लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- mi_anu

Submitted by mi_anu on 23 August, 2020 - 03:53

8 मार्च महिला दिन:
सीईओ भाषण करत होते.
"आजच्या दिवशी, एकमताने,तुम्हा सर्वांना हवीहवीशी गोष्ट म्हणून आपल्या ऑफिस मधल्या महिलांची इच्छा काय असेल?"
आणि आम्ही सगळ्या बायका एकमताने "वर्क फ्रॉम होम" म्हणून ओरडलो.शक्यतो इथे वर्क फ्रॉम होम दिले जात नाही.एक म्हणजे लोकांच्या नेटवर्क अडचणी आणि दुसरे म्हणजे एकंदर उत्पादन क्षमता.
"ते माझ्या हातात नाही.हे निर्णय मी ठरवत नाही.पण आम्ही गंभीर समस्यांसाठी, नवमातांना, काही अपघाताने घरी राहायला लागलेल्याना ते नक्की देऊ."
(इथे नियतीने नक्की हसून सर्वाना "लो अब भुगतो" म्हणून एक अदृश्य मिडल फिंगर दिले असावे."आपण काय मागतो ते खूप विचार करून, काळजीपूर्वक मागावं, ते आपल्याला काही वेगळ्या चुकीच्या प्रकारे मिळू शकतं" या अर्थाची इंग्लिश म्हण आहे.)

19 मार्च:
सगळ्यांना घरी थांबायला सांगीतलं आहे.आयटी टीम ची भाड्याने लॅपटॉप घ्यायची लगबग चालू आहे.सकाळी 9 ते रात्री 10. दिवस पुरत नाहीये त्यांना.जेवायला जायला वेळ नाही.डबा बाहेर काढला तितक्यात कोणी ना कोणी लॅपटॉप घ्यायला येतंय.भाड्याच्या घरात, पेईंग गेस्ट म्हणून कंपनी जवळ राहणारी बॅचलरं गोंधळली. घरी निघून जावं का?कंपनीने "घरी जाऊ नका, कोणत्याही दिवशी परिस्थिती सुधारेल आणि आम्ही ऑफिस मध्ये बोलावू" अशी तंबी दिली.सोसायटीत काही जणींनी घरगुती मदतनीस घरी बोलावणं बंद केलं.बाकीच्यांनी "काय बाई हे घाबरणं" म्हणून नाकं मुरडली.सोसायटीनेच पत्रक काढून सर्व मदतनीस, प्लम्बर, सुतार यांना यायला बंदी केली.

23 मार्च:
एक दिवस संचारबंदी करून संध्याकाळी टाळ्या आणि थाळ्या वाजवून निवांत झालेले लोक रात्री 3 आठवड्याच्या लॉकडाऊन ची घोषणा ऐकून हादरले.त्या पाठोपाठ विमानं, लोकल आणि बस बंद करण्याच्या बातम्या आल्या.फुटकळ कलाकारांच्या भूमिका केलेले, आपल्याला माहितीही नसलेले नायक नायिका एका पिक्चर ने रातोरात प्रसिद्ध व्हावे तसा संक्रांत हलव्याच्या आकाराचा हा करोना सर्वत्र दिसायला लागला, व्यापायला लागला."स्वाईन फ्लू पाहिलाच की आपण सगळयांनी.गेला ना तो 2 महिन्यात? इथे पण होईल सगळं नीट 1 मे पर्यंत." म्हणून घरी राहणं, मुलांच्या सुट्ट्या आणि आईबापांच्या त्यांच्या मागे पसारा न करण्या बद्दल, टीव्ही न बघण्या बद्दल कटकटी चालू झाल्या.

