तयार.

पारीसाठीचे साहित्य एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावं. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून पारी लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक बनवणं उकडीच्या मोदकापेक्षा २१ पटीने सोप्पा आहे यांत मुळीच शंका नाही पण तरीही आकार न जमल्यास चिंता नसावी.. पूर्वी अशा मोदकाला पूर्णपणे रस्स्यात बुडवून लपवण्याची कामगिरी फत्ते केलेली आहे.

आता रस्स्यासाठी थोड्या तेलात कांदा, खोबरं,डाळे खरपूस भाजून घ्या. मिक्सर मधे बारीकसर वाटून घ्या आणि कढईत तेल ओतून त्यात छान परतून घ्या.. लाल तिखट, मसाला पावडर घालून तेल सुटेपर्यंत हलवा ..गरम पाणी ओतून मीठ घालून एक उकळी काढा..त्यानंतर रस्स्यात मोदक सोडून झाकण ठेऊन १५ मि. शिजू द्या.. रस्स्यातले मोदक थुईथुई नाचू लागले की पेटलेली शेगडी बंद करा..शेवटी कोशिंबीर घालून सजवा.

महत्वाचा सल्ला - पूर्वी असाच अफलातून ‘रस्सा मोदक’ आई आणि सासूला खाऊ घातल्याची आठवण झाली.. माझ्या आईकडे कौतुकाची कायमच टंचाई म्हणून तिच्याकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष फेकत आपली नजर सासूकडे वळवली होती.. सासूने मस्त चपातीचा घास रस्स्यात मुरगळत, मोदकाचा लचका तोडत तोंडात गडप केला.. तीच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव तिखट मोदक आवडल्याची साक्ष देत होते.. तोंडातला घास संपताच आनंदाच्या भरात एखाद्या नवाबाप्रमाणे आपल्या गळ्यातील दोन पदरी सोन्याची माळ काढून माझ्याकडे भिरकावण्यासाठी वळलेले हात बघून माझ्या मनातले मोदक थुईथुई नाचू लागले.. पण तितक्यात “रस्स्यात मीठ थोडं कमी आहे” म्हणत माशी शिंकावी तशी आयशी शिंकली.. सासूनेही लगेचच गळ्याजवळचा हात मीठाच्या बरणीकडे वळवत कधी नव्हे ते आईच्या ‘हो’ ला ‘हो’ दिला.. म्हणून मीठाकडे खास लक्ष द्यावे.

F95B975C-B46A-4C24-B77C-1CE7B3543036.jpegAC549EBA-9532-4369-8DAA-CD07958797B0.jpeg6E69ACAE-9BF8-4A76-9B45-1AC81E245D61.jpeg37F9DE3B-53F6-49A6-9754-158EC3EDC693.jpeg

सकाळी ॲलेक्सावर अरूण दाते यांच्या आवाजातलं “दिवस तुझे हे फुलायचे“ गाणं ऐकत ऐकत तिखट मोदकाचा घाट घातला.. मग तेव्हाच थोडंसं विडंबन सुचलं आणि दिवसभर तेच विडंबन ऐकवून नवरोबाला छळलं..आता थोडंसं माबोकरांनाही छळायची इच्छा झाली आहे Happy

(चालीत म्हणा)

दिवस आले हे खादाडीचे
तिखट मोदक हादडायचे

कांदा थोडा चिरून घेणे
खोबरं पण किसून ठेवणे
कढईत ह्याला परतायचे
पाट्यावर ठेऊन वाटायचे

बेसण घ्या घट्ट मळून
पारी पण घ्यावी जरा लाटून
अलगद सारण भरायचे
कळ्यांचे मोदक बनवाऽऽयचे

तिखट झणझणीत सार
सोसेना मोदकाचा भार
चमच्याने चाटून बघायचे
झाकण ठेऊन उकळायचे

माझ्या ह्या ताटाच्यापाशी
थांबते मी पण जराशी
फोटो जरा टिपून काढायचे
तिखट मोदक हादडायचे

दिवस आले हे खादाडीचे
तिखट मोदक हादडायचे

————————-
सर्वांना गणेश चतुर्थीच्या मोदका सारख्या झणझणीत आणि रश्श्यासारख्या रसरशीत शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्वांचे मनापासून धन्यवाद.
सारण कसले केलेय??>> मासवडी मधे जे सारण भरतात तेच कांदा,खोबरं, तीळ घालून बनवलेलं सारण वापरलंय.
रेसिपी लवकरच इथे टाकते.

Lol मस्त!
रेसिपी म्हणजे सारणावर अजुन एक कडवं टाका की झालीच रेसिपी.

आणि हे खायचे कसे म्हणजे भातासोबत, चपाती बरोबर, नुसतेच स्टार्टर म्हणून ते पण सुचवा

रेसिपी म्हणजे सारणावर अजुन एक कडवं टाका की झालीच रेसिपी>> हो टाकते की .. मात्र असं विडंबन वाचून तयार झालेल्या मोदकावर घरच्यांनी विडंबन केलं तर मला सांगू नका Happy

आणि हे खायचे कसे म्हणजे भातासोबत, चपाती बरोबर, नुसतेच स्टार्टर म्हणून ते पण सुचवा>> भाकरी, चपाती, भात, पाव .. कशा बरोबरही खा.. तेवढं चहात टाकून खायचं मात्र टाळा Lol

तेवढं चहात टाकून खायचं मात्र टाळा Lol
>>>>
Proud
ऑलरेडी रस्सा दिसतोय त्यात.
सुके असते तर नक्की ट्राय मारली असती. निदान ते सारण पाहून तरी नक्कीच चहासोबत जातेय असे वाटतेय

लवकरच राले ट्रिप मारावी म्हणतोय. मोदक रस्सा खेचतोय मला>> तडक नीघून यावे.. एक मोदक आणि थोडासा रस्सा शिल्लक आहे.. आज तर अजूनच भारी लागेल.

रेसिपी पण भारीच आहे ,
खान्देशात म्हणे( मी खान्देशाची सुन आणी भाउ जावई असल्याने म्हणे जोडलय) हा स्पेशल पदार्थ जावयासाठी करतात, मोदकाची आमटी, पाटवड्याची आमटी हे सगळे निगुतिने करुन खाउ घालतात पण, तिकडे भाज्या फारश्या मिळत नसल्याने हा जुगाड जमवला असावा अस माझ आणि भावाच मत आहे आणी आम्हि ते दोघही आपाअपल्या अर्धागाना एकवत असतो.

भाज्या फारश्या मिळत नसल्याने हा जुगाड जमवला असावा >> मी खान्देशातली नाही पण काही काळ मेक्सिकोत काढला आहे.. तीथे भाज्यांचा तुटवडा असायचा त्यामुळे अशा जुगाडू रेसिपींज आता जास्त जवळच्या वाटतात Happy

खुसखुशीत लेखन, फोटो एकदम सही, तोंडाला पाणी सुटले.

कोणी करून दिले तर खाऊ. फार मेहनत आहे यात. उकडीचे सोपे वाटतात मला यापुढे. अर्थात उकडीचे करायला आवडतात पण फार गोडखाऊ नसल्याने, खायला असे मोदक आवडतील.

रस्स्यासाठीचे (काही जणं हे ‘रस्त्यासाठीचे’ असेही वाचतील :)) >>> त्यावेळी मीही असंच वाचलेलं.

खुसखुशीत लेखन, फोटो एकदम सही, रस्स्याला जसे तेल तसे तोंडाला पाणी सुटले. Happy
फक्त एवढेच करून स्वयंपाकाला सुट्टी घ्यावी लागेल ! वन डिश मिल होईल का गं हे ?

अर्थात उकडीचे करायला आवडतात पण फार गोडखाऊ नसल्याने, खायला असे मोदक आवडतील. >> मी पण गोडखाऊ नाही म्हणूनच असे सगळे प्रकार बनवत असते .. तसही चांगलं खाण्यासाठी थोडीफार मेहनत घ्यावीच लागते Happy

फक्त एवढेच करून स्वयंपाकाला सुट्टी घ्यावी लागेल ! वन डिश मिल होईल का गं हे ?>> अगं इतकं वेळ खाऊ प्रकरण नाहीए.. अगदी पाऊण तासात तयार होतं.. भाकरी, पोळी बरोबर मस्त लागतं.

तसही चांगलं खाण्यासाठी थोडीफार मेहनत घ्यावीच लागते >>> वेगळे प्रकार करते हो मी तिखट मोदकांचे, उकडीचे तळणीचे दोन्ही करते विविध सारणे करून. जरा कमी मेहनतीचे Wink .

इथे चांगलं म्हटलंय तुम्ही ते चमचमीत या अर्थी असावं बहुतेक. कारण गोड पदार्थ पण चांगले असतात फक्त मी गोडखाऊ नाही.

आई शपथ ! तोंडाला पाणी सुटलं , मोदक मस्तच आणि लिखाणाची स्टाईल हि मस्त !
रस्स्यातले मोदक >> मी खरंच रस्त्यातले वाचलं
मस्त आहे आयडिया ! मी करून बघेन असं वाटतंय , पण रश्या ऐवजी गरम तेलात तळेन म्हणते Wink

महाळसा मोदक मस्त दिसतायत. रस्सा भारी आहे झणझणीत..मी करून बघेन. मी ते मोदक फक्त तळून त्याचे असेच स्टार्टर म्हणून खाईन आणि थोडे रस्स्यात टाकेन..आणि उरलेला रस्सा दुसऱ्या दिवशी पोहयावर वापरेन..

४ /५ मोदक कढी मोदक ( कढी पकोडे ) करेन.

४ /५ मोदक कढी मोदक ( कढी पकोडे ) करेन.>> हो अक्चुअली मी आत्ता हाच विचार केला कि लहान लहान मोदक स्टार्टर्स म्हणून किंवा कढीगोळे / कोफ्ता करी करतो तसे करता येतील आणि शिवाय नुसते तळून सुद्धा मस्त लागतील !!

सर्वात आधी काय बघितलं असीन तर शेवटी जाउन हे बघितलं कि म्हळसाबाईंनी आमचा पोपट तर नाही ना केलाय? नक्की तिखट मोदक रस्सा पाकृ आहे ना ही? तर हो बुवा Lol तर आता वाचते निश्चिंतपणे. मस्त दिसतय एकुण प्रकरण. करण्यात येतील मोदक. आणि कविता भारीच आहे.

तर शेवटी जाउन हे बघितलं कि म्हळसाबाईंनी आमचा पोपट तर नाही ना केलाय? >> Lol असं नका ओ म्हणू.. थोडासा विश्वास ठेवा गरीबावर

अगं, भाकरी ने तोंड पोळलय ना म्हणून मोदक फुंकून फुंकून खाते Lol आहे हो विश्वास तुझ्यावर म्हणून तर वाचली हि फर्मास रेसीपी.

वाह.. मस्तच हो. वाचताना तोंडाला पाणी सुटला.. नक्की try करेल.
सासूबाई आणि आई यांचा वर्णन आवडला न पटलं..

छान आहे रेसिपी! फोटो एकदम यम्मी दिसताहेत.
मधुराज रेसिपीमध्ये सिमीलर रेसिपी मोदकांची आमटी म्हणून आहे पण तुमची बरीच वेगळी आहे त्यापेक्षा!

Pages