14 एप्रिल:
लॉकडाऊन क्र 2 चालू झाला.घरगुती मदतनीस केव्हाच बंद झालेत.सकाळी 25 मिनिटात व्हॅक्युम क्लिनरने झाडू आणि मॉप ने पोछा करायचं वेळापत्रक छान बसलंय.दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर भांडी घासायचा मात्र कंटाळा येतोय.त्यात भांडी कमी वापरायचे, पाणी कमी वापरायचे चांगले उपाय शोधले जातायत(तव्यात भाकरी+तव्यात बटाटा काचऱ्या+तव्यात मिरची खर्डा आणि नंतर तवा घासणे).मीटिंग साठी दुपारी अचानक बोलावणं आल्यावर न लाजता "15 मिनिटात भांडी घासून येते" म्हणून सांगता यायला लागलं.जास्त भांडी इतर कोणी वापरल्यास "गॅंग ऑफ वास्सेपूर" मधल्या सारख्या शाब्दिक मारामाऱ्या व्हायला लागल्या.ट्रॅफिक मधून जाण्याचा वेळ वाचल्याने कामात तो वेळ देता आला.कधीकधी कामाने झपाटल्याने रात्री जेवणं आवरून परत रात्री 1-2 पर्यंत काम करायची सवय लागली आणि झोपेचं गणित बिघडलं. लहान मुलं, वृद्ध सासू सासरे घरी असलेल्या बाया दिवसभर घरचे काम उपसून, ऑफिसचे काम पूर्ण करून मुलांच्या बरोबर शाळा करताना दमल्या."परिस्थिती सुधारेपर्यंत मला बिनपगार बेंचवर ठेवा" अशी विनंती करू लागल्या.फेसबुकवर वेगवेगळ्या आव्हानांनी धुमाकूळ घातला.साडी, दाढी, बर्म्युडा, दालगोना,पुस्तक,कविता, नाटक काही काही म्हणून सोडलं नाही.एखादं "खडूसपणा करण्याचं चॅलेंज" आपणच काढावं आणि आपणच जिंकावं वाटायला लागलं.(मागून घरातली लोकं "चॅलेंज काय, ते तर वर्षभर चालूच असतं तुझं" पुटपुटतायत.)
आम्ही सर्वांनी दर शनिवारी रात्री कोणतातरी जुना हिंदी पिक्चर सगळ्यांनी मिळून बघणं चालू केलं.आजूबाजूच्या बातम्यांनी 'उद्या असू किंवा नसू, आज एकत्र मजेत जगून घेऊ' असा काहीसा बॅकलॅश आला.

1 मे:
बॅचलर मंडळी वैतागलीत. घरी जायचा मार्ग नाही आणि जिथे रहातात तिथे भाज्या मिळणं बंद झाल्याने रोज नुसताच सांबार पोळी सांबार भात खावा लागतो.पेपर मधल्या बातम्या वाचून नव्याने डोकं बधिर होतं.
आपल्या घरातून बाहेर निघण्यावर, आपल्या पैसे खर्च करण्या वर किती मोठी सप्लाय चेन पोट भरतेय,आणि आता किती जणांच्या आर्थिक गणिताला खीळ बसलीय हे जाणवायला लागलं.घराकडे पायी जाणाऱ्या,आपला मोबाईल विकून कुटुंबाला पोटभर जेवण आणून देऊन आत्महत्या करणाऱ्या,कुटुंबासाहित आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या बातम्या वाचून श्वास अडकायला लागले.स्वतःच्या घरात निवांत बसून खाण्याची लाज वाटायला लागली.आणि याच बरोबर बाहेर जाऊन प्रत्यक्ष मदत शिबिरात सहभागी व्हायची भीतीही वाटू लागली.सहभागी होणाऱ्यांचं कौतुक वाटू लागलं.आपल्या पगारातला ठराविक भाग डोनेटमिल, मैत्री, सावली,इम्पॅक्ट गुरू,अक्षय पात्र ला देऊन काही अंशी ही टोचणी कमी करायची सवय लागली.एखादं ड्रग घेऊन जाणिवा बधिर कराव्या तसं जमेल तितकं दान करून "आपण जग,इकॉनॉमी परत सुधारू" असं स्वतःला समजावण्याची बधिरता जमायला लागली. हळूहळू "आपण जगाला वर आणू शकणार नाहीये.जग स्वतःच वर येईल.आपण त्यातल्या त्यात आपल्या जवळच्या गरजू माणसांना, कामवाल्या मावशींना, सिक्युरिटी ना मदत लागेल तशी करावी हे कळू लागलं.लहान मुलं सहलीला जातात तेव्हा ती हरवू नये म्हणून प्रत्येकाला एक 'बडी' मुलगा मुलगी दिलेला असतो आणि एकमेकांनी फक्त आपला बडी जागेवर आहे का,सहलीत कुठे हरवला नाहीय ना इतकी काळजी घ्यायची.म्हणजे असं करून सगळा ग्रुप न हरवलेला, सुरक्षित राहतो.तसे सगळ्या जगाने आपापल्या 'बडीज' ची काळजी घेतली तर या संकटालाही आपण परतवून लावू.

31 मे:
आता पुढचे काही महिने 30 दिवस मरमर काम करून 15 दिवसांचाच पगार मिळणार आहे.(टू बी फेअर,पगार तसा जास्त होता.कंपनी ला मीरूपी पांढरा हत्ती पोसणं जड जाणार हे नोकरी स्वीकारताना कळत होतंच. पण गंमत अशी की 6 महिन्यात परत नोकरी बदलून या पांढऱ्या हत्तीचा पांढरा पोलर बेअर झाला होता.) अर्थातच तरीही चिडचिड झालीच.कडक कॉफी पित घरातल्या इझी चेअर वर 'नोकरी बदलून चूक केली का,नसती बदलली तर आयुष्य कसं असतं' वगैरे फिरून फिरून त्याच वळणावर थांबणारे विचार करून झाले.
लिंकडईन, कॉग्नीझंट सारख्या कंपनी कर्मचारी कपात करतायत या बातम्या कानावर आदळत होत्याच.("बरं झालं, त्यानिमित्ताने भार हलका करता आला" असं यातले बरेच जण म्हणत होते) लिंकडईन वर रोज 10 या प्रमाणात "माझी नोकरी गेली, घरी मी एकटा कमावणारा आहे, मला डिप्रेशन आलंय, मला मदत करा" अश्या पोस्ट आणि त्यावर मदतीची एखादी आणि "कमेंटिंग फॉर बेटर रीच" च्या 99 कमेंटि बघायला मिळू लागल्या."उघड्याकडे नागडं गेलं" या म्हणी प्रमाणे "मॅम, माझ्यासाठी प्रयत्न करा" म्हणून रोज 5-6 फ्रेशर बाळांचे संदेश यायला लागले.(लिंकडईन वर एरवी फार विनोदी संदेश येतात.मन रमतं."आपण कॉफी प्यायला जाऊया का, मी केरळ मध्ये नवं मसाज सेंटर उघडलंय तिथे याल का, थोडे डोळे वर करून फोटो काढून तो प्रोफाइल वर टाकता का,माझ्या बिझनेस मध्ये पैसे गुंतवणार का" असे.ती करमणूक बंद होऊन आता खरेखुरे संदेश यायला लागले.)

13 जून:
पगार अर्धा झाल्याचा धक्का आता कमी झालाय.आम्ही अर्धे पगारकरी त्यावर विनोद करायला शिकलोय."काय मग, यावेळी किती टक्के व्हेरिएबल पे मिळाला?हॅ हॅ हॅ" वगैरे.
शिरीष कणेकरांच्या 'एकला बोलो रे' मध्ये एक अनुभव आहे.एकपात्री प्रयोग ते स्वतः करणार आणि मॅनेजरही ते स्वतःच.त्यामुळे बुकिंग कमी असेल तर तोट्याच्या दुःखात बॅक स्टेज ला बसण्याची चैन त्यांना करता यायची नाही."हळूहळू बुकिंग भरगच्च असेल तेव्हा 'त्यात काय मोठं' आणि चार पाच लोकांचं बुकिंग पूर्ण थिएटरमध्ये असेल तेव्हा या चार पाच जणांना परमेश्वर मानून अधिक झोकून देऊन एकपात्री प्रयोग सादर करणं जमायला लागलं" या अर्थाचं त्यांचं वाक्य आहे.तसं आपल्या कामाला ईश्वर मानून परिस्थिती सुधारेपर्यंत रिझ्युम मध्ये जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी येतील हे बघण्याची, पगार आणि काम हे दोन वेगवेगळे कप्पे ठेवण्याची, कामावरची निष्ठा या बाह्य गोष्टींनी जराही कमी न होऊ देण्याची मनाला सवय लागली.परिस्थिती सुधारेल तेव्हा उंच झेप घेण्यासाठी आता पंखात ताकत हवी.ती गोळा करायला हा उत्तम काळ आहे हे जाणवायला लागलं.उडणार किंवा लहानशी उडी मारून थोडेच पुढे जाणार.उडी मारायची जिगर मात्र हवी.ती गमावली की आपण भूतकाळ झालो.

1 जुलै:
"अनलॉक" चालू झालाय.पण क्वचित बाहेर जायची मुभा मिळाली तरी बाहेर जाऊन उध्वस्त भाड्याने देण्याच्या पाट्या असलेल्या दुकानांचे, बंद पडलेल्या हॉटेल्स, पार्लर्सचे अवशेष बघवत नाहीयेत.बाहेर गल्लीच्या टोकाला बसणारे चप्पल शिवणारे काका ऊन वादळ पाऊस प्रत्येक वेळी असायचे.खूप काम करायचे.आता ते दिसत नाहीयेत.कुठे गेले असतील?काही कामाने ऑफिस ला जाणं झालं तर समोरचा चहा टपरी वाला दिसत नाहीये.फूड कोर्ट मधले छोटे मोठे स्टॉल बंद आहेत.या सर्वांचं काय झालं?ते आपल्याला परत भेटणार आहेत का?त्यांचा दुसऱ्या काही धंद्यात जम बसला असेल का?या प्रश्नांची सध्याची उत्तरं कळली तर आपल्याला ती ऐकणं सहन होईल का?काही प्रश्न इतके मोठे असतात, उत्तरं इतकी कठीण असतात की ते प्रश्न नुसतेच आपल्या जागी सोडून द्यावे लागतात.उत्तरं काळ ठरवतो.नोकरीतली बॅचलरं आता आपापल्या खोल्या सोडून गावी निघून गेली.तिथून निदान कमी खर्चात, घरचं चांगलं खाणं खात काम करतात.खुश आहेत.असंच आयुष्य चालू राहावं, कमी खर्चात स्वतःच्या घरी राहून काम आणि पगार चालू राहावा असं त्यानाच वाटतंय.

15 ऑगस्ट:
आज 12 वर्षांत पहिल्यांदा सोसायटीचा स्वातंत्र्यदिन ध्वजवंदन कार्यक्रम झाला नाही.तुपातलं सुंदर शुद्ध हिंदी बोलणाऱ्या, कार्यक्रमाचं सुंदर संचलन करणाऱ्या शर्मा भाभी,सर्वात कठीण शास्त्रीय नाच आणि गाणं मुलीला शिकवून तयार करणाऱ्या चॅटर्जी बाई, कार्यक्रमाला मनसोक्त नावं ठेवणाऱ्या मेहरा बाई,कितीही व्यस्त असले तरी 5 मिनिटांची हजेरी लावून जाणारे नगर सेवक,प्रसंगी 2 वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या वेळी बोलावलेले 2 नगर सेवक एकदम आल्याने दोघांना वेगवेगळ्या जागी मॅनेज करणारे सोसायटी मंडळ, हे सगळेच यावेळी निवांत आहेत.गच्चीवर जमून 9 ला राष्ट्रगीत म्हणायला आम्ही तीनच कुटूंब आलोय.बाकी लोकांना मेसेज टाकूनही आले नाहीत("येणार कसे?यावर्षी छोले पुरी मिळणार नाहीये ना राष्ट्रगीतानंतर" असं आलेली कुटुंबं पुटपुटतायत.)

22 ऑगस्ट:
विघ्नहर्ता गणेशाचे आगमन झाले.आम्ही गणेशमूर्ती निवडताना आधी मूर्तीचे डोळे बघतो.सगळ्याच मूर्ती सुंदर असतात.पण एखाद्या मूर्ती च्या डोळ्यात 'मी तुमचाच' असे भाव दिसतात आणि सर्वानुमते तीच मूर्ती बुक होते.स्थापनेनंतर मूर्तीच्या प्रेमळ डोळ्यात बघताना त्यात एक आश्वासन उगीचच दिसायला लागलं.
परिस्थिती जादूने काही महिन्यात सुधारणार नाहीये हे आता सर्वांनी स्वीकारलंय.'चिंता करतो विश्वाची' म्हणत पूर्ण विश्वाचं कल्याण करणारे आपण नाही, आपण स्वतः आणि जवळपासचे बघावे हेही आता माहिती झालेय.जग सुधारेल.इकॉनॉमी वर नक्की येईल.केव्हा ते माहीत नाही.तोवर जग हे सगळ्यांसाठी आहे, एकमेकांना धरून या प्रलयातून पुढे यायचंय आणि यावर्षी खंबीरपणे रेटून उभं राहायचंय,या वावटळीत तग धरायचाय.नवे धुमारे नक्की फुटणार.परिस्थिती बसून राहणार नाही.तोवर एकमेकांना आधार देत मुळं मजबूत करत राहुयात.
घरी राहूया, सुरक्षित राहूया, आणि आपण सुरक्षित राहावं यासाठी बाहेर राहणाऱ्याना,अहोरात्र खपणाऱ्याना सन्मानाने वागवूया!!

"दरिया हो या पहाड़ हो टकराना चाहिए
जब तक न साँस टूटे जिए जाना चाहिए
यूँ तो क़दम क़दम पे है दीवार सामने
कोई न हो तो ख़ुद से उलझ जाना चाहिए"
-निदा फ़ाज़ली

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.बाहेर गल्लीच्या टोकाला बसणारे चप्पल शिवणारे काका ऊन वादळ पाऊस प्रत्येक वेळी असायचे.खूप काम करायचे.आता ते दिसत नाहीयेत.कुठे गेले असतील? >> असे खूप जण दिसेनासे झालेत. तेव्हा जाणवत नव्हते, पण आता त्यांच्या रिकाम्या जागा बोचतात एकदम!

सर्व चांगले होईल हाच विश्वास बाळगून पुढे चलूयात.
अनू, चांगले लिहीलेस.

खूप आधीच वाचलेलं, आत्ता पोचपावती देते, वाचलं आवडलं. तुझ्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळं लिहिलंय, हे देखील आवडलं.

छान लिहिले आहे , आवडले
सर्वांचे अनुभव सारखेच असताना , अनुभवात काहीही शॉक व्हॅल्यू नसताना ही वाचकांचा इंटरेस्ट शेवटपर्यंत टिकून राहतो हे लिहिणार्याचे कसब आहे Happy

छान लिहले आहे.
काही काही ठिकाणी तर एकदम अगदी अगदी झालं.

१० मार्च पासुन ऑफिसात कोणत्याही बाहेर च्या व्यक्ति ला प्रवेश नव्हते. १६ मार्च पासुन ऑफिसात १०% उपस्थिती होती. ११ मार्च ला ऑफिस मध्ये मास्क वाटप झाले होते. खबरदारी ची उपाय योजना म्हणुन अटेंडेंस चे फिंगर प्रिंट स्कॅनिंग मशीन बंद केले होते. रिसेपशन मध्ये सॅनिटायझर चे बॉटल ठेवले गेले. २० मार्च ला आम्ही ऑफिस मध्येच होतो. संध्या ४ च्या सुमारास सर्कुलर आलं, अनटील फर्दर नोटीस एव्हरीबॉडी विल बी वर्किंग फ्रॉम होम. सगळे ट्रॅवल प्लॅन्स रद्द झालेत. तेव्हा असं जरा सुध्दा मनात आले नाही कि दिस वुड एक्स्टेंड दिस लाँग.

एप्रिल महिन्यात नॉर्मल वर्क फ्रॉम होम चालु होतं, मग जेव्हा स्थलांतरचे बातमी येऊ लागले तेव्हा मात्र पोटात गोळा आलं, दिस इज वेरी सिरीयस, इट्स बिकमींग मोर मर्कियर.

ग्रोसरी स्टोअर मध्ये हे वाक्य माझ्या सहित पुष्कळ जणांच्या तोंडी होतं : I’ll call you back, I’m at the grocery store.

सॅनिटायझर किंवा ग्लोव्स घ्यायला गेले असता फोन आले कि आय अ‍ॅम अ‍ॅट दी फार्मसी स्टोअर म्हंटल कि लगेच समोरुन विचारणा होई, ऑल वेल ना.

फोन वरचे संभाषण सुध्दा शेवटी ला सी या म्हणुन नाही तर टेक केर, बी अ‍ॅट होम अ‍ॅन्ड बी सेफ असे होते.

ऑफिस चा गणेशोत्सव असतो, रोज आरती असते, गुगल मीट वरुन सगळे हजर असतात, काही निवडक कर्मचारी आहेत ऑफिस मध्ये ते सगळं करतात.

ऑफिस च्या इमारती समोर खाण्या पिण्याची रेल चेल होती, जे ५ - ६ जण ऑफिस ला येतात, त्यांना खाली बाहेर जाण्याची परवांगी नाही. त्यांच्या कडुन समझले, आता एखादं दुसरं टपरी किंवा वडा पाव ची हाथ गाडी आहे.

टेरिब्ली मिसिंग ऑफिस.

Pages